दिवड : याला पाणदिवड किंवा विरोळा असेही म्हणतात. हा बिनविषारी साप असून कोल्यूब्रिडी सर्पकुलातील कोल्यूब्रिनी या उपकुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव नट्रिक्स पिस्केटर आहे. हा सपाट प्रदेशात राहणारा साप आहे, पण तो डोंगराळ भागात १,९२० मी. उंचीपर्यंत आढळतो. भारतात हा सगळीकडे सापडतो. पाण्याजवळ व पाण्यात राहणारा असल्यामुळे डबकी, भाताची खाचरे, नद्या, नाले, ओढे, तलाव यांत किंवा यांच्या जवळपास तो नेहमी असतो.

हा एक मध्यम आकारमानाचा राकट साप आहे. नराची लांबी ९०–१०० सेंमी. असून मादीची १२० सेंमी. पर्यंत असते. शेपूट शरीराच्या लांबीच्या एक-चतुर्थांश ते एक-तृतीयांश असते. पाठीवरच्या प्रत्येक खवल्यावर कणा असल्यामुळे ती खरखरीत लागते. पाठीचा रंग पिवळा किंवा गर्द तपकिरी हिरवा असून तिच्यावर काळे चौकोनी ठिपके असतात. यांची एक ओळ पाठीच्या मध्यावर असते या ओळीच्या दोन्ही बाजूंना एकेक ओळ असते. आणि प्रत्येक पार्श्व (बगलेच्या) बाजूवर एक असते. पुष्कळदा हे ठिपके एकमेकांना चिकटलेले असतात. या पाच ओळींतील ठिपकांच्या मांडणीमुळे बुद्धिबळाच्या पटाचा भास होतो. पोट पिवळसर पांढरे असते. डोके तिकोनी व डोळे मोठे असतात प्रत्येक डोळ्याच्या मागून एक बारीक, तिरकस, काळी रेघ निघून मागे वरच्या जबड्याच्या शेवटापर्यंत जाते.

फुरशाप्रमाणेच [⟶ फुरसे] क्षुल्लक कारणांवरून चवताळणारा हा साप आहे. चावताना नागाप्रमाणे [⟶ नाग] शरीराचा पुढचा भाग उभारून जोराने प्रहार करून तो दंश करतो. हा अतिशय चपळ आणि तडफदार साप आहे. सामान्यतः दिवसा दिसतो. पाण्यात हा फार जलद पोहतो. बेडूक आणि मासे यांवर हा आपली उपजीविका करतो. बेडूक तोंडात पकडल्यावर तो मरण्याची वाट न पाहता हा त्याला जिवंत गिळतो. पावसाळ्यात बेडूक सगळीकडे आढळत असल्यामुळे त्याच दिवसांत हे सापदेखील पुष्कळ दिसतात. कडक उन्हाळ्यात हे साप ग्रीष्मसुप्ती (उन्हाळ्यात येणारी गुंगी अथवा झोप) आणि कडाक्याच्या थंडीच्या दिवसांत शीतसुप्ती (हिवाळ्यात येणारी गुंगी अथवा झोप) घेतात असे म्हणतात.

हा साप अंडी घालाणारा आहे. मादी साधारणपणे मार्च–एप्रिलच्या सुमारास ५०–७५ अंडी घालते आणि मे–जूनच्या सुमारास अंडी फुटून पिल्ले बाहेर पडतात.

दिवडाच्या वंशातील व त्याच्यासारख्या सवयींची आणखी एक साप सर्व भारतात आढळतो, याला बहुधा गवती साप म्हणतात.याचे शास्त्रीय नाव नट्रिक्स स्टोलेटा असे आहे. हा गरीब, निरुपद्रवी आणि बिनविषारी आहे.

पहा : ग्रीष्मनिष्क्रियता शीतनिष्क्रियता.

कर्वे, ज. नी.