गोरल : गो-कुलातील नीमोऱ्हीडस  वंशातील सस्तन प्राणी. याच्या दोन जाती आहेत, एक नीमोऱ्हीडस गोरल  आणि दुसरी नीमोऱ्हीडस क्रॅनब्रुकाय. पहिल्या जातीचा गोरल मँचुरिया, कोरिया, मंगोलिया, चीन, 

गोरल

उत्तर भारत व ब्रह्मदेश येथे आढळतो. भारतात तो पश्चिम हिमालय आणि काश्मीरात सापडतो. दुसऱ्या जातीचा गोरल तिबेट, आसाम आणि ब्रह्मदेशात राहणारा आहे. हे पहाडी प्राणी असून १,०००–२,५०० मी. उंचीवरील खडबडीत गवताळ टेकड्या आणि अरण्यांच्या जवळच्या खडकाळ जमिनी राहण्याकरिता पसंत करतात.

उत्तर भारतात आढळणाऱ्या गोरलच्या दोन प्रजाती आहेत. एकीला राखी गोरल व दुसरीला तपकिरी गोरल म्हणतात. पश्चिम हिमालय आणि काश्मीर या भागांत आढळणारा गोरल राखी गोरल होय. तपकिरी गोरल नेपाळ आणि सिक्कीममध्ये आढळतो. 

गोरलची ठेवण बोकडासारखी असते. शरीरावर लांब, भरभरीत, संरक्षक केस असून त्यांच्या खाली आखूड लोकरीसारखे केस असतात. मानेवर केसांचा झुबका असतो. डोक्यासकट शरीराची लांबी ०·९–१·३ मी. खांद्यापाशी उंची ६५–७० सेंमी. शेपूट आखूड असून ते ८–२० सेंमी. लांब नर व मादी या दोहोंनाही शिंगे असून त्यांची लांबी १३–१७ सेंमी. असते ती बुडाशी जाड व टोकाकडे निमुळती होत गेलेली असून मागे वळलेली असतात जवळजवळ सबंध शिंगावर कंगोरे असतात. वजन २३–३२ किग्रॅ. असते. राखी गोरलचा रंग पिवळसर करडा असून त्यात काळा रंग मिसळलेला असतो. खालच्या बाजूकडे हा रंग फिक्का होत जातो. हनुवटी, वरचा ओठ, जबड्याची खालची बाजू पांढरी असते. तपकिरी गोरलचा रंग सोनेरी किंवा तांबूस तपकिरी असून त्यावर काळे ठिपके असतात. पाठीवर मधोमध असलेला काळा पट्टा शेपटीच्या बुडापर्यंत गेलेला असतो. राखी गोरलच्या पाठीवर हा पट्टा असलाच, तर खांद्याच्या पलीकडे तो जात नाही. मांडीच्या मागच्या बाजूवर घोट्यापासून वर गेलेला काळा पट्टा असतो. शेपटीचे वरचे पृष्ठ काळे असते.

गोरल सकाळ-संध्याकाळ चरावयास बाहेर पडतो. दुपारी तो विश्रांती घेतो. ढगाळ हवा असेल त्या दिवशी तो दिवसभर चरतो. भोवतालच्या परिस्थितीशी त्याचा रंग इतका मिळताजुळता असतो की, त्याने हालचाल केली नाही, तर तो मुळीच दिसून येत नाही.

मादीला मे किंवा जून महिन्यात एकच पिल्लू (क्वचित दोन) होते. गर्भावधी (गर्भारपणाचा काळ) सु. सहा महिन्यांचा असतो. मादीला चार स्तन असतात.

दातार, म. चिं.