आंत्रांत्रनिवेश: आंत्राच्या (आतड्याच्या) एका भागाचा जवळच्या दुसऱ्या भागात प्रवेश झाला, तर त्या अवस्थेला आंत्रांत्रनिवेश असे म्हणतात. आंत्राचा जवळचा भाग दूरस्थ भागात प्रवेशित होतो. क्वचित उलट्या दिशेने म्हणजे दूरस्थ भाग जवळच्या भागात प्रविष्ट होतो. सदऱ्याची बाही दुमडीत असताना होणाऱ्या क्रियेसारखी ही क्रिया असते. सामान्यतः वयाच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षातील मुलांना होणारा हा रोग आहे. हा रोग क्वचितच होतो.

आंत्रांत्रनिवेशाचे मूळ कारण अज्ञात आहे. आंत्राच्या आत लोंबणारा मोड, जंतांची वेटोळी, अंकुराकार कर्कट (शरीरातील विशिष्ट पेशींच्या अत्याधिक वाढीमुळे निर्माण झालेली व शरीरास निरुपयोगी असणारी अंकुराकार गाठ), वसार्बुद (चरबीयुक्त पेशींची निरुपद्रवी गाठ) आणि मेकेल -अंधनाल (बालजीवाच्या पोषणास आवश्यक असणाऱ्या पीतक नावाच्या पदार्थाभोवतीचे आवरण व आतडे यांना जोडणारा कायम स्वरूपाचा व मेकेल या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखला जाणारा भाग) यांमुळे आंत्रांत्रनिवेशाला चालना मिळू शकते. ६ महिने वयापासून १२ वर्षांच्या मुलांमध्ये आंत्रांत्रनिवेशाचे प्रमाण अधिक दिसते. मूल बहुधा स्थूल व अधाशी असते. या वयात होणारा आहारातील बदल, विषाणूच्या (व्हायरसाच्या) संसर्गामुळे सुजलेली लसीकाक्षेत्रे (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांकडून म्हणजे ऊतकांकडून रक्तात जाणाऱ्या व रक्तद्रवाशी साम्य असलेल्या द्रव पदार्थांची क्षेत्रे) व ⇨ नीलारुणी रोगामध्ये आंत्रात झालेल्या रक्तस्रावामुळे लघ्वांत्राची (लहान आतड्याची) वाढलेली व अनियमित हालचाल आंत्रांत्रनिवेशाला पोषक ठरते.

आ. १. आंत्रांत्रनिवेशाचे भाग. (१) आत प्रवेश करणारा भाग, (२) परतून येणारा भाग, (३) बाहेरचा आच्छादक भाग, [१, २—आंतरनिविष्ट भाग ३—आंत्रांत्रधारक भाग].

आंत्रांत्रनिवेशातील पहिल्या म्हणजे आत प्रवेश करणाऱ्या व दुसऱ्या म्हणजे परतून येणाऱ्या भागाला मिळून आंतरनिविष्ट भाग असे नाव असून तिसऱ्या म्हणजे बाहेरच्या आच्छादक भागाला आंत्रांत्रधारक भाग असे म्हणतात.

आत शिरलेल्या आंत्रविभागाचा रक्तपुरवठा बंद झाल्यास आंत्रकोथ (आतड्यातील ऊतकांचा मृत्यू) होतो. कोथ तसाच राहू दिल्यास तो फुटून पर्युदरशोथ (उदरातील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पडद्यासारख्या थराची दाहयुक्त सूज) होतो.

आंत्रांत्रनिवेशाचे मुख्यत: तीन प्रकार आहेत : (१) लघु-लघ्वांत्र, (२) लघु-बृहदांत्र, (३) बृहत्-बृहदांत्र.

आ. २. आंत्रांत्रनिवेशाचे प्रकार. (अ) आंतरलघ्वांत्र, (आ) उंडुक-लघ्वांत्र, (इ) लघु-बृहदांत्र, (ई) उंडुकस्थ, (उ) बृहतू-बृहदांत्र.

लक्षणे: एकाएकी पोटात कळा येऊ लागतात. वांत्या होतात, मूल बेचैन होते. सुरुवातीला कळा थोड्या अवकाशाने येतात व मूल किंचाळते, पाय पोटाशी धरते. पुढेपुढे कळांची तीव्रता व पुनरावृत्ती वाढून मुलाला अवसाद (शॉक) होतो.

सुरुवातीला मलविसर्जन होते, पण पुढे १२ ते १४ तासांनी रक्तमिश्रित श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) पडू लागतो. त्याचा रंग काळसर व तो जेलीसारखा बुळबुळीत असतो. आंत्रावरोघाची (आतड्यातील पदार्थाच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची) लक्षणे दिसू लागतात. मलोत्सर्ग बंद पडतो, वाराही सरकत नाही. पित्ताच्या वांत्या होऊन पोट फुगते. चोवीस तासांनंतर केव्हा केव्हा ताप चढतो.

पोटाच्या उजव्या व वरच्या बाजूस केळ्याच्या आकाराची लांबट गाठ हाताला लागते. उजव्या व खालच्या बाजूस पोट अगदी रिकामे असते. गुदद्वारात बोट घालून तपासले असता बोटाला आंतरनिविष्ट भागाची शंखाकृती गाठ लागते.

क्ष-किरण परीक्षा : क्ष-किरण परीक्षेमध्ये उंडुक (मोठ्या आकाड्याचा पहिला गोमुखाकार व टोकाशी बंद असलेला भाग) सोडून इतरत्र पोटात वारा भरल्यासारखे दिसते. बेरियमाची बस्ती देऊन क्ष-किरण परीक्षेने लघु-बृहदांत्र आंत्रांत्रनिवेशाचे निदान नक्की करता येते. लघुलघ्वांत्र आंत्रात्रनिवेशाचे निदान नक्की करता येईलच असे नाही. काही वेळा बेरियम बस्तीच्या जोरानेच आंत्रांत्रनिवेश नाहीसा होतो.

चिकित्सा: निदान लवकर केल्यास रोग्याची शक्ती क्षीण होण्याच्या आधीच शस्त्रक्रिया करता येते. अन्यथा शस्त्रक्रिया करण्यापूर्वी द्राक्षशर्करालवण (ग्‍लुकोज-सलाइन) विद्राव नीलेमध्ये देऊन रोग्याची प्रकृती सुधारावी लागते. जठरात नळी घालून तेथील द्रव पदार्थ शोषून घेण्याकरिता योजना करावी लागते.

स्थितिक (पाण्याच्या साहाय्याने दाब देण्याच्या) पद्धतीने आंत्रांत्रनिवेश सोडविण्याचा प्रथम प्रयत्न करून बघतात. वर बेरियम बस्तीचा उल्लेख आला आहेच. तसाच लवण-विद्रावाचाही प्रयोग करून पाहतात. न साधले तर शस्त्रक्रिया करावी लागते. आत घुसलेला भाग आतड्यातून हळुवारपणे सोडवावा लागतो. गाईची धार काढताना जसे बाहेरून दाबून दूध काढतात तसा ग्रस्त भाग सोडवून घ्यावा लागतो. आंतरनिविष्ट आंत्राचा कोथ झालेला असल्यास तेवढा भाग कापून काढावा लागतो. उरलेला चांगला भाग जोडून घ्यावा लागतो.

सलगर, द. चि.