प्रदर : स्त्रियांच्या ⇨ योनिमार्गातून येणाऱ्या अपसामान्य पांढऱ्या स्त्रावाला ‘प्रदर’ म्हणतात. सर्वसाधारण भाषेत स्त्रिया याचा ‘अंगावर जाते’ असा उल्लेख करतात. कधीकधी स्त्रीरोगात नेहमी आढळणाऱ्या या लक्षणाला ‘श्वेत प्रदर’ किंवा पांढरी धुपणी या संज्ञाही लावतात. सर्वसाधारणपणे प्रमाणापेक्षा जास्त श्लेष्मल (बुळबुळीत) किंवा पूयुक्त व योनिमार्गावाटे बाहेर पडणाऱ्या स्रावाला प्रदर म्हणतात.

प्रत्येक स्त्रीच्या जननमार्गाचे काही प्राकृतिक (स्वाभाविक) स्त्राव असतात. योनिमार्ग प्रकोष्ठावर (प्रवेशद्वाराजवळील पोकळीवर) असलेल्या बार्थोलिन ग्रंथीचा (सी. बार्थोलिन या डॅनिश शरीरविज्ञांच्या नावावरुन ओळखण्यात येणाऱ्या ग्रंथीचा) स्राव, गर्भाशयाच्या ग्रीवेतील (मानेसारख्या भागातील) ग्रंथींचा स्त्राव, योनिभित्तीतील ग्रंथींचा स्त्राव व गर्भाशय-भिंत्तीचा स्त्राव हे सर्व प्राकृतिक स्त्राव होत. त्यांचा उद्देश जननमार्ग ओलसर ठेवण्याचा असतो आणि त्यांची स्त्रीस जाणीवही नसते. गर्भाशय ग्रीवेच्या स्त्रावाचे प्रमाण निरनिराळे असते व प्रत्येक स्त्रीमध्ये ऋतुचक्राप्रमाणे त्यात बदल होतो. गर्भारपण, लैंगिक व मानसिक उद्दीपन आणि अंडमोचनाच्या (परिपक्व अंड म्हणजे प्रजोत्पत्तिक्षम पेशी अंडकोशातून बाहेर पडण्याच्या) वेळी स्त्रावाधिक्य आढळते. या शरीरक्रियात्मक स्त्रावामुळे योनिमार्गाच्या संमुख भित्तीचे पृष्ठभाग एकमेकांजवळ असूनही  घर्षणविरहित राहतात. याशिवाय या स्त्रावाची अम्लता [pH मूल्य ४ ⟶ पीएच मूल्य] सूक्ष्मजंतूची वाढ रोखण्यास मदत करते. योनिमार्ग-भित्तीच्या उपकला अस्तराच्या (पातळ अस्तराच्या) कोशिकांचे (पेशींचे) सतत विशल्कन (झडून पडणे) चालू असते. या कोशिकांतील ग्लायकोजेनापासून योनिमार्गात नेहमी असणारे डीडरलीन सूक्ष्मजंतू (ए. डीडरलीन या जर्मन स्त्रीरोगतज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारे सूक्ष्मजंतू) लॅक्टीक अम्ल तयार करीत असतात. ही क्रिया रक्तातील ⇨ स्त्रीमदजन या हॉर्मोनामुळे (उत्तेजक स्त्रावामुळे) नियंत्रित केली जाते. लहान मुली व वयोवृद्ध स्त्रियांमध्ये लॅक्टिक अम्लाचे संरक्षण कमी पडल्यामुळे या वयोगटात योनिमार्गशोथाची (योनिमार्गाला दाहयुक्त सूज येण्याची) शक्यता अधिक असते. 

कारणे : प्रदराच्या कारणांचा विचार करण्याकरिता तीन वयोगट पाडता येतात. (१) बालवय, (२) जननक्षम वय (ऋतुकालाच्या सुरुवातीपासून ऋतुनिवृत्तीपर्यत) आणि (३) वयोवृद्ध स्त्रिया. 

(१) बालवय : बालवयात योनिच्छदामुळे (योनीचे बाह्यछिद्र अंशतः वा पूर्णपणे घट्ट बंद ठेवणाऱ्या पातळ पटलयुक्त घडीमुळे) योनिमार्गाचे उत्तम संरक्षण होते. नवजात अर्भकातील अक्षोभक व अल्पकाल टिकणारा योनिमार्गाचा स्त्राव शरीरक्रियात्मक असतो. मातेच्या रक्तातील स्त्रीमदजन गर्भाच्या रक्तातही शिरते. त्याच्या प्रभावामुळे गर्भाच्या योनिमार्गातील कोशिकांचे विशल्कन होत नाही परंतु जन्मल्याबरोबर अर्भकाच्या रक्तातील स्त्रीमदजनाचे प्रमाण घटते व कोशिका झडतात. कधीकधी हा स्त्राव रक्तमिश्रितही असतो. नवजात अर्भकातील स्त्रावाचे हे कारण मातेस समजावून सांगितल्यास तिची काळजी दूर होते.

अस्वच्छता, कुतूहल (बोटे घालणे वगैरे), बाह्य पदार्थ (उदा., पाटीपेन्सिलीचे किंवा काडीचे तुकडे) व घाण योनिमार्गात शिरणे जंतुसंक्रामणास कारणीभूत होतात. आंत्रमार्गातील (आतड्यातील) परोपजीवींची (जंत वगैरेंची) वाढ, रक्तक्षय (ॲनिमिया) आणि योनिमार्गाचा स्त्राव हे पुष्कळ वेळा एकाच वेळी आढळतात. यांशिवाय हस्तमैथुनाची सवय व आतून घालावयाच्या गलिच्छ चड्ड्या कारणीभूत असतात. विकृतिस्थान (रोगस्थान) बहुधा भग (जननेंद्रियाचा बाह्य भाग) हे असते. योनिच्छद अभंग असल्यास व बाह्य पदार्थाची शंका नसल्यास किंबहुना या वयातच जननेंद्रियाची प्रत्यक्ष तपासणी शक्य तो टाळावी.

(२) जननक्षम वय : प्राकृतिक ओलसरपणा ज्या स्त्रावामुळे उत्पन्न होतो तो स्वच्छ किंवा मलईसारखा अपारदर्शी असतो. तो अक्षोभक असून त्याचा चिकटपणा बहुतांशी गर्भाशय ग्रीवेच्या स्त्रावामुळे बनलेला असतो. प्राकृतिक स्त्रावामध्ये विकृतिजन्य बदल होण्याची अनेक कारणे आहेत. विकृतिजन्य स्त्रावालाच ‘प्रदर’ ही संज्ञा वापरावी व प्राकृतिक स्त्रावांचा उल्लेख ‘योनिमार्गाचा स्त्राव’ असा करावा, असे काही स्त्रीरोगतज्ञांचे मत आहे. जननक्षम वयातील प्रदराच्या कारणांचे वर्गीकरण रोगस्थान प्रकार व उपप्रकार यांनुसार खाली दिले आहे.

(अ) योनिमार्ग : सूक्ष्मजंतु-संक्रामण : (१) अविशिष्ट सूक्ष्मजंतु-संक्रामण (स्टॅफिलोकोकाय, स्ट्रेप्टोकोकाय, एश्वेरिकिया कोलाय इत्यादींमुळे होणारे संक्रामण), (२) गोनोकोकाय (परमा), (३) ट्रिकोमोनास व्हजायनॅलिस, (४) कॅन्डिडा अल्बिकान्स (मोनिलियासीस), (५) हीमोफायलस व्हजायनॅलिस, (६) उपदंशविरहित चामखीळ. 

प्रदरास कारणीभूत असणारे सूक्ष्मजीव : (अ) ट्रिकोमोनास व्हजायनॅलिस (उजवीकडे) व रक्तातील पांढरी कोशीका (आकारमानाच्या तुलनेसाठी) (आ) कॅन्डिडा अल्बिकान्स.

 बाह्य पदार्थ : (१) पेसरी (नेहमीची जागा सोडून मागे झुकलेल्या गर्भाशयास पूर्वस्थितीत ठेवण्याकरिता वापरण्यात येणारे व्हल्कनाइटाचे बांगडीसारखे उपकरण), (२) कापसाचा किंवा चिंधीचा बोळा. 

रसायनजन्य : (१) योनिमार्ग फवारण्याकरिता वापरलेली पूतिरोधक (सूक्ष्मजंतूची वाढ रोखणारी) औषधी द्रव्ये (२) योनिमार्गात ठेवण्याची संततिप्रतिबंधक औषधे. अर्बुदजन्य (नवीन कोशिकांची अत्याधिक वाढ झाल्याने होणाऱ्या गाठीमुळे उत्पन्न होणारा) व्रण. 

शस्त्रक्रियापश्च (शस्त्रक्रियेनंतर उत्पन्न होणारे) : कणोतक (जखम भरून आल्यानंतर तयार होणारा रक्तवाहिन्यायुक्त कोशिकासमूह). 

(आ) गर्भाशय ग्रीवा : (१) ग्रैव अपक्षरण (गर्भाशयाच्या बाह्य मुखाभोवतील कोशिकारचना बदलल्यामुळे लाल दिसणारा भाग) (२) चिरकारी (दिर्घकालीन) ग्रीवाशोथ. 

(इ) गर्भाशय : (१) गर्भपातानंतर आत राहिलेल्या गर्भधारणेचा अंश, (२) पूयगर्भाशय (गर्भाशयाच्या पोकळीत पूसंचय होणे), (३) कर्करोग. 

(ई) सार्वदेहिक : अस्थिमार्दव (या विकृतीत प्रदर हे एक प्रमुख लक्षण असते.) 

(उ) मनोनिर्मित : (१) वैवाहिक सलोख्याचा अभाव, (२) गर्भधारणेची भिती, (३) गुप्तरोगाची भीती, (४) कर्करोगाची भिती. 


ऋतुकालपूर्व वयात (ऋतुकाल सुरु होण्यापूर्वी काही दिवस अगोदर) पुष्कळ वेळा योनिमार्गाचा स्त्राव वाढतो. या वेळी दुय्यम लैंगिक लक्षणांची वाढ होत असते. स्त्रीमदजनाचे अविरोध आणि वाढीव उत्पादनाला कारणीभूत असते. कधीकधी या मुलीमध्ये जन्मजात ग्रैव अपक्षरणही असते. हा स्त्राव अक्षोभक, गंधरहित, स्वच्छ व चिकट असतो. संक्रामणाची इतर कोणतीही लक्षणे (उदा., खाज सुटणे वगैरे) आढळत नाहीत.

(३) वयोवृद्ध स्त्रिया : ऋतुनिवृत्ती काळ जवळ आला असताना किंवा ऋतुनिवृत्तीनंतर प्रदर उद्‍भवू शकतो. जननमार्गाचे वार्धक्यजन्य निवर्तन (अंतस्त्यांचे व ऊतकांचे वार्धक्यामुळे होणारे प्राकृतिक संकोचन अंतस्त्य म्हणजे अंतर्गत इंद्रिय आणि ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह) प्रत्येक स्त्रीमध्ये निरनिराळे असते. जेव्हा हे निवर्तन अतिशय जलद होते तेव्हा योनिमार्ग-भित्तीवरील उपकलास्तर कोशिका अधिक झडतात व हा थर पातळ बनतो. यामुळे सूक्ष्मजंतुसंक्रामणाची शक्यता वाढून वार्धक्यजन्य योनिमार्गशोथ उद्‍भवतो. या विकृतीचे प्रदर हे एक प्रमुख लक्षण असून पुष्कळ वेळा हा स्त्राव रक्तमिश्रित असतो. याच वयात गर्भाशयाचा किंवा गर्भवाहिनीचा कर्करोग उद्‍भवण्याची शक्यता असते आणि या गंभीर रोगाचे पहिले लक्षण असाच रक्तमिश्रित स्त्राव असू शकते. या कारणाकरिता वयोवृद्ध स्त्रियांतील रक्तमिश्रित प्रदर फार काळजीपूर्वक विचारात घ्यावा लागतो. याशिवाय वार्धक्यजन्य, पूयगर्भाशय, गर्भाशय अंतःस्तराखालील तंत्वाबुर्दापासून (तंतुमय अर्बुदापासून) सुटणारे मृतोतक (मृत ऊतक) ही कारणे या वयात प्रदर उत्पन्न करतात.

स्राव प्रकार : सर्वसाधारणपणे रोगी स्त्राव प्रकाराचे वर्णन करतो व या स्त्राव प्रकारावरून प्रदराच्या कारणासंबंधी अंदाज करता येतो. 

प्रदराच्या स्त्रावाचे प्रकार व रोगाचे कारण 

स्त्राव प्रकार 

रोगाचे कारण 

पिवळा पूयुक्त स्त्राव  

श्लेष्म-पूयुक्त स्त्राव 

पांढरे घट्ट तुकडे मिश्रित पाण्यासारखा स्त्राव 

प्राकृतिक स्त्रावाची वाढ 

रक्तमिश्रित स्त्राव 

मूत्रमिश्रित स्त्राव 

मलमिश्रित स्त्राव 

दुर्गंधियुक्त स्त्राव 

ट्रिकोमोनास व्हजायनॅलिस संक्रामण. 

ग्रैव संक्रामण, ग्रैव अपक्षरण. 

कॅन्डिडा अल्बिकान्स संक्रामण. 

शरीरक्रियात्मक, ऋतुकालपश्च, गर्भारपण, मनोनिर्मित कारणे. 

गर्भाशय ग्रीवेतील मोड, ग्रैव अपक्षरण, ग्रैव व्रण, गर्भाशय अर्बुद, गर्भाशय कर्करोग. 

मूत्रीय नाडीव्रण (मूत्राशय व योनिमार्ग यांना जोडणारे अपसामान्य छिद्र). 

गुदांत्र-योनिमार्ग नाडीव्रण (गुदांत्र आणि योनिमार्ग जोडणारे अपसामान्य छिद्र). 

जननमार्गातील मृतोतक उत्पादक विकृती उदा., ग्रैव कर्करोग, ग्रीवेतील मोड, बाह्य पदार्थ, ट्रिकोमोनासजन्य स्त्रावाला विशिष्ट गंध असतो.

रोगनिदान व चिकित्सा : निदानाकरिता संपूर्ण रोग-इतिहास, सार्वदेहिक तपासणी, जननमार्ग तपासणी व काही विशिष्ट तपासण्या कराव्या लागतात. प्रदराविषयी शक्य तेवढी माहिती, विशेषेकरून त्याचा काळ, प्रथमच की प्रत्यावर्ती (कालांतराने पुनःपुन्हा होणारा) आणि त्यामुळे कोणता त्रास होतो, ही माहिती मिळविणे जरूर असते. स्त्रावाची सूक्ष्मदर्शकीय तपासणी, तसेच मल परीक्षा, मूत्र परीक्षा व रक्त परीक्षा या प्रयोगशालीय परीक्षा आवश्यक असतात. यांशिवाय जी. एन्. पापानिकोलाऊ या ग्रीक शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारी ‘पापानिकोलाऊ परीक्षा’ ही विशिष्ट परीक्षा करतात. या परीक्षेकरिता ग्रैव स्त्राव पिचकारीने शोषून घेऊन तो काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शकीय तपासणी करतात. याचा वेळी बाह्य गर्भाशय मुखाजवळचे खरवडून घेतलेले ऊतकही तपासतात. काचपट्टीवरील या आलेपाला ‘पॅप आलेप’ म्हणतात. सूक्ष्मजंतु-संक्रामण व कर्करोग यांच्या निदानाकरिता ही एक अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे.

नवजात अर्भकातील स्त्रावाकरिता कोणत्याही उपचारांची गरज नसते. ऋतुकालपूर्व स्त्रावाकरिता विटपाच्या (मांड्यांच्या मधल्या धडाच्या खालच्या भागाच्या) स्वच्छतेविषयीच्या सूचना व इतर गोष्टी समजावून सांगणे पुरते. इतर सर्व वयोगटांतील प्रदराचे कारण शोधून त्यावर इलाज करतात. अती उत्साही व चोखंदळ स्त्रियांच्या बाबतीत योनिमार्गात पूतिरोधक औषधांचे फवारे वारंवार मारून घेण्याने प्रदर बरा होण्याऐवजी वृद्धिंगत होण्याची किंवा नसल्यास सुरू होण्याचीच शक्यता असते. वयोवृद्ध स्त्रियांमध्ये कर्करोग आणि विशिष्ट सूक्ष्मजंतु-संसर्ग नसल्याची खात्री करून घेतल्यानंतर ५०० मिली. पाण्यात २० ते ४० मिली. लॅक्टिक अम्ल घालून योनिमार्ग फवारल्यास प्रदर कमी होतो. रक्तमिश्रित प्रदराचे विलंब न लावता निदान करणे आवश्यक असते व त्याकरिता स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घेणे जरूर असते. ट्रिकोमोनासजन्य प्रदर ही संभोगजन्य विकृती असल्यामुळे पत्नी व पती या दोघांनाही मेट्रोनिडाझोलाच्या २५० मिग्रॅ. गोळ्या दिवसातून तीन अशा १० दिवसापर्यंत घेणे आवश्यक असते. 

भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा : प्रदर हा स्त्रियांचा विकार आहे. या विकारात स्त्रियांच्या योनीतून स्त्राव होत असतो. हा स्त्राव दोन प्रकारचा असतो : पांढरा किंवा तांबडा लाल. लालस्त्राव होतो त्याला रक्तप्रदर व पांढरा स्त्राव होतो तेव्हा श्वेतप्रदर किंवा धुपणी असे म्हणतात. 

रक्तप्रदर : ह्यात रक्तस्त्राव होत असतो. रक्तस्त्राव हे जरी सामान्य लक्षण असले, तरी ह्या स्वरूपाचे अनेक विकार असतात. दोघांच्या प्रकोपाने रक्तयोनी, रक्तपित्त, पित्तयोनी, पित्तावृत्त अपान आणि धातुपधातू वृद्धीपासून रक्तवृद्धी, रजोवृद्धी असे प्रकार पडतात. त्या त्या विकाराला अनुसरून योग्य चिकित्सा करावी लागते. पित्तावृत्त अपानामध्ये अपानवातनाशक चिकित्सा, तर पहिल्या तीन रोगांत पित्तनाशक व रक्तस्तंभक रक्तपित्ताची चिकित्सा करावी लागते. रक्तवृद्धी व रजोवृद्धी यांत रक्तधातूचे व रसधातूचे पचन वाढवून त्यापासून अनुक्रमे मांस व रक्त धातू निर्माण करण्याची प्रवृत्ती शरीरामध्ये उत्पन्न करावी. या विकारामध्ये स्नेहन देऊन सर्व शरीराला शेक दिला पाहिजे. धायटीचे फूल, खैर, इ. सिद्ध किंवा शालसारादिगण सिद्ध तूप पिण्याला देऊन शेक करून वमन, विरेचन, नंतर रेचक बस्ती, स्नेह बस्ती आणि योनी बस्ती (उत्तर बस्ती) द्यावा. जेष्ठमध व खडीसाखर तांदुळाच्या धुवणाबरोबर पिण्यास द्यावे. बलामूळ साखर आणि मद्य ह्यांच्याबरोबर द्यावे, वाघनखीचे मूळ उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर आणून कंबरेला बांधावे, रसांजन व तांदुळजाचे मूळ मध व तांदुळाच्या धुवणाबरोबर पिण्यास द्यावे. अशोकाच्या सालीने सिद्ध केलेले दूध, कुशाच्या मुळाचे चूर्ण उंबराच्या पाण्याबरोबर, तसेच दार्व्यादि क्काथ हे द्यावेत, आहार-दुध्याचा कीस साखर घालून त्याचे मोदक करून ते खाण्यास द्यावेत कोहळ्याची भाजी तिखट न घालता द्यावी दुधातुपाचे पदार्थ द्यावेत, शीत, सुगंधी अशा द्रव्यांचा उपयोग करावा, शोणितस्थापक मध, केशरमोचरस इ. औषधांचा उपयोग करावा, तसेच चंद्रकला, प्रवाळ, दगडी बोर, वसंतकुसुमाकर ह्यांचा उपयोग करावा.

श्वेत प्रदर : शोधन उपचारांपैकी वमन उपचार हा प्राधान्याने करावा. चंद्रप्रभा, प्रतापलंकेश्वर, अशोकारिष्ट, लोध्रासव ही द्यावीत तुरटी, गेरू, काथ ह्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करून ते तिळाच्या तेलात कालवून त्यात कापसाचा बोळा भिजवून गरम करुन तो योनीमध्ये ठेवीत असावे खैर, कायफळ, हिरडा, चंदन ह्यांच्या काढ्याने योनिधावन करीत असावे. ह्या विकाराबरोबर शुक्रक्षीणता, रसक्षीणता असल्यास ती क्षीणतानाशक औषधेही दिली पाहीजेत. मानसिक कारण असल्यास अभ्रक, रौप्य ब्राह्मीच्या रसातून द्यावीत.

पटवर्धन, शुभदा अ. 

संदर्भ : 1. Clayton, S. G. and others, Ed., Gynaecology, London, 1974.

          2. Howkins, J. Bourne, G. Ed., Shaw’s Textbook of Gynaecology, Edinburgh, 1976.