तिरुवन्नामलई : तमिळनाडू राज्याच्या उ. अर्काट जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या ६१,३७० (१९७१). हे विल्लुपुरम्–वेल्लोर लोहमार्गावर वेल्लोरच्या दक्षिणेस सु. ८० किमी. आहे. अठराव्या शतकात हे लष्करी ठाणे होते. हे या भागातील महत्त्वाचे वाहतूक व व्यापारी केंद्र आहे. येथे गुरांचा मोठा बाजार दरवर्षी भरतो. तिरुवन्नामलई (पवित्र ज्योतीचा डोंगर) हे नाव शहराच्या पाठीमागील सु. ८०० मी. उंचीच्या शिखरावरून पडले असावे. येथे शंकरानी ज्योतीरूपाने प्रगट होऊन पार्वतीला शापमुक्त केले, अशी आख्यायिका आहे. डोंगराच्या पायथ्याचे भव्य तेजोलिंगम् मंदिर शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. येथे कार्तिक महिन्यात मोठी जत्रा भरते व वरील आख्यायिकेला अनुसरूनच पुजारी डोंगरावर एक ज्योत लावतो. रमण महर्षीचा आश्रमही येथून जवळच आहे.

फडके, वि. शं.