पेरिपॅटस : हा ⇨ऑनिकॉफोरा वर्गातील प्राणी आहे. याच्या पुष्कळ जाती आहेत. येथे दिलेली माहिती पेरिपॅटस केपेन्सिस या प्रतिनिधिक जातीची असून बव्हंशी इतर जातींनाही लागू पडणारी आहे.

आ.१. पेरिपॅटस (पेरिपॅटस केपेन्सिस) : सबंध प्राणी

याचे शरीर दंडगोलाकार असून सु. ५० मिमी. लांब असते. शीर्ष स्पष्ट नसते. शीर्ष-भागावर दोन आखूड शृंगिका (स्पर्शेंद्रिये),

दोन बारीक पृष्ठीय डोळे, मुख (अधर पृष्ठावर), दोन लहान शृंगमय जंभ (मुखाच्या आत) आणि दोन मुख-अंकुरक असतात. पातळ उपचर्माने शरीर झाकलेले असते त्याच्यावर सूक्ष्म अंकुरकांची वलये असून प्रत्येक अंकुरकावर एक लहान संवेदी कंटक असतो. पाय आखूड खुंटांसारखे असून त्यांच्या १५-४३ जोड्या असतात. पायांच्या टोकावर दोन नखर असतात पायांच्या बुडाच्या आतल्या बाजूवर वृक्कक-रंध्र (शरीरातील निरुपयोगी द्रव्ये ज्याद्वारे बाहेर टाकून देण्यात येतात असे छिद्र) असते. शरीराच्या निमुळत्या, बोथट, पश्च टोकावर गुदद्वार असून त्याच्या अलीकडे अधर पृष्ठावर जनन-रंध्र असते.

आ. २. पेरिपॅटसची संरचना : (अ) अग्र टोक, अधर दृश्य : (१) शृंगिका, (२) मुख-अंकुरक, (३) जंभ, (४) पाय (आ) पश्च टोक, अधर दृश्य : (१) जनन रंध्र, (२) गुदद्वार.

शरीरात एक अखंड रूधिर-गुहिका असून तिच्यात आंतर-इंद्रिये असतात. प्रत्येक बाजूला एक श्लेष्म-ग्रंथी (बुळबुळीत स्राव स्रवणारी ग्रंथी) असून ती मुख-अंकुरकामधून बाहेर उघडते. या ग्रंथीत उत्पन्न होणारा श्लेष्मा पिचकारीप्रमाणे दूर उडविता येतो स्वसंरक्षणाकरिता आणि भक्ष्य पकडण्याकरिता त्याचा उपयोग होतो. आहार-नाल (पचन मार्ग) मुखापासून गुदद्वारापर्यंत सरळ गेलेला असतो. पृष्ठीय हृदयामुळे रूधिर-परिवहन होते. श्वासोच्छवासाकरिता सूक्ष्मश्वासनलिका असतात. उत्सर्जन-अंगे वृक्कांच्या (शरीरातील निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणाऱ्या नळीसारख्या इंद्रियांच्या) स्वरूपाची असून त्यांच्या कित्येक जोड्या असतात. वृक्कांच्या आतल्या टोकाशी एक बंद कोश असतो त्याची वाहिनी वृक्करंध्राने बाहेर उघडते. तंत्रिका तंत्रात (मज्जासंस्थेत) मुखाच्या वर असलेल्या दोन प्रमस्तिष्क गुच्छिका (मेंदू), कित्येक अग्र तंत्रिका, दोन परिग्रसनी-संयोजक (घशाभोवतील तंत्रिका तंतूंचे जुडगे) आणि दोन पृथक् अधर तंत्रिका रज्जू असतात. डोळे अँनेलिडांच्या डोळ्यांसारखे असतात. लिंगे पृथक् असतात. जननेंद्रिये युग्मित असून बाह्य जनन-रंध्र एकच असते. बहुतेक जाती जरायुज (पिलांना जन्म देणाऱ्या) असतात. मादीच्या दोन्ही अंडवाहिन्यांचा काही भाग विशेषित होऊन गर्भाशयाचे कार्य करतो आणि भ्रूणांची त्यात वाढ होते. मादीला दर वर्षी ३०-४० पिल्ले होतात.

कर्वे, ज. नी.