सेफॅलोपोडा : (शीर्षपाद वगर्र्). ⇨ मॉलस्का (मृदुकाय प्राण्यांच्या) संघातील सर्वांत प्रगत व सर्वस्वी सागरी प्राण्यांचा वर्ग. सेफॅलोपोडांच्या सु. ३,००० जीवाश्मी (शिळारूप अवशेष प्राप्त झालेल्या) प्रजातींची व सु. १५,००० जातींची वर्णने प्रसिद्ध झालेली असून त्यांच्या विद्यमान सु. १५० प्रजाती व ११,००० जाती आहेत. ⇨ माखली, ⇨ लोलिगो व ⇨ ऑक्टोपस हे विद्यमान सेफॅलोपोडांचे परिचित प्रातिनिधिक प्राणी होत. सेफॅलोपोडा हे इतर मॉलस्कांहून बऱ्याच गोष्टींत भिन्न असतात. ⇨ नॉटिलस प्रजाती वगळली तर इतर विद्यमान सेफॅलोपोडांना बाह्य कवच नसून आंतरिक कवच असते. ⇨ स्पायरूला प्रजातीचे कवच सर्पिल व सप्रकोष्ठ, सेपियाचे जाड व खडूमय, लोलिगोचे कायटिनयमय आणि ऑक्टोपसाचे अवशेषरूप व दोन भागांचे असते. ईडिओसेपियस प्रजातीत कवच नसते. ⇨ आर्गोनॉटांच्या माद्यांचे बाह्य भंगुर कवच समजात अंग म्हणजे खरे कवच नसून ती अंडी ठेवण्याची डबी असते.

नॉटिलस (मौक्तिकमय नॉटिलस)

आर्गोनॉट (कागदी नॉटिलस)

लोलिगो (स्क्रिड)ऑक्टोपससेपिया (कटलफिश)

मॉलस्काच्या संचलनाचे सामान्य इंद्रिय म्हणजे पाद (पाय) होय. सेफॅलोपोडांच्या पायाचे विभाग होऊन आठ किंवा अधिक उपांगे तयार झालेली असतात आणि ती प्राण्याच्या तोंडाभोवती असतात. ही उपांगे कधीकधी आकुंचनक्षम असतात व नॉटिलसाखेरीज इतर सर्वांच्या उपांगांवर चूषके असतात. संचलनासाठी कित्येकांना पर (पंख) असतात परंतु सेफॅलोपोडांचे संचलन मुख्यतः त्यांच्या डोक्याच्या खाली जे नसराळे असते, त्याच्या क्रियेमुळे घडून येते. प्रावार गुहेत शिरलेल्या पाण्याची जोरदार चिळकांडी नसराळ्याद्वारे बाहेर सोडली म्हणजे त्या चिळकांडीच्या जोरामुळे प्राण्याचे शरीर वेगाने मागे सरकते. चिळकांडीची दिशा बदलून पुढे किंवा बाजूस जाता येईल अशा रचनेची नसराळी असणारे प्राणीही आढळतात.

सेफॅलोपोडांचा आंतरांग पुंज प्रावाराच्या वेष्टनात असतो. पचनमार्ग नालाच्या आकाराचा असून त्याच्यात कायटिनमय चोचीची एक जोडी, लाला ग्रंथीच्या दोन जोड्या, एक लांब ग्रसिका, एक मोठे जठर, एक आंत्र (आतडे) व गुद ही असतात. गुदाच्या रक्षणासाठी सामान्यतः दोन पंखासारख्या झडपा असतात. कित्येकांच्यामध्ये पश्च लाला ग्रंथी विषारी असतात.

नॉटिलसाखेरीज इतर सेफॅलोपोडांचे अभिसरण तंत्र संवृत (मॉलस्कात सामान्यतः नसणाऱ्या) प्रकारचे असते. नॉटिलसामधील अभिसरण तंत्र अंशतः रिक्तिकावान असते, मात्र त्यात इतर कोणतीही कोटरे नसतात. रक्तात हीमोसायनीन नावाचा निळा श्वसन-वर्णक असतो. एक शारीरिक व दोन क्लोमीय अशी एकूण तीन हृदये असतात. तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) व ज्ञानेंद्रिये बरीच विकसित असतात. त्वचेत असणारे वर्णकी लवक आलटून पालटून आखडून घेऊन किंवा सैल सोडून सेफॅलोपोडांना आपला रंग वेगाने बदलता येतो. हे प्राणी एकलिंगी असून त्यांची जननेंद्रिये चांगली विकसित असतात. सामान्यतः नरांमध्ये माद्यांना शुक्राणुधर पोहचविता येणे शक्य होईल अशी रचना असणारा निषेचनांग नावाचा एक बाहू असतो. ट्रेमॉक्टोपसासारख्या काही प्राण्यांच्या नरांना आपले निषेचनांग अलग करून फेकून देता येते. ते मादीच्या प्रावार गुहेत शिरून तेथे राहते. अंडी पाण्यात सुटी किंवा एखाद्या आधारास चिकटून घातली जातात. ऑक्टोपसासारख्या काही प्राण्यांच्या माद्यांकडून अंडी उबविली जातात. कित्येक जातींच्या अंड्यांचा विकास होऊन बाहेर पडणारे प्राणी पूर्ण विकसित असतात व प्रौढाप्रमाणे राहू लागतात. इतर जातींच्या अंड्यांतून प्रौढांपेक्षा अगदी भिन्न स्वरूपाचे डिंभ बाहेर पडतात व ते प्लवक (तरंगणाऱ्या) जीवसमूहात मिसळतात परंतु इतर मॉलस्कात आढळणाऱ्या ट्रोकोफोअर (पक्ष्मवलयवान-डिंभ) किंवा व्हेलिजर (पटिका-डिंभ) अवस्था त्यांना प्राप्त होत नाहीत.

सेफॅलोपोडा वर्गातील प्राणी अत्यंत खादाड व मांसभक्षक असतात. ते कवचधारी (क्रस्टेशियन) प्राणी, मासे व स्वजातीय प्राणीसुद्धा खातात. आपले बाहू किंवा संस्पर्शके लांब पसरून, भक्ष्यास विळखा घालून, चूषकांच्या साहाय्याने किंवा काही स्क्विडांना असतात तशा आकड्यासारख्या नखरांनी (पंजांनी) आपले भक्ष्य ते पकडून ठेवतात.

चोचीने भक्ष्याचे लचके तोडून ते रेत्रिकेच्या साहाय्याने घासले जाऊन घशाखाली ढकलले जातात.

सेफॅलोपोडा हे स्वच्छंद हिंडू शकणारे प्राणी असून त्यांच्यापैकी काही सागराच्या खोल पाण्यात किंवा तळाशी, परंतु बहुसंख्य प्राणी किनाऱ्याजवळ असलेल्या उथळ समुद्रात राहतात. कित्येक क्षेत्रांत त्यांचे प्रचंड समूह आढळतात. सेफॅलोपोडा सागरी अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहेत, सागरातील अनेक मासे व सस्तन प्राणी मुख्यतः सेफॅलोपोडा खाऊनच राहतात. मनुष्याच्या अन्नपुरवठ्याच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहेत. जपान देशातील कोळ्यांकडून पकडल्या जाणाऱ्या सेफॅलोपोडांचे प्रमाण फार मोठे आहे. पोर्तुगालजवळच्या समुद्रात स्क्विड व भूमध्य समुद्रात ऑक्टोपस पकडण्याची क्षेत्रे आहेत.

सेफॅलोपोडाच्या वर्गीकरणाविषयी मतभेद आहेत. सामान्यतः त्याचे (१) नॉटिलॉइडिया, (२) ॲमोनॉइडिया व (३) डायब्रँकिया (दोन क्लोमधारी) असे तीन गट (गण किंवा उपवर्ग) केले जातात. कधीकधी नॉटिलॉइडिया व ॲमोनॉइडिया मिळून टेट्राब्रँकिया (चार क्लोमधारी) नावाचा गट केला जातो. डायब्रँकियांचे (१) डेकॅपोडा (दहा पाय किंवा बाहू) व (२) ऑक्टोपोडा (आठ पाय किंवा बाहू) असे दोन विभाग (उपगण) केले जातात. डेकॅपोडात स्पायरूला, सेपिया, लोलिगो, आर्किट्यूथिस या विद्यमान प्रजातींचा व ⇨ बेलेम्नाइट या जीवाश्मी गटाचा आणि ऑक्टोपोडात ⇨ आर्गोनॉट व ऑक्टोपस या विद्यमान प्रजातींचा समावेश होतो.

पुराजीव महाकल्पात (६० ते २४ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) नॉटिलॉइडियांची भरभराट झाली होती. त्यांच्यापैकी नॉटिलस ही एकच प्रजाती आता राहिलेली आहे. मध्यजीव महाकल्पात (२३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) ॲमोनॉइडिया प्रमुख होते परंतु त्या महाकल्पाच्या अखेरीस ते निर्वंश झाले. डायब्रँकिया हे मध्यजीव महाकल्पाच्या सुरुवातीस अवतरले व आजच्या सेफॅलोपोडात ते अग्रेसर आहेत. एक नॉटिलस वगळून आजचे सर्व सेफॅलोपोडा डायब्रँकिया गटातील आहेत. डायब्रँकियांपैकी बेलेम्नाइट नावाचा टिकाऊ सांगाडे असणाऱ्या प्राण्यांचा गट मध्यजीव महाकल्पात असे व त्यांचे विपुल जीवाश्म सापडतात परंतु बहुसंख्य डायब्रँकियांना टिकाऊ कवचे नसतात किंवा कवचेच नसतात, त्यामुळे त्यांचे जीवाश्म विरळाच आढळतात.

पहा : मॉलस्का.

संदर्भ : 1. Hanlon, R. T. Messenger, J. B. Cephalopod Behaviour, Cambridge, 1996.

           2. Nesis, K. N. Cephalopods of the World, Neptune City, N. J. 1987.

           3. Norman, M. Cephalopods : A  World Guide, Hackenheim, Germany, 2000.

केळकर, क. वा.