पा र्श्विक रेखा : मासे, उभयचरांचे (जमिनीवर व पाण्यातही राहणाऱ्या प्राण्यांचे) काही गट आणि उभयचरांच्या डिंभावस्था (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी प्राण्याची क्रियाशील पूर्वावस्था) यांच्यात शरीराच्या बाजूंवर आणि डोक्यावर द्रवाने भरलेल्या त्वचीय नालांचे (वाहक मार्गांचे) एक तंत्र (संस्था) असते. यसा नालांचे पुष्कळ छिद्रांमधून भोवतालच्या पाण्याशी स्पष्टपणे दळणवळण असते. या इंद्रियाला पार्श्विक रेखा किंवा पार्श्विक रेखा तंत्र म्हणतात.

पार्श्विक रेखा तंत्र वरील व्याख्येत सांगितल्याप्रमाणे त्वचेत असलेल्या नालांचे बनलेले असून हे नाल शरीराच्या दोन्ही बाजूंच्या मध्यावर पुच्छापासून डोक्यापर्यंत गेलेले असतात. काही अस्थिमत्स्यांमध्ये (ज्यांचा सांगाडा हाडांचा बनलेला असतो अशा माशांमध्ये) ही पार्श्विक रेखा नुसत्या डोळ्यांनी एखाद्या बारीक रेघेप्रमाणे दिसते. पुढच्या बाजूला क्लोमांच्या (कल्ल्यांच्या) जवळ प्रत्येक नालापासून लहान शाखा उत्पन्न होऊन त्या शीर्षाच्या वरच्या, बाजूच्या आणि खालच्या पृष्ठावर एका ठराविक पद्धतीने पसरून त्यांची एक जटिल संहती (गुंतागुंतीची व्यूह) निर्माण होते. नाल त्वचेच्या अधिचर्मीय (बाह्य त्वचेच्या) कोशिकांपासून (पेशींपासून) उत्पन्न

अस्थिमत्स्याच्या पार्श्र्विक रेखा तंत्रातील तंत्रिकातुंगक (1) पार्श्र्विक रेखा, (2) छिद्र (3) बाह्यत्वचा,(4) चषिका (5) संवेदी कोशिका, (6) तंत्रिकातुंगक, (7) तंत्रिका, (8) शल्क (9) स्नायू

होऊन तिच्यात खोल जातात. बहुतेक आद्य मत्स्यांत नाल केवळ पन्हळीसारखे उघडे असतात माशांच्या जास्त प्रगत गटांमध्ये ते बंद होऊन त्वचेच्या बाह्य स्तरामध्ये खोल गेलेले असतात. ज्यांच्या अंगावर खवले नसतात (उदा., पाकट) अशा उपस्थिमत्स्यांमध्ये (ज्यांचा सांगाडा कूर्चेचा बनलेला आहे अशा माशांमध्ये) पार्श्विक रेखा सहज दिसते. अस्थिमत्स्यांमध्ये शरीरावरील (धडावरील) मुख्य पार्श्विक रेखा नाल दिसतात पण शीर्षाच्या त्वचेमध्ये अस्थींची वाढ झाल्यामुळे तेथे ते दिसत नाहीत. सगळे नाल द्रवाने भरलेले असतात, नालाच्या सगळ्या लांबीवर थोड्या थोड्या अंतरावर नियमितपणे स्वादकलिकांसारखी (चवीची संवेदना समजण्याचे कार्य करणाऱ्या पृष्ठालगतच्या संवेदनशील कोशिकांच्या समूहांसारखी) दिसणारी तंत्रिकातुंगक-अंगे (मेंदूपासून निघणाऱ्या काही तंत्रिकांच्या –मज्जांच्या –शाखांचा ज्यांत शेवट होतो अशा संवेदी कोशिकांच्या समूहांनी बनलेली इंद्रिये) असून ती श्लेष्म्यात (बुळबुळीत द्रवात) बुडालेली असतात. या इंद्रियांमध्ये कोशिकांचे दोन संच असतात : एक विशेषित त्वचीय ग्राही संचातील प्रत्येक ग्राही कोशिकेपासून केसासारखा एक प्रवर्ध (वाढ) निघतो सगळे प्रवर्ध एका श्लेषी (चिकटसर) चषिकेत जातात. या कोशिकांना खालून असंवेदी आधार-कोशिकांनी आधार दिलेला असतो. तंत्रिकातुंगकांना सातव्या, नवव्या आणि दहाव्या मस्तिष्क-तंत्रिकांच्या (मेंदूपासून निघालेल्या तंत्रिकांच्या) संवेदी शाखा गेलेल्या असतात.

मुख्य पार्श्विक रेखा नाल आणि शीर्ष- थोड्या थोड्या अंतरावर मुख्य पार्श्विक रेखा नाल आणि शीर्ष-नाल थोड्या थोड्या अंतरावर असलेल्या बारीक छिद्रांनी बाहेर उघडतात. शार्क आणि पाकट या माशांमध्ये ही छिद्र सहज दिसून येतात. भोवतालच्या पाण्यातून येणारी नीच कंप्रतेचे (दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांची संख्या नीच-कमी-असलेले) तरंग माशांच्या शरीरावर आदळतात आणि नालातील द्रव पदार्थावर दाब उत्पन्न करतात या दाबामुळे तंत्रिकातुंगकअंगे उत्तेजित होतात. अशा तऱ्हेने उत्पन्न झालेली संवेदी प्रेरणा तंत्रिका मेंदूला पोहोचवितात.

पार्श्विक रेखा तंत्राचे नक्की कार्य काय असावे याविषयी पुष्कळ शास्त्रज्ञांना कुतूहल होते. केवळ जलीय पृष्ठवंशी (पाण्यात राहणाऱ्या व पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांमध्येच हे तंत्र अस्तित्वात असल्यामुळे ते प्राण्याचा जलीय माध्यमाशी संबंधी जोडण्याचे कार्य करीत असावे, हे उघड आहे. प्रयोगांवरून असे दिसून आले आहे की, उष्णता, ध्वनी, प्रकाश, रासायनिक कण, विद्युत् आणि पाण्याचा खारेपणा अथवा साधा दाब अथवा जोरदार प्रवाह यांच्या योगाने तंत्रिकातुंगक उद्दीपित होत नाहीत. त्यांना उद्दीपित करणारा उद्दीपक ‘नीच कंप्रतेचे तरंग’ हाच आहे. डच प्राणिशास्त्रज्ञ डायक्राफ यांनी आपल्या प्रयोगांनी नंतर हे सिद्ध केले. गेल्या कित्येक वर्षांत करण्यात आलेल्या प्रयोगांवरून असा निष्कर्ष निघतो की, ही अंगे पाण्याचे नीच कंप्रतेचे प्रवाह शोधून काढण्याच्या कामी मदत करतात.

मासा पाण्यात इकडेतिकडे पोहत असताना त्याच्या शरीराच्या हालचाली भोवतालच्या पाण्यात यांत्रिक क्षोभ उत्पन्न करतात. हा क्षोभ सर्व बाजूंना पसरतो आणि घन वस्तूंवरून त्याचे परावर्तन होते. हा पराविर्तत क्षोभ त्या माशाच्या शरीरापर्यंत पोहोचल्यावर त्यामुळे पार्श्विक रेखा नालातील द्रवात थोडे स्थलांतर होते परंतु तंत्रिकातुंगकातील ग्राही कोशिकांना उद्दीपित करण्यास ही हालचाल पुरेशी होते. यामुळे जवळपासच्या घन वस्तूंच्या अस्तित्वाचे ज्ञान होते तेवढेच नव्हे, तर त्या नक्की कोठे आहेत हेदेखील समजते. पार्श्विक रेखा तंत्रामुळे माशांना मार्गातील अडथळे टाळता येतात, शत्रूला चुकविता येते आणि भक्ष्य नक्की कोठे आहे ते समजते.

कर्वे, ज.नी.