ठिपकेवाला पिरान्हा (सेरॅसाल्मस – हाँबियस )

पिरान्हा : टायगर फिश, पेराई, पिराया व कॅराइब अशीही या माशाची इतर नावे आहेत. चॅरॅसिडी मत्स्यकुलातील सेरॅसाल्मस वंशातील पुष्कळ जातींना पिरान्हा हे नाव देतात. हे मासे मांसाहारी असून द. अमेरिकेत पूर्व व वायव्य भागांतील नद्यांत (उदा., ॲमेझॉनमध्ये) आढळतात. बहुसंख्य माशांची लांबी सु. ३५ सेंमी. असते पण मोठा मासा ६० सेंमी. पर्यंत लांब असतो. त्यांचे शरीर दोन्ही बाजूंनी पसरट व रुपेरी रंगाचे असते. डोके मोठे असते. त्यांचे जबडे बळकट व दात तीक्ष‌्ण असतात. तोंड मिटलेले असताना वरचे करवतीसारखे दात खालच्या कातरीसारख्या दातांच्या विरुध्द येतात. या मासांच्या झुंडी असतात व नदीच्या पाण्यात येणाऱ्या कोणत्याही प्राण्यावर ते हल्ला करतात व अल्पावधीत त्याचा फडशा पाडतात. त्यामुळे भक्ष‌्याचा फक्त सांगाडाच शिल्लक राहतो. अनेक वेळा त्यांनी माणसे खाल्ली आहेत. असे असले, तरी लहान मासे हेच त्यांचे प्रमुख अन्न होय. भक्ष्याच्या वाहणाऱ्या रक्ताच्या वासाने ते इतके आकृष्ट होतात की, काही वेळातच शेकडो पिरान्हा भक्या्रभोवती गोळा होतात. त्यांचे दात एवढे तीक्ष‌्या असतात की, लचके तोडलेले कळतसुध्दा नाही. गळाने मासेमारी करण्यात ह्यांच्यामुळे अडथळा येतो, कारण गळाला लागलेल्या माशावर ते तुटून पडतात, तसेच ते नेहमीच्या मासेमारी साधनांनी पकडणे अवघड असते. त्यांच्या फार तीक्ष‌्ण  दातांनी बहुतेक मासेमारी आकड्यांचे ते सहज तुकडे पाडतात.

जमदाडे, ज. वि.