कादंबरी – २ :  बाणभट्टाने रचिलेला अभिजात संस्कृत वाङ्‌मयातील एक अत्यंत प्रसिद्ध कथाप्रबंध. संस्कृत वाङ्‌मयात कथा आणि आख्यायिका असे गद्यकाव्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत. जिच्यातील गोष्ट केवळ कल्पाधिष्ठित असते, ती कथा आणि जिच्यातील वृत्तान्त सत्यांशयुक्त असतो, ती आख्यायिका. बाणभट्टाला या दोन्ही प्रकारांची चांगली माहिती होती आणि त्याच्या मते स्वतःचे हर्षचरित ही आख्यायिका व कादंबरी ही कथा होय. कादंबरीवर सहा टीका उपलब्ध आहेत.

कादंबरीचे कथासार थोडक्यात असे : विदिशा नगरीचा राजा शुद्रक ह्याच्या राजसभेत एके दिवशी एक चांडालकन्यका वैशंपायन नावाचा एक अद्‌भुत पोपट त्याला अर्पण करण्याच्या हेतूने घेऊन येते. राजदरबारात हा पोपट मनुष्यवाणीने आपली कथा सांगू लागतो. ह्या कथेबरोबरच कादंबरीची कथा सुरू होते. विंध्यारण्यातील एका शाल्मली वृक्षाच्या ढोलीत राहणारा पोपट एका शबराच्या तडाख्यातून एका तापसकुमाराच्या हाती लागतो आणि तो त्याला आपल्या आश्रमात नेतो. तापसकुमाराचा पिता जाबाली हा त्या पोपटाला त्याच्या पूर्वजन्माची कहानी सांगतो, ती अशी : हा पोपट पूर्वजन्मी चंद्रापीडनामक राजपुत्राचा मित्र वैशंपायन होता. चंद्रपीड हा उज्जयिनीचा राजा तारापीड आणि राणी विलासवती ह्यांचा पुत्र आणि वैशंपायन हा तारापीडाचा मंत्री शुकनास ह्याचा पुत्र. यौवराज्याभिषेक झाल्यानंतर चंद्रापीड दिग्विजयासाठी सैन्य घेऊन निघतो. रमणीय अच्छोद सरोवराजवळील एका शिवमंदिरात त्याला महाश्वेता नावाची तरूणी भेटते. मदनबाधेने मरण पावलेल्या पुंडरीक ह्या तिच्या प्रियकरासाठी ती दुःखाकुल झालेली असते. चंद्रापीड तिचे सांत्वन करतो. ह्या निमित्ताने त्याला गंधर्वराजकन्या कादंबरी ह्या महाश्वेतेच्या सखीची माहिती मिळते. महाश्वेतेचे पुंडरीकाशी पुनर्मिलन होईपर्यंत स्वत: अविवाहित राहण्याचा   निश्चय कादंबरीने केलेला असतो. तिची समजून घालण्यासाठी महाश्वेता चंद्रापीडाला घेऊन हेमकूट पर्वतावर जाते. तेथे चंद्रापीड आणि कादंबरी एकमेकांवर अनुरक्त होतात. चंद्रापीड उज्जयिनीला परततो तथापि कादंबरी विरहाने व्याकुळ होते. हे समजल्यावर चंद्रापीड तिला भेटण्यासाठी गंधर्वलोकात जाण्यास निघतो. त्याच वेळी आपली सेना दशपुरापर्यंत आल्याचे त्याला कळते. त्याचा मित्र वैशंपायन हा मात्र परतण्यास असमर्थ असल्यामुळे अच्छोद  सरोवराजवळच राहिलेला असतो. त्याला भेटण्यासाठी चंद्रापीड पुन्हा अच्छोद सरोवराकडे जाण्यास निघतो. तेथे गेल्यावर महाश्वेतेने प्रेमाचा अव्हेर केल्यानंतर आपला मित्र वैशंपायन मरण पावला, असे त्याला समजते. `तू पोपट होशील’ असा शाप महाश्वेतेने त्याला दिलेला असतो. वैशंपायनासंबंधीचे हे दुःखद वृत्त ऐकून चंद्रापीडही प्राण सोडतो. हे पाहून कादंबरीही प्राणत्यागास उद्युक्त होते तथापि एक दिव्य पुरूष तेथे येऊन तिला आश्वासन देतो, की चंद्रापीड हा चंद्राचाच अवतार असून त्याच्या पार्थिव देहाचे रक्षण केल्यास तो कालांतराने पुन्हा जिवंत होऊ शकेल. चंद्रापीडाच्या मृत्युने दुःखित होऊन त्याची एक सेविका इंद्रायुध अश्वाला बरोबर घेऊन सरोवरात उडी टाकते. हे होताच एका शापामुळे इंद्रायुध बनलेला कपिंजल हा पुंडरीकाचा मित्र सरोवरातून शापमुक्त होऊन बाहेर येतो आणि चंद्रापीड चंद्रलोकात सुरक्षित असल्याचे सांगतो. वैशंपायन हा पूर्वजन्मीचा महाश्वेतेचा प्रियकर पुंडरीकच होय, हेही तो स्पष्ट करतो.

तारापीडास सर्व वृत्तान्त समजल्यानंतर तो आपली राणी विलासवती आणि मंत्री शुकनास आणि त्याची पत्नी मनोरमा ह्यांच्यासह अच्छोद सरोवराकाठी जाऊन राहतो. तेथे ते सर्व वैराग्याचे घालवू लागतात.

पोपटाला एवढी हकीकत सांगून जाबाली मुनी त्याला तो महाश्वेतेच्या शापाने पोपट झालेला वैशंपायनच असल्याची जाणीव देतो आणि शुकरूप वैशंपायनालाही आपल्या पुर्वजन्माचे स्मरण होते.

जाबाली – आश्रमात असलेल्या शुकाला (वैशंपायनाला) त्याचा तो पुंडरीक असतानाचा मित्र कपिंजल भेटतो व आपण शापमुक्त झाल्याचे सांगून तेथून अदृश्य होतो. पोपट पंख फुटल्यानंतर आश्रमातून उडून जातो आणि एका चांडालाच्या हाती सापडतो. त्याच्याकडून तो चांडालराजाच्या कन्येस भेट म्हणून दिला जातो आणि ही चांडालराजकन्या त्याला घेऊन शूद्रकाच्या दरबारी आलेली असते. ह्या साऱ्या प्रकारामुळे शूद्रक राजाचे कुतूहल जागृत होऊन तो त्या चांडालकन्येस तिची माहिती विचारतो. त्यावर ती राजाला तो स्वतःच पूर्वजन्मीचा चंद्रापीड असल्याची जाणीव देते, ती स्वतः त्या पोपटाची माता लक्ष्मी असते. कामांध झाल्यामुळे तिच्या पुत्राला ती दशा प्राप्त झालेली असते. आता तो शापमुक्त झाला असल्याचे सांगून ती चांडालकन्या अदृश्य होते.

हे ऐकल्यानंतर शूद्रकालाही आपल्या पूर्वजन्माचे स्मरण होते. तो कादंबरीच्या आणि शापमुक्त वैशंपायन महाश्वेतेच्या स्मरणाने विव्हल होतो. त्याच वेळी वसंत ऋतू बहरतो आणि गंधर्वलोकात कामदेवाचा उत्सव सुरू होतो. कामदेवाची पूजा करून कादंबरीने चंद्रापीडाच्या पार्थिव देहाला आलिंगन देताच तो पुन्हा जिवंत होतो. शापमुक्त होईपर्यंतच चंद्रापीडाने शुद्रकाच्या देहात जिवंत रहावयाचे असल्यामुळे त्याने शूद्रकाचा देह आता सोडलेला असतो. महाश्वेतेच्या प्रियकराचा शापही आता संपला असल्याचे चंद्रापीड कादंबरीला सांगतो. तेवढ्यात कर्पिजलाचा हात धरून पुंडरीक आकाशातून अवतीर्ण होतो. या प्रकारे दोन्ही प्रेमी युगुलांचे मीलन होते.

या कादंबरीकथेमध्ये चंद्रापीड – वैशंपायन ह्या दोन नायकांचे तीन जन्म आपल्याला दिसतात. नायक – नायिकांच्या प्रेमकहाण्यांतील गुंतागुंतीमुळे, जन्म-पुनर्जन्म आणि शाप-प्रतिशाप यांच्या मिश्रतेमुळे, तसेच आत्मनिवेदनात्मक अनेकपुटी कहाण्यांमुळे कादंबरीचे कथानक अतिशय जटिल बनलेले आहे. मुख्य व्यक्तिरेखांखेरीज कपिंजल, केयरूक, तारापीड, विलासवती इ. कितीतरीअवांतर व्यक्तिरेखा कादंबरीमध्ये आढळतात. या सर्व व्यक्तींच्या पूर्वोत्तर जन्मांची सांधेमोड कवीने ठिकठिकाणी केली आहे. तसेच, त्यांच्या मनातल्या विचार – विकारांचे सूक्ष्म विश्र्लेषणही केले अरहे. कादंबरीची संपूर्ण कथा आपल्याला वैशंपायन या पोपटाच्या मुखातून ऐकावयाला मिळते. विविध रंगरनी उत्कटतेने नटलेली ही अद्‌भुतरम्य कथा संपूर्णतया वाणभट्टाने आपल्या कल्पनेने निर्माण केलेली आहे. तिचे वातावरण सांकेतिक स्वरूपाचे असले तरी दिव्य व झगमगीत आहे आणि कथेतील व्यक्ती देवगंधर्वकुलातील आहेत. तिच्यातील प्रेमकहाण्या भावस्थिर झालेल्या जननांतर सौहृदांवर आधारलेल्या आहेत आणि त्यांतूनच विविध व्यक्तिरेखांची अनेक सुखदुःखे उत्पन्न झालेली आहेत.

बाणभट्टाची वर्णनशैली अत्यंत समर्थ, प्रगल्भ, चित्रमय, भव्योदत्त आणि गहिरी आहे. प्रदीर्घ वाक्ये तो लीलया पेलतो आणि त्यांची छोट्याछोट्या चटपटीत वाक्यांशी चातुर्याने गुंफण करतसे. ही त्याची धाटणी अपूर्व आणि परिणामकारी आहे. उज्जयिनीनगर, राजप्रसाद, विंध्यारण्य, अच्छोद सरोवर, शाल्मलीतरू, सांजसकाळ, चंद्रोदय, चंडिकेचे देवालय, म्हातारा द्रविड इत्यादींच्या काव्यात्मक प्रत्ययकारी वर्णनांमुळे त्याच्या कृतीला महाकाव्याची डूब चढलेली आहे. प्रमाणहीनता, समाजहीनता, समाजसजटिला, कथामिश्रता, आडवळीपणा, श्लेषादी अलंकारांची अतिरिक्तता यांमुळे कादंबरी कादंबरी कादंबरी दुर्बोध व दमछाक करणारी झालेली असली,तरी तिचे गडद काव्यात्मत्व प्रभावीठरले आहे. मराठीमध्ये कादंबरी हे वाङ्‌मयप्रकारचे नाववाणभ्ट्टाच्या कादंबरीवरून आले आहे. 

पूर्वभाग आणि उत्तरभाग असे कादंबरीचे दोन भाग आहेत. पूर्वभागाची कथा रचून झाल्यावर बाणभट्ट दिवंगत झाला. त्यानंतर त्याचा मुलगा भूषणभट्ट[किंवा पुलिंद (न्ध्र) भट्ट किंवा पुलिनभट्ट] याने तो बेमालूमपणे आणि समर्थपणे पूर्ण केली.

मंगरूळकर, अरविंद