बुळकांड्या : (ढेंढाळ्या डरंगळ्या). रवंथ करणाऱ्या जनावरांना व डुकरांना तीव्र स्वरूपात होणारा हा एक संहारक व जलद फैलावणारा साथीचा रोग आहे. टॉरटोर बोव्हिस या मॅक्सोव्हायरस गटातील रोगकारक व्हायरसामुळे हा रोग होत असून मुख्यत्वे गुरे व म्हशी यांना होतो. भारत, श्रीलंका व आफ्रिका या प्रदेशांतील शेळ्या व मेंढ्या काही प्रमाणात प्रतिरोधी (लवकर रोग संसर्ग न होणाऱ्या) आहेत. युरोपातील डुकरांमध्ये रोग सौम्य स्वरूपात होतो. मात्र थायलंड व मलेशिया येथील स्थानिक डुकरे प्रकर्षाने रोगग्राहक (रोगाने संसर्गित होणारी) आहेत. वन्य गायी व हरिणे यांना हा रोग होत असल्यामुळे पाळीव जनावरांना या प्राण्यांमार्फत रोगसंसर्ग होण्याची शक्यता असते. आफ्रिका खंडामध्ये सर्वत्र दिसून येणाऱ्या केप म्हशी (ब्यूथॅलस सिन्सेरस) या रोगामुळे नामशेष होण्याची वेळ आली होती.

इसवी सनाच्या सुरूवातीपासून या रोगाची माहिती होती व आशिया किंवा पूर्व यूरोपमध्ये हा प्रथम उद्भवला असावा, असे दिसते. वारंवार पूर्वेकडून होणाऱ्या लष्करी स्वाऱ्यांबरोबर असलेल्या जनावरांमार्फत हा रोग पश्चिम यूरोपमध्ये पाहोचला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होऊन दक्षिणेस टांझानियापर्यंत त्याचा प्रसार झाला व हजारो गुरे मृत्युमुखी पडली. पुढे दक्षिण भागातून त्याचे उच्चाटन झाले, तरी उत्तरेमध्ये तो पशुस्थानिक स्वरूपात (रोगकारकाच्या अस्तित्वामुळे एखाद्या भागातील जनावरांमध्ये वारंवार उद्भवणारा) राहिला. यूरोपमध्ये अठराव्या व एकोणिसाव्या शतकात हजारो गुरे या रोगाने दगावल्याची नोंद आहे. भारत व आग्नेय आशियातील देशांमध्येही हा पशुस्थानिक स्वरूपात असल्यामुळे रोगाच्या साथी नेहमी येत राहिल्या. भारतामध्ये १९६० च्या पूर्वी या रोगाने प्रतिवर्षी ४ लाख गुरे व म्हशी मृत्युमुखी पडत व एकंदर आर्थिक नुकसान ३० कोटी रूपयांच्या घरात असे. शिवाय गायीगुरांच्या निर्यात व्यापारावरही विपरीत परिणाम होई. रोगकारक व्हायरसाचे अनेक विभेद आहेत व त्यांची रोगकारक शक्ती कमीअधिक असली, तरी प्रतिरक्षाविज्ञानाच्या (रोगप्रतिकार क्षमतेच्या अभ्यासाच्या शास्त्राच्या) दृष्टीने त्यांत फरक नाही. निरनिराळ्या देशांतील गायीगुरे या रोगाला कमीजास्त प्रमाणात ग्रहणशील आहेत. भारतामधील दुधाळ जातीची, विदेशी व त्यांच्या संकराने निपजलेली संकरित गुरे-म्हशी, तसेच समुद्रसपाटीपासून६५० मी. उंचीवरील प्रदेशातील गुरे अधिक प्रमाणात रोगग्रहणशील आहेत. अशा जनावरांच्या कळपात रोगाची साथ आल्यास ९० टक्क्यापर्यंत गुरे दगावण्याचा संभव असतो. याउलट सपाट प्रदेशातील गुरे थोडीफार प्रतिरोधी असल्यामुळे त्यांमध्ये मृत्युचे प्रमाण २० ते ५० टक्के असते. रोगी जनावरांच्या लाळ, मलमूत्र, नाकातोंडाद्वारे येणारे उत्सर्ग (पाझरून येणारे पातळ पदार्थ) यामध्ये रोगकारक व्हायरस असतो. रोगप्रसार होण्यासाठी रोगी व निरोगी जनावर यांचा निकटचा सहवास यावा लागतो कारण जनावराच्या शरीराबाहेर व्हायरस काही तासांपेक्षा अधिक काळ जिवंत राहू शकत नाही. रोगकारक व्हायरस निरोगी जनावराच्या शरीरात बहुदा श्वसन तंत्रावाटे (श्वसन संस्थेवाटे) किंवा व्हायरस दूषित अन्नपाण्यामधून प्रवेश करतो.

लक्षणे : तीन ते सात दिवसांच्या रोगपरिपाक कालानंतर (रोगकारक व्हायरसाने शरिरात प्रवेश केल्यापासून रोगलक्षणे दिसेपर्यंतच्या काळानंतर) आजाराची सुरुवात ४०°.५ ते ४१°.५ से. पर्यंत चढणाऱ्या तापाने होते. ताप २ ते ४ दिवस राहातो. या काळात चारा खाणे, रवंथ करणे बंद होते आणि नाकातील व डोळ्यातील श्लेष्मकलेला(बुळबुळीत अस्तर त्वचेला) सूज येऊन नाका-डोळ्यावाटे पाणी गळू लागते. पुढे हा उत्सर्ग घट्ट व पुवासारखा होतो. हिरड्यांना सूज येऊन त्यावर पुरळ दिसू लागतो. एकदोन दिवसात पुरळाच्या मोठ्या पुटकुळ्या होऊन त्या फुटून त्या ठीकाणी चट्टे पडून त्यांचे व्रण तयार होतात. खालच्या हिरड्यांवर, जिभेच्या कडांवर व खाली हे व्रण दिसतात. व्रणांवर कोंडा पसरल्यासारखा पापुद्रा जमतो. असा पापुद्रा हे बुळकांड्या रोगातील व्रणांचे वैशिष्ट्य आहे. तोंडातून चिकट लाळेची तार लोंबते व तोंडाला दुर्गंधी येते. व्रणावरील पापुद्रा सुटून त्याजागी स्पष्ट कडा असलेले व्रण दिसू लागतात. तीन ते पांच दिवसांच्या आजारानंतर ताप कमी होऊन जनावराला जुलाब होऊ लागतात. जुलाबांना दुर्गंधी येते आणि त्यात शेंब आणि रक्त पडते. जुलाब आपोआप व जोराने होतात. यावरूनच ढेंढाळ्या हे नांव रोगास पडले आहे. गाभण जनावरे गाभाडतात. श्वासोच्छ्वासास कष्ट होतात व खोकला असतो. जुलाबावाटे शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे ऊतकांचे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिंकांच्या-पेशींच्या-समूहांचे) निर्जलीकरण होते, शरीराचे तापमान आणखी खाली घसरते व खंगत जाऊन जनावर ६ ते 1१० दिवसात मरण पावते. शेळ्या व मेंढ्यांमध्ये वरीलप्रमाणेच रोगलक्षणे दिसतात मात्र तोंडामध्ये सहसा व्रण असत नाहीत. मेंढ्यांमध्ये फुप्फुसशोथ (फुप्फुसाची दाहकयुक्त सूज) हे नेहमी आढळणारे लक्षण आहे.

शेळ्यामेंढ्या व गायीम्हशी यांना होणाऱ्या बुळकांड्या रोगाचा व्हायरस एकच असला, तरी निसर्गामध्ये रोगी शेळ्यामेंढ्यांपासून गायीम्हशींना किंवा याउलट रोगसंसर्ग झाल्याचे दिसत नाही, याचे कारण मात्र अद्याप समजलेले नाही.

निदान : जलद पसरणाऱ्या या रोगाच्या साथीमध्ये एकाच वेळी रोगाच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये अनेक जनावरे पाहिल्यावर वरील रोगलक्षणावरून निदान करणे सोपे असते. रोगाने मेलेल्या जनावराची शवपरीक्षा केल्यास रोगनिदान करण्यास मदत होते. शवपरीक्षेत बुळकांड्या रोगाची विकृतीस्थळे पचनमार्गात दिसून येतात. अन्ननलिकेच्या सुरुवातीच्या भागात, लहान व मोठ्या आतड्यांत जागोजागी श्लेष्मकलेवर लहान मोठे व्रण, तसेच ठिकठिकाणी केशिका (सूक्ष्म रक्तवाहिन्या) फुटल्यामुळे रक्तस्त्राव होऊन तांबडे ठिपके दिसतात. जठराशयाची श्लेष्मकला सुजल्यामुळे व केशिकांच्या रक्तस्त्रावामुळे त्यावर लाल ठिपके दिसतात. बृहदांत्राच्या (मोठ्या आतड्याच्या) शेवटच्या भागामध्ये रक्ताधिक्य (जास्त प्रमाणात रक्त साठणे) व रक्तस्त्राव यांमुळे श्लेष्मकलेवर झीब्र्याच्या पायांवरील पट्यांप्रमाणे आडवे पट्टे दिसतात. यांना ‘झीब्रा मार्क’ असेच नांव असून रोगनिदान करण्यास उपयुक्त अशी ही महत्वपूर्ण खूण आहे.

म्यूकोसल रोग (तोंडात व नाकात व्रण आढळणारा एक व्हायरसजन्य रोग),⇨बदराणुजन्य रोग व ⇨लाळ रोग या रोगांमध्ये दिसणारी लक्षणे केंव्हा केंव्हा बुळकांड्या रोगात दिसणाऱ्या लक्षणांशी मिळतीजुळती असल्यामुळे व्यवच्छेदक (अलगत्व सिद्ध करणारे) निदान करणे जरूर होते. म्यूकोसल रोग बुळकांड्याइतका जलद पसरत नाही व साथ लवकर थांबते. एका वेळी लागण झालेल्या जनावरांची संख्या कमी असून मृत्युचे प्रमाण जवळ जवळ १०० टक्के असते. लाळ रोगात हिरड्यांवर व्रण दिसत असले, तरी जुलाब होत नाहीत. व मृत्युचे प्रमाण अत्यल्प असते. बदराणुजन्य रोगात ताप असत नाही व शेण सूक्ष्मदर्शकाने तपासल्यास त्यात बदराणूच्या युग्मक पुटी (अपक्व अंडी) दिसून येतात.


उपचार : या रोगावर खात्रीलायक योजना नाही. सल्फा या प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे काही प्रमाणात उपयुक्त आहेत. आजारी जनावरांना रोगाच्या सुरवातीच्या काळात रोगावरचा रक्तरस [रोगकारक व्हायरसविरुद्धची प्रतिपिंड असलेला रक्तरस ⟶ प्रतिपिंड] योग्य मात्रेमध्ये दिल्यास काही जनावरे बरी होतात. म्हशी व विदेशी जातीची गुरे यांना रक्तरसाची मोठी मात्रा द्यावी लागते. रक्तरसाने मिळणारी प्रतिरक्षा(रोगप्रतिकारक्षमता) परार्जित (दुसऱ्या रक्तातील आयती प्रतिपिंडे टोचून प्राप्त होणारी) असते व ती चौदा दिवसच टिकते. त्यामुळे १४दिवसांनी पुन्हा रक्तरस टोचणे आवश्यक असते.

प्रतिबंधक उपाय : रोगप्रतिबंधात्मक उपाय योजण्यासाठी रोगावरचा रक्तरस व आणखी तीन प्रकारच्या लशी उपयोगात आणतात. या तीनही लशी गुणकारी आहेत पण त्यांचा वापर मात्र जनावरांच्या रोगग्राहकतेच्या संदर्भात करणे जरूर असते.

 इ. स. १९२५ सालापर्यंत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरोगी जनावरांना रोगावरचा रक्तरस टोचीत असत. ही टोचलेली जनावरे फक्त चौदा दिवसच प्रतिरक्षित राहात. यामुळे साथ संपेपर्यंत दर पंधरा दिवसांनी जनावरांना पुनःपुन्हा रक्तरस टोचावा लागे.

 लस : इझ्झतनगर (उत्तर प्रदेश) येथील भारतीय पशुरोग संशोधन संस्थेमध्ये जे. टी. एडवर्ड यांनी भारतामध्ये प्रथम शेळी – व्हायरस लस या नावाने ओळखण्यात येणाऱ्या लशीच्या संशोधनास सुरवात केली. पुढे केन्यामध्ये यावर संशोधन झाले. गुरांमधील तीव्र स्वरूपाचे व्हायरस शेळीमध्ये टोचले, तर शेळीमध्ये ते वाढतात व शेळीमध्ये रोगोद्भव होतो. असा शेळीमधील व्हायरस पुन्हा दुसऱ्या शेळीत – या क्रमाने टोचत गेल्यास त्या व्हायरसाची गुरांमध्ये रोग उत्पन्न करण्याची शक्ती कमी होते. हे क्षीणन केलेले व्हायरस म्हणजेच शेळी – व्हाचरस लस होय व गुरांना ही टोचल्यास अगदी अल्प प्रमाणात सौम्य रोगोद्भव होतो आणि टोचलेल्या गुरामध्ये रोगकारक व्हायरसविद्धची प्रतिपिंडे भरपूर प्रमाणात तयार होतात. यामुळे उत्पन्न होणारी प्रतिरक्षा १२ वर्षे टिकते परंतु शेळ्या व मेंढ्या, विदेशी जातीची गुरे व त्यांपासून निपजलेली संकरित गुरे यांना ही लस टोचल्यास तीव्र स्वरूपात रोगोद्भव होऊन ती दगावण्याचा संभव अधिक असतो. अशा जनावरांसाठी अधिक सौम्य लसीची आवश्यकता भासली. वरील लस शेळी – अनुयोजित (नैसर्गिक रीत्या शेळीमध्ये न वाढणाऱ्या पण कृत्रीम रीत्या वाढविलेल्या) व्हायरसपासून तयार केलेली आहे. याचप्रकारे ससा – अनुयोजित व कोंबडीच्या अंड्यातील भ्रुणावर वाढविलेल्या व्हायरसांपासुन केलेली अशा दोन तऱ्हांच्या लशी तयार करण्यात आल्या. या सौम्य असल्यामुळे विदेशी गुरे, संकरीत गुरे, शेळ्या – मेंढ्या यांकरीता उपयुक्त आहेत.

अगदी अलीकडे ऊतकसंवर्धन तंत्र (शरीरातील कोशिकांची शरीराबाहेर कृत्रिम रीत्या वाढ करण्याचे तंत्र) वापरून गुरांच्या मुत्रपिंडातील कोशिकांवर क्षीणन केलेल्या व्हायरसांची वाढ करून ऊतकसंवर्धीत लस तयार करण्यात आली आहे व ती वरील दोन्ही लशींपेक्षा अधिक गुणकारी व उपयुक्त आहे. वरील सर्व लशी हल्ली शीत – शुष्क स्वरूपात उपलब्ध आहेत. एखाद्या देशातील सर्व रोगग्रहणशील जनावरे लस टोचून प्रतिरक्षीत केल्यास, ग्रहणशील जनावरे नसल्यामुळे रोगकारक व्हायरस निसर्गातूनच नष्ट होऊ शकतो, या तत्वाचा आधार घेऊन भारतामध्ये केंद्र शासनाने वर उल्लेखिलेल्या लशींचा वापर करून भारतातील सर्व गुरे टोचण्याची ‘बुळकांड्या निर्मूलन योजना’ नावाची देशव्यापी मोहीम१९५६ मध्ये सुरू केली. या मोहिमेचा दृश्य परिणाम म्हणजे १९७० च्या सुमारास काही राज्यामधून या रोगाचे संपुर्ण उच्चाटन झाले आहे, तर काही राज्यांमध्ये तो तुरळक स्वरूपात असला, तरी बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. ब्रिटन व इतर काही देशांमधून या रोगाचे व्यावहारिक दृष्ट्या निर्मूलन झालेले आहे. पुन्हा या रोगाने डोके वर काढू नये यासाठी रोगोद्भवासंबंधी अधिसुचना देणे, सक्तीने जनावरांना लस टोचणे इ. तरतुदी त्या देशांमधील जनावरांच्या सांसर्गिक रोगासंबंधीच्या कायद्यात केलेल्या आहेत. याशिवाय ब्रिटनमध्ये बुळकांड्या रोगसंबंधाने १८९५ मध्ये ‘कॅटल प्लेग ऑर्डर’ काढून रोगोद्भ व झालेल्या कळपातील सर्व जनावरे मारून टाकणे, त्यांच्या कलेवरांची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावणे, जंतुनाशकांचा वापर करून गोठे स्वच्छ करणे इ. बाबीसंबंधीचे नियम या कायद्यात समाविष्ट आहेत. मारलेल्या जनावरांच्या किंमतीची काही प्रमाणात भरपाई करण्याची तरतूदही या नियमांमध्ये आहे.

 टांगानिका (टांझानिया) व युगांडा या देशांमधील या रोगाच्या निर्मुलन योजनांचा अनुभव पाहता रवंथ करणारी वन्य जनावरे रोगग्रहणशील असल्यामुळे त्यांच्यापासून पाळीव जनावरांना रोगसंसर्ग होऊ शकतो, असे दिसून आले आहे. बुळकांड्या रोगाविरुद्धची निर्मूलन योजना आखताना या घटनेचा विसर पडता कामा नये, हेही स्पष्ट झाले. तसेच या रोगाच्या देशव्यापी निर्मूलन योजना आखताना जनावरे टोचण्यासाठी योग्य प्रभावी लशीची निवड, रोगग्रहणशील जनावरांच्या वाहतुकीवर नियंत्रण व ती त्यांना सक्तीने टोचण्यासाठी योग्य ते अधिकार इ. बाबींकडे लक्ष पुरविणे जरूर आहे. शास्त्रीय माहितीच्या आधारे असे दिसून येते की, मातेच्या दुधावाटे परार्जित प्रतिरक्षा प्राप्त झालेल्या वासरांना ६ महिन्यांच्या आत लस टोचल्यास रोगप्रतिकारक्षमता उत्पन्न होऊ शकत नाही. याउलट अशी परार्जित प्रतिरक्षा नसलेल्या वासरांना एक दिवसाची असताना लस टोचल्यास ती प्रतिरक्षित होऊ शकतात. या व अशा बाबींचा विचार निर्मूलन योजना आखताना करणे आवश्यक आहे. भारतामधील काही राज्यांत अलिकडे तुरळकपणे उद्भवलेल्या या रोगाच्या साथीमध्ये दिसून आलेली लक्षणे सौम्य स्वरूपाची व थोडी वेगळी दिसून आली आहेत. रोगकारक व्हायरसचे निसर्गामध्ये उत्परिवर्तन (आकस्मिकपणे घडून येणारा आनुवंशिक बदल) झाल्यामुळे हे होत असावे, असा संशय आहे.

संदर्भ : 1.Blood D.C. Henderson, J.A. Veterinary Medicine London, 1963.

            2.C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI supplement Livestock (Including Poultry). New Delhi, 1970

           3.I.C.A.R. Handbook of Animal Husbandry, New Delhi, 1967.

            4.Miller, W.C. West G.P., Ed. Black’s Veterinary Dictionary, London, 1962.

खळदकर, त्रिं. रं दीक्षित, श्री. गं.