गळसुजी: पाश्चुरेला मल्टोसिडा  नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे प्रायः गाईम्हशींना होणारा, त्वचा, छाती, आंत्र (आतडे) व मेंदू ह्या अवयवांत विकृती निर्माण करणारा जंतुरक्तताकारी (रक्तामध्ये मोठ्या प्रमाणावर जंतू असणारा) संहारी रोग. शेळ्यामेंढ्यांनाही हा रोग होतो, पण कमी प्रमाणात होतो. सामान्यतः रोगाच्या साथी पावसाळ्याच्या सुरुवातीस दिसून येतात. हा रोग प्रदेशनिष्ठ आहे. पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या दलदलीच्या प्रदेशांत प्रतिवर्षी रोगाचा प्रादुर्भाव होतो. याच कारणामुळे इंडोचायना, फिलिपीन्स, व्हिएटनाम या देशांतून ह्या रोगाचा प्रादुर्भाव बराच आहे. अशा प्रदेशांत रोगजंतू जमिनीवर वर्षानुवर्षे जिवंत राहू शकतात. असेही दृष्टोत्पत्तीस आले आहे की, ह्या रोगाचे सूक्ष्मजंतू क्वचित निरोगी जनावराच्या श्वसनमार्गात असतात व जनावर इतर कुठल्या कारणाने दुबळे झाले की, त्यावेळी हे जंतू आपले काम साधतात आणि जनावर रोगाने पछाडले जाते. हा रोग भारतात जितक्या तीव्र स्वरूपात आढळतो तितका पाश्चात्त्य देशांत आढळत नाही व तेथे मृत्यूचे प्रमाणही अत्यल्प असते. लांबच्या प्रवासाने थकलेली, आगगाडीच्या उघड्या डब्यातून किंवा जहाजातून नेलेली अशी जनावरे जागेवर पोहोचल्यावर त्यांच्यात रोगाचा प्रादुर्भाव झालेला दृष्टोत्पत्तीस आला. त्यामुळे अमेरिकेत ह्या रोगाला ‘शिपिंग फिव्हर’ असे नाव आहे. गाईबैलांपैक्षा म्हशींमध्ये रोग जास्त तीव्र स्वरूपात आढळतो. वयस्क जनावरांपेक्षा लहान वयाची जनावरे जास्त दगावतात. रोगजंतूंचा प्रसार आजारी जनावरांच्या मलमूत्र, लाळ इत्यादींतून बाहेर ओढ्या-नाल्याचे पाणी व चराऊ कुरणे दूषित होण्याने होतो. अशा दूषित झालेल्या जमिनीवर पावसाळ्याच्या सुरुवातीस कोवळे गवत उगवले व ते जनावरांच्या खाण्यात आले की, गवताबरोबरच्या मातीतून रोगजंतू पोटात गेल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगजंतू शरीरात शिरल्यापासून दोन ते पाच दिवसांत रोगाची लक्षणे दिसू लागतात.

लक्षणे: शरीराच्या ज्या भागात रोगजंतूंचा जोर वाढतो, त्या अवयवात विकृती निर्माण होतात आणि त्यानुसार लक्षणे दिसतात. मुख्यत्वेकरून तीव्र स्वरूपाच्या रोगात खालील लक्षणे दिसतात.

जनावराचे चारापाणी खाणे व रवंथ करणे बंद होते. जनावर गुंगून उभे राहते, ४१ से. पर्यंत ताप चढतो, थरथर कापते, धापा टाकते, श्वासोछ्‌वास जलद व कष्टप्रद होतो. खोकते, श्वासनालात (मुख्य श्वासनलिकेत) सूज येऊन आत बेडके साचल्यामुळे घरघर असा आवाज दूरवर ऐकू येतो. डोळ्यांची श्लेष्मकला (अस्तरत्वचा) लाल होऊन तीतून पाणी वाहते. घसा व जीभ सुजून तोंडातून चिकट तारयुक्त लाळ गळते. कधीकधी जिभेची सूज जास्त झाली म्हणजे ती तोंडाबाहेर राहते. पचनेंद्रियात विकृती निर्माण झाल्यास, जनावराला प्रथम बद्धकोष्ठ होतो. पोटात दुखते व नंतर दुर्गंधीयुक्त जुलाब होतात. कधीकधी जनावराच्या गळ्याखाली पोळ्यापर्यंत, मानेवर, कानांवर, तोंडावर (नाकपुड्यांत, डोळे व डोके) सूज येते. हा भाग हाताला कढत लागतो व दुखरा असतो. क्वचित ही सूज योनी व गुदद्वार यांवरही येते. एखादे वेळी मेंदूवरील आवरणाला सूज आल्यामुळे जनावर बेभान होऊन भिंतीवर डोके आपटते. अशी निरनिराळी लक्षणे आढळतात व जनावर अशक्त होऊन दोनतीन दिवसांत मरते. रोगाने पछाडलेल्या जनावरांपैकी शेकडा ऐंशी जनावरे मृत्युमुखी पडतात.

रोगनिदान : वरील लक्षणांपैकी कित्येक लक्षणे दुसऱ्या अनेक रोगांमध्येही आढळतात. त्यामुळे नुसत्या लक्षणांवरून अचूक निदान करणे कठीण असते. काही वेळा रक्ततपासणीत रोगजंतू निश्चितपणे सापडतीलच असे नाही, तथापि बऱ्याच वेळा सापडतात. सुजलेल्या भागातील निःस्रावांच्या तपासणीत ते बहुधा सापडतातच. रक्त व निःस्राव यांच्या सूक्ष्मदर्शकाने केलेल्या तपासणीवरूनच निश्चित रोगनिदान होते आणि त्यामुळेच फऱ्या व सांसर्गिक काळपुळी यांसारख्या रोगांबाबतचा संशय दूर होतो.

मरणोत्तर तपासणी : घसा, श्वासनाल यांच रक्ताळलेली सूज व चिकट निःस्राव असून तो तांबूस असतो. छातीत पिवळसर पाणी आणि आतील भागावर रक्ताळलेले पट्टे दिसतात. फुप्फुसे सुजलेली व काही भाग घट्ट झालेला असतो. कातडीखालीही रक्ताळलेले पट्टे दिसतात. परिहृदयावर (हृदयावरील आवरणावर) रक्ताळलेले पट्टे आणि सूज असते. अंतर्हृद्स्तर (हृदयाच्या आतील आवरण), जठराशय (पोटाचा चौथा कप्पा) व आंत्र (आतडे) सुजलेले आणि त्यांवर रक्ताळलेले पट्टे असतात.

चिकित्सा : निरोगी जनावरापासून रोगी जनावर निराळे काढतात. त्याला गवताचा बिछाना घालून तांदळाची कांजी, शिजवलेले जव, ओला मऊ चारा यांसारखे पचेल असे हलके अन्न देतात. सल्फा औषधे पोटातून देतात. सल्फा मेझाथीन ३३% द्रावण किंवा पेनिसिलीन हे प्रतिजैव (अँटिबायॉटिक) शिरेतून टोचल्यास त्वरित आराम पडतो. लक्षणे दिसताच रोगप्रतिबंधक रक्तरस (रोगप्रतिकारक विशिष्ट ग्‍लोब्युलीन म्हणजे एक प्रकारचे प्रथिन असलेला रक्तातील द्रवपदार्थ) देतात.

प्रतिबंधक इलाज : रोगी जनावरास निराळे करून आजूबाजूच्या सर्व निरोगी जनावरांना लस टोचतात. ज्या भागात प्रतिवर्षी रोगाची साथ येते त्या भागातील जनावरांना पावसाळ्यापूर्वी लस टोचतात. दूरच्या प्रवासाला निघण्यापूर्वीच जनावरांना लस टोचतात. गोठे दलदल नसलेल्या उंचवट्यावर बांधल्यास आपोआपच रोगाला आळा बसतो. रोगी जनावर बांधलेली जमीन व त्याच्या सान्निध्यास असलेले सर्व सामान जंतुनाशकाने स्वच्छ करतात. मेलेले जनावर दूर व खोल पुरतात किंवा शक्य असल्यास जाळतात.

खळदकर, त्रिं. रं.