मादीरोगविज्ञान : पशुवैद्यकशास्त्रातील मादीच्या जनन तंत्रातील (जनन संस्थेतील) इंद्रियांच्या क्रिया-विक्रियांच्या (बदलांच्या) व विकृतींच्या अभ्यासाच्या शाखेला मादीरोगविज्ञान म्हणतात. या अभ्यासामध्ये प्रसूतिविद्या, श्रोणीय शस्त्रक्रिया (धडाच्या तळाशी हाडांच्या संयोगामुळे तयार झालेल्या पोकळीतील अवयवांची शस्त्रक्रिया) व जनन तंत्राशी संबंधित अंतःस्त्रावविज्ञान (सरळ रक्तात मिसळणारा उत्तेजक स्त्राव स्त्रवणाऱ्या ग्रंथींच्या स्त्रावांचा म्हणजे हॉर्मोनांचा अभ्यास) यांच्या अभ्यासाचा अंतर्भाव आहे मात्र सामान्यपणे जनन तंत्रातील विकृतींच्या अभ्यासाला मादीरोगविज्ञान म्हणण्याची प्रथा आहे. मादीरोगविज्ञानातील माहिती मानवी वैद्यकातील ⇨ स्त्रीरोगविज्ञानातील माहितीशी मिळती जुळती आहे.

भारताची अर्थव्यवस्था शेतीप्रधान असल्यामुळे ती पशु-उद्योगाशी निगडित आहे. गाय, म्हैस किंवा अन्य पाळीव पशूची मादी नियुक्त कालमर्यादेत प्रसूत होणे (विणे) हा पशु-उद्योगातील महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही कारणाने या प्रजोत्पादन चक्रात व्यत्यय आल्यास मादीच्या उत्पादनक्षमतेचा पुरेपूर लाभ उठवता येत नाही. इतकेच नव्हे, तर तिच्या अनुत्पादक काळातील पालनपोषणाच्या खर्चाचा बोजा व्यर्थ वाढतो. यावरून पशुपालन धंद्यातील या विषयाचे महत्त्व सहज लक्षात येईल.

आ. १. मादीची (गायीची) जननेंद्रिये : (१) अंडाशय, (२) अंडपुटक, (३) अंड, (४) पीतपिंड, (५) अंडवाहिनीचा नरसाळ्याच्या आकाराचा भाग, (६) अंडवाहिनी, (७) गर्भाशय ग्रीवा, (८) गर्भाशय शृंग, (९) योनी, (१०) भग.

मादीचे जनन तंत्र : मादीच्या जनन तंत्रातील अंडाशय (अंडकोश), अंडवाहिनी, गर्भाशय व योनी ही शरीरांतर्गत जननेंद्रिये आहेत, तर भग (दोन्ही बाजूंस ओठासारखा मांसल भाग असलेले फटीसारखे जनेनेंद्रिये) व भगोष्ठ (भगाच्या दोन्ही बाजूंकडील ओठासारखा मांसल भाग) ही बाह्य जननेंद्रिये आहेत. या सर्व इंद्रियांचे स्त्रियांच्या जनन तंत्रातील इंद्रियांशी, तसेच त्यांच्या कार्यप्रणालीशी बरेच साम्य आहे [⟶ जनन तंत्र]. त्यांचे थोडक्यात वर्णन खालीदिले आहे (आ.१).

अंडाशय : प्रत्येक मादीमध्ये गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंस एक एक असे दोन अंडाशय असतात व श्रोणिगुहेमध्ये (श्रोणीतील पोकळीमध्ये) बंधाच्या साहाय्याने ते पर्युदराच्या (उदरातील इंद्रियांवरील पातळ पडद्यासारख्या आवरणाच्या) घडीमध्ये उदरगुहेच्या छतामध्ये बसवलेले असतात. घोडीमध्ये अंडाशयाची आकार घेवड्याच्या बियांसारखा असून त्याची लांबी ५ ते १० सेंमी. असते. गायीचा अंडाशय लंबवर्तळाकृती असून त्याची लांबी २·५ ते ४ सेंमी. असते, तर मेंढीच्या अंडाशयाची लांबी १·२५ ते २·५ सेंमी. असते. बाह्यक (बाहेरचा कवचासारखा भाग) व मध्यक असे अंडाशयाचे दोन भाग असतात. अंडाशयाच्या पृष्ठभागावर घनाकार कोशिकांचा (पेशींचा) एक स्तर असतो. या कोशिकांपासून अंडपुटकांची (ज्यांत अपक्व अंडी असतात अशा लहान पिशव्यांची) उत्पत्ती होते म्हणून या स्तराला जननदअधिस्तर म्हणतात. यातील काही कोशिकांचे आकारमान वाढते व त्यांपासून अंड तयार होत. अंड म्हणजे पुढील संततीला मादीकडून प्राप्त होणारा अर्धा भाग. अंड्याच्या सभोवती असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कोशिका स्त्री मदजन (इस्ट्रोजेन) हे हॉर्मोन तयार करतात. ऋतुकालामध्ये ठराविक वेळी अंड पुटकातून अंडमोचन (अंड बाहेर पडण्याची क्रिया) होते. अंड बाहेर पडलेल्या जागी तेथील कोशिकांमध्ये बदल होऊन त्याचे पीतपिंडामध्ये रूपांतर होते. प्रौढत्व प्राप्त होऊन मादी माजावर येण्याच्या वेळी अंडपुटकाची वाढ व फुटणे हे ⇨ पोष ग्रंथीच्या (मेंदूच्या तळाशी मध्यभागी असलेल्या अंतःस्त्रावी ग्रंथीच्या) जनन ग्रंथिपोषक (गोनॅडोट्रॉफिक) व पुटकोद्दीपक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग) या हॉर्मोनांवर अवलंबून असते. स्त्रीमदजन व पोष ग्रंथीच्या वरील हॉर्मोनांच्या सहकार्याने अंडमोचन होते. अंडमोचनानंतर गर्भाशयामध्ये त्याचा शुक्राणूशी (पुं-जनन कोशिकेशी) संयोग होऊन ग्रर्भधारणा झाल्यास वर उल्लेखिलेला पीतपिंड प्रगर्भरक्षी प्रोजेस्टेरॉन) हॉर्मोन तयार करू लागतो. गर्भधारणा न झाल्यास पीतपिंडाचा आकार कमी होत जाऊन प्रगर्भरक्षी हॉर्मोनाचे उत्पादन थांबते व पुन्हा दुसऱ्या अंडपुटकाचा आकार मोठा होऊन पुढील ऋतुकालामध्ये अंडमोचन होते. निरनिराळ्या प्राण्यांतील हे ऋतुकाल आवर्तन ऋतुचक्र-कमी-जास्ती दिवसांचे असते. काही प्राण्यांमध्ये ऋतुचक्र प्रजनन मोसमामध्येच सुरू होते. मेंढी हा प्राणी मोसमामध्येच माजा वर येणारा आहे. गाय, म्हैस, घोडी व डुकरीण हे प्राणी वर्षभर त्यांच्या ऋतुचक्रातील दिवसाप्रमाणे माजावर येत राहतात. ऋतुकाल सुरू झाल्यावर अंडमोचन होण्याचा काल प्रत्येक जातीच्या प्राण्यात वेगवेगळा आहे. स्त्रीमदजन व प्रगर्भरक्षी यांखेरीज रिलॅक्झीन नावाचे आणखी एक हॉर्मोन अंडाशयात तयार होते.

अंडवाहिनी : प्रत्येक अंडाशयाकरिता एक याप्रमाणे दोन अंडवाहिन्या असतात व त्यांचे काम अंडाशयातून बाहेर पडलेले अंड गर्भाशयापर्यंत पोहोचविणे हे असते. या वाहिनींचे अंडाशयाकडील टोक नरसाळ्यासारखे असून त्याच्या काठावर झालर असते. उदरगुहेत विमुक्त झालेले अंड झालरीच्या हालचालीमुळे अंडवाहिनीत प्रवेश करते. अंडवाहिन्या मांसल असून त्यांच्या आतील बाजूस श्लेष्मकलेचे (बुळबुळीत पदार्थ स्त्रवणाऱ्या कोशिकांच्या पातळ स्तराचे) अस्तर असते. त्यातून श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) स्त्रवत असल्यामुळे त्यातून अंडाचा प्रवास सुलभ होतो. अंडवाहिनीच्या भित्तीच्या आकुंचनामुळे अंड पुढे सरकत हळूहळू गर्भाशयाकडे नेले जाते. अंडाचे निषेचन (फलन) नेहमी अंडवाहिनीमध्ये होते. या वाहिन्या परिवलित (वलये असलेल्या) असल्यामुळे त्या बंद होण्याचा धोका असतो. अंडाच्या परिपक्वतेची शेवटची अवस्था, निषेचन व निषेचित अंडाच्या विदलनापर्यंतच्या (निषेचित अंडाच्या एकापासून अनेक कोशिकांमध्ये रुपांतर होण्याच्या प्रक्रियेपर्यंरतच्या) वाढीच्या सर्व अवस्था त्याचा अंडवाहिनीतील प्रवास चालू असताना होत असतात.

गर्भाशय : सस्तन प्राण्यांच्या गर्भाशयाचे ग्रीवा (मानेसारखा भाग), अंग व गर्भाशय शृंग असे तीन भाग असतात. गर्भाशयाचा योनीलगतचा दंडगोलाकार भाग म्हणजे ग्रीवा, त्यामागे अंग आणि त्यामागे डावे व उजवे अशी दोन गर्भाशय शृंग अशी रचना असते. गर्भाशयाचे अंग व शृंग स्नायूंच्या पिशव्यांसारखे असतात. त्यांचा आतील भाग संयोजी ऊतक (समान रचना असलेल्या कोशिकांचा बनलेला व जोडण्याचे काम करणारा कोशिकासमूह) व अधिस्तर (आच्छादित करणारी अस्तरत्वचा) यांचा असतो. या अधिस्तराखाली गर्भाशय ग्रंथी असतात. गाय, म्हैस, शेळी, मेंढी व डुकरीण या माद्यांमध्ये शृंगांची वाढ विस्तृत असते व निषेचित अंडाची स्थापना व गर्भाची वाढ गर्भाशय शृंगातच होते. डुकरीणीमध्ये गर्भाशय शृंगांची लांबी १० ते १२·५ सेंमी. असते व त्यांना वलये असल्यामुळे एकापेक्षा अधिक गर्भ वाढवण्यास पुरेशी जागा उपलब्ध होते. घोडीमध्ये मात्र गर्भाशय शृंग लहान असल्यामुळे गर्भाची वाढ गर्भाशयाच्या अंगामध्ये होते. गर्भाशय ग्रीवा म्हणजे गर्भाशयाचे अंग व योनिमार्ग यांना जोडणारा नळीसारखा भाग होय. ग्रीवेच्या भित्ती जाड व मांसल असल्यामुळे ग्रीवेचे तोंड नेहमी जवळजवळ बंद राहते. माजाच्या वेळी हे तोंड शुक्राणूंना आत प्रवेश देण्याइतपतच उघडले जाते, तर प्रसूतीच्या वेळी मात्र संपूर्ण वाढलेल्या गर्भाला बाहेरच्या जगात प्रवेश करू देण्याइतपत विस्तृत होते. घट्‌ट व बुळबुळीत पदार्थाने ग्रीवा नेहमी भरलेली असते. नराकडून योनीत सुपूर्त झालेले शुक्राणू आत येऊ देणे व गर्भाशय दूषित होऊ न देणे हे काम ग्रीवेकडून होते.

योनी : बाह्य जननेंद्रियापासून गर्भाशयाच्या ग्रीवेपर्यंतच्या मांसल पोकळीस योनी म्हणतात. पोकळीच्या आतील भागावर उपकलेचे (अधिस्तराचे) अस्तर असून ऋतुचक्रातील बदलाप्रमाणे या उपकलेच्या कोशिकांमध्ये बदल घडून येतात. घोडीच्या योनिमार्गाची लांबी १५ ते २० सेंमी., गायीच्या २० ते २५ सेंमी., डुकरीणीच्या १० ते १२ सेंमी. व मेंढीच्या ८ ते १० सेंमी. असते. समागमाच्या वेळी शिश्न योनिमार्गामध्ये येते व रेतही येथेच पडते.

भग व भगोष्ठ : योनिमार्गाच्या बाहेरील द्वाराला भग म्हणतात. द्वाराजवळील त्वचेच्या घडी पडण्यामुळे बनलेल्या ओठासारख्या रचनेला भगोष्ठ म्हणतात. यातील बृहत्‌भगोष्ठाच्या आतील बाजूस लघुभगोष्ठ असतात व त्यांवर श्लेष्मकलेचे आवरण असते. बृहत्‌भगोष्ठावर धर्म ग्रंथी व ⇨ त्वक्-स्नेह ग्रंथी आढळतात.

मादीचा वयात येण्याचा काळ :कोणत्याही पशूच्या मादीचा जन्मानंतरचा विवक्षित काळ तिच्या शरीराची पूर्ण वाढ होण्यासाठी खर्च होतो. या काळात शरीरातील इतर तंत्रांतील इंद्रियांबरोबर जनन तंत्रातील इंद्रियांची वाढ चालू असते. ही वाढ जास्तीत जास्त योग्य मर्यादेपर्यंत पूर्ण झाली म्हणजे ती वयात आली असे म्हणतात. याच सुमारास तिच्या ऋतुचक्रास प्रारंभ होतो व दुग्धग्रंथींची वाढ, श्रोणिअस्थींंतील व एकूण शरीररचनेतील बदल, आवाजातील बदल इ. गौण लैंगिक लक्षणे व्यक्त होऊ लागतात. वयात येण्याबरोबर ती प्रजोत्पादनक्षम झाली, तरी तो प्रजोत्पादनास लायक झाली असे असत नाही, कारण अजून तिच्या शरीराची परिपूर्ण वाढ व्हावयाची असते. प्रजोत्पादनाची सुरुवात वयात आल्याबरोबर करण्याऐवजी परिपक्व वय होईपर्यंत थांबणे हितावह असते बहुतेक पाळीव पशूंच्या माद्यांमधील (मेंढी सोडून) वाढीचा हा काळ अनुत्पादक असला, तरी याकाळातील पोषण, संगोपन पद्धती, निरोगीपणा या गोष्टी तिच्या भविष्यकालीन उत्पादनक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

सामान्य जननचक्र : लैंगिक दृष्ट्या परिपक्व वयाच्या मादीच्या जीवनक्रमात एक प्रकारची तालबद्धता असते. तिच्या जननचक्रातील प्रत्येक कालखंडाची विशिष्ट आवर्तकालाने पुनरावृत्ती होत असते. या लयीत प्राण्यांच्या जातीनुसार, अभिजातीनुसार (अस्सल जातीनुसार) व वैयक्तिक फरकानुसार फेरफार होऊ शकतात.

जननचक्राचे कालखंड पुढे दिल्याप्रमाणे असतात : (१) मद अथवा माज, (२) गर्भधारणा, (३) प्रसूती, (४) गर्भाशय निवर्तन (पूर्व स्थितीवर येणे), (५) दुग्धकाल आणि (६) निष्क्रिय काल. पाळीव पशूमध्ये चौथ्या व पाचव्या आणि पाचव्या व सहाव्या कालखंडांतील फरक स्पष्टपणे व्यक्त होत नाहीत. तसेच मद अथवा माज या कालखंडाचे वैयक्तिक आवर्तन आढळून येते. याशिवाय ऋतुचक्रातील पूर्वमद (प्रत्यक्ष माज येण्यापूर्वीची अवस्था), मद अथवा माज (या काळात मादी संयोगास उत्सुक होऊन नरास जवळ येऊ देते), पश्चमद (यात गर्धधारणेस अनुकूल ठरतील असे फेरबदल गर्भाशयात होत असतात) व अमद (पश्चमद काळात गर्भधारणा न झाल्यास ऋतुचक्रातील पूर्वमद अवस्थेस व गर्भधारणा झाल्यास जनन तंत्रातील इंद्रियात इष्ट ते फेरबदल घडून येतात) या अवस्था दिसून येतात. भिन्नभिन्न जातींच्या माद्यांच्या प्रजोत्पादक कालखंडांची व इतर संबंधित माहिती वरील कोष्टक क्र. १ मध्ये दिली आहे.

मादीच्या प्रजो त्पादनातील हॉर्मोनांचे कार्य : हॉर्मोनांचे ऋतुचक्रावरील नियंत्रम, जननचक्रावरील परिणाम, दैनंदिन शरीरस्वास्थातील स्थान आणि त्यांच्यातील समतोलामुळे अगर बिघाडामुळे जनन तंत्रातील इंद्रियांवर होणारे परिणाम यांचे अनन्य साधारण महत्त्व आहे.

पोष ग्रंथीमध्ये उत्पन्न होणाऱ्या हॉर्मोनांचे अन्य अंतःस्त्रावी ग्रंथींवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नियंत्रण असते. वा ग्रंथीचे अग्र व पश्च असे दोन खंड असतात. अग्रखंडामध्ये जनन ग्रंथिपोषक, पुटकोद्दीपक व दुग्धस्त्रावक (प्रोलॅक्टिन) या तीन प्रजोत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या हॉर्मोनांचे उत्पादन होते. पुटकोद्दीपक हॉर्मोन अंडाशयातील अंडपुटकांची वाढ व संगोपन यांचे नियमन करते. जनन ग्रंथिपोषक हॉर्मोनामुळे अंडपुटक फुटणे व त्यातून अंड बाहेर पडणे या क्रिया घडतात, तर दुग्धस्त्रावक हॉर्मोनामुळे दुग्ध ग्रंथींचा विकास व दुग्धोत्पादन या क्रिया घडतात. पश्चखंडामध्ये गर्भाशय-संकोचक अथवा शीघ्र जननी (ऑक्सिटोसीन) व वाहिनीनीपीड (व्हॅसोप्रेसीन) या हॉर्मोनांचे उत्पादन होते. शीघ्रजननी हे बहुविघ कार्ये करणारे हॉर्मोन असून त्याचे उत्पादन गर्भावस्थेच्या अखेरच्या काळात वाढू लागते व त्यामुळे गर्भाशयाच्या आंकुचनास चालना मिळते. दुग्धस्त्रवणाच्या वेळी पान्हा सोडण्याचे कार्यही ह्याच हॉर्मोनामुळे होते. वाहिनीनिपीडीच्या प्रभावामुळे रोहिणिका (सूक्ष्म रोहिण्या) आंकुचन पावतात. या क्रियेमुळे प्रसवोत्तर रक्तस्त्रावाचे प्रमाण मर्यादित राहते. याशिवाय वृक्कीय नलिकेतून (मूत्रपिंडाच्या क्रियाशील भागातील नलिकेतून) जलशोषण वाढवून मूत्राचे प्रमाण कमी करणे हे कार्यही हे हॉर्मोन करते. पोष गंथ्रीत तयार होणाऱ्या हॉर्मोनांचे परस्परसंबंध व त्यांच्या प्रभावाखाली येणारी मादीच्या जनन तंत्राशी संबंधित असलेली इंद्रिये आ. २ मध्ये दर्शविली आहेत.

आ. २. पोष ग्रंथीत तयार होणाऱ्या हॉर्मोनांचे परस्परसंबंध व त्यांच्या प्रभावाखाली येणारी मादीच्या जनन तंत्राशी संबंधित असलेली इंद्रिये.

 

अंडाशयामध्ये तयार होणाऱ्या स्त्रीमदन हॉर्मोनाचे उत्पादन अंडपुटकात होते. जनन तंत्रातील इंद्रियांवरील त्याच्या परिणामामुळे योनीच्या श्र्लेष्मकलेची वृध्दी होऊन तिच्यातील कोशिकांचे शृंगीभवन (शिंगामध्ये असलेल्या घटक पदार्थांमध्ये रूपांतर होणाची क्रिया) होते. रुधिराभिसरण वाढते व भगोष्ठ पुष्ट दिसतात. गर्भाशयाच्या श्र्लेष्मकलेची वाढ होऊन गर्भाशय उत्तेजित होते व त्याची आकुंचनक्षमताही वाढते. गर्भाशय ग्रीवा शिथिल होऊन अंड्याच्या पांढऱ्या बलकासारखा पातळ स्त्राव गळू लागतो. भगोष्ठ सैल पडून किंचित विलग होतात. वरील बदलांमुळे जननमार्ग संयोगक्षम होतो. आकुंचनक्षमता वाढल्यामुळे शुक्राणूंचा गर्भाशयातील प्रवास सुलभ व जलद होतो. अंडाशयात तयार होणाऱ्या दुसऱ्या प्रगर्भरक्षी हॉर्मोनाच्या उत्पादनासाठी पोष ग्रंथीच्या अग्रखंडात तयार होणाऱ्या दुग्धस्त्रावक हॉर्मोनाची पीतपिंडावर क्रिया होणे आवश्यक असते. या हॉर्मोनामुळे गर्भाशयातील श्लेष्मकलेच्या आवरणाखालील ग्रंथींची वाढ होऊ लागते, गर्भाशयाची आंकुचनक्षमता कमी होऊ लागते व त्यामुळे गर्भधारणेस पोषक अशी परिस्थिती गर्भाशयात तयार होते. गर्भधारणा, गर्भाची वाढ व पोषण यांसाठी हे सर्व आवश्यक असते. थोडक्यात असे म्हणता येईल की, पश्वमद अवस्थेत तयारी करणे हे प्रगर्भरक्षी हॉर्मोनाचे कार्य आहे. गर्भावधीच्या अखेरीस पीतपिडांत रिलॅक्झीन या हॉर्मोनाच्या उत्पादनास प्रारंभ होतो व त्याच्या प्रभावामुळे श्रोणीमधील बंध शिथिल होऊ लागतात.

अवटू ग्रंथीत (मानेच्या पुढील बाजूस असलेल्या द्विखंडी अंतःस्त्रावी ग्रंथीत) तयार होणाऱ्या थायरॉक्सिन या हॉर्मोनाचे शरीराच्या वाढीबरोबरच जननेंद्रियांच्या वाढीवर नियंत्रण असते. मादीतील वंध्यत्व व जनन-अक्षमता यांच्याशी या हॉर्मोनाचा संबंध असावा, असा तर्क आहे. पोष गंथ्रीच्या अग्रखंडात तयार होणाऱ्या अवटू ग्रंथी उद्दीपक (थायरोट्रोपीन) या हार्मोनाचे थायरॉक्सिनाच्या उत्पादनावर नियत्रंण असते. [ ⟶ अवटू ग्रंथि].

अधिवृक्क ग्रंथी (वृक्काच्या वरच्या टोकाला असलेली अंत:स्त्रावी ग्रंथी) ॲड्र्रेनॅलीन व स्टेरॉइड वर्गातील इतर हॉर्मोनांचे उत्पादन करते. ह्या हॉर्मोनांच्या प्रभावामुळे पोष ग्रंथीच्या अग्रखंडात तयार होणाऱ्या दुग्धस्त्रावक हॉर्मोनाच्या उत्पादनास मज्जाव होऊन पान्हा सुटत नाही. तसेच पूर्वी स्त्रीमदजन हॉर्मोनाच्या प्रभावाखाली आलेल्या गर्भाशयावर त्यांची क्रिया होऊन ते शिथिल बनते. [ ⟶ अधिवृक्क ग्रंथि].

तृतीय नेत्र ग्रंथीमध्ये(मेंदूच्या तिसऱ्या विवराच्या छताच्या मागील बाजूस लटकलेल्या लहान ग्रंथीमध्ये) तयार होणाऱ्या हॉर्मोनाचा जन्मानंतर वयात येण्यापर्यंतच्या वाढीवर परिणाम होत असावा, असा तर्क आहे [⟶ तृतीय नेत्र पिंड] .

यौवनलोपी ग्रंथीची (घशामध्ये असणाऱ्या ग्रंथीची) कमाल वाढ वयात येण्यापूर्वीच होते व त्यानंतर ती जवळ-जवळ नाहीशी होते. यामुळे या ग्रंथीत तयार होणाऱ्या हॉर्मोनाचे कार्य वयात येण्यापर्यंतच्या वाढीशी निगडित असावे, असे समजले जाते. [ ⟶ यौवनपलोपी ग्रंथि].

गर्भधारणा व गर्भविकास : नैसर्गिक पैदास पद्धतीने अथवा ⇨ कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीने अंडवाहिनीत किंवा गर्भाशयात अंड व शुक्राणू यांचा संयोग होणे याला निषेचन असे म्हणतात. निषेचित अंड्याच्या गर्भाशयात रोपण होणे याला गर्भधारणा होणे म्हणतात. हा गर्भावस्थेचा प्रारंभ होय. निषेचनाच्या अथवा रोपणाच्या अभावी गर्भधारणा होऊ शकत नाही. निषेचनाच्या क्रियेत मातृक व पितृक अशा उभय कोशिकांचा संयोग होत असल्यामुळे गर्भाला प्राप्त होणाऱ्या गुणधर्मावर माता व पिता या दोहोंचा प्रभाव पडतो. पाळीव पशूंमध्ये ऋतुप्रारंभानंतर ठराविक अंडमोचन होत असते. अंडाचे निषेचन होण्यासाठी त्याआधी काही तास शुक्राणू गर्भाशय शृंगामध्ये हजर असणे जरुर असते. एका समागमाच्या वेळी नराकडून लक्षावधी शुक्राणू योनिमार्गात सोडले जात असले, तरी त्यातील काही हजारच अंडापर्यंत पोहोचतात व त्यांतील एकच अंडाच्या निषेचनास उपयोगी पडतो. तथापि हे हजारो शुक्राणू अंडाच्या भोवती काही जीवरासायनिक बदल घडवून आणण्यास जरूर आहेत, असे मानले जाते. निषेचित अंडाचे त्वरित विदलन होऊन त्याचे भ्रूणात व पुढे गर्भात रूपांतर होते. गायीमधील गर्भाच्या वाढीचा ढोबळ तपशील कोष्टक क्र. २ मध्ये दिलेलाआहे.

विकृती :वंधत्ववजनन-अक्षमता : जननक्षमतेच्या सामान्य प्रमाणात कमी अधिक घट होणे म्हणजेच जनन-अक्षमता होय. जनन-क्षमता संपूर्ण नष्ट झाल्यास वंधत्व प्राप्त होते. जनन-अक्षमता तात्पुरती किंवा नित्याची असू शकते व ती अनेक कारणांमुळे उद्‍भवते. बहुधा अनेक कारणांच्या एकत्रित परिणामामुळे जनन-अक्षमता निर्माण होते व त्यात तात्कालिक कारणांचाही समावेश होतो.

जनन-अक्षमतेची कारणे जन्मजात तशीच आनुवंशिक असू शकतात. जन्मजात कारणांतील विकृती जन्मापासून असल्या, तरी त्या गुणसूत्रावरील (एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आनुवंशिक लक्षणे नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकावरील) जीनामार्फत (गुणसूत्रावर निश्चित जागी असणाऱ्या व निश्चित गुणधर्म पुढील पिढीत नेणाऱ्या जैव एककामार्फत) पिंडधर्मात आलेल्या नसतात. आनुवंशिक विकृती मात्र जीनामार्फत पिंडधर्मात आलेल्या असतात.

जन्मजात व आनुवंशिक विकृती : () अविकसितअंडाशय: ही विकृती गुणसूत्रावरील एकाच जीनाकडून व्यक्त होते आणि त्यामुळे नर व मादी या दोन्हीमध्ये दुष्पपरिणाम घडविते. आयुष्याच्या कोणत्याही कालखंडात ही विकृती होऊ शकत असल्याने काही माद्या प्रजोप्तादनच करू शकत नाहीत, तर काही माद्यांची एक दोन वेते झाल्यावर ही विकृती होते. एक किंवा दोन्ही अंडाशय अविकसित असू शकतात व एकच अविकसित राहिल्यास गर्भाशयात विकृती निर्माण होऊ शकत नाही. पण दोन्ही अविकसित असल्यास संपूर्ण प्रजोप्तादन मार्गच अविकसित राहतो. अशा वेळी गौण लैंगिक लक्षणेही अव्यक्त राहतात. मादीच्या शरीराचा बांधा व तिचे वर्तन नराप्रमाणे असते. श्रोणि अस्थि वळूप्रमाणे अरुंद राहतात. आणखी काही मारक जीनांमुळे अविकसित अंडाशयाखेरीज शारीरिक व शरीरक्रियात्मक विकृती निर्माण होतात व त्यामुळे माद्या प्रजोप्तादनास निरुपयोगी होतात.

() वंध्ययमी: सामान्यतः एकावेळी एक गर्भ राहणाऱ्या पशूंच्या मादीला जुळे होऊन त्यातील एक नर व एक मादी गर्भ असल्यास दोन्हींच्या गर्भावरणाचा व रुधिराभिसरणाचा संयोग झाल्यामुळे पुंस्त्रावांचा प्रभाव अधिक झाल्याने मादीची लैंगिक वाढ विकृत होऊन ती बहुधा वंध्या होते. तिला वंध्ययमी म्हणतात. वंध्ययमीची जननेंद्रिये अविकसित असतात व ती वळूप्रमाणे दिसते. बाह्य जननेंद्रिये मादीसारखी असली, तरी अंतर्गत जननेंद्रिये नरासारखी असतात म्हणून वंध्ययमीला उभयलिंगी असेही म्हणता येईल. भारतात गायीमध्ये होणाऱ्या जुळयांचे प्रमाण ०·२% आहे. त्यातही एक मादी व एक नर अशा जुळयांचे प्रमाण केवळ ०·९% आहे. अशा जुळ्यांपैकी ९२% माद्या वांझ असतात.

हॉर्मोनांच्या असमतोल उत्पादनामुळे होणाऱ्या विकृती : ऋतुचक्रावरील व जननचक्रावरील हॉर्मोनांच्या नियंत्रणाचा उल्लेख वर आलाच आहे. प्रत्येक हॉर्मोनाचे उत्पादन योग्य वेळी आवश्यक इतपत झाले, तरच दैनंदिन शरीरव्यापारावरील नियंत्रणात समतोल राहतो. याखेरीज हॉर्मोनांचे एकमेकांच्या कार्यावरही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नियंत्रण राहते. या नियंत्रणात बिघाड झाल्यास त्याचे दुष्परिणाम जननतंत्रामध्ये दिसून येतात. प्रथमतः जननक्षमता अनियमित होणे, नंतर जनन-अक्षमता व शेवटी वंध्यत्व हे ते दुष्परिणाम होत. जनन ग्रंथिपोषक हॉर्मोनाच्या अंडपुटावरील नियंत्रणात बिघाड झाल्यास सामान्य जननचक्रात अंडाशयातील अंडपुटक अभंग राहतात. अशा अनेक अंडपुटकांच्या स्त्रीमदजनहॉर्मोनांचे उत्पादन वाढून मादी सतत माजावरच अतिकामनिक अवस्थेत राहते. याउलट स्त्रीमदजन हॉर्मोनाचे उत्पादन आवश्यक पातळीपेक्षा कमी झाल्यास माज अव्यक्त राहातो. अशावेळी अंडमोचनाचे कार्य होत असले, तरी माजाची लक्षणे अव्यक्त राहिल्याने मादीस वळू दाखविला जात नाही व प्रजननामध्ये व्यत्यय येतो. तसेच पीतपिंड कायम राहिल्यामुळे त्यातून स्रवणाऱ्या प्रगर्भरक्षी हॉर्मोनाचे उत्पादन होत राहून अंडाशयातील अंडपुटाच्या वाढीत व्यत्यय येऊन मादी माजावर येत नाही. एखादे वेळी माजाच्या लक्षणांचा आभास निर्माण झाला, तरी अंडमोचन न झाल्याने मादीमध्ये गर्भधारणा होत नाही.

उपार्जित विकृती : (उपार्जित म्हणजे जन्माच्या वेळी नसलेल्या पण नंतर प्राप्त झालेल्या). संक्रामक रोगामुळे होणाऱ्या विकृतीचा यात समावेश होतो. ब्रूसेलोसिस, व्हिब्रिओसीस, ट्रिकोमोनियासीस व लेप्टोस्पायरोसीस यांसारख्या नर-मादी संयोग क्रियेमध्ये प्रसार होणाऱ्या रोगांमुळे अनियमित ऋतुचक्र, गर्भपात, जननतंत्रातील इंद्रियांचा दाह इ. विकृती होऊन जनन-अक्षमता व वंध्यत्व येते.

व्हिब्रिओसीस:व्हिब्रिफीटस या स्वल्पविरामासारख्या आकाराच्या सूक्ष्मजंतूमुळे हा रोग होतो. गाय व मेंढी या प्राण्यांमध्ये हा आढळून आला आहे. रोगी वळूच्या वीर्यातून संयोगाच्या वेळी गायीला रोगसंसर्ग होऊन जनन-अक्षमता व गर्भपात या विकृती होतात. गर्भपात सामान्यतः चौथ्या ते सातव्या महिन्यांत होतात. रोगसंसर्ग झाल्यापासून तीन महिन्यांनी गायीमध्ये प्रतिरक्षा (रोग- प्रतिकार क्षमता) उप्तन्न होते व त्यानंतर गर्भधारणा होऊन सामान्य प्रसूती होते, असे अनुभवान्ती आढळून आले आहे. पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन यांसारख्या औषधांचा उपयोग करून काही अंशी रोग आटोक्यात राहतो. भारतामध्ये हा रोग क्वचितच आढळून येतो.

लेप्टोस्पायरोसीस: लेप्टोस्पायरा या प्रजीवामुळे (प्रोटोझोआमुळे) गायीमध्ये व डुकरीणीमध्ये गर्भपात होतात. भारतामध्ये हा रोग अलीकडेच आढळून येऊ लागला आहे. रोगी जनावराच्या मूत्रातून, तसेच कीटकांमार्फत रोगसंसर्ग होतो. अमेरिकेमध्ये गर्भपात हे या रोगाचे गायीमधील एकमेव लक्षण आढळते. तेथील एका राज्यातील पाहणीत १४% जनावरे संसर्गित असल्याचे आढळून आले होते. ताप, कावीळ, स्तनशोथ (स्तनग्रंथींची दाहयुक्त सूज) व रक्तमिश्रित मूत्र ही रोगलक्षणे आढळून येतात. गर्भपात होत असले, तरी गायीमध्ये जनन-अक्षमता आढळून येत नाही.

ब्रूसेलोसिस व ट्रिकोमोनियासीस या रोगांची माहिती ‘गाय’ या नोंदीमध्ये दिलेली आहे.

भ्रूणमृत्यू : अंड्याच्या निषेचनानंतर त्वरित विदलन सुरू होऊन अनेक कोशिका तयार होतात. वरच्या थरातील कोशिका गर्भाशयाच्या आतील अस्तर थरातील कोशिकांशी एकजीव होतात. आतील थरातील कोशिकांची वाढ होऊन त्याचे भ्रूणात रूपांतर होते. गाय व मेंढी या प्राण्यांमध्ये या अवस्थेस १०० ते २०० तास लागतात. भ्रूणाची वाढ पूर्ण होण्यासाठी म्हणजे गर्भाच्या शरीराचा आकार व त्यातील निरनिराळ्या तंत्रांची वाढ स्पष्टपणे दिसून येण्यास गायीमध्ये  ४५ दिवस, मेंढीमध्ये ३५ दिवस, डुकरीणीमध्ये ३० तर घोडीमध्ये ४९ दिवस लागतात. आनुवंशिकता, अंड अगर शुक्राणू यांची अप्राकृत (असाधारण) रचना, जंतुसंसर्ग व अंडवाहिनी किंवा गर्भाशय यांतील प्रतिकूल परिस्थिती या कारणांनी कित्येकदा भ्रूण मरण पावतो. भ्रूणाचे शरीर मांसल असल्यामुळे त्याचे अवशेष मादीच्या शरीराबाहेर न टाकले जाता गर्भाशयातच शोषून घेतले जातात. भ्रूण मृत्यूनंतर मादी लवकर माजावर येत नाही.

गर्भधारणा निदान: पशूमध्ये गर्भधारणा निदानाला विशेष महत्त्व आहे कारण गाभण समजून मादीच्या पालनपोषणाचा खर्च वाया जातो व आर्थिक नुकसान होते. मादीचा नराशी संयोग झाल्यानंतर ती गाभण राहते परंतु ती राहिलीअसेलच असे नाही. सामान्यपणे पशूंच्या माद्या संयोगानंतर त्यांच्या ऋतुचक्रातील विशिष्ट दिवसानंतर माजावर आल्या नाहीत, तर त्या गाभण आहेत, असे समजतात. गर्भधारणा निदान करून त्याची खात्री करून घेता येते. भ्रूण मृत्यू झाला असल्यास ती गाभणही नसते व माजावरही येत नाही. अशावेळी गर्भधारणा निदान उपयुक्त ठरते.

परीक्षा : दृश्यपरीक्षा: या परीक्षा पद्धतीने ढोबळमानाने गर्भधारणा निदान करता येते. त्वचा सतेज दिसणे, शरीर पुष्ट होणे, वजन व पोटाचा घेर वाढणे, कासेचे आकारमान वाढणे (विशेषतः पहिलारू मादीत ही वाढ नजरेत भरण्याइतपत असते) या लक्षणांवरून गर्भधारणेचा अंदाज बांधणे शक्य असते.

हस्त परीक्षा: गाय, म्हैस, घोडी यांसारख्या मोठ्या जनावरांमध्ये मादीच्या गुदद्वारातून लांबवर हात घालून चाचपून गर्भाच्या वाढीच्या आकारमानावरून वेगवेगळ्या अवस्था निश्चितपणे अजमावता येतात. हे अर्थातच तज्ञ माणसालाच शक्य आहे. गर्भावधीच्या दुसऱ्या महिन्यामध्ये (६ते८आठवड्यांनी) ही परीक्षा करता येते. शेळी, मेंढी, कुत्री या प्राण्यांमध्ये स्टेथॉस्कोपच्या साहाय्याने गर्भाच्या हृदयाचे स्पंदन ऐकून गर्भधारणा परीक्षा करणे शक्य होते.

जैपरीक्षा: गरोदर स्त्रीचे मूत्र अथवा रक्त घेऊन त्यांतील विविध हॉर्मोनांच्या अस्तित्वावरून जैव परीक्षा करून गर्भधारणा निदान परीक्षा करतात [⟶गर्भारपणा]. पशूंमध्ये अशी परीक्षा फक्त घोडीमध्ये करता येते. गाभण घोडीचे मूत्र, अंडाशय काढून टाकलेल्या किंवा वयात न आलेल्या उंदराच्या मादीमध्ये टोचल्यास तिच्या योनिमार्गातील उपकलेतील कोशिकांमध्ये होणारा बदल सूक्ष्मदर्शकाने पाहून ही परीक्षा करता येते. शेळ्या मेंढ्यांमध्ये गर्भधारणा निदान करण्यासाठी अलीकडे श्राव्यातील उपकरणांचा [⟶ श्राव्यातीत ध्वनिकी] उपयोग करण्यात येऊ लागला आहे. मथुरा येथील केंद्र शासनाच्या शेळ्यांसंबंधित संशोधन केंद्रात केलेल्या प्रयोगांत ‘मेंडाटा गर्भधारणा अभिज्ञापका’च्या साहायाने ९२% शेळ्यामेंढ्यांमधील निदान अचूक करता आले.

लैंगिक आरोग्य नियंत्रण : पाळीव पशूंच्या मादीचे मुख्य कर्तव्य प्रजनन हे आहे. दुग्धोत्पादन, मांसोत्पादन, लोकर इ. गोष्टी तदनुषंगिक आहेत. प्रजनन नियमितपणे होत राहिले, तरच मादीच्या आयुष्याच्या अंगीभूत कमाल उत्पन्नाचा लाभ किफायतशीरपणे घेणे शक्य होते. यासाठी मादीच्या प्रजनना संबंधी पुढील नोंदी संगतवार ठेवणे आवश्यक असते : माजावर आल्याची तारीख, संयोग तारीख, उलटल्याची तारीख, प्रसूतीची तारीख, प्रसवोत्तर रोगाच्या नोंदी वगैरे.

गाय, म्हैस, घोडी यांसारख्या मोठ्या पशूंची गर्भधारणा निदान परीक्षा हाताने खात्रीशीरपणे करता येत असल्याने प्रत्येक वीर्यसेचनानंतर (नैसर्गिक अगर कृत्रिम) ६ ते ८आठवड्यांनी अशी परीक्षा करणे इष्ट असते तसेच तीन-चार संयोगांमध्ये गर्भधारणा न झाल्यास जनन-अक्षमता किंवा वंध्यत्व यासाठी तपासणी करणे इ. बाबींकडे लक्ष पुरविले, तरच प्रजनन सुरळीत व फायदेशीर होते.

पहा : गर्भपात; प्रसूतिविज्ञान; वीर्यसेचन, कृत्रिम.

संदर्भ : 1. Arthur, G. H. Wright’s Veterinary Obstetrics, London, 1964.

2. Cole, H. H.; Cups, P. T. Reproduction in Domestic Animals, New York, 1969.

3. Hafez, E. S. E. Reproduction in Farm Animals, Philadelphia, 1968.

4. Perry, E. J. The Artificial Insemination in Farm Animals, New Brunswick, 1952.

5. Roberts, S. J. Veterinary Obstetrics and Genital Diseases, New York, 1971.

साने, चिं. रा.; दीक्षित, श्री. गं.