गवत्या संकंप : (गवत लागणे, ग्रास टेटॅनी). रक्तरसातील (रक्तातील द्रव पदार्थातील) मॅग्नेशियमाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जनावराच्या मागच्या पायातील लवचिकपणा कमी होऊन ताठून चालण्यामुळे लटपटत ओढत चालल्याचा भास होणारा रोग. संकंप म्हणजे स्नायूंतील मज्जातंतूंचा विक्षोभ झाल्यामुळे स्नायूंचे आकुंचन होणे व काही वेळा आकडी येणे ही लक्षणे असणारा विकार. एकोणिसाव्या शतकापासून हा रोग माहीत असला, तरी त्या विषयीची उपयुक्त माहिती तसेच रोग नियंत्रण करण्यासंबंधीच्या ज्ञानात विशेष प्रगती नुकतीच झाली आहे. प्राण्यांतील संकंप या नावखाली ⇨ आक्षेपीविकारांचे (आकडी वा आचके येणाऱ्या विकारांचे) व ⇨ पक्षाघाताचे निरनिराळे प्रकार ओळखले जातात. रोगाच्या कारणमीमांसेवरून ह्या रोगाला ‘मॅग्नेशियम न्यूनता संकंप’ असेही म्हणतात. रोगाचा प्रादुर्भाव रवंथ करणाऱ्या पशूंतील मादीवर्गात आढळतो. हा रोग विशेषेकरून गायीत होत असला, तरी आठ-दहा महिनेपर्यंत बव्हंशी दुधावर वाढविलेल्या वासरांत व शेळ्या-मेंढ्यांनाही होतो.

लक्षणे : मागील पाय दुमडता येत नसल्यामुळे जनावर पाय ताठूनच चालते व झोके खात असल्यासारख्या भास होतो. भूक कमी होते. जनावर सुस्त होते. गंभीर स्वरूपात रोगी जनावर घाबरट व बेफाम बनते, वांरवार लघवी करते आणि त्याला हगवण सुरू होते. पायांची आणि शेपटीची संकंपी आंकुचने होतात. व डोके मागे टाकले जाते. पक्षाघात होऊन जनावर जमिनीवर पडते आणि त्याला आक्षेपी लक्षणे होऊन मृत्यू येतो. कधीकधी लक्षणे न दिसता अचानक जनावर मरून पडलेले आढळते.

प्रादुर्भाव : मॅग्नेशियमाच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. दुभत्या व गाभण जनावरांना मॅग्नेशियम आधीच जास्त लागते. त्यातही गवतातील त्याचे प्रमाण कमी असले म्हणजे अशी जनावरे ह्या रोगाने जास्त पछाडली जातात. उन्हाळ्याच्या सुरुवातीस किंवा पावसाळ्यातही कधीकधी हा रोग उद्‌भवतो. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया व नेव्हाडा या राज्यांत हा रोग गंभीर स्वरूपाचा आढळला असून तेथे गेल्या काही वर्षांत दहा हजारापेक्षा जास्त जनावरे मेली. अमेरिकेतील कित्येक राज्यांत, तसेच नेदर्लंड्‌स, ब्रिटन बेटे, फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क आणि न्यूझीलंड ह्या देशांतही गंभीर स्वरूपाच्या साथी उद्‌भवल्याचे नमूद आहे. ह्या रोगामुळे कळपातील १ ते १० टक्के जनावरे आजारी होतात.

हवामानाशी रोगाचा संबंध : हवेतील तापमानाचा ह्या रोगाशी घनिष्ट संबंध आहे. थंडीच्या दिवसानंतर तापमान वाढू लागले की, रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. वसंत ऋतूत लागोपाठ सहा दिवस १४° सें. च्यावर सरासरी तापमान राहिले, तर रोगोद्‌भव अजिबात होत नाही. पण तेच तापमान कमी होऊन पुन्हा चढू लागले की, त्या सुमारास पाच दिवसांनी पुन्हा रोगोद्‍‌भव होतो. तसेच थंड व पावसाळी ऋतूंत रोगाचा प्रादुर्भाव वाढत्या प्रमाणात असतो.

गवतातील पौष्टिकता : नायट्रोजनयुक्त खते देण्याने घास-चाऱ्यातील शुष्क घटक कमी होण्याची प्रवृत्ती असते. अशा वेळी गवतात मॅग्नेशियमाचे प्रमाण कमी असेल, तर जनावरांना आवश्यक तो मॅग्नेशियमाचा पुरवठा ओल्या गवतातूनही होत नाही. हवामानाचा रोग प्रादुर्भावावर परिणाम का घडतो याचे कारण निश्चित समजलेले नाही. तथापि थंडीच्या नंतर तापमान वाढू लागले की, गवतातील पोटॅशियमाचे प्रमाण वाढत जाते व त्यामुळे पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचा  समतोल बिघडतो व रोगाचा प्रादुर्भाव होतो. खतामध्ये पोटॅशियमाचे व नायट्रोजनाचे वाढते प्रमाण असल्यास जमिनीतील मॅग्नेशियमावर ताण पडतो व गवतात त्याचे प्रमाण कमी होते. गवतातील हे प्रमाण ०·२१ टक्क्यांपेक्षा कमी झाले, तर रोगाचे प्रमाण वाढते. मॅग्नेशियमयुक्त खते दिल्यामुळे ब्रिटनमध्ये रोगाचे प्रमाण दृश्य स्वरूपात कमी झालेले आढळले. द्विदल वनस्पतींत मॅग्नेशियमाचे अवक्षेपण (साचणे) जास्त होते म्हणून रोग टाळण्याकरिता खाद्यात द्विदले समाविष्ट करणे हा एक मार्ग आहे.

रोगप्रतिबंध व उपचार : जनावरांना गवतातून मॅग्नेशियमाचा योग्य तो पुरवठा होण्यासाठी कुरणांना मॅग्नेशियमयुक्त खत देणे हा सर्वांत उत्तम उपाय होय. मॅग्नेशियममिश्रित लवणाचे खडे चाटण्यास ठेवतात. रोगी जनावारांना मॅग्नेशियम ग्‍लुकोनेट व कॅल्शियम ग्‍लुकोनेट टोचतात. ह्यांमुळे रोगी जनावरे लवकर बरी होतात.

खळदकर, त्रिं. र. बापट, श्री. ह.