सराप्रोटोझोआ या एककोशिक प्राण्यांच्या मॅस्टिगोफोरा वर्गातील ट्रिपॅनोसोमा प्रजातीतील काही परजीवींमुळे पाळीव प्राण्यांमध्ये रोग होतात. हे असिकाय (ट्रिपॅनोसोम) कशाभिकायुत (शेपटीसारखा अवयव असलेले) असून पृष्ठवंशी व अपृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या व नसलेल्या) प्राण्यांमध्ये बहुधा रक्तामध्ये आढळून येतात. सर डेव्हिड बूस यांनी १८९५ मध्ये आफ्रिकेतील ऱ्होडेशिया, युगांडा, सूदान व टांझानिया या देशांतील पाळीव जनावरांना ट्रिपॅनोसोमा बूसिआय या परजीवीमुळे नगान नावाचा रोग होऊन अनेक जनावरे मृत्युमुखी पडतात, हे दाखवून दिले. तसेच ग्लोसिना मॉर्सीटान्स व इतर जातींच्या त्सेत्से माश्यांमार्फत या रोगाचा प्रसार होतो [→ त्सेत्से माशी], हेही त्यांनीच १८९७ मध्ये निदर्शनास आणून दिले. यानंतरच्या काळात आणखी काही असिकाय परजीवींमुळे जनावरांना व माणसांना कमी-अधिक तीव स्वरूपाचे रोग होतात, असे आढळून आले. सरा हा अशा रोगांपैकी एक असून तो ट्रि. ईव्हॅन्साय या परजीवीमुळे होतो. भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया, आग्नेय आशियातील देश, इराण व सौदी अरेबिया या देशांमध्ये हा रोग आढळून येतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये यूरोपातील देशांमधून भारतात आयात केलेले विदेशी घोडे अधिक रोगगाहक दिसून आले. हे घोडे पुढे चीनमध्ये हलविले गेल्यावर चीनमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. घोडे, खेचरे, गाढवे, गायी, म्हशी, उंट, हत्ती व कुत्री या प्राण्यांना हा रोग होत असला, तरी घोडा, खेचर व गाढव यांना तो तीव स्वरूपात होतो, तर गायी-म्हशींना सामान्यपणे सौम्य स्वरूपात होतो पण क्वचित तीव स्वरूपाच्या साथी येऊन त्यादेखील मृत्युमुखी पडतात. मुख्यत्वे टिबॅनिडी व स्टोमोक्सिनी (घोड्याच्या तबेल्यात आढळणाऱ्या) या गटातील रक्तशोषक माश्यांमुळे या रोगाचा प्रसार होतो. मात्र त्सेत्से माश्यांच्या शरीरात काही असिकाय परजीवींच्या जीवनचकातील अवस्थांची वाढ होते, तशी या माश्यांच्या शरीरात होत नाही. फक्त यांत्रिक पद्धतीने त्या रोगाचा प्रसार करतात. रोगी जनावरांचे रक्तशोषण केल्यानंतर या माश्या निरोगी जनावरांना चावतात व या क्रियेमध्ये रोगकारक परजीवी निरोगी जनावरांच्या शरीरात टोचले जातात. कुत्र्यांच्या बाबतीत मात्र माश्यांशिवाय गोचिडया व पिसवा यांच्यामुळे रोगप्रसार होत असावा, असा समज आहे. चार ते पंधरा दिवसांच्या रोगपरिपाककालानंतर (रोगकारक शरीरात प्रवेशिल्यानंतर लक्षणे दिसू लागेपर्यंतच्या काळानंतर) लक्षणे दिसू लागतात. भारतामध्ये पावसाळ्यात व त्यानंतर लगोलग रोगोद्भव मोठया प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. याचे कारण रोगप्रसार करणाऱ्या माश्या त्यावेळी सर्वत्र जास्त प्रमाणात असतात.

लक्षणेघोड्यांना पाळीचा ताप येतो. तापाचे मान बरेच असून तो तीन ते चार दिवस टिकून राहतो. सात ते दहा दिवसांच्या विरामानंतर पुन्हा तापाची पाळी येते. डोळ्यांच्या व सर्व दृश्य श्लेष्मकलेवर (शरीराच्या पोकळ्यांच्या आतील भागांवरील अस्तर त्वचेवर) केशिका (सूक्ष्म रक्तवाहिन्या) फुटल्यामुळे होणाऱ्या रक्तस्रावामुळे तांबडे ठिपके दिसतात. पाय, गळा, खालच्या जबडयाखाली, छाती व पोटाचा खालचा भाग, जननेंद्रियाचे आवरण इ. भागांवर जलशोफ (जलयुक्त सूज) दिसून येतो. रोग वाढत गेल्यास श्लेष्मकला फिकट व पिवळट दिसू लागतात. रोगाच्या अंतिम अवस्थेमध्ये घोडा खंगत जाऊन त्याच्या बरगड्या दिसू लागतात, तो अडखळत चालतो व कधीकधी पायांचा अंशतः पक्षाघात झाल्याचे आढळून येते व आडवा पडून राहतो. उपचार न केल्यास सहा ते आठ आठवडयात मृत्यू ओढवतो.

उंटांमध्ये सर्वसाधारण रोगलक्षणे घोडयाप्रमाणे दिसत असली, तरी काही वेळा तापाच्या पाळ्या वर्षानुवर्षे येत राहतात. उंट २-३ वर्षांपर्यंत आजारी असतो म्हणून या रोगाला ‘तिबर्सा’ असेही नाव आहे. सूदान, अल्जेरिया व ईजिप्तमधील एक मदार असलेल्या उंटांमध्ये आशियातील उंटांपेक्षा हा सौम्य स्वरूपात आढळून येतो.

गायी-म्हशींमध्ये रोगाचे स्वरूप सर्वसाधारणपणे सौम्य असते. रोगकारक असिकाय परजीवी कित्येक महिने त्यांच्या शरीरात (रक्तात) असले, तरी काहीही रोगलक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे ही जनावरे रोगवाहक बनून घोडे, खेचरे व कुत्री यांसारख्या अतिरोगगहणशील जनावरांना धोकादायक होऊन बसतात. मात्र काही वेळा दुसऱ्या एखादया रोगाने त्यांची रोग-प्रतिकारक्षमता (रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती) कमी झाल्यास तीव स्वरूपाची साथ येते. अशा वेळी उच्च ताप, उद्दीपित होणे, गोलगोल फिरणे, दात खाणे, वारंवार मलमूत्र विसर्जन, घोर लागल्यासारखे कष्टश्वसन इ. लक्षणे दिसतात व शक्तिपात होऊन जनावरे एक-दोन दिवसांत मृत्यू पावतात. गायीगुरांपेक्षा म्हशींमध्ये रोगाचा जोर अधिक राहतो.

हत्ती व कुत्र्यांमध्ये उच्च तापाच्या पाळ्या हेच मुख्य लक्षण दिसते. हत्तींमध्ये चिरकारी (जुनाट) स्वरूपात तर कुत्र्यामध्ये तीव स्वरूपात रोग होऊन कुत्रा एक ते दीड महिन्यात मरण पावतो.

रोगनिदानवर उल्लेखिलेल्या लक्षणांवरून रोगनिदान होऊ शकते. तथापि, निश्चित रोगनिदान आजारी जनावराचे रक्त किंवा सूज आलेल्या भागातील द्रवाची सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने तपासणी केल्यानेच होते. रक्त काढल्याबरोबर काचेवर एक थेंब घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केल्यास रक्तामध्ये वळवळ करणारे ट्रॅ. ईव्हॅन्साय परजीवी स्पष्टपणे दिसल्यास रोगनिदानाची निश्चिती करता येते. अशी तपासणी उच्च् ताप असते वेळी किंवा दिवसाचे तापमान अधिक असते अशा दुपारच्या वेळी रक्त काढून केल्यास परिघीरक्ताभिसरणामध्ये हे परजीवी आढळण्याची शक्यता अधिक असते (जनावरांत कानाच्या टोकाला टाचणी टोचून तपासणीसाठी रक्त काढतात). उंटाच्या परिघीरक्ताभिसरणात असिकाय सहसा असत नाहीत. त्यामुळे त्याच्या रक्ताची मर्क्युरिक क्लोराइड परीक्षा करून (रक्ताचा थेंब व मर्क्युरिक क्लोराइड विद्राव यांचे मिश्रण केल्यावर दिसून येणारी विशिष्ट रासायनिक प्रक्रिया) निश्चित रोगनिदान करता येते. ही परीक्षा दुसऱ्या प्राण्यांमध्ये लागू पडत नाही. कधीकधी रक्त तपासणीमुळेही निश्चित रोगनिदान झाले नाही, तर संशयित जनावराचे रक्त काढून ते सशामध्ये टोचतात. सशाच्या शरीरात असिकाय परजीवींचे गुणनवाढ होते. टोचल्यावर एक-दोन दिवसांनी सशाच्या रक्ताची तपासणी केल्यास त्यात असिकाय आढळून येतात व रोगनिदान होऊ शकते.

उपचारनॅगॅनॉल, अँट्नोपॉल, अँट्रिसाइड (क्विनपायरॅमीन सल्फेट), अँटिमनी पोटॅशियम टार्टारेट इ. अनेक औषधे या रोगावर परिणामकारक आहेत. घोडयांना प्रत्येक ४५·५ किगॅ. वजनाला पहिल्या, आठव्या व पंधराव्या दिवशी अनुक्रमे ०·६, ०·३ व ०·३ गॅ. मात्रेमध्ये अँट्नोपॉलाचा १० टक्के विद्राव शिरेमध्ये टोचतात. यानंतरच्या रक्ततपासणीत पुढील ५६ दिवसांत केव्हाही परजीवी दिसले नाहीत, तर घोडा बरा झाला असे समजतात. गायी-म्हशींमध्ये अँटिमनी पोटॅशियम टार्टारेटाचा २ टक्के विद्राव दर ४५·५ किगॅ. वजनाला 5 मिलि. ही मात्रा शिरेमध्ये टोचतात. हत्तींमध्ये १४ दिवसांच्या अंतराने ३० गॅम व उंटामध्ये ४ गॅ. अँट्रोपॉलाचा १० टक्के विद्राव शिरेमध्ये टोचतात. हत्तींमध्ये कानाच्या शिरेमध्ये अंतःक्षेपण करतात. यांतील काही औषधांची सरा रोगाच्या मोसमात काही अंतराने एक ते तीन अंतःक्षेपणे दिल्यास त्यांचा रोगप्रतिबंधात्मक उपयोग होतो. रोगप्रसार करणाऱ्या माश्यांपासून जनावरांचे रक्षण करण्याचे उपाय योजणे हाही प्रतिबंधाचाच भाग आहे.

पहा : ट्रिपॅनोसोमा.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI.Livestock (Including Poultry), New Delhi, 1970.

           2. Hagan, W. A Bruner, D. N. The Infectious Diseases of Domestic Animals, London, 1951.

           3. I. C. A. R. Handbook of Animal Husbandry, New Delhi, 1967.

पंडित, र. वि. दीक्षित, श्री. गं.