कुक्कुटपालन : अंडी आणि मांस यांच्या उत्पादनासाठी कुक्कुटपालनाचा व्यवसाय जगात सर्वत्र केला जातो. डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इ. देशांत कुक्कुटपालन ही कृषिव्यवसायाची एक महत्त्वाची शाखा मानण्यात येते. जगात बऱ्याच ठिकाणी जोडधंदा म्हणून शेतकरी कोंबड्या पाळतात व स्थानिक बाजारात अंडी व पिले यांची विक्री करतात. तथापि अलीकडच्या काळात फार मोठ्या प्रमाणावर आधुनिक पद्धतीने कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिक संस्था अस्तित्वात आलेल्या असून त्यांच्यामार्फत बऱ्याच दूरवर अंडी व मांस यांचे वितरण करण्यात येते. प्रगत देशांत अंड्यांचे व मांसाचे उत्पादन करण्याचे तंत्र मोठ्या प्रमाणावर विकसित करण्यात आले असून ही उत्पादने वेगवेगळीच करण्याची प्रथा पडत चालली आहे. पाश्चात्त्य देशांत कुक्कुटपालन (पोल्ट्री फार्मिंग) या संज्ञेचा कोंबड्यांच्या बरोबरच टर्की, बदके, हंस (गूज) इ. पक्षी पाळणे असा अर्थ प्रचलित आहे.

इतिहास : पृथ्वीवर सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व कुक्कुट(गॅलस) वंशाचे पूर्वज मध्य, पूर्व आणि उत्तर भारत, हिमालयाच्या उतरणीवरचा प्रदेश, आसाम, ब्रह्मदेश, श्रीलंका, जावा व सुमात्रा ह्या प्रदेशांत असणाऱ्या जंगली अवस्थेतील कुक्कुट असावेत असे मानतात. प्राणीशास्त्राप्रमाणे गॅलस (कोंबडा-फॅजिॲनिडी कुल) ह्या वंशामध्ये लाल जंगली कुक्कुट (गॅलस बँकिवा), श्रीलंकेतील जंगली  कुक्कुट (गॅलस लॅफेएटाय), राखी जंगली कुक्कुट (गॅलस सोनेरेटाय) व जावामधील जंगली कुक्कुट (गॅलस व्हेरियस) ह्या चार जातींचा समावेश होतो. पहिल्या तीन जातींत आनुवंशिकतेचे साम्य आहे, हे शेपटीची चौदा पिसे व कातरलेला तुरा यांवरून दिसून येते. जावातील जंगली कुक्कुट मात्र वेगळा असून त्याला शेपटीची सोळा पिसे व एकसंघी तुरा आहे. त्यातल्या त्यात लाल जंगली कुक्कुट हेच आधुनिक कुक्कुटांचे पूर्वज असावेत, असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. हे पक्षी अजूनही उत्तर, मध्य व पूर्व भारत, ब्रह्मदेश, थायलंड, चीनचा भाग, मलेशिया, फिलीपीन्स आणि सुमात्रा ह्या प्रदेशांत आढळून येतात [→ रानकोंबडी].

 कुक्कुटासंबंधीच्या नोंदीमध्ये सर्वांत जुनी नोंद (ख्रि. पू. ३२००) भारतातच आहे. चीनमधील एका विश्वकोशामध्ये (ख्रि. पू. १४००) कुक्कुट हा पश्चिमेकडील पक्षी आहे असा उल्लेख आहे आणि भारत हेच त्याचे मूलस्थान असावे असे चिनी लोकही मानतात. ह्याच सुमारास ईजिप्तमध्येही मातीच्या  भांड्यामध्ये कृत्रिम पद्धतीने अंडी उबविल्याचे उल्लेख आहेत. गंगेच्या काठावर आर्य पोहोचले (ख्रि. पू. ११००) तेव्हाचा कुक्कुटासंबंधीचा उल्लेख यजुर्वेदातही आहे. आर्य चाणक्य (ख्रि. पू. ३२०) यांनी रचलेल्या  एका काव्यात कुक्कुटांपासून (१) लढाई करणे, (२) लवकर उठणे, (३) कुटुंबासमवेत भोजन घेणे व (४) प्रियेचे संरक्षण करणे ह्या चार गोष्टी शिकाव्यात असे लिहिले आहे. ह्याच सुमारास व नंतर अनेक देशांमधील साहित्यात कुक्कुटाचा उल्लेख आहे. तथापि रामूर या फ्रेंच लेखकांनी १७४९ मध्ये ‘कुक्कुटपालन व कृत्रिम पद्धतीने अंडी उबवणे’ ह्या विषयावर पुस्तक लिहीपर्यंत मध्यंतरीच्या काळात कुक्कुटपालनाच्या तंत्रात फारसा बदल झाल्याचे दिसत नाही. रामूर यांनी कुक्कुटांचे खाद्य, अंड्यांचा आकार, त्यांची संख्या, टिकाऊपणा वगैरे बाबतींत संशोधन करून खर्‍या अर्थाने आधुनिक कुक्कुटपालनाच्या व्यवसायाचा पाया घातला असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.

कोंबडीपालनाचा धंदा म्हणजे किफायतशीरपणे अंडी व कोंबडीचे मांस यांच्या विक्रीचा प्रश्न आलाच. अर्थातच थोड्या कालावधीत अधिकाधिक अंडी देणाऱ्या व गलेलठ्ठ होणाऱ्या कोंबड्यांच्या जाती निर्माण करण्याची जरुरी भासली आणि त्या दृष्टिने संशोधनाला दिशा मिळाली. कुक्कुटाच्या शरीररचनेचा, त्याच्या क्रियात्मक वैशिष्ट्यांचा अभ्यास होणे अपरिहार्य होते. ऊन, वाऱ्यापासून त्यांचे संरक्षण, संतुलित व पुरेसा आहार, आहारातील अन्नघटक अशा गोष्टींकडे लक्ष पुरविल्यामुळे त्यांची बरीचशी ऊर्जा खाद्य शोधण्याऐवजी अंडी व मांस यांच्या निर्मितीकडे उपयोगात आणता येते. या व अशा अनेक बाबींचा संशोधनात्मक अभ्यास सुरू झाला. त्याचबरोबर अंडी उबविण्यासाठी खुडूक बसण्याची सवय, एका वर्षात घातलेल्या अंड्यांची संख्या, त्यांचा आकार, त्यासाठी लागलेल्या खाद्याचे प्रमाण इ. गुणांची नोंद ठेवून व या आनुवंशिक गुणांचा काळजीपूर्वक अभ्यास करून, चांगले गुण जोपासून अशा नर-माद्यांपासून पैदास करून कोंबड्यांच्या निरनिराळ्या जाती निर्माण करण्यात आल्या आहेत. मुख्यत्वेकरून हे काम ब्रिटन, अमेरिका, डेन्मार्क यांसारख्या पुढारलेल्या देशांत झाले.

भारताचा विचार करता १९२० सालापर्यंत कोंबडीपालन अगदीच अप्रगल्भ अवस्थेत होते. इंग्लंड- अमेरिकेतील सुधारित जातींची आयात करून १९३० च्या सुमारास ह्या व्यवसायास चालना मिळाली. १९४७ मध्ये स्वराज्यप्राप्ती झाल्यानंतर ह्या व्यवसायास देशाच्या विकासाकरिता तयार केलेल्या पंचवार्षिक योजनांत स्थान मिळाले व त्याच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू झाले आहेत. ह्याच सुमारास कोंबड्यांच्या बऱ्याचशा मारक रोगांवर, रोगप्रतिबंधक लशींची निर्मितीही भारतात सुरू झाल्यामुळे धंद्याला स्थैर्य येण्याच्या दृष्टीने त्याचा बराच फायदा झाला आहे. शिवाय खालील वैशिष्ट्यांमुळे या व्यवसायाकडे बरेच लोक आकर्षित झाले: (१) भांडवल अल्प प्रमाणात गुंतवावे लागते, (२) उत्पन्न मिळण्यास लवकर सुरुवात होते, (३) जमिनीच्या लहानशा तुकड्यावरही व्यवसाय चालविता येतो. मानवासाठी खाद्य म्हणून निरुपयोगी असलेल्या तंतुमय व कमी सत्त्वहीन पदार्थांचे अतिपोषक, संरक्षक व प्राणिज प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांत रूपांतर करता येते. या विविध फायद्यांची जाणीव झाल्यामुळे शासनाने देशाच्या पंचवार्षिक योजनांत या व्यवसायाकरिता उत्तरोत्तर अधिकाधिक रकमेची तरतूद केली.

वर्गीकरण : कोंबड्यांच्या शंभरहून अधिक जाती अस्तित्वात आहेत. मूलस्थान किंवा प्रदेश, बाह्यरूप, रंग, आकार व वजन यांवर भर देऊन प्रथम जाती ठरविण्यात आल्या. जातींतील साधर्म्यांवरून त्यांची उपयोगाच्या दृष्टीने पुन्हा वर्गवारी करण्यात आली. हे वर्गीकरण ढोबळमानाने पुढीलप्रमाणे देता येईल.

(१) हलक्या वजनाच्या भरपूर अंडी देणाऱ्या जाती: कोंबड्या आकाराने लहान, चपळ, भित्र्या, लवकर अंड्यावर येणाऱ्या, खुडूक न बसणाऱ्या, नाजूक आसल्यामुळे चांगली घरे असल्याशिवाय थंडी वाऱ्यात टिकाव धरत नाहीत. इतर जातींपेक्षा कमी खाऊन जास्त अंडी देणे हे यांचे वैशिष्ट्य. उदा., लेगहॉर्न, मिनॉर्क, आंकॉना.

(२) भारी वजनाच्या मांसाकरिता उपयुक्त : आकाराने मोठ्या, शांत, थोड्याशा सुस्त, अंड्यावर लवकर न येणाऱ्या, खुडूक बसतात. भरपूर खाऊन लवकर चांगल्या गुबगुबीत होणाऱ्या, सर्वसाधारणपणे अंडी कमी देत असल्या तरी काही पक्षी भरपूर अंडी देणाऱ्या जातीशी बरोबरी करू शकणारे आहेत. प्रमुख जाती: ब्रह्मा, कोचीन व लँगशॅन.

(३) मध्यम वजनाच्या : मांसाकरिता चांगल्या असून अंडीही बऱ्यापैकी देतात. हलक्यापेक्षा सुस्त पण भारीपेक्षा सुटसुटीत. उदा., प्लिमथ रॉक, ऱ्होड आयलंड रेड, वायनडॉट्स.

(४) दिखाऊ: डौलदार चांगली पिसे, अंडी किंवा मांस याकरिता विशेष उपयोगी नाहीत. उदा., पोलिश, वॅटमस, सिल्कीज.


जाती व उपजाती : कोंबड्यांच्या जातीचा विचार करता भूमध्य समुद्रातील, आशियातील, अमेरिकन व यूरोपियन असा उल्लेख करणेच सोईचे आहे. मुख्य जातीपासूनच त्या त्या जातीतील चांगल्या गुणांचा अधिकाधिक परिपोष करण्याकरिताच उपजातींची निर्मिती केली असल्याने मुख्य जातींचा उल्लेख या ठिकाणी अभिप्रेत नाही. काही प्रसिद्ध जातींची माहिती खालीलप्रमाणे आहे. जातीच्या नावापुढे त्या त्या जातीतील नर व मादी यांची प्रमाणित वजने किग्रॅ. मध्ये दिली आहेत.

भूमध्यसामुद्रिक विभागातील जाती : लेगहॉर्न : (२·७ २). मूळची जास्त अंडी देणारी. शास्त्रज्ञांनी त्यातील निवडक घेऊन शास्त्रीय जोपासना करून पैदास केली. इटलीतील लेगहॉर्न खेड्यातील लहानसर, चपळ, आकर्षक पांढऱ्या रंगाचे पक्षी. कोचीनच्या संकराने बफ लेगहॉर्न तसेच गेम जातीशी संकराने ब्राऊन लेगहॉर्न  अशा उपजातींही निघाल्या. कोंबड्यांची चोच, कातडी व पाय पिवळे तुरा तांबडालाल, मऊ व तुकतुकीत असून नराचा सरळ उभा तर मादीचा एका बाजूस पडलेला. साडेपाच ते सहा महिन्यांची मादी अंड्यांवर येते. अलीकडे काही सुधारित जातींतील माद्या साडेचार ते पाच महिन्यांत अंडी द्यावयास लागतात. भारतात अतिशय लोकप्रिय. वर्षातून २०० ते २५० (काही ३०० पर्यंत) पांढरी अंडी देतात.

मिनॉर्क: (३·६–४·० २·९–३·४). लेगहॉर्नपेक्षा आकाराने जरा मोठी, रंगाने काळी, चोच काळी, पाय काळे वा  काळसर, तुरा लाल, कानाची पाळी पांढरी, अंडी पांढरी स्वच्छ असून आकाराने मोठी व आकर्षक. सर्वसाधारणपणे अंडे ६० ग्रॅ. पेक्षा जास्त वजनाचे असते. स्पेनच्या पूर्व किनाऱ्यावरील मिनॉर्क बेटावरील जात. उष्ण हवामानात चांगली टिकू शकते. पक्षी काळ्या व पांढऱ्या रंगाचे असतात.

आंकॉना : (२·७२ २). काळसर रंगावर पांढरे ठिपके असलेली, दिसायला सुरेख, मूळची इटलीतील. सर्वसाधारणपणे गुण लेगहॉर्न सारखे असले तरी अंड्याकरिता लेगहॉर्नच्या खालोखाल.

आशियातील जाती : मांसाकरिता चांगल्या, पाय केसाळ, अंड्यावर उशिरा येतात. अंड्याचा रंग तांबूस विटकरी असतो.

ब्रह्मा : (४·९–५·२ ३·८–४·३). मूळची ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील. चित्तगाँग म्हणूनही ओळखली जाते. अंगाने थोराड, रंगाने राखी वा काळी. पिसे भरपूर.

कोचीन : (४·९ ३·८). मूळची चीनमधील. शांघायची म्हणून शांघाय नावानेही ओळखली जाते. गलेलठ्ठ असून पायावर पिसे, अंगावरील पिसे भरपूर व लांबलचक. कोंबड्या काळ्या, पांढऱ्या व राखी रंगाच्या असतात.

लँगशॅन : मूळची चीनमधील लँगशॅन गावची. आकार लहान, लांबलचक पाय, शेपटीची पिसे लांबसडक असून तुरा एकसंघी असतो. एकूण कोंबडी डौलदार असते.

अमेरिकन जाती : एकूण अकरा जातींपैकी चार महत्त्वाच्या आहेत. ह्या भूमध्य समुद्राच्या विभागातील व आशियातील जातींपासून तयार केलेल्या आहेत. दोन्ही जातींच्या गुणांचे संमिश्र दर्शन ह्या जातीत घडते. अंडी व मांस दोन्हीकरिता उपयोगी आहेत.

प्लिमथ रॉक : (४·३ ३·४). भरीव वजनदार, मांसाला चांगली असलेली लोकप्रिय जात. अंडी पण चांगली देते. तुरा एकसंघी, अंड्याचा रंग थोडा पिवळटसर. काळ्या पांढऱ्या इ. सात प्रकारच्या कोंबड्या असतात. अमेरिकेत प्लिमथ रॉक नर व न्यू हॅम्पशर मादी यांच्या संकरापासून ‘ब्रॉयलर’ (मांसल कोंबड्यांची निर्मिती) उद्योगासाठी लागणाऱ्या मांसल कोंबड्यांच्या जातीची निर्मिती केली आहे.

वायनडॉट्स : (३·८ २·९). पांढऱ्या रंगाच्या, गोलसर आकाराच्या, वजनदार कोंबड्या. कोंबडीची पिसे तुरळक, पाठ छोटीशी, तुरा लालसर, कातडी पिवळटसर, अंडी व मांस दोन्हीकरिता उपयोगी. काळ्या, पांढऱ्या, भुऱ्या, इ. आठ प्रकारच्या कोंबड्या आढळतात.

ऱ्होड आयलंड रेड : (३·८ २·९). अंगाने थोराड, कणखर, शरीराने लांबरुंद वजनदार कोंबड्या मांसाला चांगल्या असून बरीच अंडी देतात. भारतात व्हाइट लेगहॉर्नच्या खालोखाल ही जात लोकप्रिय आहे. तपकिरी तांबड्या रंगाची, खूप पिसे असलेली, पाय व मांस पिवळटसर, भरदार छाती, तपकिरी चोच, लाल तुरा, आखूड व भरदार शेपूट, तांबूस-विटकर रंगाची अंडी देणाऱ्या कोंबड्या.

न्यू हॅम्पशर : (३·८ ३·९). ऱ्होड आयलंड रेडपासून निर्माण झालेली जात. अतिशय कणखर म्हणून प्रसिद्ध आहे. लालसर रंगाच्या ह्या कोंबड्या विटकरी रंगाची मोठ्या आकाराची अंडी देतात.

इंग्लिश जाती : ससेक्स, ऑरपिंग्टन, ऑस्ट्रलॉर्प, कॉर्निश, डॉर्किंग व रेड कॅप ह्या जाती. कॉर्निशशिवाय सर्वांचे कातडे पांढरे असते. कानाची पाळी लाल. डॉर्किंग व रेड कॅप व्यतिरिक्त सर्वांची अंडी विटकरी-लालसर रंगाची असतात.

ससेक्स : (४·१ ३·२). अंगाने लांबसडक, गुबगुबीत, मांसाकरिता प्रसिद्ध जात. अंडी पण बऱ्यापैकी देते. या जातीचे तीन प्रकार असून लाइट ससेक्स विशेष लोकप्रिय जात आहे कारण तिच्यापासून आता अंडीही भरपूर मिळू लागली आहेत.

ऑरपिंग्टन : (४·५ ३·६). मुख्यत्वे मांसाकरिता प्रसिद्ध जात. अलीकडे त्यामध्ये निवड करून आनुवंशिक गुणांची जोपासना करून चांगली अंडी देणाऱ्या कोंबड्या तयार केल्या गेल्या आहेत. ह्यांत काळ्या, पांढऱ्या, निळसर व राखी रंगाच्या कोंबड्या असतात.

ऑस्ट्रलॉर्प : (३·८ २·९). हिरवी झाक असलेल्या काळ्या रंगाच्या कोंबड्या मांसाकरिता प्रसिद्ध आहेत. ही जात ऑस्ट्रेलियात तयार झाली. यांचा तुरा एकसंघी असून चोच व पाय काळे असतात.

कॉर्निश : (४·७ ३·६). असील व इंग्लिश जंगली कोंबडी यांपासून तयार केलेली मांसाकरिता प्रसिद्ध असलेली जात.

भारतातील जाती : भारतातील खेड्यांतून शेकडो वर्षे कोंबड्या पाळल्या जात असल्या तरी त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. भारतातील सर्व जाती देशी ह्या एका नावाने जरी माहीत झाल्या असल्या तरी त्यातल्या त्यात काही असील, पंजाब, काश्मीर, चित्तगाँग वगैरे नावांनीही प्रसिद्ध आहेत.

असील : (४·१–४·५ २·७). अस्सल शब्दापासून ह्या जातीस असील हे नाव मिळाले आहे. ही जात कोंबड्यांच्या झुंजीसाठी प्रसिद्ध आहे. बळकट पाय असलेली ही जात रगेल व ताकदवान असून तिच्यापासून संकर करून मांसल कोंबडीची पैदास करण्याचे प्रयत्न चालू आहेत. काळ्या, पांढऱ्या,  तपकिरी व पिवळसर रंगांचे पक्षी यात आढळतात.

इतर जातींचे गुणधर्म सातत्याने टिकाऊ नाहीत म्हणून त्यांचा निर्देश केलेला नाही.

उत्पादनविषयक तत्त्वे : आनुवंशिकीतील सिद्धतत्त्वांचा आधार घेऊन चांगले नर व माद्या वापरून अंड्यांसाठी व मांसासाठी वर वर्णन केलेल्या जाती तयार करण्यात आल्या आहेत. अंडी घालण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या विशिष्ट पेट्यांचा शोध लागल्यापासून नक्की कोणती कोंबडी किती अंडी घालते हे समजू लागले (कोंबडी या पेटीत जाऊन अंडी घालते पण माणसाने पेटीचे दार उघडल्याशिवाय तिला बाहेर येता येत नाही. ती आत गेल्यावर मात्र दार आपोआप बंद होते). यामुळे एका वर्षात घातलेल्या अंड्यांची संख्या, त्यांचा आकार, कवचाची जाडी, ती उबवली असताना पिलांचे बाहेर पडण्याचे प्रमाण इ. गुणांची नोंद होऊ शकली. अशा नोंदींचा उपयोग करून नर व माद्या निवडून त्यांपासून प्रजनन करून आनुवंशिकीतील अंतःजनन, संकर इ. सिद्धांतांचा अवलंब करून संख्येने जास्त, आकाराने मोठी अशी अंडी देणार्‍या त्याचप्रमाणे थोड्या दिवसांत कमीत कमी खाद्याचे जास्तीत जास्त मांसात रूपांतर करणाऱ्या अशा कोंबड्यांच्या जाती निर्माण करण्यात आल्या. एका नराचा दहा माद्यांशी संबंध येत असल्यामुळे नर निवडताना तर त्याच्या वंशावळीबद्दल विशेषच काळजी घेतली जाते. इंग्लंड, अमेरिका, डेन्मार्क, इस्राएल व इतर यूरोपीय देशांमध्ये अशा अनेक जाती निर्माण करण्यात आल्या आहेत. एखादी जात अस्तित्वात आली म्हणजे त्या जातीच्या अस्सल कोंबड्या आणि कोंबडे यांचाच संयोग करून त्या जातीची नसल जपतात. अशा एकाच जातीच्या वंशवृद्धीसाठी मोठमोठ्या वाड्या (खुराडी) त्या देशांत तयार करण्यात आलेल्या आहेत.


अंडी उबवणे : कोंबडी अंड्यांवर बसून (१० ते १५ अंडी, पंख अर्धवट उघडून त्यांना आपल्या शरीराच्या उबेने उष्णता देऊन उबविते. अंडी उबविण्याकरिता  ती काळोखाची व एकांताची जागा जास्त पसंत करते. निसर्गतः  अंडी घालण्यासाठीही ती अशीच जागा पसंत करते. अशा रीतीने अंडी उबविण्यासाठी  बसण्याला ‘खुडूक बसणे’ म्हणतात. एकवीस दिवसांनंतर पिले बाहेर पडतात, अर्थातच ह्या काळात ती अंडी घालीत नाही. त्यामुळे वर्षाकाठी घातलेल्या अंड्यांची संख्या कमी होते. खूडूक बसणे हा आनुवंशिक गुण असून तो अवगुण समजला जातो. सुधारलेल्या जातीच्या कोंबड्या खुडूक बसत नाहीत. कोंबडीपालनाला व्यवसायाचे स्वरूप येऊ लागले तेव्हा एकाच वेळी शेकडो अंडी उबवण्याची गरज पडू लागली व त्याकरिता कृत्रिम पद्धतीने अंडी उबविण्याची जरुरी भासू लागली.

खुडूक कोंबडीचे साहाय्य न घेता इतर व्यवस्था करून अंडी उबवणे ही पद्धती पूर्वकालीन ईजिप्तमध्ये वापरीत असत इतकी ती जुनी आहे. ईजिप्शियन लोक मातीच्या भांड्यात अंडी उबवीत असत. अंडी उबविण्याच्या आधुनिक यंत्राचा उपयोग प्रथम इंग्लंडमध्ये १७७० मध्ये व अमेरिकेत १८४४ मध्ये झाला. ह्या पद्धतीचा शास्त्रीय दृष्टीने विकास मात्र विसाव्या शतकाच्या सुरुवातीस झाला आहे  व त्यासाठी लागणारी लहानमोठी यंत्रे बनविण्यात आली आहेत. अशा यंत्राला ‘उबवण यंत्र’ (इन्क्यूबेटर ) असे म्हणतात. त्याचा आकार पेटीसारखा अगर कपाटासारखा असतो. त्यात एकावर एक अशी तबके ठेवण्याची व्यवस्था असते. तबकांचे तळ हवा खेळती राहण्याच्या दृष्टिने व त्याचप्रमाणे अंडी रांगेने ठेवल्यावर ती एकमेकांवर आपटू नयेत अशा प्रकारचे असतात. अलीकडे यांत्रिक पद्धतीने अंडी उबविण्याची पद्धती रूढ होत आहे. त्यामुळे सर्वांची गरज भागावी अशी पंचवीस अंड्यांपासून ते एक लाख अंडी उबविता येतील अशी सोय असलेली लहान मोठी यंत्रे उपलब्ध आहेत. ह्या यंत्रात उष्णता निर्माण करण्यासाठी जळण म्हणून तेल, वायू, कोळसा किंवा वीज यांचा उपयोग करतात. विजेवरील यंत्रे जास्त कार्यक्षम असतात. यंत्रात वापरण्यात आलेली उष्णता निरोधक साधने उत्तम प्रतीची असली म्हणजे बाहेरील हवामानाचा आतील हवामानावर परिणाम होत नाही. आतील उष्णता कायम ३८ से. व आर्द्रता ६० टक्के असावी लागते. ह्यामंध्ये चढउतार झाल्यास उबत असलेल्या अंड्यांवर अनिष्ट परिणाम होऊन आतील भ्रूणाचा (गर्भाचा) मृत्यू संभवतो. उबविण्यासाठी ठेवलेली अंडी रोज फिरवावी लागतात,म्हणजे अंड्याच्या सर्व भागात सारखी उष्णता लागते. यंत्रात जेथे हजारो अंडी ठेवतात तेथे अंडी फिरविण्याची स्वयंचलित यंत्रणा असते. आतील दूषित झालेली हवा बाहेर नेण्याची व बाहेरील शुद्ध हवा आत नेण्याची योग्य नियंत्रित व्यवस्था यंत्रात असते. काही मोठमोठ्या यंत्रांत पिले बाहेर पडण्यापूर्वी दोन दिवस अठरा-एकोणीसाव्या दिवशी अंडी निराळ्या तबकात ठेवण्याची व्यवस्था असते. उष्णता व आर्द्रता यांचे योग्य नियंत्रण, हवा आत बाहेर फेकण्याची व्यवस्था, तबकांची रचना या बाबतींत योजनाकौशल्य वापरून अंडी उबविण्यास सुयोग्य अशी तयार केलेली विविध प्रकारची यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. अलीकडे अशी यंत्रे वापरून अंड्यांकरिता व मांसाकरिता प्रसिद्ध असलेल्या चांगल्या जातिवंत कोंबड्यांची अंडी उबवून एक दिवसाची पिले विकणे हा कुक्कुटपालनाच्या व्यवसायातील एक महत्त्वाचा उपव्यवसाय झाला आहे.

पिलांची जोपासना : उबविण्यासाठी यंत्रात ठेवलेल्या अंड्यात एकविसाव्या दिवशी पिलू पूर्णपणे तयार झालेले असते व ते कवच फोडून बाहेर येण्याच्या प्रयत्नाला लागते. चोची मारून कवचाला छिद्र पाडून हळूहळू कवचाचा भाग फोडून साधारणपणे पाच तासांच्या प्रयत्नानंतर ते बाहेर पडते. त्याला यंत्रामध्येच १० ते १२ तास राहू देतात म्हणजे त्याची ओलसर असलेली पिसे वाळतात. पिलांना पहिल्या २४ तासांत अन्नपाण्याची जरुरी नसते. मात्र, यंत्रातून बाहेर काढल्यापासून ऊब देण्याची व्यवस्था असणे जरुरीचे असते. पहिल्याच दिवशी लिंगभेद (नरमादीची ) निवड करतात. 

आधुनिक तंत्राप्रमाणे पहिल्याच दिवशी लिंगभेद निवड करून कोंबडा व कोंबडी वेगळी करता येतात. स्लिपमन यांनी १९०९ मध्ये पिलांच्या रंगावरून किंवा फक्त पंखातील पिसावरून लिंगभेद निवड करण्याची पद्धती शोधून काढली. पिलांच्या पंखांच्या पिसांच्या रंगावरून किंवा आकारावरून लिंगभेद ओळखण्यासाठी त्या त्या जातीच्या गुणांचा सखोल आनुवंशिक अभ्यास आवश्यक आहे. तरीसुद्धा ही खात्रीशीर पद्धती नाही. शिवाय ही काही जातींपुरतीच मर्यादित आहे कारण यात पिसांच्या रंगाबाबतचा गुणधर्म लिंगसहलग्न असणे जरूर असते. ‘जपानी’ पद्धत म्हणून प्रसिद्ध असलेली पद्धत १९२४ मध्ये कियुशी मसुई, उचिरो हासिनोटोव्ह व इझायु या जपानी शास्त्रज्ञांनी शोधून काढली. पिलू जन्मल्यापासून २४ तासांच्या आतच ही परीक्षा करावी लागते. पिलाच्या गुदद्वारात बाहेरील बाजूस दोन उभ्या वळ्या असतात. ह्या वळ्यांमध्ये टाचणीच्या डोक्याएवढा बारीकसा मोती (उंचवटा) दिसतो किंवा अंगठ्याने स्पर्श करून जाणता येतो. हा मोती असणारा नर व नसणारी मादी होय. लिंगभेद निवड ही एक कला आहे. आजतरी जपानी लोक ह्या कलेत वाकबगार आहेत. ते तासाला १,००० पिलांची तपासणी करून ९८–९९ टक्के अचूक लिंगभेद निवड करतात. याशिवाय अगदी खात्रीशीर नव्हे पण ८०–९० टक्के बरोबर लिंगभेद करणारी विद्युत् यंत्रे उपलब्ध आहेत, त्यांस ‘लिंगनिदर्शक’ म्हणतात.

उबविण्याच्या यंत्रातून पिले काळजीपूर्वक बाहेर काढून ज्या ठिकाणी उबेची व्यवस्था केली आहे अशा पेटीवजा घरामध्ये नेतात. ह्या ठिकाणी पिले सहा आठवडे राहतात कारण तोपर्यंत त्यांना उष्णतेची जरुरी असते. ह्या घरांना ‘ब्रूडर’ म्हणतात. अशा घरांचेही विविध प्रकार आहेत. विजेचे दिवे, कंदिल अशा साधनांनी उष्णता देण्याची व्यवस्था असते व पिले उबेपासून जरुरीप्रमाणे दूर अगर जवळ येऊ शकतात. ब्रूडरमध्ये प्रत्येक पिलास ०·१ चौ.मी. जागा या हिशोबाने ते लहान (५० पिलांकरिता) अगर मोठे बनवतात. पहिल्या आठवड्यात ३५ से. इतके तापमान असणे जरूर असते व ढोबळ मानाने दर आठवड्याला ३ से. कमी करून सहाव्या आठवड्यात ते २० से. असावे लागते. वाढत्या वयाची गरज लक्षात घेऊन पिलांना योग्य असे खाद्य देण्यात येते. जेथे कोंबडीच अंडी उबविते, तेथे पिलांची जोपासना तीच त्यांना पंखाखाली घेऊन ऊब देऊन दाणे टिपण्यास शिकवून ६ आठवड्यांपर्यंत काळजी घेते. चांगल्या जातीच्या कोंबड्या २० ते २२ आठवड्यांच्या झाल्यावर त्यांना प्रौढत्व येते म्हणजे त्या प्रजननशील होतात आणि अंडी घालू लागतात. त्यांना ‘तलंगा’ म्हणून संबोधतात. ह्याच सुमारास किंवा थोडे आधी पिलांच्या चोची कापतात. कारण पिलांना एकमेकांना चोची मारून रक्तबंबाळ करण्याची वाईट सवय असते. तसे करता येऊ नये म्हणून वरची चोच १/३ कापून टाकतात. शिवाय अशी चोच कापल्यामुळे खाताना उडविण्यामुळे होणारी खाद्यांची नासधूसही होत नाही.


अंडी देणाऱ्या कोंबड्यांची जोपासना :कोंबड्यांची घरे : ही दाट लोकवस्तीपासून शक्यतो दूर ठेवतात, म्हणजे कर्कश आवाज, गोंगाट वगैरेंचा त्रास होत नाही, स्वच्छ व भरपूर मोकळी हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळून रोगापासून उपद्रव होण्याची भीती कमी राहते. पाण्याची व विजेची सोय, निचरा होणारी कोरडी जमीन, फार दूर नसलेली बाजारपेठ ह्या गोष्टी कोंबड्यांची वाडी वसवताना लक्षात घ्याव्या लागतात. घरे बांधण्यासाठी लाकडाचा वापर कमीतकमी करतात कारण फळ्यांच्या फटींमध्ये गोचिड्या बसतात व त्यांचे निर्मूलन करणे कठीण असते. सिमेंट, लोखंड व १·२५ सेंमी. चौकोन असलेली मजबूत जाळी, विटा ही साधने बांधकामासाठी वापरतात. सर्वसाधारणपणे ०·७५ मी. उंचीची भिंत व त्यावर सु. २ मी. उंचीची जाळी (वळचणीकडील मापे) व पाख्याकडे ३·६ मी. उंची अशी घरांची रचना असते. लांबी व रुंदी कोंबड्यांच्या संख्येवर अवलंबून असते. पण सामान्यत: ४० मी. लांबी व १६ मी. रुंदी असलेली दोन भागांत विभागलेली घरे बांधली जातात. थंड प्रदेशात निराळी व्यवस्था असणे योग्य असते. भारतातही थंडीच्या दिवसात गोणपाट लावून उघडी जाळी बंद करतात. प्रत्येक कोंबडीला ०·२ चौ.मी. जागा असणे इष्ट ठरते. अंडी घालण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या पेट्या, विश्रांतीसाठी दांड्या, पाण्यासाठी न कलंडणारी वपाण्याची पातळी कायम राहील अशी सोय असलेली भांडी, खाण्यासाठी खाद्य ठेवण्याची पुरेशी तबके इ. सोई असावयास पाहिजेत. पाणी व खाद्य नेहमी उपलब्ध हवे. कॅल्शियमाच्या पुरवठ्यासाठी शिंपल्यांची पूड असलेली स्वतंत्र तबकेही अंडी देणाऱ्या पक्ष्यांच्या घरात ठेवतात. अलीकडील संशोधनावरून असे दिसून आले आहे की, सूर्य मावळल्यानंतर कोंबड्यांच्या घरामध्ये विजेच्या दिव्यांचा प्रकाश जर काही तास ठेवला, तर कोंबड्या जास्त वेळ खात राहतात व अंडीही जास्त घालतात. जास्तीत जास्त १७ तास प्रकाश असावा. ९० चौ.मी. जागेसाठी ४० ते ६० वॉट शक्तीचे ५ दिवे जमिनीपासून ३·६० मी. उंचीवर लावतात. भारतातील खेड्यातून अजूनही कोंबड्यांची शास्त्रशुद्ध घरे फारशी बांधली जात नाहीत. कोंदट खुराड्यात अगर पाटीखाली कोंबड्या ठेवण्याची पद्धतच रूढ आहे. अंड्यांच्या पेट्यांतील अंडी दिवसातून सामान्यत: चार वेळा गोळा करतात. गोळा करण्यास जाते वेळी कोंबड्या बिचकणार नाहीत अशी काळजी घेतात. कोंबड्या बिचकल्या, बिथरल्या तर त्याचा अंडी देण्यावर विपरीत परिणाम होतो.

गादी पद्धती : कोंबड्यांच्या घरातील जमीन फरसबंद असते, परंतु ती रोजच्या रोज साफ करण्याची पद्धत खर्चाची होते. त्याऐवजी व्यापारी पद्धतीने कोंबड्या पाळताना गादी पद्धत अवलंबितात. फरशीवर लाकडाचा भुसा, वाळलेले गवत, भाताचा भुसा, उसाच्या चोयट्यांचे तुकडे इ. पदार्थ पसरतात. ह्या वस्तू संपूर्णपणे कोरड्या असाव्या लागतात आणि त्यांचा थर १० ते १५ सेंमी. ठेवतात. वेळोवेळी ह्यावर भर टाकण्यात येते. मधूनमधून थरातील भुसा खालीवर चाळवतात, म्हणजे भुसा कोरडा राहतो. कालांतराने ६ ते ८ महिन्यांनी भुशात असणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे विष्ठा, भुसा आदी पदार्थांचा भुगा बनतो व मग त्यात बाष्प शोषून घेण्याची कुवत राहत नाही. अशा वेळी गादी बदलतात म्हणजे नवीन भुसा टाकतात. यात साफसफाईचा खर्च वाचून कोंबड्या सारख्या चाळवल्या जात नाहीत.

 पिंजरा पद्धती : ह्यात अंडी देण्याऱ्या कोंबड्या पिंजऱ्यामध्ये ठेवून पिंजऱ्यांच्या एकावर एक अशा ३ ते ४ रांगा घरात ठेवतात. ह्यात जागेची बचत होते. भारतात ह्या पद्धतीचा अवलंब केल्यास उन्हाळ्यात ही घरे थंड राखण्यासाठी छपरावर व घरात पाण्याचे फवारे उडवून तापमान कमी करणे जरूर असते. प्रत्येक पिंजऱ्याचा तळ जाळीचा असतो व त्याखाली असलेल्या तबकाच्या पत्र्यावर विष्ठा पडते. ही तबके साफ करावी लागतात. पाणी व खाद्य यांच्या पन्हाळी पिंजऱ्याच्या एका बाजूने जात असतात व त्यांतून पक्षी अन्नपाणी सहजपणे घेत असतो. ही पद्धत भारतात फारशी लोकप्रिय नाही. अलीकडे घरगुती प्रमाणावर कोंबड्या पाळणारे १० ते २० कोंबड्या राहतील अशी लोखंडाच्या चौकटीची घरे काही ठिकाणी वापरतात.

मांसल कोंबड्यांची जोपासना : (ब्रॉयलर उद्योग). १९३० पूर्वीच्या काळात विशिष्ट प्रकारच्या मांसल कोंबड्यांची पैदास करण्याची प्रथा नव्हती. अंड्यांसाठी निकामी झालेल्या कोंबड्या व जरुरीपेक्षा अधिक असलेले नर यांचाच खाण्यासाठी उपयोग होत असे. त्यातल्या त्यात भारी वजनाच्या बार्ब्ड प्लिमथ, ऱ्होड आयलंड रेड ह्या जाती खाण्यासाठी पसंत करीत. ह्याही जाती मंदगतीने वाढणाऱ्या असल्यामुळे व्यापारी दृष्टीने लवकर वजनदार होणाऱ्या अशा जाती निर्माण करण्याकडे शास्त्रज्ञांचे लक्ष गेले. १९३० च्या सुमारास न्यू हॅम्पशर व ऱ्होड आयलंड रेड यांच्या संकरातून पहिला मांसल पक्षी (ब्रॉयलर) निर्माण झाला. यानंतर अनेक जाती व उपजाती निर्माण झाल्या. मांसल कोंबड्यांची पिले ८ ते १० आठवड्यांतच १,३०० ते १,५०० ग्रॅ. वजनाची होतात. अशा वेळी ती खाण्यासाठी कापण्यात येतात. हे वजनही जितके थोडे खाद्य खाऊन होईल यावर जातीची गुणवत्ता अवलंबून असते. ०·५ किग्रॅ. मांस वाढविण्यासाठी १·२५ किग्रॅ. खाद्य लागते. मांसल कोंबड्या ह्या वास्तविक ८ ते १० आठवड्यांची कोवळी लुसलुशीत कोंबड्यांची पिलेच होत. एका पक्ष्यास ०·१ चौ.मी. जागा पुरते. त्यामुळे ४२ × ११ मी. च्या घरात पाच हजार कोंबड्या पाळता येतात. शिवाय वर्षातून पाच हप्ते म्हणजे २५,००० पक्ष्यांचा व्यवहार होऊ शकतो. भारतात १९६० पासून हा व्यवसाय सुरू झाला असून हळूहळू वाढीस लागला आहे.

कोंबड्यांचे खाद्य : कुक्कुटपालन हा ज्यावेळी व्यवसाय म्हणून केला जात नव्हता त्यावेळी कोंबड्या आपले खाद्य उकिरड्यातून किंवा वाया जाणाऱ्या अन्नातून निवडून खात असत. पुढे त्यांच्यासाठी मधूनमधून चार दाणे टाकणे एवढीच खाद्य देण्याची पद्धती असे. त्यानंतर कुठलेही उपलब्ध धान्य वाडग्यात भरून समोर ठेवणे अशीही पद्धत सुरू झाली. विसाव्या शतकातील शास्त्रीय संशोधनामुळे कोंबड्यांनाही समतोल आहार देणे हे कोंबडीपालनाचा व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी आवश्यक आहे असे दिसून आले. असा संतुलित आहार दिल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचा जास्तीत जास्त उपयोग मांस व अंडी यांच्या उत्पादनासाठी होऊ शकतो हेही प्रयोगांनी सिद्ध झाले. त्यातच कोंबड्यांच्या वयोमानाप्रमाणे व शारीरिक गरजेनुसार विविध अन्नघटकांची आवश्यकता प्रयोगांती सिद्ध झाल्यामुळे खाद्यातील घटकांमध्ये फेरफार करणे उपयुक्त ठरले. प्रथिने, वसा (स्निग्ध पदार्थ), शर्करायुक्त पिठूळ पदार्थ, लवणे, जीवनसत्त्वे ह्या अन्नघटकांचे खाद्यामध्ये योग्य प्रमाण असणे जरूर आहे. शिवाय अंड्यांसाठी, मांसासाठी किंवा वंशवृद्धीसाठी ठेवण्यात येणाऱ्या कोंबड्यांची अन्नघटकांची गरज निरनिराळी असते. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊनच खाद्यमिश्रण तयार केले जाते. सध्या अशी सहा प्रकारची खाद्यमिश्रणे प्रचलित आहेत. अशा संतुलित आहारामुळे खालेल्या खाद्यातील जास्तीत जास्त भाग मांस व अंडी यांच्या उत्पादनासाठी उपयोगी पडतो. अर्थात नुसते खाद्य संतुलित असून चालत नाही, तर खाद्याचा फायदेशीर उपयोग करणे हा कोंबडीचा आनुवंशिक गुणही आहे आणि त्याकरिता कोंबड्या चांगल्या जातीच्या असणेही व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक असते.

सर्वसाधारणपणे शंभर पक्ष्यांना खालीलप्रमाणे खाद्य लागते. 

पिलांना 

}

१ आठवडा ते ८ आठवडे 

६ ते २० आठवडे 

२०० ते २२५ किग्रॅ. 

६०० ते ६२५ किग्रॅ. 

अंडी देणाऱ्या कोंबड्यांना

}

२१ ते ७२ आठवडे 

३,९६० ते ४,३२० किग्रॅ. (११० ते १२० गॅ. प्रत्येक कोंबडीला दररोज) 

मांसल जातीच्या पिलांना

}

१ ते ५ आठवडे 

६ ते १० आठवडे 

१०० ते १२० किग्रॅ. 

२५० ते २९० किग्रॅ. 

वर उल्लेखिलेल्या प्रमाणात थोड्याफार फरकाने खाद्यमिश्रणे तयार करण्याचे सु. ६०कारखाने भारतात १९७३पर्यंत निघाले. मुख्यत्वेकरून गहू, मका, भाताचा कोंडा, गव्हाचा कोंडा, शेंगदाण्याची पेंड, माशाची भुकटी (मत्स्यपिष्ट), मळी, लवणमिश्रण या पदार्थांचा खाद्यमिश्रणामध्ये वापर केला जातो. जीवनसत्त्वे अ, ब, ड, ई यांचाही योग्य प्रमाणात समावेश करतात. यांशिवाय अलीकडे अल्प प्रमाणात विशिष्ट प्रतिजैव (सूक्ष्मजंतूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे) पदार्थ खाद्य तयार करताना त्यात मिसळतात. त्या योगे पक्ष्यांमध्ये रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण होते. खाद्य भरड स्वरूपात किंवा त्याच्या विविध आकारांच्या गोळ्या करून देतात. गोळ्यांच्या स्वरूपात दिलेल्या खाद्यामुळे त्याची नासधूस होत नाही, घटकद्रव्ये ज्या प्रमाणात मिसळलेली असतात त्या प्रमाणात सर्वच्या सर्व खाल्ली जातात खाद्य हाताळण्यास सोईस्कर असते. तरीही सुकी भरड खाद्ये देण्याची पद्धतच जास्त प्रमाणात आढळते.


कोष्टक क्र. १. खाद्यमिश्रणातील अन्नघटकांचे सर्वसाधारण प्रमाण (प्रतिशत पोषक उपलब्धता) 

अन्नघटक 

पिलांचे खाद्य 

० ते ८ आठवडे 

वाढीस लागलेल्या पिलांचे खाद्य ९ ते २० आठवडे 

अंडी देणाऱ्या

कोंबड्यांचे खाद्य २० आठवड्यांच्या पुढे 

वंशवृद्धीसाठी ठेवलेल्या कोंबड्यांचे खाद्य २० आठवड्यांच्या पुढे 

मांसल जातीच्या पिलांचे खाद्य ० ते ५ आठवडे 

मांसल जातीच्या वाढीस लागलेल्या पिलांचे खाद्य ६ ते १० आठवडे 

अशुद्ध प्रथिने 

२० 

१८ 

१६ 

१७ 

२४ 

२१ 

वसा 

४ 

३·५ 

३·५ 

४ 

४.५ 

५ 

कॅल्शियम 

१.२ 

१ 

२·५ 

२·५ 

१.२ 

१ 

फॉस्फरस 

०·५ 

०·४ 

०·४ 

०·५ 

०.५ 

०.५ 

अशुद्ध तंतुमय घटक 

६ 

७ 

७ 

७ 

६ 

६ 

ऊर्जा (चयापचयी, कॅलरी) 

२,७०० 

२,६०० 

२,८०० 

२,८५० 

२.९५० 

३,००० 

अंड्यांचा व्यापार : प्राचीन कालापासून अनेक प्राण्यांची अंडी मानव खाद्य म्हणून उपयोगात आणीत आहे. सुसर, कासव व पक्षी या सर्वांत कोंबड्यांची अंडी खाद्य म्हणून सर्रास वापरली जातात. जगातील बहुतेक खेडेगावांत अंड्यांकरिता कोंबड्या पाळल्या जातात. कोंबडीच्या अंड्यातील पोषक घटकांचा विचार करता दुधाच्या खालोखाल अंड्याला सकस आहारात स्थान आहे. अंड्यामध्ये ६६%पाणी, १३% प्रथिने, १०% वसा व ११% लवणे असे सामान्यतः प्रमाण असते. नराशी संयोग न येता कोंबडी जी अंडी घालते त्यांना अफल (शाकाहारी) अंडी म्हणतात. त्यांत जीव वाढत नसल्यामुळे ती जास्त काळ चांगल्या स्थितीत राहू शकतात. चीनमध्ये अंडी दाहक चुन्यामध्ये बुडवून वर्षानुवर्षे टिकवून खाण्यासाठी वापरत असत, तसेच पॅसिफिक महासागरातील बेटांमध्ये आत भ्रूण वाढत असलेली अंडी चविष्टपणे खाल्ली जात असत. तरीही कोंबड्यांच्या ताज्या अंड्यांसाठीच जगभर मागणी अधिक आहे. अंड्यांचा ताजेपणा टिकविण्यासाठी कवचावरील छिद्रे विविध प्रकारच्या द्रावणामध्ये अंडी बुडविल्याने बंद करता येतात. छिद्रे बंद झाल्यामुळे बाहेरील हवामानामुळे आतील घटकांमध्ये होणारा बदल लवकर होत नाही व त्यामुळे अंडी जास्त दिवस टिकतात. विशिष्ट प्रकारच्या तेलाचा (थंड वा गरम) किंवा चुन्याच्या निवळीचा उपयोगही ह्या कामाकरिता करतात. याशिवाय शीतगृहात (१०ते १५से. तापमानात) अंडी ठेवल्यास ती जास्त दिवस टिकतात. अंड्यांची भुकटी तयार करता येते व ती दीर्घकाळ टिकते. एक टन भुकटी तयार करण्यासाठी सु. ८६,०००अंडी लागतात. बंगलोरमध्ये असा भुकटी बनविण्याचा एक कारखाना सुरू झाला आहे. अंड्यातील भ्रूण २०से. ला वाढू लागतो म्हणून अंडी १२से. तापमानामध्ये साठवतात. भारतात खेडोपाडी शीतगृहांची सोय नसल्यामुळे आणि हवेचे तापमान जास्त असल्यामुळे जमिनीत पुरलेले माठ, ओले केलेले कापडांचे पडदे, वाळ्याचे पडदे आदी साधनांनी अंड्यांच्या भोवतीचे हवामान थंड रहावे अशी सोय करून अंडी साठवतात. अंडी बाजारात पाठविण्यापूर्वी ती कवचावरील तडा, हवेची पोकळी, आतील मांसाचा किंवा रक्ताचा ठिपका व तत्सम दोष हुडकून काढण्यासाठी व ताजेपणासाठी तपासतात. ही तपासणी दिव्याच्या प्रकाशाच्या झोतापुढे अंडे धरून केली जाते. अर्धवट फुटलेली, तडा गेलेली, उष्ण हवेमुळे खराब झालेली व हाताळताना वाया गेलेली अशी अनेक अंडी गिऱ्हाइकांपर्यंत पोहोचेपर्यंत वाया जातात व त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी कागदाच्या लगद्यापासून किंवा प्लॅस्टिकची एकमेकांत खोचून एकावर एक ठेवता येतील अशी तबके तयार केली आहेत. ही तबके अंड्यांची ने-आण करण्यास सोईची असल्याचे दिसून आले आहे. त्यांत एकमेकांवर आपटून अंडी फुटण्याची भीती फारच कमी झाली आहे. 

अंडी हे नाशवंत अन्न असल्यामुळे त्यांच्या उत्पादनानंतर ती गिऱ्हाइकाला पोहोचेपर्यंत जितका कमी वेळ लागेल तितका जास्त फायदा त्यांच्या व्यापारामध्ये होतो. मध्यंतरीच्या काळात त्यांचा ताजेपणा टिकविण्यासाठी त्यांच्या साठवणुकीची योग्य ती व्यवस्था (उदा.‚शीतगृहे) असावयास पाहिजे. उत्पादन केलेल्या अंड्यांपैकी बराचसा भाग हा खाण्याकरिताच उपयोगात आणतात. याशिवाय थोड्याफार प्रमाणात छायाचित्रण, रंग, वैद्यकीय संशोधन‚ लस उत्पादन यांसाठीही त्यांचा उपयोग केला जातो. भारतामध्ये अंड्यांचा व्यापार सर्वस्वी दलालांमार्फत होत आहे. हे लोक खेडोपाडी अंडी गोळा करून ती बांबूच्या टोपल्यांतून शहराकडे पाठवीत असत. यांमध्ये फूटतूट व खराबी यांमुळे अंड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान तर होत असेच शिवाय कोंबड्या पाळणारांना मात्र चांगला भाव मिळत नसे व दलालच बराचसा पैसा मिळवीत. १९६० नंतर मात्र बऱ्याच ठिकाणी राज्य सरकारांनी हा व्यापार अंशतः ताब्यात घेतला आहे किंवा तो सहकारी संस्थांमार्फत केला जात आहे, त्यामुळे कोंबडीपालनाचा धंदा करणारांना चांगला भाव मिळू लागला आहे. राज्य सरकारच्या योजनांद्वारे अगर सहकारी संस्थांमार्फत अंडी गोळा करण्यापासून त्यांची ठोक वा किरकोळ विक्री करण्यापर्यंत सर्व व्यवस्था होते. त्यामुळे उत्पादकाला व गिऱ्हाइकाला दोघांनाही फायदा होतो.

अशा रीतीने अंड्यांच्या व्यापारातील समस्यांवर अंशत: मात करण्यात आल्यामुळे कोंबडीपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करण्यास उत्तेजन मिळत आहे.

कोंबड्यांचा व्यापार : भारतात सध्यातरी खाण्यासाठी उपयोगात येणाऱ्या बहुसंख्य कोंबड्या जिवंत अवस्थेतच विकल्या जातात. खेडोपाडी भरणाऱ्या आठवडा बाजारात त्या खरिदल्या जातात व गोळा करून बांबूच्या टोपल्यांतून शहरातील विक्रीकेंद्रांकडे पाठवल्या जातात. सर्रास रूढ असलेल्या ह्या पद्धतीत पक्ष्यांची फारच आबाळ होते आणि रस्त्यातच त्यांतील काही मृत्युमुखीही पडतात व ज्या ठिकाणावर पोहोचतात त्याही मरणावस्थेला आलेल्या असतात. त्यामुळे अशा अवस्थेत उत्पादकाच्या हाती रास्त किंमत पडत नाही व ग्राहकालाही दिलेल्या किमतीच्या मोबदल्यात चांगले पक्षी मिळत नाहीत.


इंग्लंड, अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांत जिवंत पक्ष्यांचा व्यापार जवळजवळ करीत नाहीत. तेथे यंत्राच्या साहाय्याने पक्षी सोलण्याची अनेक संस्करण संयंत्रे (यंत्रसंच) वापरत आहेत. असा शिजवावयास तयार अशा अवस्थेतील सोलीव पक्षी पॉलिथीनच्या पिशवीमध्ये घातलेला दुकानातील शीतपेटीत ठेवलेला मिळतो. भारतातही अशी चार-पाच कुक्कुट संस्करण संयंत्रे सध्या वापरात आहेत. एकंदर खाण्यासाठी विकल्या जाणाऱ्या पक्ष्यांच्या संदर्भात संस्करण केलेल्या कोंबड्यांची संख्या सध्या तरी अत्यल्प आहे. महाराष्ट्र राज्यात पुण्यास असे एक संयंत्र बसविण्यात आले आहे. त्यातील यंत्रसामग्री डेन्मार्कहून आणलेली आहे. दर ताशी १,००० कोंबड्यांवर संस्करण होऊ शकेल इतकी या संयंत्राची क्षमता आहे. अशा संयंत्रात स्वयंचलित पट्‌ट्याला असलेल्या आकड्यांना कोंबड्या उलट्या टांगल्या जातात. पट्‌ट्यावर पुढे सरकत असताना कोंबडीला प्रथम विजेचा सौम्य धक्का देण्यात येतो. हा धक्का जीवघेणा नसला तरी कोंबडी पुष्कळ तडफडते आणि तिचे स्नायू मोकळे होतात. थोडी पुढे सरकल्यावर मानेच्या दोन्हीही रक्तनलिका सुरीने कापतात आणि भरपूर रक्तस्राव होऊ दिला जातो. तो जास्तीत जास्त होऊ दिला व शरीरातील संपूर्ण रक्त बाहेर पडले म्हणजे मांस चविष्ट होते व ते जास्त काळ टिकतेही. रक्तस्रावामुळे कोंबडी मरते. याही पुढे बोटाच्या आकाराच्या उलटसुलट फिरणाऱ्या रबरी खुंटांमधून कोंबडी जाते व त्याठिकाणी पिसे काढली जातात. त्यानंतर उरलेसुरले पिसांचे बारीक खुंट व केस जाळले जाऊन ती उकळत्या पाण्यातून स्वच्छ होऊन ४० से. तापमानाच्या पाण्यामध्ये थंड होण्यासाठी थोडा वेळ बुडवून ठेवतात. डोके, ढोपराखालील पाय व आतडी अलग केली जाऊन बाकीचा भाग पॉलिथीनच्या पिशवीत घालून शीतगृहात ठेवण्यात येतो. या शीतगृहाचे तापमान –२३० ते –१८० से. असते. वरीलपैकी बऱ्याचशा प्रक्रिया यंत्राच्या साहाय्याने होतात.

मांसल जातीच्या कोंबड्यांची ८ ते १० आठवडे वयाची १ किग्रॅ. पेक्षा अधिक वजनाची पिले या कामी उपयोगात आणतात. त्यांचे मांस कोवळे व लुसलुशीत असते.

म्हैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने नुसत्या सोललेल्या, सोलून हाडे काढून टाकलेल्या, तुकडे केलेल्या अशा कोंबड्या हवाबंद डब्यात भरण्याची पद्धती शोधून काढली आहे.

कोंबडी पालनाचा व्यवसाय : अमेरिका आणि इतर पाश्चात्त्य देशांमध्ये हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. लाख कोंबड्या असलेल्या अनेक कोंबड्यांच्या वाड्या तेथे आहेत. त्यातच अंड्यांसाठी ठेवलेल्या कोंबड्या, वंशवृद्धीसाठी ठेवलेल्या, नुसती पिले वाढवणाऱ्या, मांसल कोंबड्यांची पैदास करणाऱ्या, अंडी उबवून पिले विकणाऱ्या अशा अनेक वाड्या व्यवसायातील त्या त्या विशिष्ट आंगोपांगाकडे लक्ष पुरवीत असल्यामुळे हा व्यवसाय बराच आखीव झाला आहे. शिवाय काेंबड्यांचे खाद्य तयार करण्याचे कारखाने, कोंबड्या सोलण्याचे कारखाने, अंडी गोळा करण्याची व विक्रीची केंद्रे, वाहतुकीसाठी व साठवणीसाठी शीतगाड्या व शीतगृहे असा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या धंद्याचा व्याप वाढला आहे. ब्रिटनमध्ये या धंद्यापासून १९३७-३८ साली ३ कोटी ९० लाख पौंड उत्पन्न मिळाले, तर १९६०-६१ साली २४ कोटी पौंडापर्यंत ते वाढले.

भारतात १९६६ च्या गणनेप्रमाणे कोंबड्यांची एकूण संख्या ११ कोटी ५० लाख होती. त्यांपैकी ७० लाखच सुधारलेल्या जातीच्या होत्या व बाकीच्या देशी होत्या. यातील बऱ्याच कोंबड्या खेडेगावांतून घरोघरी १०–१२ च्या संख्येने पाळल्या जातात. परंतु १९४५ सालानंतर कोंबड्यांच्या अनेक सुसंघटित वाड्या स्थापन झाल्या आहेत व त्या ठिकाणी कोंबड्यांच्या सुधारित जाती परदेशातून आयात करून वाढविल्या जात आहेत. या व्यवसायामुळे देशाला मिळणारे वार्षिक उत्पन्न ६७ कोटी रुपयांच्या घरात आहे व हे उत्पन्न जनावरांपासून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या ४% आहे.

दिल्ली, पंजाब, केरळ व महाराष्ट्र या राज्यांत कोंबडीपालनाच्या धंद्याची वाढ झपाट्याने होत आहे. १९७२ च्या सुमारास देशात लहान मोठ्या ३,००० वाड्या होत्या. बऱ्याच राज्यांतून या धंद्याला संघटित स्वरूप प्राप्त होत आहे. आर्बर एकर्स, शेव्हर्स, हायलाईन, बॅबकॉक इ. जगातील नामांकित कंपन्यांशी सहकार्य करून त्या त्या जातींची पालन व उबवण केंद्रे खासगी रीतीने निघत आहेत. ही केंद्रे दर आठवड्याला एक दिवस वयाची हजारो पिले विकतात व त्याच प्रमाणात ही पिले विकत घेऊन वाढवणाऱ्या मोठमोठ्या वाड्या स्थापन झाल्या असून दिवसेंदिवस त्यांची संख्या व व्याप्ती वाढत आहे. भारतातील विद्यापीठांतून कोंबड्यांची निपज, त्यांची आनुवंशिकी, निगा, खाद्य, शरीरविज्ञान, रोगप्रतिबंध अशा विविध विषयांचा पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव केला आहे. त्यामुळे अनेक तज्ञ लोक या धंद्याच्या वाढीसाठी उपलब्ध होत आहेत.

कोष्टक क्र. २ दरडोई अंडी व मांस यांच्या वार्षिक खपाचे प्रमाण 

देशाचे नाव 

अंडी 

मांस (किग्रॅ.) 

अमेरिकेची संयुक्त संस्थाने 

३०५ 

१७·३ 

कॅनडा 

२८८ 

१३·९ 

इंग्लंड 

२४५ 

६·७ 

प. जर्मनी 

२४० 

४·७ 

डेन्मार्क 

१७६ 

४·२ 

स्वित्झर्लंड 

१६१ 

४.२ 

इटली 

१५२ 

४·१ 

भारत 

५ 

०·२९ 

कुक्कुटपालनाच्या धंद्याचे अर्थशास्त्र पाहू गेले असता इमारती व इतर साधनसामग्रीवरील घसारा, पिलांची किंमत, गादीकरिता भुसा, वीज, खाद्य, औषधोपचार व मानवी श्रम ह्या खर्चाच्या बाबी आहेत. यातील ६० ते ७० टक्के खर्च कोंबड्यांच्या खाद्यावर होतो. खाद्यावरील खर्चाबाबत असे दिसून येते की, सुधारित जातीच्या कोंबडीला एक डझन अंडी देण्यासाठी १·८ ते २ किग्रॅ., तर १ किग्रॅ. मांस वाढविण्यासाठी ३ ते ४ किग्रॅ. खाद्य लागते. यावरून खाद्याच्या किमती रास्त असतील तरच चांगला फायदा संभवतो असे दिसून येईल. प्रचलित भाव लक्षात घेऊन असे म्हणता येईल की, अंड्यासाठी सुधारलेल्या जातीच्या कोंबड्या पाळल्यास प्रत्येक कोंबडीमागे दरमहा १ रु. आणि मांसल कोंबड्यांचा धंदा केल्यास दर पाच हजार पिलांमागे अडीच हजार रु. फायदा होऊ शकतो. कोंबड्यांच्या खतापासूनही उत्पन्न मिळते. चाळीस कोंबड्यांपासून बारा महिन्यांमध्ये एक टन खत तयार होते.

कोंबडीपालनाच्या धंद्याची वाढ करण्यासाठी भारतात भरपूर वाव आहे, हे काही देशांतील अंडी व मांस यांचा खप किती आहे. ह्याच्या कोष्टक क्र. २ मधील तुलनात्मक आकड्यांवरून दिसून येईल.


कोंबड्यांचे रोग 

कोंबड्यांच्या नैमित्तिक व सांसर्गिक आजारांच्या बाबतीत उपचार करून आजार बरा करणे आर्थिक दृष्ट्या फायद्याचे नसते, त्यामुळे प्रामुख्याने रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रक उपाययोजना करणे हेच फायद्याचे ठरते. सांसर्गिक रोगांचा फैलाव एवढा झपाट्याने होतो की, रोगाने पछाडलेला पक्षी कळपात आढळल्यास दुसरा दिवस उजाडण्याच्या आत अनेक पक्षी मेलेले अगर पछाडलेले आढळतात. काही सांसर्गिक रोग फारच गुंतागुंतीचे आहेत व त्यांची लक्षणे एकमेकांशी इतकी मिळतीजुळती आहेत की, नुसत्या लक्षणावरून रोगनिदान करणे कठीण असते. निदान झाले तरी रोगोपचार खर्चाचा असतो व रोगी कोंबडी बरी होण्याची तितकीशी खात्री नसते. बरे झालेले पक्षी अंडी आणि मांस यांच्या निर्मितीला तितकेसे कार्यक्षम राहत नाहीत म्हणून रोगप्रतिबंधक उपाययोजना करणेच श्रेयस्कर असते.

वेळेवर लस टोचणे, बाहेरून पक्षी सरळ कळपात न सोडणे, लहान मोठे पक्षी एकत्र न ठेवणे, मेलेले पक्षी जाळून वा पुरून टाकणे, रोगी पक्षी हाताळल्यावर डेटॉल, लायसॉल, फिनॉल इ. जंतुनाशक द्रावणांनी हात धुणे, बाहेरून आलेल्या माणसांना पक्ष्यांच्या घरात तसेच सरळ जाण्यास मज्जाव करणे इ. रोगनियंत्रक उपाय सर्वच सांसर्गिक रोगांच्या बाबतीत योजणे आवश्यक असते.

नैमित्तिक रोग कारणपरत्वे होतात व ते सांसर्गिक नसतात. त्यांमध्ये अन्नातील विशिष्ट घटकांच्या अभावामुळे होणाऱ्या रोगांचाही समावेश आहे. सांसर्गिक रोग विषाणू (अतिसूक्ष्म जंतू, व्हायरस), सूक्ष्मजंतू, परजीवी (अन्य प्राण्यावर उपजीविका करणारे) व कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती) यांच्यामुळे होतात. आनुवंशिकता, हवेतील बदलापासून अपुरे संरक्षण, अस्वच्छता, अशास्त्रीय घरे, घरातून पक्ष्यांची दाटी, असंतुलित आहार, सदोष व्यवस्थापन इ. दोष सांसर्गिक रोगाला कारणीभूत ठरतात.

कोंबड्यांच्या मुख्य रोगांची माहिती खाली दिली आहे.

विषाणुजन्य रोग :(१) मानमोडी : कोंबड्या आणि टर्की यांना विषाणूमुळे होणारा जगभर दिसणारा संहारक सांसर्गिक रोग. अगदी प्रथम १९२६ साली इंग्लंडमध्ये न्यूकॅसल म्हणून ओळखला गेला. अमेरिकेत डॉइल्स रोग, भारतात रानिखेत व महाराष्ट्रात मानमोडी या नावांनी हा रोग ओळखला जातो. कोंबड्याशिवाय इतर पक्ष्यांतही म्हणजे कावळा, चिमणी, कबूतर, तितर, कोकिळा इ. पक्ष्यांतही दिसून येतो. हंस आणि बदके यांना हा रोग होत नाही. रोगाची लक्षणे मुख्यत: श्वसन तंत्र (श्वसन संस्था) व तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) यांमध्ये दिसून येतात. रोगाचा परिपाक काल (म्हणजे रोगबाधा झाल्यापासून लक्षणे दिसू लागण्यापर्यंतचा काल) ४ ते १४ दिवसांचा असून सरासरी ५ ते ६ दिवसांचा असतो. पिलांमध्ये श्वसन तंत्राच्या व वयस्क कोंबड्यांत तंत्रिका तंत्राच्या विकृतीची लक्षणे प्रायः दिसतात. पिलांमध्ये शिंका, धापा टाकणे, चोच वासून श्वास घेणे, पाय व मानेतील स्नायूंचा समन्वय नसणे, कापरे भरणे, एक वा दोन्ही पायांचा पूर्ण पक्षाघात, क्वचित मान वर फिरवून उलटे चालणे, मान गोलाकार, वरखाली फिरवणे अशी लक्षणे आढळतात. वयस्क पक्ष्यात खोकला, घशात घरघर, भूक मंद होणे, कवचहीन अंडी घालणे किंवा अंडी देणे बंद होणे, अवसन्नता (मलूल होणे), अतिसार (हगवण), स्नायूत पेटके येणे व अंशत: किंवा संपूर्ण पक्षाघात ही लक्षणे दिसतात. रोगाच्या साथीत खुराड्यातील बहुतांशी अथवा सर्व पक्षी ३-४ दिवसांत मृत्युमुखी पडतात. रोगविषाणू अन्न व श्वसन नलिकेद्वारे कोंबड्यांच्या शरीरात प्रवेश करतात. रोगग्रस्त पक्ष्यांच्या मलमूत्रादी उत्सर्गातून, अंड्यांतून, श्वासोच्छ्‌वासातून विषाणूंचा प्रसार होऊन रोगग्रहणशील पक्ष्यामध्ये रोगप्रसार होतो. कष्टमय दुर्गंधीयुक्त श्वसन व त्यापाठोपाठ तंत्रिका तंत्राच्या विकृतीची लक्षणे यावरून रोगाचा संशय येण्यास काहीच प्रत्यवाय नाही. निर्विवादपणे रोगनिदान प्रयोगशाळेतील रक्तसमूहन (विशिष्ट प्रक्रियेने रक्तातील तांबड्या पेशींच्या गुठळ्या होणे) परीक्षेवरूनच होऊ शकते. सध्या रोगग्रस्त कोंबड्या बऱ्या करण्यासाठी कोणताही गुणकारी उपचार उपलब्ध नाही. साथीच्या वेळी सामान्यतः योजले जाणारे रोगनिवारक उपाय योजतात. हे उपाय म्हणजे निरोगी पक्ष्यांपासून रोगी पक्षी वेगळे करणे व जंतुनाशकद्रव्यांचा उपयोग करून भांडीकुंडी व घरे स्वच्छ ठेवणे. जरी रोगावर उपचार उपलब्ध नसला, तरी खात्रीशीर रोगप्रतिबंधक लस उपलब्ध आहे. ही मुख्यतः २ प्रकारची आहे. सौम्य विषाणूच्या सौम्य विभेदापासून (एकाच जातीतील विशिष्ट उपजातीपासून) बनवलेली लस ही त्या त्या विभेदाच्या नावावरून ओळखली जाते. त्यात लसोटा बी वन एफ वन या विभेदांचा अंतर्भाव आहे. ही लस सौम्य असल्यामुळे १ ते ४ दिवसांच्या पिलांना डोळे व नाक यांच्याद्वारा देण्यात येते. दुसरी लस विषाणूंच्या तीव्र विभेदापासून केलेली असून मुक्तेश्वर म्हणून ओळखली जाते. ही लस पिले ८ आठवड्यांची झाल्यावरच स्नायूमध्ये टोचतात. ह्या लसीने पूर्ण प्रतिरक्षा (रोगप्रतिकारकक्षमता) प्राप्त होते.

भारतात १९४० पूर्वी मोठ्या प्रमाणावर कोंबडीपालन करण्याच्या धंद्याला मानमोडी रोगाची आडकाठी होती. जवळजवळ प्रत्येक खेड्यात उन्हाळ्याच्या दिवसात रोगाचा प्रादुर्भाव होऊन अनेक कोंबड्या मृत्युमुखी पडत असत. आर्थिक हानीही बरेच होत असे. मानमोडीची लस हे वरदान ठरले आहे. कोंबडीपालनातील व्यवस्थापनाचा भाग म्हणून प्रतिवर्षी कोंबड्यांना लस टोचून घेतल्यास रोगाची भीती उरत नाही. सध्या प्रचलित असलेली मानमोडी रोगावरील सर्व प्रकारची लस ही अंड्यापासून तयार केलेली असते. ९ दिवसांचा भ्रूण ज्यात वाढलेला आहे अशी अंडी घेऊन त्यांना छिद्र पाडून आत मानमोडी रोगाचे सौम्य विषाणू सोडले जातात व ते त्याठिकाणी वाढले म्हणजे भ्रूणाचा मृत्यू होतो. अशा अंड्यातील भ्रूण व त्यामधील इतर ऊतकापासून (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहापासून) ही लस तयार केली जाते.

(२)देवी :बोरिलिएटा एव्हियम  नावाच्या विषाणूंनी होणारा संसर्गजन्य रोग. रोगप्रसार प्रत्यक्ष संसर्गामुळेच संभवतो. तसेच रोगी पक्ष्यांच्या रोगक्षतातून कृमिकीटकांद्वारे विषाणूंचा फैलाव निरोगी पक्ष्यांमध्ये होऊ शकतो. पिलांमध्ये रोगोद्‌भव झाल्यास मृत्यूचे प्रमाण ६० ते ७०% असू शकते. रोगाचा परिपाक काल ४ ते १४ दिवसांचा असून तीन प्रकारची रोग लक्षणे संभवतात. त्वचा प्रकारामध्ये त्वचेवर पिसे नसलेल्या ठिकाणी देवीचे फोड येतात. चक्षू-नासिकाप्रकारामध्ये डोळे व नाक यांतून श्लेष्मल (शेमासारखा) उत्सर्ग (रोगट स्राव) वाहतो. डोळे सुजलेले व नाक चोंदलेले असते. घटसर्पी प्रकारामध्ये घशातील श्लेष्मकलेवर (अस्तरासारख्या नाजूक स्तरावर) जाड पांढरे आवरण दिसते व ते खरडून काढल्यास खालची श्लेष्मकला रक्ती व आवळलेली असते. त्वचेवरील फोडाशिवाय मरणोत्तर तपासणीत काहीही विशेष आढळत नाही. फोडातील उपकला (त्वचेतील वरच्या थरातील) कोशिकांच्या (पेशींच्या) सूक्ष्म परीक्षणामध्ये ‘बोरेल पिंड’ नावाचे विषाणूंचे अंतस्थपिंड (विषाणूच्या वाढीतील सूक्ष्मतम अवस्था) दिसतात. कोंबडीची पिले ६ आठवड्यांची होताच त्यांना प्रतिबंधक लस टोचली असता पूर्ण प्रतिरक्षा प्राप्त होते. त्वचेच्या फोडांना ग्लिसरीन-आयोडीन मिश्रण लावल्याने फोड नरम होऊन बरे होतात. दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. एक कोंबड्यांच्या देवीच्या विषाणूंच्या सौम्य विभेदापासून आणि दुसरी कबुतरांच्या देवीच्या विषाणूंपासून बनवलेली. दोन्ही लसी अंड्यापासूनच तयार केलेल्या आहेत.


(३) जटिलश्वेतकोशिकाधिक्य : (ल्यूकोसीस कॉम्प्लेक्स, रक्तातील पांढऱ्या कोशिकांची प्रमाणाबाहेर वाढ). विषाणूंमुळे होणारा कोंबड्यांचा गुंतागुंतीचा संसर्गजन्य रोग. रोगाचे दोन मुख्य प्रकार दिसून येतात. पहिल्या प्रकारामध्ये रक्तातील तांबड्या कोशिकांचे व श्वेत कोशिकांचे आधिक्य दिसते व रक्तामध्ये अपरिपक्व कोशिकांची वाढ होते. ही वाढ तांबड्या कोशिकांची अगर श्वेत कोशिकांची होते. ह्या दोन्हीही प्रकारांत पक्षी रक्तहीन व क्षीण बनतात. तुरा व कल्ले फिकट होऊन यकृत, प्लीहा (पानथरी) व वृक्क (मूत्रपिंड) यांची थोडीफार वाढ होते आणि रक्त पाण्यासारखे पातळ होते. दुसऱ्या प्रकारामध्ये रक्तवाहिनीच्या बाहेर श्वेतकोशिकांतील लसीका कोशिकांची [→ लसीका तंत्र]वाढ होऊन लसीकार्बुदावस्था (लसीका कोशिकांची गाठ) प्राप्त होते. यातील चार उपप्रकारांपैकी तंत्रिका कोशिकांचा उपप्रकार हा नेहमी आढळणारा व अतिघातक प्रकार असून पंख व पाय यांचा पक्षाघात होतो. डोळ्याच्या उपप्रकारात बुबुळावर निळसर करडा रंग किंवा रंगहीन छटा येते. तिसऱ्या अंतस्त्यासंबंधीच्या (छाती व पोटाच्या पोकळीतील इंद्रियांच्या) उपप्रकारात यकृत, हृदय, फुप्फुसे, वृक्क, अंडाशय इ. अवयवांवर गाठी येतात. रक्तात लसीका कोशिकांच्या वाढीव्यतिरिक्त विशेष बदल आढळत नाही. अस्थिसंधयन (हाडांच्या सांध्यांच्या) उपप्रकारात अस्थी टणक व सुजलेली असून आतील अस्थिमज्जेचा (हाडाच्या पोकळीतील वाहक संयोजी ऊतकाचा) नाश झालेला असतो. रोगावर औषधोपचार उपलब्ध नाही. रोगनियंत्रणाचे उपाय काटेकोरपणे अमलात आणतात.

(४) मॅरेक्स रोग : हरपेझ  विषाणूमुळे (डीएनए प्रकार) कोंबड्यांना होणारा सांसर्गिक रोग. हा एक संहारक रोग आहे. परंतु ह्या रोगात दिसणारी लक्षणे श्वेत कोशिकाधिक्य ह्या रोगाशी इतकी मिळतीजुळती आहेत की, १९६७ मध्ये ह्या रोगाच्या विषाणूंचे स्वतंत्र अस्तित्व निदर्शनास येईपर्यंत हा रोग श्वेत कोशिकाधिक्य आहे असेच समजले जात असे. ह्या रोगाचे चार प्रकार संभवतात, तंत्रिका कोशिकांच्या प्रकारात ८ ते २० आठवडे वयाच्या वाढीस लागलेल्या कोंबड्या पछाडतात. पंखांचा व पायांचा पक्षाघात हे मुख्य लक्षण आढळते. अंतस्त्यासंबंधीच्या प्रकारात यकृत, प्लीहा, जननेंद्रिये व वृक्क यांवर लसीका कोशिकांच्या वाढीमुळे गाठी वाढतात व त्याप्रमाणे लक्षणे दिसतात. डोळ्यांच्या प्रकारात दृष्टिदोष उत्पन्न होतात. एका किंवा दोन्ही डोळ्यांच्या बाहुल्यांची असाधारण उघडझाप, बुबुळ अपारदर्शक होऊन शेवटी अंधत्व येते. चौथ्या प्रकारामध्ये कातडीच्या पिसांच्या पुटकांना (मुळांना) सूज येते. येथील उपकला कोशिकांमध्ये रोगाचे विषाणू सापडतात. कुक्कुटपालनाच्या व्यवसायावर या रोगाने फार प्रतिकूल परिणाम झाला आहे. १९७० च्या सुमारास टर्की पक्ष्याच्या हरपेझ  विषाणूपासून प्रतिबंधक लस बनविण्यात आली आहे व ती एक दिवसाच्या पिलांनाही टोचता येते. टोचलेल्या पिलांना पूर्ण प्रतिरक्षा प्राप्त होते, असे दिसून येत आहे. ही लस ऊतकसंवंर्धन (कृत्रिम रीत्या सजीव कोशिकांची वाढ करण्याच्या) तंत्राचा अवलंब करून बनविली आहे.

(५) सांसर्गिक कंठ-श्वासनाल शोथ : जगभर आढळणारा तीव्र प्रकारचा, त्वरित पसरणारा, विषाणूमुळे होणारा कोंबड्यांचा संसर्गजन्य रोग. या रोगाचा परिपाक काल ४८ तासांपेक्षा कमी असून श्वसनातील (मुख्य श्वासनलिकेतील) उत्सर्गातील विषाणूमुळे रोगप्रसार होतो. श्वासावरोध होत असल्यामुळे मान उंच करून चोच वासून श्वास घेण्याचा रोगी पक्षी प्रयत्न करतो. घशात घरघर होते, कंठ आणि श्वासनाल रक्तमिश्रित बुळबुळीत उत्सर्गाने भरलेला असून तेथील श्लेष्मकला लालसर असते. रोगी पक्ष्याच्या ग्रंथिल भागातील विषाणूंचाच (स्रावातील विषाणूंचा) लस म्हणून उपयोग करतात. ही लस गुदद्वाराजवळील पिशवीसारख्या भागाच्या श्लेष्मकलेवर घासतात. हीच पक्ष्याला टोचण्याची पद्धत होय. टोचलेल्या पक्ष्याला सक्रिय (पूर्ण) प्रतिरक्षा प्राप्त होते.

(६) सांसर्गिक श्वासनलिका शोथ : रोगी पक्ष्याच्या श्वासोच्छ्‌वासातून दुसऱ्या पक्ष्यास होणारा कोंबड्यांचा विषाणुजन्य सांसर्गिक रोग. सामान्यतः चार दिवस ते चार आठवडे वयाच्या लहान पिलांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. श्वासनालाचा खालचा भाग व श्वासनलिकेचा शोथ (दाहयुक्त सूज) दिसून येतो. घोगरेपणा, धापा टाकणे, हवा घेण्यासाठी धडधड, नाकातून व डोळ्यातून उत्सर्ग ही लक्षणे दिसतात. श्वासनालातील उत्सर्ग घट्ट झाल्यामुळे श्वसनक्रियेचा मार्ग बंद होतो आणि हवेच्या अभावी पक्षी दगावतो. प्रतिबंधक लस उपलब्ध आहे.

(७) मस्तिष्क शोथ : (मेंदूची सूज). विषाणूमुळे दोन ते चार आठवडे वयातील पिलांना होणारा सांसर्गिक रोग. १९३४ मध्ये अमेरिकेमध्ये हा रोग प्रथम आढळला. पिलांच्या पायांत अशक्तता आलेली दिसते, खुरटून चालण्याचा व पंखाच्या साहाय्याने तोल राखण्याचा पिलू प्रयत्न करते, क्वचित अंशत: वा पूर्ण पक्षाघात होतो. डोके व मान यांचा कंप सुरू होतो. मृत्यूचे प्रमाण ५०% हून अधिक असते. परिणामकारक उपाययोजना नाही व प्रतिबंधात्मक लसही उपलब्ध नाही.

(८) प्लेग: विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग. रोगी पक्ष्याच्या सर्व उत्सर्गातून विषाणूंचा प्रसार होऊन रोग प्रसार होतो. स्रावदूषित अन्नामुळे जरी अत्यल्प प्रमाणात विषाणू पोटात गेले तरी रोग प्रादुर्भाव संभवतो. हा रोग सर्व जगभर आढळला आहे. ४५ ते ४६ से. इतका ताप, मंद भूक, विसकटलेली पिसे, तुरा व कल्ला निळा, डोळे लाल व सुजलेले, डोके व घसा यांवर सूज, श्वसनक्रियेला त्रास अशी या रोगाची मुख्य लक्षणे दिसतात. मृत्यूचे प्रमाण क्वचित १००% ही असू शकते. प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. रोगनियंत्रक उपाय परिणामकारक रीतीने अमलात आणूनच रोगाचा प्रसार थांबवावा लागतो.

सूक्ष्मजंतुजन्य रोग :(१) पांढरी हगवण : (पुलोरम रोग). साल्मोनेला पुलोरम  नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे होणारा प्रामुख्याने पिलांचा संहारक सांसर्गिक रोग. पिलांमध्ये मृत्यूचे प्रमाण ८५% पर्यंत असते. क्वचित वयस्क कोंबड्याही मृत्यू पावतात. सर्व जगभर हा रोग आढळतो. रोगी कोंबड्यांच्या सूक्ष्मजंतूदूषित अंड्यामुळे व रोगी पिलांच्या विष्ठेमुळे रोगप्रसार होतो. रोगाचा परिपाक काल १५ ते २१ दिवस असतो. दूषित अंड्यांतून बाहेर पडणारी पिले जन्मतःच रोगी असतात व बहुसंख्य पिले पहिल्या आठवड्यात मृत्यू पावतात. धाप लागणे, एकत्र जमून उभे राहणे, गुदद्वाराभोवती पांढरी विष्ठा चिकटलेली असणे, यकृत रक्त स्रावांकित आणि वृक्कावर रक्त साचणे ही पिलामध्ये लक्षणे असतात. वयस्क कोंबड्यांत रोग लक्षणे तीव्रतेने दिसत नाहीत. अग्निमांद्य, तुरा व श्लेष्मकलेवरील फिकटपणा, ताप, अतिशय तहान ही लक्षणे दिसतात. अंडाशयातील अंडकोशिकांचे वाकडेतिकडे आकार, हृदय, यकृत, फुप्फुसे व पेषणीतील (अन्न कुटून बारीक करणाऱ्या अन्नमार्गाच्या स्नायुमय कोष्ठातील) स्नायूंवर ऊतकनाशी क्षते (व्रण) ही लक्षणेही आढळतात. वयस्क कोंबड्यांत चिरकारी (रेंगाळणाऱ्या) स्वरूपाने रोग असतो व ते रोगवाहक असल्यामुळे त्यांची विशेषत: माद्यांची रक्तसमूहन परीक्षा करून व्यक्तप्रतिक्रिया (रोगदर्शक प्रतिक्रिया) असलेले पक्षी मारून टाकतात. खात्रीलायक औषधोपचार किंवा प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. रोगनियंत्रक उपाय योजतात.

(२) कॉलरा : पाश्चेरेला मल्टोसिडा  नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे होणारा जंतुरक्तीय [रक्तामध्ये बहुसंख्येने जंतू असणे, →जंतुरक्तता] सांसर्गिक रोग. भारतात या रोगाचे प्रमाण कमी आहे. रोगी पक्ष्यांच्या उत्सर्जनाने दूषित झालेल्या अन्नपाणी व इतर सामग्रीमुळे रोगप्रसार होतो. कोंबड्यांच्या थव्यामध्ये आजार काही दिवस चालू राहतो. तुरा व कल्ला शामवर्णाचा होणे, भूक मंद होणे, अतिसार, नाक वाहणे वगैरे लक्षणे दिसतात. सल्फा औषधे आणि पेनिसिलीन यांनी रोग बरा होतो. प्रतिबंधक लस उपलब्ध आहे व ती टोचल्याने प्रतिरक्षा प्राप्त होते.


(३) टायफॉइड : साल्मोनेला गॅलिनेरम  नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे होणारा, जगभर आढळणारा सांसर्गिक रोग. पक्षी निस्तेज दिसतात, ४४ ते ४५ से. इतका ताप, तुरा व कल्ला काळवंडलेला. हिरवट रंगाचे जुलाब ही लक्षणे आशुकारी (तीव्र स्वरूपाच्या) प्रकारात दिसतात. चिरकारी प्रकारात यकृत वाढलेले असून त्यावर किंचित हिरवी छटा व बरीक करड्या रंगाचे ठिपकेही दिसतात. वृक्क व प्लीहा वाढलेली व हृदयावर लहान मोठ्या करड्या रंगाच्या गाठी ही लक्षणेही दिसतात. ऑरिओमायसीन हे प्रतिजैव औषध रोग बरा करण्यास उपयोगी पडते. रोगप्रतिबंधक लस उपलब्ध नाही. त्यामुळे रोगनियंत्रक उपाय योजणे हेच रोगाला आळा घालण्याचे साधन ठरते.

(४) क्षयरोग : मायकोबॅक्टिरियम एव्हियम  ह्या सूक्ष्मजंतूमुळे होणारा सांसर्गिक रोग. हा रोग जगभर होत असला तरी रोगाचे प्रमाण अत्यल्प आहे. दूषित अन्न, रोगी व निरोगी पक्षी एकत्र राहणे यामुळे रोगप्रसार होतो. खाणे भरपूर असूनही वजन घटणे व हळूहळू अस्थिपंजर होत जाणे, अंडी कमी देणे अगर बंद होणे, ताप नसूनही अशक्तपणा वाढत जाऊन मृत्यू पावणे ही सर्वसामान्य लक्षणे असतात. ट्युबरक्युलीन नावाचे द्रव्य कल्ल्यावर टोचून त्याच्या विशिष्ट प्रक्रियेवरून रोगसंसर्ग ओळखता येतो. रोगी पक्षी नष्ट केल्याने रोगनियंत्रण होते. उपचार करीत नाहीत.

(५) सर्पिल जंतुजन्य रोग : स्पायरोकीटा गॅलिनेरम  किंवा बोरीलिया गॅलिनेरम  नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे होणारा संक्रामक (संपर्काने होणारा) रोग. आर्गस पर्सिकस नावाच्या गोचिडीमध्ये रोगजंतू वाढतात. इतकेच नव्हे तर तिच्या अंड्यामधून गोचिड्यांच्या पुढील पिढ्यांतही जाऊ शकतात. दूषित गोचिड्यांच्या चाव्यामुळे रोगोद्‌भव होतो. ४३ ते ४४ से. पर्यंत ताप, विस्कळीत पिसे, गुंगून उभे राहणे, हिरवट जुलाब व आकडी येऊन मृत्यू येणे ही लक्षणे आढळतात. प्लीहा पाच ते सहा पट वाढलेली आढळते. या रोगावर पेनिसिलीन गुणकारी ठरले आहे. रोगप्रतिबंधक लसही उपलब्ध आहे आणि ती टोचल्याने प्रतिरक्षा प्राप्त होते.

(६) संसर्गजन्य सर्दी : हिमोफिलस गॅलिनेरम  या सूक्ष्मजंतूमुळे होणारा संसर्गजन्य रोग. तुरा व गलोल वाळलेली असते. तोंड उघडून पाहिल्यास टाळूला व क्वचित जिभेवर पिवळट पांढरे पापुद्रे दिसतात. रोगप्रतिबंधक लस उपलब्ध नाही. रोगनियंत्रक उपाय योजतात.

प्रजीवजन्य रोग : (प्रजीव म्हणजे एककोशिक जीव, प्रोटोझोआ). यमेरिया  जातीच्या बदराणूमुळे (कॉक्सीडिया या प्रजीव संघातील जीवामुळे) कोंबड्यांमध्ये सौम्य पण कोंबड्यांच्या दोन ते सहा आठवड्यांच्या पिलांमध्ये तीव्र स्वरूपात रोग उत्पन्न होतो. आतड्यामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे पिलांमध्ये मृत्युचे प्रमाण बरेच असते. आयमेरियाच्या आठ उपजाती कोंबड्यांमध्ये रोगकारक म्हणून माहीत झाल्या आहेत. आमांश हे ह्या रोगाचे मुख्य लक्षण आहे. [→ बदराणुजन्य रोग].

कवकजन्य रोग: धूमित गदाकवकांच्या (ॲस्परजिलस फ्युमिगेटस  या कवकाच्या) संसर्गाने कोंबड्यांच्या पिलांमध्ये तीव्र स्वरूपात रोगाचा प्रादुर्भाव होतो. प्रामुख्याने फुप्फुसाचा विकार उद्‌भवतो. कष्टमय जलद श्वासोच्छ्‌वास, नाकातून चिकट दुर्गंधीयुक्त उत्सर्ग ही लक्षणे दिसतात. कवकामुळे पक्ष्यात होणारे रोग सहसा चिरकारी असतात, परंतु पिलामध्ये होणारा हा रोग मात्र तीव्र स्वरूपाचा असतो. [→ गदाकवकजन्य रोग] .

परजीवीजन्य रोग : (१)जृंभा रोग : सिंगॅमस ट्रॅकिया  या गोलकृमीमुळे होणारा रोग. ह्या कृमीला रेडवर्म, गेपवर्म वा फोर्कवर्म अशाही संज्ञा आहेत. हा रोग सर्व जगभर आढळतो. रोगग्रस्त टर्की पक्षी रोगवाहक असतात व ते रोगप्रसार करतात. कृमी श्वासनालात असतात त्यामुळे तेथील श्लेष्मकला सुजून श्लेष्म जमते आणि कष्टश्वसन व श्वासावरोध होतो. मान लांब करून चोच उघडून श्वास घेण्याचा पक्षी प्रयत्न करतो. थोड्याथोड्या वेळाने घशात अडकलेले श्लेष्म फेकण्यासाठी डोके जोराने फिरवून खोकतो. अँटिमनी बेरियम टार्टारेटाची वस्त्रगाळ पूड पक्ष्याला हुंगण्यास लावल्याने रोग बरा होतो.

(२) कंड रोग : नेमिडोकॉप्टीस गॅलिनी   ह्या पंखांच्या माइटमुळे (एक प्रकारच्या किडीमुळे) कोंबड्यांच्या पंखांच्या मुळाशी कातडीत पोखरले जाते व पंख निघून त्या ठिकाणी कंड सुटते. कंड शमविण्यासाठी चोचा मारल्यामुळे त्याठिकाणी रक्त निघते. योग्य प्रमाणातील गंधक-साबण व पाणी यांच्या मिश्रणात पक्ष्याचा दूषित भाग बुडविल्याने रोग बरा होतो.

(३) खवल्या पाय : नेमिडोकॉप्टीस म्युटन्स  ह्या माइटमुळे पायाच्या गुळगुळीत खवल्यांमध्ये कंड सुटते. खवले विस्कळीत होऊन फुगतात व त्यांमध्ये पांढरे भुसकट साचते. क्रूड ऑइल (अशुद्ध खनिज तेल) पायावर घासल्याने रोग बरा होतो. वरील दोन्ही रोगांवर बेंझिल बेंझोएट लावल्याने सुद्धा रोग बरे होतात.

इतर किरकोळ आजार : (१) अंड्याचा अवरोध : अंडवाहिनीचा असाधारण लहान आकार आणि अंड्याचा मोठा आकार किंवा अंडवाहिनीचा शोथ यांमुळे अंडे तोंडाशी अडकून बसते. हाताच्या बोटाचा कौशल्याने उपयोग करून अंडे बाहेर काढतात किंवा छोटी शस्त्रक्रिया करून काढतात.

(२) गाउट : जरुरीपेक्षा अधिक प्रथिनयुक्त आहारामुळे अगर वृक्कात बिघाड झाल्यामुळे हा आजार संभवतो. पहिल्या अस्थिसंघायक प्रकारात पंखांच्या आणि पायाच्या सांध्यावर सूज येते. सांधा उघडा केल्यास यूरेटाच्या निक्षेपणामुळे (साचलेल्या थरामुळे) खडूसारखा पांढरा पदार्थ आढळतो. दुसऱ्या अभ्यंतरोग प्रकारात संयोजी ऊतक व रक्तरसकला आणि अवयव यांवर सोडियम व कॅल्शियम यांचे निक्षेपण होते. मूत्रवाहिनीमध्येही यूरेट आढळते. पहिल्या प्रकारात आहारातील प्रथिने कमी करतात. दुसरा प्रकार लक्षातच येत नाही. त्यामुळे उपचाराचा फारसा प्रश्न उद्‌भवत नाही.

(३) अंधांत्र बंद : पक्ष्याच्या खाण्यात येणाऱ्या पिसे, लोकर, पेंढा, भाजी, गवत इ. पदार्थ आंत्रात (आतड्यात) अडकल्यामुळे अन्न पुढे सरकत नाही. पक्षी मंद होतो व चोच वासून वायू बाहेर टाकतो.

(४) अन्नविषबाधा : क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम  ह्या जंतूचे विष कुजलेल्या वा नासलेल्या अन्नातून पक्ष्याच्या पोटात गेल्यास मानेच्या स्नायूंचा समन्वय न होणे व पक्षाघात यांसारखी लक्षणे दिसून पक्षी मरतो. उपचार उपलब्ध नाही.

वर उल्लेखिलेल्या आजारांशिवाय कोंबड्यांमध्ये अनेक प्रकारचे परजीवी आहेत. त्यांत अंतर्गत परजीवी व बाह्य परजीवी असे प्रकार आहेत. अंतर्गत परजीवी म्हणजे पोटात होणारे हरतऱ्हेचे जंत. या प्रकारामध्ये स्कॅरिडिया गॅलाय, हिट्रोकिस गॅलिनी, कॅपिलारिया लॉंजिकॉलीस, ॲक्युॲरिया हॅम्युलोसा, टेट्रमेरेस फ्युसिपिना  हे गोलकृमी, प्रॉस्थॉगॉनिमस इंडिकस  हा पर्णाकृती कृमी, डॅव्हॅ निया प्रोग्लोटिडा, रॅलेटिना टेट्रागोना  हे चपटे कृमी यांचा समावेश होतो. अंतर्गत कृमी जास्त प्रमाणात झाले तरच अशक्तता, रक्तक्षय, अंडी बंद होणे ही लक्षणे दिसतात आणि क्वचित मृत्यूही संभवतो. सामान्यत: त्यांच्यापासून फारसा उपद्रव पोहोचत नाही, तरीसुद्धा कोंबड्यांना मधूनमधून जंतनाशक औषधे देण्याची प्रथा आहे.

बाह्य परजीवी प्रकारामध्ये गोचिडी, पिसवा, उवा व माइट यांचा समावेश आहे. आर्गस पर्सिकस  ही गोचीड रोगकारक आहे. सेरॅटोफालस गॅलिनी, किनोप्रॅगा गॅलिनेसीया ह्या पिसवा, मेनाकॅन्थस स्ट्रॅमिनियस, मेनोपॉन गॅलिनी, लॉथपेयुरस हेटरोफॅगस, लॉ. व्हेरियाबिलिस  व गोनिओकोटस गॅलिनी  ह्या उवा आणि डर्‌मॅनायसस गॅलिनी, सायटोडियाटिस न्यूडास  ह्या माइट ह्यांमुळे कोंबड्यांना उपद्रव पोहोचतो. ह्या बाह्य परजीवींमुळे पक्षी अस्वस्थ झाल्यामुळे कमी खातो व अंडी कमी देतो किंवा अंडी देणे बंद होते. क्वचितच मृत्यू संभवतो. डीडीटी (५ ते १०%) व सोडियम फ्ल्युओराइड यांचा पिसवा व उवा मारण्याकरिता चांगला उपयोग होतो. माइटकरिता गंधक व चुना यांचे मिश्रण उपयुक्त ठरते. (चित्रपत्रे १ व २)  

पहा: अंडे, टर्की रानकोंबडी.

संदर्भ :  1. Barger, E.H. Card, L. E. Pomeroy, B. S. Diseases and Parasites of Poultry, Philadelphia, 1958.

     2. Beister, H. E. Schwarte, L. H. Diseases of Poultry, Iowa, 1965.  

     3. Jull Morley, A. Poultry Husbandry, New York, 1960.  

     4. Jull Morley, A. Poultry Breeding, New York, 1960.  

     5. McArdle, M. A. Panda, J.N. A Hand-Book for Poultry Officers in India, Food and Agricultural Organisation, New Delhi, 1965.     

     6. Naidu, P.M.N. Poultry Keeping in India, New Delhi, 1967.  

     7. Robinson, L. Modern Poultry Husbandry, London, 1961.  

     8. Romanoff, A. L. Romanoff, A.J. The Avian Egg, New York, 1949.  

     9. Taylor, L.W. Fertility and Hatchability of Chicken and Turkey Eggs, New York, 1956.  

   10. CSIR, The Wealth of India-Raw material, Vol. VII, Live Stock Supplement, Including Poultry, New Delhi, 1970

फडके, श्री. पु. देवधर, ना. सं.


प्लिमथ रॉक असोल बक ऑरपिंग्टन व्हाइट लेगहोर्न ऑस्ट्रलॉर्प देशी  कॉर्निश


कोंबड्यांच्या घराचा आतील देखावा अंड्यांची तबके आत रचलेले उबयण यंत्र एक आठवड्यापर्यंतची पिले वाढविण्याची व्यवस्था कोंबड्यांची पाणी पिण्याची भांडी  कोंबड्यांची खाद्य ठेवण्याची भांडी दुमजली पद्धतीचे पिंजरे एक दिवसाची पिले भरलेल्या पुठ्ठ्याच्या पेट्या