सिद्घगान : तमिळनाडूमध्ये प्राचीन काळापासून ‘सिद्घ’ नामक गूढवादी योग्यांची परंपरा होती. त्यांनी रचलेली धार्मिक पदे ‘सिद्धगान’ म्हणून ओळखली जातात. तमिळनाडूमधील सिद्घांची ही परंपरा नेमकी कोणत्या काळात कशा प्रकारे निर्माण झाली, हे सांगता येणे कठीण आहे. हे सिद्घ वेद, शास्त्र, पुराणे मानत नसत. तीर्थयात्रा, पूजापाठ इ. बाह्य आचारांची ते टवाळी करीत, त्यांचा भर आंतरिक साधनेवर होता. अद्वैत हे त्यांचे तत्त्वज्ञान व शिव हे उपास्य दैवत होते. या सिद्घांपैकी कित्येक सिद्घ हे वैद्यक व औषधी, ज्योतिषिद्या, रसायन वा किमयागारी, मंत्रतंत्र, योगसाधना, तत्त्वज्ञान अशा नानाविध विषयांचे जाणकार होते व त्यांवर त्यांनी वाङ्‌मयही निर्माण केले. त्यांच्या ठायी असाध्य रोग बरे करण्याची अद्‌भुत शक्ती होती तारुण्य टिकवण्यासाठी व दीर्घायुष्य लाभावे म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारचे योग करीत असत सामान्य धातूचे किमयागारीने ते सोन्याचांदीत रुपांतर करीत, अशा अनेक समजुती या सिद्घांविषयी त्या काळी प्रचलित होत्या. हे सिद्घ नाना प्रकारचे चमत्कार व हठयोगातील अनेक क्रिया लोकांना दाखवून प्रभावित करीत असत. हे बहुतेक सिद्घ कनिष्ठ जातिजमातींतील होते, हे विशेष होय. हे सिद्घ जातिव्यवस्था व अंधश्रद्घा यांच्या विरोधात होते. असे एकूण अठरा प्रमुख सिद्घ होऊन गेले, असे परंपरेने मानले जाते. त्यांनी विविध विषयांवर वाङ्‌मय निर्माण केले. ⇨ अगस्त्य मुनीं पासून ही परंपरा सुरु होते व शिववाक्यार या शेवटच्या सिद्घापाशी संपते, असे एक संप्रदाय मानतो तथापि दुसऱ्या एका संप्रदायानुसार अगस्त्य मुनींचा समावेश अठरा सिद्घांमध्ये केला जात नाही. पहिल्या परंपरेनुसार मानले जाणारे हे अठरा सिद्घ पुढीलप्रमाणे : (१) अगस्त्य मुनी, (२) तिरुमूलर, (३) बोगा मुनिवर, (४) पुलिप्पणी, (५) कोंगनार, (६) इदैक्कट्टु सिद्घार, (७) कमलमुनी, (८) सत्तैमुनी, (९) मच्छमुनी, (१०) ऊरोमा मुनी, (११) ऊगी मुनी, (१२) कोरक्कार, (१३) थेरयार, (१४) धन्वंतरी, (१५) पाम्फट्टी सिद्घार, (१६) अगप्पै सिद्घार, (१७) कदम्पै सिद्घार व (१८) शिववाक्यार. तायुमानवर याने सिद्घरगणम् नामक ग्रंथ लिहिला असून त्यात त्याने तमिळ देशातल्या अठरा सिद्घांची नावे दिली आहेत. तथापि या नावांबाबत एकवाक्यता दिसून येत नाही. वेगवेगळ्या संप्रदायांनुसार ही नावे वेगवेगळी दिली जातात. काही सांप्रदायिक अगस्त्य व तिरुमूलर यांचाही सिद्घपरंपरेत समावेश करतात. त्यानुसार ⇨ तिरुमूलर हा कवी सकल सिद्घांचा मुकुटमणी व त्रेसष्ट ⇨ नायन्मारां पैकी सर्वश्रेष्ठ सिद्घ मानला जातो. या अठरा सिद्घांमध्ये हिंदू , बौद्घ, जैन धर्मपंथीयांचाही समावेश होता. तसेच ते वेगवेगळ्या कनिष्ठ जातिजमातींतून आलेले बहुजनसमाजाचे प्रतिनिधी होते. तिरुमूलरप्रमाणेच शिववाक्यार, पट्टिनत्तार, भद्रगिरियर, पाम्फट्टी सिद्घार व इदैक्कट्टु हे सिद्घ कवी प्रसिद्घ होते.

तिरुमूलर ह्याचा तिरुमंत्रम् (पवित्र मंत्र) हा एकूण ३,००० पदांचा ग्रंथ प्रसिद्घ आहे. बोगा मुनिवर हा प्रमुख सिद्घ असून तो सर्व सिद्घांचा म्होरक्या मानला जातो. त्याने सात कांडांमध्ये एकूण ७,००,००० पदे रचली, असे समजले जाते. वैद्यक, योग इ. विषयांवरची रचना त्यात आहे. पुलिप्पणी सिद्घारने वैद्यक, ज्योतिष इ. विषयांवर रचना केली. कोंगनार मुनिवर हा त्या काळातील प्रसिद्घ किमयागार होता. इदैक्कट्टची पद्ये तत्कालीन लोकगीतांच्या संक्रलित खंडांध्ये समाविष्ट आहेत. कमलमुनी हा सुवर्णकार असून हस्तसामुद्रिक विद्येमध्ये पारंगत होता व त्या विषयावरील त्याची ग्रंथरचना प्रसिद्घ होती. सत्तैमुनी हा विणकर जमातीतील, तर मच्छमुनी हा मच्छीमार जमातीतील होता. ऊगी मुनीने वैद्य चिंतामणी ही वैद्यकावर प्रबंधरचना केली, तर कोरक्कार मुनीने (दहावे शतक) कोरक्कार वैपु ही औषधीवरील रचना सिद्घ केली. थेरयार याने औषधी, वैद्यक व रोगनिवारण या विषयांवर नोयनुक वीथी हा प्रसिद्घ ग्रंथ रचला. धन्वंतरीनामक सिद्घाने वैद्य चिंतामणी, कलैज्ञानम्, सिमित्तु रत्य सिमुक्कम्, धन्वंतरी निखंडु इ. ग्रंथ रचले. पाम्फट्टी सिद्घाराने ज्योतिषविद्या, नक्षत्रविज्ञान यांवर सिद्घार आरुदम् ही रचना केली. अगप्पै सिद्घाराने मानवी अंतरात्म्यात वसत असलेल्या सैतानाच्या लीलांचे रुपकात्मक वर्णन करणारी पदे रचली, तर कदम्पै सिद्घाराने स्त्रीला चेटकी संबोधून तत्त्वबोधपर उपदेश करणारी पदे रचली. शिववाक्यार या शेवटच्या सिद्घाने रचलेली शिववाक्कियम् ही पद्यरचना प्रसिद्घ आहे. या सिद्घांनी तमिळ भाषेत रचलेल्या ग्रंथांमध्ये मुखत्वे वैद्यक, रसायनशास्त्र, नक्षत्रविज्ञान, सामुद्रिक, शुभाशुभ शकुन, हठयोग इ. विषय प्रामुख्याने येतात. या सिद्घांपैकी एकाने नाग खेळवणाऱ्या गारुड्याच्या पुंगीवादनाच्या सुरावटीशी मिळतीजुळती छंदरचना आपल्या पदांमध्ये वापरली, त्यामुळे तो पाम्फट्टी सिद्घार म्हणून ओळखला जाऊ लागला. धनगरी ओव्यांच्या चालींशी साधर्म्य असलेल्या छंदात पदे रचणाऱ्या सिद्घाला इदैक्कट्टु सिद्घार हे नाव पडले. ह्या सर्व सिद्घांनी बाह्य धार्मिक विधींचे व कर्मकांडांचे अवडंबर मुळीच न माजवता अंतरात्म्याच्या अभिव्यक्तीवर जास्त भर दिला. ह्या सिद्घांनी रचलेली पदे वरवर सुबोध व साधी वाटत असली, तरी त्यांतील गूढार्थाची उकल करणे फार कठीण आहे. त्यांच्या पदांमध्ये त्यांनी दैनंदिन व्यावहारिक जीवनातील भाषा वापरलेली आढळते. प्रतीकात्मकता, विषयभोगाविषयी तीव्र जुगुप्सा,जनसामान्यांना अनाकलनीय अशी रहस्यमय, गूढगुंजनात्मक परिभाषा ही तमिळ सिद्घसाहित्याची प्रमुख वैशिष्ट्ये होत. तत्कालीन उच्च्वर्णीय ब्राह्मणवर्गाने धर्मविधी व कर्मकांडे यांचे अवास्तव स्तोम माजवून बहुजनसमाजाला धर्मज्ञानापासून वंचित ठेवले होते. तमिळ सिद्घांनी या ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्घ बंड उभारले आणि भक्ती व अध्यात्म या गोष्टी उच्चवर्णीयांच्या मिरासदारीतून मुक्त करुन बहुजनसमाजाच्या सर्व स्तरांत त्यांचा प्रसार केला. तथापि रुढीवादी उच्चवर्णीय पंडितांच्या उपेक्षेमुळे त्यांच्या अनेक ग्रंथरचना काळाच्या ओघात नष्ट झाल्या मात्र या सिद्घांच्या वाणीचा व नीतिवचनांचा समाजाच्या सर्व स्तरांमध्ये प्रसार होऊन ही पदे लोकप्रिय झाली. शैव तमिळ सिद्घांची ही पदे दक्षिणेकडील लोकांच्या मुखी अद्यापही आहेत.

तमिळनाडूमध्ये मध्ययुगात (चौदाव्या शतकाच्या अखेरीस) सिद्घ कवींचा नवा संप्रदाय उदयाला आला. त्या काळात राजकीय उलाढाली, लढाया, सत्तापालट व परकी सत्तांचे प्राबल्य आदी घडामोडींमुळे समाजजीवनातले स्वास्थ्य व स्थैर्य लोप पावले. बहुजनसमाजाला लौकिक जीवनात कशाचीच शाश्वती उरली नाही. लोकांमध्ये निराशा व औदासीन्य पसरले. त्यातून एका फसव्या अध्यात्मवादाचा उदय झाला. त्यात मानवी प्रयत्नांना कमी लेखून दैववाद व वैराग्य यांना प्राधान्य देण्यात आले. ह्याचे प्रतिबिंब तत्कालीन तमिळ साहित्यातही उमटले. ह्या सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीवर नव्याने पुढे आलेल्या सिद्घ कवींच्या संप्रदायाने योग आणि वैराग्य यांचेच स्तोम माजविले, असा एक आक्षेप घेतला जातो.

वरदराजन्, मु. (इं.) इनामदार, श्री. दे. (म.)