कारैक्काल अम्मैयार : (सु.सहावे शतक). तमिळमधील एक शैव संत कवयित्री. त्रेसष्ट ⇨ नायन्मारांंपैकी (शैव संत) ती एक असून तिचे मूळ नाव पुनितवती होते. चोल राज्यातील कारैक्काल या गावी ती राहत असे. पुढे या गावाच्या नावावरूनच कारैक्काल अम्मैयार या नावाने ती ओळखली जाऊ लागली. पॅरियपुराणम्‌ ह्या सांप्रदायिक ग्रंथात तिच्याबाबत माहिती आलेली आहे. त्यानुसार एका व्यापाऱ्याची ती सालस पत्नी. तिच्या अंगच्या गूढ शक्ती व सिद्धी पाहून तो व्यापारी घाबरला व तिला टाकून देऊन त्याने दुसरा विवाह केला. यानंतर आपले तारुण्य व सौंदर्य झाडून टाकून ती स्वतःस ‘भूत’ म्हणवू लागली आणि उर्वरित आयुष्य तिने शिवभक्तीत वेचले. मद्रासजवळील तिरुवालंगाडू येथील मंदिरात तिची मूर्ती असून आजही तिची मोठ्या भक्तिभावे उपासना केली जाते.

तिरुवालंगाडू येथील कारैक्काल अम्मैयारची ब्रॉंझमूर्ती.

सहाव्या ते नवव्या शतकांत शैव व वैष्णव भक्तिसंप्रदायांमुळे तमिळ साहित्यात अनेक भक्तिगीतांची मौलिक भर पडली. नायन्मार आणि ⇨ आळवार (वैष्णव संत) ह्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या संतांनी तमिळ साहित्यावर आपला कायम ठसा उमटविला आहे. नायन्मारांत कारैक्काल अम्मैयारला अग्रगण्य स्थान आहे. अर्‌पुदततिरु-अंदादि  नावाचे तिच्या १०० पद्यांचे एक संकलन असून त्यातील कविता उत्कट शिवभक्तीने ओथंबलेली आहे. काही पद्यांत तिने आपले गूढ आध्यात्मिक अनुभवही वर्णिले आहेत. शिव विश्वतत्त्व म्हणून तर आहेच, पण तिचा तो हृदयस्वामीही आहे. दुसऱ्या एका काव्यात तिने तिरुवालंगाडू येथे शिव व काली यांच्यात झालेल्या नृत्यस्पर्धेचे वर्णन केले आहे. यांव्यतिरिक्त शिवस्तुतिपर दोन ‘पदिकम’ (दशक) काव्येही तिने लिहिली आहेत.

तिच्यानंतर होऊन गेलेल्या नायन्मारांत तिच्याविषयी कमालीचा पूज्यभाव होता. तिच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमीवर पाऊल ठेवणेही त्यांना अप्रशस्त वाटे. म्हणून मंदिराच्या परिसराबाहेरूनच ते तिची पूजा बांधीत.

 

 

वरदराजन्‌, मु. (इं.); सुर्वे, भा. ग. (म.)