मरैमलै अडिगळ : (१८७६−१९५०) . प्रख्यात तमिळ समीक्षक व विचारवंत. जन्म तंजावर जिल्ह्यातील कदमपडी येथे शैव वेल्लाळ कुटुंबात. मूळ नाव स्वामी वेदाचलम्. नंतर तमिळ भाषेच्या अभिमानातून त्यांनी ‘मरैमलै अडिगळ’ हे मूळ नावाचेच तमिळ अनुवादित नाव स्वीकारले. मद्रास येथील ख्रिश्चन महाविद्यालयात ते तमिळचे प्राधापक होते. पूर्वायुष्यात संसार करून उत्तरायुष्यात त्यांनी संन्यास घेतला. एक नाणावलेले वक्ते व मान्यवर लेखक म्हणून त्यांचा लौकिक होता. ख्रिश्चन महाविद्यालयातील प्राध्यापकपद सोडल्यानंतर त्यांनी आपले आयुष्य तमिळ भाषासाहित्याच्या तसेच शैव मताच्या पुरस्कारार्थ वेचले. स्वामिनाथ अय्यर यांनी संघम् कालीन प्राचीन तमिळ अभिजात साहित्य शोधून प्रकाशित केले आणि मरैमलै अडिगळ यांनी ते साहित्य व्यासपीठावरून तसेच आपल्या समीक्षापर लेखनातून लोकांपर्यंत नेऊन पोहोचविले. शैव मताच्या चार प्रख्यात अध्वर्यूबाबत त्यांच्या मनात कमालीचा भक्तिभाव होता. त्यांनी आपल्या व्याख्यानांतून व लेखनातून शैव मताचा निष्ठापूर्वक प्रचार केला. एक थोर तत्ववेत्ते व समीक्षक म्हणून तसेच तमिळ, संस्कृत व इंग्रजी भाषा-साहित्यांचे गाढे पंडित म्हणून त्यांचा लौकिक होता. संस्कृत किंवा अन्य परकीय शब्दांचे मिश्रण तमिळमध्ये करण्याची अजिबात गरज नाही असे त्यांचे मत होते आणि विशुद्ध तमिळचे ते कडवे पुरस्कर्ते होते.

त्यांनी धर्म, तत्वज्ञान,समाजशास्त्र, इतिहास, भाषाशास्त्र, प्राचीन साहित्य, चरित्र, निबंध, समीक्षा, अनुवाद इ. विषयांत व प्रकारांत विपुल लेखन केले. पांडेक्कालत्तमिळारूम् आरियारूम् (१९०६) त्यांचा हा अत्यंत महत्वाचा व विद्वत्तापूर्ण असा संशोधन-समीक्षापर ग्रंथ असून तमिळमधील ऐतिहासिक व अभिजात समीक्षेचा तो एक मानदंड मानला जातो. संशोधनविषयाचा सखोल वेध घेणारी त्यांची मर्मग्राही दृष्टी त्यांच्या अनेक संशोधनपर लेखांतही दिसून येते. या दृष्टीने त्यांचे ‘पट्टिनाप्पलै आरैचि उरै’, ‘तिरूक्कुरळ आरैचि उरै’,‘ कुरूमंचिपट्‌टु आरैचि’ इ. लेख मूलभूत महत्वाचे होत. संस्कृत, तमिळ व इंग्रजी वाङ्मयाच्या सखोल अध्ययनातून त्यांची तुलनात्मक अभ्यासाची दृष्टी विकसित झाली. त्यांच्या अनेक ग्रंथांतून याचा प्रत्यय येतो.

त्यांची शैली साधी, सरळ पण प्रभावी आहे. अशा शैलीतील आपल्या भाष्य-विवरण ग्रंथांद्वारे त्यांनी शैव सिद्धांत व त्याचे तत्वज्ञान सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहोचविले. शाकुंतल नाटकम् (१९०७), वेल्लाळर नागरिकम् (१९२३), माणिक्कवाचगर वरलारूम् कालभुम् (१९३०), मुर्‌कालप्पिर्‌काल तमिळप्पुलवर (१९३६) ह्या ग्रंथांतून त्यांची इतिहासाची सूक्ष्म , सखोल जाण आणि चिकित्सक दृष्टी दिसून येते.

मुतर्कुरळ वाद निराकरणम् (१८९८), पळंतमिळक्कोहळकैये शैव समयम् (१९३०), शाकुंतल नाटक आरायच्चि (१९३४), शैवसिद्धांत ज्ञानबोधम् (१९३५), तमिळर मतम् (१९४१), भुम्मणिक्कोवै (१९४२), इंडी पोटु मोळिया? (३ री आवृ. १९४९) इ. त्यांचे ग्रंथही महत्वपूर्ण होत.

वरदराजन्, मु. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)