शेक्किळार : (सु. बारावे शतक). प्रसिद्ध तमिळ महाकवी. जातीने वेळ्ळाळ. कुन्रत्तूर (तोंडैनाडू) येथील रहिवासी. चोल राजा दुसरा राजराज याच्या दरबारी तो प्रमुख मंत्री होता परंतु काहींच्या मते तो पहिला कुलोत्तुंग याच्या दरबारात, तर काहींच्या मते तो अनपायचोल याच्या दरबारात होता.
परमेश्वरावरील उत्कट भक्ती, अढळ श्रद्धा आणि आदर्श व परोपकारी जीवन यांच्या साहाय्याने सामान्य माणसालाही स्वतःची आध्यात्मिक उन्नती साधता येईल, हा पेरियपुराणम् चा मध्यवर्ती संदेश आहे. मोक्षप्राप्ती अथवा परमेश्वरप्राप्ती यांसाठी सर्वसंगपरित्याग करण्याची गरज नाही तर उच्च आध्यात्मिक मूल्यांना व आदर्शांना अनुसरून, गृहस्थाश्रमात राहूनही हे अंतिम ध्येय प्राप्त करता येईल, यावर पेरियपुराणम् ने भर दिला आहे. पेरियपुराणम् मध्ये गृहस्थाश्रमाचा महिमा सांगितला आहे. सामान्य माणसांच्या भावभावना, संघर्ष, विचार इत्यादींचे मार्मिक चित्रण त्यात आलेले असून तत्कालीन समाजजीवनाचेही त्यातून दर्शन घडते. तमिळ संतस्थानांची वेधक वर्णनेही ठिकठिकाणी आलेली असून त्यांतून तत्कालीन ग्रामजीवनाचे प्रतिबिंब आढळते.
पेरियपुराणम् वेगवेगळ्या वृत्तांत रचलेले असून त्याची शैली ओघवती व प्रासादिक आहे. उत्कट भक्तिभावना, उदार मानवतावादी दृष्टिकोण, व्यापक सहानुभूती, जीवनाबद्दलचे प्रेम व कृतज्ञता, उच्च आध्यात्मिक आदर्श इ. वैशिष्ट्यांमुळे पेरियपुराणम् हे तमिळ साहित्यात कंब रामायणाखालोखाल श्रेष्ठ दर्जाचे महाकाव्य मानले जाते. नंतरच्या तमिळ काव्यांवर व साहित्यावर पेरियपुराणम् चा फार मोठा प्रभाव पडला.
वरदराजन, मु. (इं.) पोरे, प्रतिभा (म.)