भारतीदासन : (२९ एप्रिल १८९१ – २१ एप्रिल १९६४). सुब्रह्मण्य भारतींच्या प्रभावळीतील एक अग्रगण्य तमिळ कवी. जन्म पाँडिचेरी येथे. त्यांचे वडिल कनकसभाई मुदलियार हे व्यापारी होते. भारतीदासन यांचे आरंभीचे शिक्षण पाँडिचेरी येथे झाले आणि नंतर त्यांनी पाँडिचेरी येथेच शिक्षकीपेशा पतकरला. त्यांचे मूळ नाव कनकसुब्बरत्नम् असे होते परंतु ⇨ सुब्रह्मण्य भारतींविषयींच्या पूज्यभावातून व प्रभावातून त्यांनी आपल्या लेखनासाठी ‘भारतीदासन’ हे टोपणनाव घेतले व तेच पुढे रूढही झाले. लहानपणीच ते कविता रचू लागले तसेच ते भारतींच्या सहवासतही आले आणि त्यांच्या काव्यलेखनास भारतींकडून मान्यता व प्रोत्साहनही मिळाले.

भारतीदासन हे बहुप्रसव कवी व लेखक होते. त्यांनी तमिळमध्ये काव्य (भावगीते, कथाकाव्ये व पद्यनाट्ये), नाटक, कादंबरी, पटकथा इ. प्रकारांत लेखन केले असले, तरी प्रामुख्याने ते कवी म्हणूनच प्रख्यात आहेत. भारतींच्या काव्याचा व व्यक्तिमत्वाचा खोल ठसा त्यांच्यावर उमटला. भारतींच्या क्रांतिकारी कार्याच्या प्रभावातून भारतीदासन यांनी अनेक स्वातंत्र्यसेनानींना पाँडिचेरीतील आपल्या घराचे द्वार मुक्त ठेवले व त्यांना उदार आश्रयही दिला. त्यांच्या पत्नीचेही त्यांना याबाबत उत्तम सहकार्य लाभले. 

तमिळ चित्रपटांसाठीही त्यांनी काही पटकथा लिहिल्या. उत्तरायुष्याच्या अखेरीस त्यांनी आपले निष्ठास्थान असलेल्या भारतींच्या जीवनावर चित्रपट काढण्याची योजना आखली तसेच स्वतःच्या पांडियन परिचु वरही एक चित्रपट काढण्याची योजना आखली होती तथापि मद्रास येथे त्यांना ह्रदयविकाराचा झटका येऊन आखली होती तथापि मद्रास येथे त्यांना ह्रदयविकाराचा झटका येऊन त्यातच त्यांचे आकस्मिक निधन झाले व ह्या दोन्ही चित्रपटांच्या योजना अपुऱ्या राहिल्या. १९६९ मध्ये त्यांना साहित्य अकादेमीने मरणोत्तर अकादेमी पुरस्कार प्रदान केला. त्यांचे एकुलते एक पुत्र के. मन्नार मन्नन् हेही लेखक असून पाँडिचेरी आकाशवाणी केंद्रावर आहेत.

हिंदुधर्मप्रणीत जातिव्यवस्थेविरुद्ध – विशेषतः ब्राह्मण जात विरुद्ध – व अंधश्रद्धांविरुद्ध त्यांनी जळजळीत शब्दांत काव्यलेखन केले. भारतींना ते आपल्या गुरुस्थानी मानत, याचे एक कारण जातिव्यवस्थेला व ब्राह्मणांच्या वर्तनाला भारतींचा कडवा विरोध होता. भारती हे जातीने ब्राह्मण होते, तरीही त्यांना ब्राह्मणांचे वर्तन पसंत नव्हते. त्यांनी आपल्या रचनेद्वारा जातिव्यवस्थेवर व ब्राह्मणांच्या वर्तनावर कठोर प्रहार तर केलेच, पण ब्राह्मण्याचे प्रतीक असलेले आपले यज्ञोपवीतही फेकून दिले. भारतीदासन यांचे भारती हे म्हणूनच निष्ठास्थान बनले. भारतीदासन यांचे बहुतांश जीवन पाँडिचेरीत अस्पृश्यांच्या सहवासात व्यतीत झाले. त्यांना जातिव्यवस्थेचा बराच जाच सोसावा लागला म्हणून ते तिचे कडवे विरोधक बनले आणि त्यांनी आपल्या उपरोधिक लेखनातून तिच्यावर कठोर प्रहार केले. दलित, कामगार व शेतकरी यांच्या व्यथावेदनांना त्यांनी आपल्या प्रभावी काव्याद्वारे वाचा फोडली. ते क्रांतिकारी कवी मानले जातात. अभिव्यक्तीतील जोम, निर्भयता, कल्पकता व मौलिकता हे त्यांच्या रचनेचे विशेष होत. अनेकदा भावविश्वातही त्यांच्या काव्यात आढळते. जळजळीत विखारयुक्त व भावविवश अशा दोन्ही टोकांची कविता त्यांनी लिहिली. भारतीदासन यांच्या लेखनात जो कवीच्या द्रष्टेपणाचा अभाव जाणवतो, त्याला त्यांच्या वृत्तीत असलेला जातिविद्वेष कारण असावा, असे दिसते. 

त्यांच्या काव्यकृतींत संजिवी पर्वतीन सारल हे दीर्घ कथाकाव्य विशेष प्रसिद्ध व महत्वाचे मानले जाते. तत्कालीन भारताच्या राजकीय, वाङ्‌मयीन व सामाजिक स्थितीवरील भारतीदासन यांच्या निष्कर्षांचे उत्कृष्ट कलात्मक दर्शन त्यात घडते. भारतींच्या कुयिल पाट्टु ह्या काव्यातून प्रेरणा घेऊन भारतीदासन यांनी हे कथाकाव्य लिहिले. या काव्यात कुप्पन व वंजी या दूरस्थ प्रदेशातून आलेल्या व डोंगराळ प्रदेशात येऊन राहिलेल्या प्रेमिकांची कथा वर्णिली आहे. संजिवी पर्वतावरील एक अद्भुत वनस्पती हे दोन प्रेमिक खातात आणि त्यामुळे त्यांना आपल्या मानवबांधवांचे मन व विचारतरंग जाणून घेण्याची दिव्यदृष्टी प्राप्त होते, अशी पार्श्वभूमी त्यास आहे. इतरेजन काय बोलतात, काय विचार करतात हे त्यांना स्पष्टपणे कळू शकते. इंग्रज राज्यकर्ते, भारतीय देशभक्त, समाजाचे शोषणकर्ते, प्रतिष्ठित समाजकंटक इत्यादींच्या विचारांचे मार्मिक चित्रण त्यात अत्यंत जळजळीत शब्दांत व मोठ्या कलात्मक ताकदीने कवीने केले आहे. त्यांच्या यातील काव्यशैलीत एक प्रकारचे रांगडे सौंदर्य आहे. त्यांचा निरीश्वरवादी दृष्टिकोनही या सबंध काव्यात प्रकर्षाने व्यक्त होतो. 

त्यांच्या भावगर्भ शैलीचा प्रकर्ष त्यांच्या विल्हनीयम् आणि वीर-त-तै ह्या काव्यांत दिसून येतो. एक प्रभावी भावकवी म्हणूनच तमिळ साहित्यात त्यांनी ठळक प्रतिमा असून ती सदैव स्मरणात राहील. ‘मानतोप्पिल मनम्’ व ‘इंगल ऊर’ यांसारख्या त्यांच्या कवितांत मानवातील चांगुलपण आणि निसर्गप्रतिमा यांचा सुंदर समन्वय साधला गेला आहे. त्यांच्या महत्वाच्या साहित्यकृती पुढीलप्रमाणे : काव्य : भारतीदासन कवितागळ (२ खंड, १९३८, १९५२), इचैयमुत्तु (१९४३), कुटुंब विळक्कु (५ खंड, १९४३ – ५३), अळगिन चिरिप्पु (१९४४, निसर्गकविता), इरुंट विटु (१९४४), कातल निनैवुकळ (१९४४), तमिळ इयक्कम् (१९४५), भारतीदासन आत्तिचूडि (१९४७), मुल्लैक्काटु (१९४८), द्राविडर पुरट्चि तिरुमणत्तिट्टम् (१९४९), पांडियन परिचु (१९५१) इत्यादी.

नाट्य : एतिर पारात मुत्तम् (१९३८, पद्यनाट्य), इरणियन (१९३९), कर्कटु (१९४४), नल्ल तिरप्पु (१९४४), अमैति (१९४६), तमिळच्चियिन कत्ति (१९४९, पद्यनाट्य), भारतीदासन नाटकंगळ (१९५९) इत्यादी.

वरदराजन, मु. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)