तिरुत्तक्कदेवर : (सु. नववे शतक). एक तमिळ जैन महाकवी. प्रसिद्ध तमिळ महाकाव्य जीवक–चिंतामणीचा कर्ता. त्याच्या जीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. आपल्या रचनेत त्याने म्हैसूरचा गंग राजा सत्यवाक्यन् याचा उल्लेख केला आहे. त्यावरून जीवक–चिंतामणीचा रचनाकाळ दहाव्या शतकाची सुरुवात हा असावा, असे काही विद्वान मानतात, तथापि याबाबत मतभेद असून काहींच्या मते सातव्या शतकात तर काहींच्या मते नवव्या शतकाच्या उत्तरार्धात ते लिहिले गेले असावे. तमिळमधील प्रसिद्ध पंचमहाकाव्यांत जीवक–चिंतामणीचा अंतर्भाव केला जातो.

जीवक या जैन सम्राटाची कथा जीवक–चिंतामणीमध्ये वर्णिली आहे. एमांगदनाडूचा राजा सच्छंदन् याचा मंत्री कट्टियंकारन् हा कपटाने राजाचा (सच्छंदन्‌चा) वध करतो. आपल्या विरुद्धच्या कारस्थानाची वार्ता राजाला आधीच कळते त्यामुळे तो राणीची विमानातून इतरत्र सुखरूप रवानगी करतो. राणीचे विमान एका स्मशानात उतरते. तेथेच राजपुत्र जीवकाचा जन्म होतो. पुढे कंदुक्कडन् नावाच्या एका श्रीमंत वाण्याकडे त्याचे संगोपन होते. सर्वविद्यापारंगत, पराक्रमी असा जीवक अनेक विजय मिळवतो व पुढे कट्टियंकारन् याचा पराभव करून राज्यही परत मिळवतो. अनेक वर्षे आदर्श राज्यकारभार केल्यावर तो सर्वसंगपरित्याग करून एका जैन आचार्याचे शिष्यत्व पतकरतो. कठीण अशा तपश्चर्येनंतर त्याला मुक्ती प्राप्त होते. जीवक–चिंतामणीचे हे मध्यवर्ती कथानक आहे. तथापि जीवकाच्या आठ विवाहाच्या उपकथाही त्यात आलेल्या असून त्याही अत्यंत वेधक आहेत व मुख्य कथानकाशी त्यांची सांगड अतिशय कलात्मक रीतीने घातलेली आहे. या विवाहकथांवरून जैन लोक जीवक–चिंतामणीला ‘विवाह–ग्रंथ’ (मण–नूल्) असेही संबोधतात. जैन विवाहप्रसंगी त्याचे पठनही होते. जैनांची जीवनपद्धती, चालीरीती, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचे चित्रण या महाकाव्यात आले असून ‘चित्त’, ‘अरूग’, ‘साधू’ व धर्म’ या जैन धर्मातील चारही चरणांचे  विस्तृत विवरण त्यात आहे. तमिळनाडूतील जैनांच्या पवित्र ग्रंथांत जीवक–चिंतामणीचा समावेश असून तमिळमधील प्रसिद्ध जैन महाकाव्यत्रयीतही त्याचा अंतर्भाव केला जातो.

जीवक–चिंतामणि हे क्षात्र चूडामणीवर आधारलेले असल्याचे मानले जाते. जीवन्धर नाटक  आणि जीवन्धर चंपू  यांमध्येही जीवकाच्या कथेचा उल्लेख आला आहे. जीवक–चिंतामणीची पद्यसंख्या सु. ३,१४५ असून त्यांतील सु. २,७०० पद्येच तिरुत्तक्कदेवरची असावीत, असे मानले जाते. ते तेरा भागांत (कलंबगम्) विभागलेले असून ‘नामगळ्’, ‘गोविंदैयार्’, ‘मणमगळ्’, ‘पूमगळ्’ व ‘मुक्ती’ ही काही प्रमुख कलंबगम्‌ची नावे होत. अखेरचे ‘मुक्ती कलंबगम्’ हे श्रेष्ठ असून जैन तत्त्वज्ञानाचा गाभा त्यात आलेला आहे. लौकिक सुखदुःखे ही क्षणभंगुर असून मानवाचे परमसाध्य अंतिम मुक्ती मिळविणे हेच आहे, अशा स्वरूपाचे प्रतिपादन त्यात आढळते. विरक्तिपर उपदेश करतानाही कवीचा दृष्टीकोन जीवनपराङ्‌मुख नाही. त्यामुळे जीवक–चिंतामणीतील सर्वच व्यक्तिरेखांना, प्रसंगांना कवीच्या सहृदय व्यक्तिमत्त्वाचा सुवर्णस्पर्श लाभला आहे. कथाप्रसंगानुसार वा भावानुसार त्यात विविध वृत्तांचा उपयोग कवीने कौशल्याने केला आहे. ‘विरुत्तम्’ म्हणजे छंदोमय रचना तमिळमध्ये प्रथम आणण्याचे श्रेयही तिरुत्तक्कदेवरला दिले जाते. नंतरच्या अनेक कवींनी या छंदांचा आपल्या काव्यासाठी उपयोग करून ते लोकप्रिय केले. तिरुत्तक्कदेवरच्या भाषाशैलीचे तसेच निवेदनद्धतीचेही अनेक कवींनी अनुकरण केले. पदलालित्य, अर्थसघनता, भावमधुरता, गेयता इत्यादींमुळे जीवक–चिंतामणी अत्यंत वेधक झाले असून नंतरच्या कवींवर त्याचा फार मोठा प्रभाव पडला. महाकवी कंबनवरही त्याचा प्रभाव दिसतो. महाकाव्याची वा पुराणाची सुरुवात जीवक–चिंतामणीत तिरुत्तक्कदेवरने आरंभीच लिहिलेल्या आदर्श राज्याच्या वा नगरीच्या वर्णनाने किंवा रसिक श्रोत्याला वा वाचकाला उद्देशून तिरुत्तक्कदेवरने लिहिलेल्या गीताने करण्याची प्रथा पुढील तमिळ काव्यांत पडली. डॉ. पोप यांनी ‘एकाच वेळी एलियडओडिसी’ या शब्दांत जीवक–चिंतामणीचा गौरवाने उल्लेख केला आहे.

याखेरीज नरिविरुत्तम् नावाची सु. ५० पद्यसंख्या असलेली रचनाही तिरुत्तक्कदेवरने केली आहे.

वरदराजन्, मु. (इं.) पोरे, प्रतिभा (म.)