कुरवंजि : ‘कुरवंजि’ ही एक तमिळ लोककथा असून तिचा आकृतिबंध (मोटिफ) तमिळ साहित्यात विशेष लोकप्रिय ठरला. विशेषतः ‘कलंबगम्‌’ या नावाच्या शतपद्यरचनेत कुरवंजीचा विषय प्रामुख्याने आढळतो. कुरवंजीच्या लोककथेत एक गिरिवासी तरुणी किंवा एखादी जिप्सी युवती सरदार घराण्यातील किंवा खानदानी  कुटुंबातील एखाद्या कुमारिकेचे भविष्य वर्तविते. ही कुमारिका बहुधा एखाद्या तरुणाच्या प्रेमात पडलेली असते किंवा एखाद्या देवतेच्या भक्तीने वेडी झालेली असते. या मूळ कथेची अनके रूपांतरे होत गेली. तिला पुढे संगीतिकेसारखे स्वरूप प्राप्त झाले व नाट्यस्वरूपात मूळची गिरिजन युवती व तिचा पती यांचा दीर्घकालीन विरह व अखेरचे मीलन असा कथाभाग पुनरावृत्त होत राहिला.

ह्या प्रकारातील अत्यंत लोकप्रिय नाट्यकुरवंजी म्हणजे तिरिकूटराशप्प कविरायर (अठरावे शतक) याची कुट्रॉल-कुरवंजि (१९१२) ही होय. तिच्यातील नायिका तिरुनेलवेली जवळील कुट्रालम्‌ क्षेत्री असलेल्या देवतेच्या प्रेमासाठी विरहव्याकुळ झालेली दाखविली आहे. दुसरी पण आशयदृष्ट्या वेगळी अशी कुरवंजी तंजावर येथे राज्य करणाऱ्या सरफोजी भोसले (१७९८–१८३३) ह्या मराठा राजाच्या प्रशंसापर असून, तिचे नाव शरभेंद्रभूपाल–कुरवंजि (१९३२) आहे. काही मुसलमान आणि ख्रिस्ती तमिळ कवींनीही ह्या लोकवाङ्‌मयीन आकृतिबंधाचा वापर करून आपल्या कुरवंजी लिहिल्या आहेत.

वरदराजन्‌, मु. (इं.) जाधव, रा. ग. (म.)