शिवप्पिरगाशर : (सतरावे शतक). तमिळ कवी. कांचीपूरम येथील कुमारस्वामी देशीकर हे त्याचे वडील. पित्याच्या मृत्यूनंतर शिवप्पिरगाशर याने तिरुवन्नमलई (जि. उत्तर अर्काट) येथे स्थलांतर केले. तेथील पार्श्वभूमीवर त्याने सोन सैलमलै हे पहिले काव्य रचले. पुढे वेंगनूर (तिरुवेंगई, जि. तिरुचिरापल्ली) येथे काही काळ वास्तव्य. तिरुवेंगैक्कोवई व तिरुवेंगैक्कलंबगम् या त्याच्या काव्यांत तेथील स्थानिक देवतेचे स्तुतिवर्णन आढळते. बोम्मैय्याळमच्या शिवनन्नाळिय स्वामिगळ यांनी शिवप्पिरगाशरला संन्यासधर्माची दीक्षा दिली. त्यांच्या स्तुतिपर शिवप्पिरगाशरने पाच छोटी कवने रचली. संन्यास घेतल्यानंतर त्याने अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. उत्तर अर्काट जिल्ह्यातील कुवम् ह्या पवित्र स्थळाची महती गाणारे कुवत्तल पुराणम् हे स्थलपुराण त्याने रचले. कलत्तिपुराणम् हे त्याचे दुसरे स्थलपुराण (आंध्र प्रदेशातील कालहस्तीच्या वैभवावर) मात्र अपुरे राहिले. ते पुढे त्याच्या दोन कनिष्ठ बंधूंनी पूर्ण केले.

शिवप्पिरगाशरने एकूण तेवीस ग्रंथ रचले. त्यांतील काही वाङ्मयीन तर काही धार्मिक स्वरूपाचे आहेत. त्यांतील प्रभुलिंगलीलै हा महत्त्वाचा साहित्यग्रंथ होय. नालवर नान्मणि-मालै या लोकप्रिय ग्रंथात चार शैव अध्वर्यूंची प्रशंसा आहे. नन्नेरी हा त्याचा ग्रंथ नीतिपर असून तो अभिजात शैली व सुंदर उपमा यांसाठी विशेष प्रसिध्द आहे. त्याने सु. नऊ महाकाव्यसदृश्य काव्यरचना (प्रबंधम्) रचल्या. शिवप्पिरगाशरच्या काव्यामधील अनुपमेय प्रतिमासृष्टीमुळे त्याला ‘कर्पनायक कलंचियम्’ (प्रतिमांचा कुबेर) असा मानाचा किताब देण्यात आला. तर्कपरिभाषा या संस्कृत ग्रंथाचा तसेच प्रभुलिंगलीलै व सिध्दांतशिखमणि या कन्नड ग्रंथांचा तमिळ अनुवादही त्याने केला. तुरैमंगलम् येथील दीर्घकालीन वास्तव्यामुळे ‘तुरैमंगलम् शिवप्पिरगाश स्वामिगळ’ या नावानेही तो ओळखला जातो.

वरदराजन्, मु. (इं.) इनामदार, श्री. दे. (म.)