कुमरगुरुपरर : (सोळावे शतक). प्रसिद्ध तमिळ शैव संतकवी. तो धर्मपुरम्‌ येथील शैव मठाचा अधिपती होता. त्याने एकूण सोळा ग्रंथ लिहिले असून त्यांतील एकाचा अपवाद सोडता बाकीचे सर्व शैवमताशी संबंधित आहेत. अपवादभूत ग्रंथाचे नाव नीतिनॅरिथिळक्कम्‌  असून तो नीतिपर आहे. कुमरगुरुपरर याने काशी येथेही एक शैव मठ स्थापन केला होता. तो आजही विद्यमान आहे. त्याने काशीवर काशीकलंबगम्‌  नावाचे कलंबगम्‌ (शंभर पद्ये असलेला तमिळ काव्यप्रकार) काव्य रचले आहे. मदुरेवरही त्याने एक कलंबगम्‌ रचले आहे. विविध वृत्तांत आणि विविध विषयांवर त्याने ‘अंदादि’ (अंतादि) स्वरूपाची कलंबगम्‌ काव्ये रचली आहेत. अंदादिरचनेत एका पद्याच्या अथवा कडव्याच्या अंत्याक्षराने पुढील पद्याचा वा कडव्याचा आरंभ होतो. त्याच्या ह्या काव्यांत भटके लोक, जादूगार, भिकारी, कोळी, धनगर स्त्री इत्यादींचे वर्णन आढळते. त्या अनुषंगाने काशीच्या अथवा मदुरेच्या देवतेचा उल्लेख हमखासपणे होतोच.

‘पिळ्ळै–तमिळ’ हा काव्य प्रकारही शंभर पद्यांचाच असतो तथापि त्यात उपास्य दैवताच्या अथवा आश्रयदात्याच्या बालपणाचे काल्पनिक चित्रण असते. त्याच्या बालपणातील विविध अवस्थांचे चित्रण त्यात करण्यात येते. ह्या प्रकारातील दोन ग्रंथ कुमरगुरुपररने रचिले असून, एक मदुरेच्या मीनाक्षीवर आणि दुसरा मुत्तुकुमारस्वामी म्हणजे सुब्रह्मण्य अथवा कार्तिकेयावर आहे. ह्या दोन्हीही रचना त्यांतील काव्यगुणांमुळे आणि भक्तीच्या उत्कटतेमुळे अत्यंत लोकप्रिय आहेत.

वरदराजन्‌, मु. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)