कंब रामायण : तमिळ भाषेतील ह्या सर्वश्रेष्ठ महाकाव्यात सु. दहा हजार पद्ये असून त्याचा कर्ता महाकवी कंबन (सु. १२ वे शतक) हा होय. वाल्मीकीच्या ⇨ रामायणावर हे महाकाव्य आधारलेले असले, तरी त्याला प्रतिभाशाली कंबनच्या कलात्मक व कल्पक संस्कारांनी स्वतंत्र रचनेचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यावर प्राचीन तमिळ साहित्यातील पुढील तीन प्रवाहांचा प्रभाव दिसून येतो : (१) संघम्-साहित्याच्या परंपरेचा प्रभाव, (२) ⇨ तिरुवळ्ळुवर परंपरेतील नीतिविचार व तत्त्वज्ञान आणि (३) ⇨ आळवारांच्या भक्तिकाव्याचा प्रवाह. ह्या तीन प्रवाहांबरोबरच पूर्वीच्या ⇨ शिलप्पधिकारम् आणि जीवक-चिंतामणी यांसारख्या जैन महाकाव्यांचाही त्यावर प्रभाव आढळतो. यामुळेच ते वाल्मीकीच्या रामायणाचा केवळ अनुवाद वा रूपांतर राहिलेले नाही. मुख्य कथानक, काही कथाप्रसंग इत्यादींची कांड, अध्याय यांसारखी मूळ मांडणी कंबनने कायम ठेवली आहे तथापि कंबनच्या प्रतिभेचा स्वतंत्रपणा, त्यातील व्यक्तिचित्रण, भिन्न आदर्शांतील परस्परसंघर्ष, प्रेमाचा प्रेमाशीच संभवणारा झगडा इत्यादींच्या चित्रणात दिसतो. वनवासास निघालेला राम कौसल्येचा निरोप घ्यावयास जातो. त्या प्रसंगाचे वर्णन कंबन असे करतो : ‘मेघमंडित पर्वतासारखा राम राजमुकुटमंडित होऊन आता येईल, आता आलाच, अशा उत्कंठेने व प्रमुदित अंत:करणाने ज्यावेळी कौसल्या रामाची वाट पहात होती, त्यावेळी तो (राम) विना चामरे, विना शुभ्रधवल राजछत्रे, पुढे नियती चालली आहे आणि शोकग्रस्त धर्म मागे रेंगाळत आहे, अशा अवस्थेत एकटाच येऊन ठेपला’.

रणांगणावर रामाकडून पराभूत झालेला रावण त्या दिवशी घरी परतत असतानाचे चित्र कंबन पुढीलप्रमाणे रेखाटतो : ‘दिग्गजांशी टक्कर देणारी छाती, पर्वत पेलून धरणारे खांदे, नारदाप्रमाणे मधुर गायन करणारी वाणी, पुष्पमालांनी सुशोभित केलेले दहा मुकुट आणि शिवाकडून मिळालेली तलवार हे सर्व आणि त्याबरोबरच आपला पराक्रमही रणांगणावर सोडून रावण रिक्तहस्ताने आपल्या नगरात परत आला’.

कंबनने चित्रित केलेला राम हा देवकोटीतील नसून मानवी गुणावगुणांनी युक्त आहे. गुह, सुग्रीव व बिभीषण हे रामाचे केवळ अनुयायी किंवा मित्रच नाहीत, तर ते त्याचे तीन बंधूच होत. राम म्हणतो, की एका अर्थी वनवास ही इष्टापत्तीच होय कारण त्यामुळे मला आणखी तीन बंधू मिळाले. अधर्माशी लढताना रामाचे हृदय कळवळते व वाचकांना त्याच्याविषयी सहानुभूती वाटू लागते. कुंभकर्णाच्या व्यक्तिमत्त्वातील उदात्त गुणांची ओळख असल्यामुळे, त्याला रणांगणावर पहाताच रामाचे हृदय द्रवते व तो त्याला सामोपचाराच्या गोष्टी सांगतो पण त्यांचा उपयोग होत नाही. शेवटी कुंभकर्णाच्या मरणयातना त्यास बघवत नाहीत व त्याचा हात कापतो.

कंब रामायणातील सर्वच व्यक्तिरेखा उत्तुंग आहेत. खलनायक रावणही भव्योदात्त व थोर वाटतो. ह्या सर्वच व्यक्तिरेखा प्रेम करतात, झगडतात, दु:खे सहन करतात. वाचकांचे मन आकृष्ट करण्याचे सामर्थ्य कंब रामायणात दिसते. राम-सीतेच्या कथेवर कंबनापूर्वी तीनचार रचना तमिळमध्ये झालेल्या आहेत तथापि कंबनच्या ह्या महान कृतीपुढे त्या फिक्या पडल्या व विस्मृत झाल्या. थोर देशभक्त व विद्वान व्ही. व्ही. एस्. अय्यर म्हणतात, की कंबनच्या रामायणाची तुलना जगातील इलिअड, ईनिड, पॅरडाइस लॉस्ट, महाभारत यांसारख्या अभिजात महाकाव्यांशीच नव्हे, तर मूळ वाल्मीकी रामायणाशीही करता येईल.

तमिळमध्ये कंब रामायणाचे स्थान व लोकप्रियता अनन्यसाधारण आहे. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी त्याचा पद्यमय इंग्रजी अनुवाद (लंडन, १९६१) केलेला असून, हिंदी अनुवाद न. वी. राजगोपालन् यांनी दोन खंडात (पाटणा, १९६३, १९६४ ) केलेला आहे.

संदर्भ : Iyyar, V. V. S. Kamba Ramayanam, Bombay, 1970.

वरदराजन्, मु. (इं.) शिरोडकर, द. स. (म.)