नम्माळवार: (नववे शतक). तामिळनाडूत ⇨ आळवार नावाने प्रसिद्ध असलेल्या बारा वैष्णव संतांत नम्माळवाराचे स्थान सर्वोच्च मानले जाते. ‘शठकोप दिव्यसूरि’ ह्या नावानेही तो ओळखला जातो. तमिळनाडूत तिरुनेलवेली जिल्ह्यातील तिरुकुरुहर (सध्याचे तिरुनगरी) गावी एका वेळ्ळाळ कुटुंबात त्याचा जन्म झाला. माता-पिता उदयनंगै-करिमारन. त्याच्या जन्माबाबत व जीवनाबाबत अनेक आख्यायिका रूढ आहेत. केवळ ३५ वर्षांचेच आयुष्य त्याला लाभल्याचे सांगतात.

नम्माळवार एक महान वैष्णव संत व कवी होता. त्याने उत्कट भक्तीने रचिलेली १,१०२ तमिळ स्तोत्रे वा पद्ये आज उपलब्ध आहेत. नाथमुनीने नवव्या शतकाच्या अखेरीस संकलित केलेली सर्व आळवारांची पद्ये नालायिरम् वा नालायिरदिव्यप्रबंधम् (चार हजार दिव्य पद्ये) नावाने संगृहीत आहेत. यातील ‘तिरुवायमोळि’ नावाच्या चौथ्या भागात नम्माळवाराची १,१०२ पद्ये आहेत. नालायिरम् हा तमिळ वैष्णवांचा पवित्र व पूज्य ग्रंथ असला, तरी त्यातील ‘तिरुवायमोळि’ हा भाग ते विशेष पूज्य मानतात. तात्त्विक विचारांची खोली व झेप तसेच गूढ धार्मिक अनुभूती या दृष्टीने ही पद्ये वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तमिळनाडूत तिरुवायमोळीला ‘सामवेदसार’ वा ‘द्राविडवेद’ म्हटले जाते. तेथील वैष्णव मंदिरांतून नालायिरम्‌मधील पद्ये मोठ्या भक्तिभावे पारंपरिक पद्धतीने म्हटली जातात. रामानुजाचार्य आणि त्यांच्या अनुयायांनाही नम्माळवाराविषयी व तिरुवायमोळीविषयी नितान्त आदर होता. तमिळमध्ये ‘तिरुवायमोळी’ वर अनेक भाष्ये लिहिली गेली व कन्नड, तेलुगू व संस्कृत या भाषांत त्याचे अनुवादही झाले. नम्माळवारावरही अनेक प्रशस्तिग्रंथ तमिळमध्ये लिहिले गेले. थोर वैष्णव संत व प्रतिभासंपन्न कवी म्हणून नम्माळवाराचे स्थान विशेष महत्त्वाचे मानले जाते.

वरदराजन्, मु. (इं) सुर्वे, भा. ग. (म.)