स्वामिनाथन् अय्यर

स्वामिनाथन् अय्यर : (१९ फेब्रुवारी १८५५—२८ एप्रिल १९४२). अभिजात तमिळ साहित्यिक व संशोधक. पूर्ण नाव उत्तमधनपुरम् वेंकटसुब्रमण्यन् स्वामिनाथन् अय्यर. त्यांचा जन्म कुंभकोण्मजवळच्या सुरायमुलई या खेड्यात झाला. ते अय्यरांच्या अष्टसहस्रम् या उपसंप्रदायातील होते. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण थोर कवी व लेखक मीनाक्षीसुंदरम् पिळ्ळै यांच्याकडे झाले. याशिवाय थिरूववादुथुरई येथील शैव मठातही त्यांचे शिक्षण झाले. कुंभकोणमच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. तिथे त्यागराज चेट्टियार हे तमिळ भाषा विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तमिळ भाषाविषयात पदवी संपादन केली (१८७६). पुढे त्यांची त्याच महाविद्यालयात तमिळ भाषा विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली (१८८०). तेथून ते १९१९ मध्ये निवृत्त झाले. पुढे त्यांची चिदंबरम् येथील मीनाक्षी तमिळ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली (१९२४) तथापि प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि ते मद्रास ( चेन्नई ) येथे स्थायिक झाले (१९२९). सालम रामस्वामी मुदलियार या मुन्सफांनी त्यांना मध्ययुगीन काळातील जीवक चिंतामणी या ग्रंथाचे हस्तलिखित प्रकाशनासाठी दिले. ही जैन अभिजात साहित्यकृती स्वामिनाथन् यांनी प्रस्तावनेसह प्रकाशित केली (१८८७). त्यानंतर ते प्राचीन संघम् साहित्या च्या संशोधनात व्यस्त झाले. अनेक वाङ्मयप्रेमी लोकांनी आपल्याकडील ताडपत्रावर लिहिलेली हस्तलिखिते त्यांच्या स्वाधीन केली. त्यामुळे पुरनानुरू (१८९४), शिलप्पधिकरम् आणि मणिमेखलै यांसारखे प्राचीन ग्रंथ उजेडात आले. तमिळमधील अनेक अभिजात ग्रंथ संशोधून व त्यांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना जोडून स्वामिनाथन् यांनी ते प्रसिद्ध केले. त्यांच्या प्रस्तावना तमिळमधील प्रमाणभूत गद्याचा आदर्श मानल्या जातात. त्यांपैकी पुरनानुरू या ग्रंथात संघम् काळातील लोकजीवनाची माहिती असल्यामुळे त्यावर स्वामिनाथन् यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. आपल्या सुमारे पाच दशकांच्या कार्यकाळात त्यांनी सु. शंभर पुस्तके लिहिली. त्यांत काही भावगीते, भक्तिगीते, गोपगीते व पुराणकथा इत्यादींचा अंतर्भाव आहे. अभिजात तमिळ वाङ्मयातील सु. ३,०६७ हस्तलिखिते त्यांनी संगृहीत केली होती. त्यांमध्ये काही ताडपत्रे होती. त्यांपैकी तिसर्‍या संघम् काळातील पत्तुप्पाट्ट ( दहा लघुकाव्ये ), एट्टतोगै ( नत्रिनाई : आठ संग्रह ), पदिनेन्कीलकणूक्कू ( अठरा नीतिपर कविता ) हे त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. स्वामिनाथन् यांच्या ग्रंथांनी प्राचीन तमिळ संगीतावर प्रकाश टाकला आणि त्यातील संशोधनाला दिशा दर्शविली. 

नन्दन सरिथिरमकर्ता व प्रसिद्ध संगीतज्ज्ञ गोपाळकृष्ण भारती यांच्याकडे त्यांनी तमिळ संगीताचा अभ्यास केला. एन् सरिथिरम (१९४२) या शीर्षकाने त्यांनी आत्मचरित्र तसेच आपले गुरू मीनाक्षीसुंदरम् पिळ्ळै यांचे चरित्र लिहिले. 

स्वामिनाथन् यांना त्यांच्या संशोधनात्मक कार्याबद्दल अनेक मानसन्मान लाभले. मद्रास विद्यापीठाने डी. लिट्. ही सन्माननीय पदवी बहाल केली (१९२५). त्यांच्या सर्वोत्तम साहित्यिक योगदानासाठी त्यांना महामहोपाध्याय ही उपाधी लाभली. याशिवाय दक्षिणाथ्य कलानिधी या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले (१९२५). त्यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट काढण्यात आले (२००६).

मद्रास ( चेन्नई ) येथे त्यांचे निधन झाले. 

पहा : तमिळ साहित्य; संघम् साहित्य.

देशपांडे, सु. र.