तिरु वि. कल्याणसुंदरम् मुदलियार : (१८८३–१९५३) प्रसिद्ध तमिळ साहित्यिक, पत्रकार, देशभक्त व कामगारनेते. ‘तिरु वि. क.’ या नावाने विशेष प्रसिद्ध. जन्म चिंगलपुट जिल्ह्यातील तुळ्ळम् येथे. शालेय शिक्षण मद्रास येथे. काही कारणाने मॅट्रिकची परीक्षा ते देऊ शकले नाहीत. ‘बालसुब्रह्मण्य भक्त जन सभा’, रॉयपेटा आणि शैव संघ, तिरुवल्लिकेणी येथे काही काळ काम केल्यानंतर त्यांनी आदी द्रविड विद्यालयात अध्यापन केले. तमिळवरील त्यांच्या विलक्षण प्रभुत्वामुळे पुढे वेस्ली महाविद्यालयात व्याख्याते म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली परंतु वर्षभरातच देशभक्तन् या तमिळ दैनिकाच्या संपादनासाठी ते पद त्यांनी सोडून दिले. पुढे १९२० मध्ये नवशक्ति या दुसऱ्या तमिळ दैनिकाचे संपादकत्वही त्यांनी स्वीकारले. एस्. श्रीनिवास अयंगार, लो. टिळक आणि डॉ. ॲनी बेझंट यांच्या सहवासामुळे त्यांनी भारताच्या राजकीय चळवळीत पदार्पण केले व स्वतःला देशसेवेस वाहून घेतले. होमरूल लीगसाठीही त्यांनी कार्य केले. महात्मा गांधीचे ते कट्टर अनुयायी होते व काँग्रेसचे सभासदही होते.असहकारितेच्या चळवळीसाठी त्यांनी चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पाठिंबा दिला. १९१९ च्या रौलट ऍक्टचा निषेध करण्यासाठी त्यांनी तमिळनाडूत संघटना उभारली. तमिळनाडू प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी १९२९ मध्ये त्यांची निवड झाली.

कामगारनेते म्हणून तमिळ जनतेत तिरु वि. क. यांना अत्यंत आदराचे स्थान आहे. बी. पी. वाडिया यांच्यासमवेत त्यांनी कामगार संघटना स्थापन केली (१९१८). भारतीय कामगार चळवळींच्या आद्य प्रणेत्यांमध्ये तिरु वि. क. यांचा समावश होतो. कामगारांच्या अनेक चळवळींत त्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला व नेतृत्वही केले. कामगारांच्या कल्याणासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. तिरु वि. क. हे अत्यंत प्रभावी वक्ते होते. उत्कट देशभक्ती, समाजहिताची कळकळ, प्रगाढ विद्वत्ता व स्वाभाविक अशी साधी, सरळ, ओघवती भाषाशैली यांमुळे त्यांची भाषणे अतिशय परिणामकारक होत. आपल्या लेखनाने तसेच भाषणांनी त्यांनी तमिळ भाषेस तिचे शुद्ध व नैसर्गिक स्वरूप प्राप्त करून दिले. त्याचप्रमाणे आधुनिक विचारांच्या अभिव्यक्तीस योग्य अशी प्रगल्भ व परिपूर्ण अशी भाषाशैलीही निर्माण केली. तमिळ भाषेसाठी त्यांनी केलेले कार्य इतके मोठे आहे, की ‘तमिळतदै’ (तमिळ भाषेचे जनक) म्हणून त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. नवशक्तीमधून प्रसिद्ध झालेले त्यांचे लेखन तमिळच्चोले अल्लदु कट्टुरैत्तिरट्‌टु (२ खंड, १९३५) या संग्रहात त्याचप्रमाणे त्यांची सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवरील विविध अध्यक्षीय भाषणे तमिळत्तेंरल् अल्लदु तलैमैप्पोळिवु (१९४७) यामध्ये संगृहीत आहेत. हे लेखसंग्रह अत्यंत लोकप्रिय असून अनेक तमिळ तरुणांना त्यांपासून प्रेरणाही लाभली. एक थोर देशभक्त व समाजसेवक म्हणून तिरु वि. क. यांना तमिळनाडूत अत्यंत आदराचे स्थान आहे. वृत्तीने ते धार्मिक होते व प्रसिद्ध तमिळ संत रामलिंग स्वामिगळ यांचे अनुयायी होते. त्यांचे संपूर्णजीवन ‘साधी राहणी व उच्च विचारसरणी’ चा आदर्श होते. त्यामुळे ‘तमिळ मुनी’ असाही त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो.

तिरु वि. क. हे एक सिद्धहस्त लेखक होते. वृत्तपत्रीय लेखनाशिवाय त्यांनी वैचारिक, धार्मिक तसेच वाङ्‌मयीन विषयांवर विपुल लेखन केले आहे. याशिवाय त्यांनी काव्यरचनाही केली आहे. त्यांची एकूण ग्रंथसंपदा सु. ५० असून त्यांतील तात्त्विक व धार्मिक स्वरूपाचे ग्रंथ २३ च्या वर आहेत. अनेक धर्मांचा व मतांचा त्यांनी साक्षेपाने अभ्यास केला होता. त्यांची विचारसरणी मतसंग्रहवादी व समन्वयवादी होती. कुठल्याही विशिष्ट धार्मिक विचारसरणीपेक्षा अखिल मानवजातीच्या धर्माला ते जास्त महत्त्व देतात. आपल्या काव्यामधूनही त्यांनी विष्णू वा येशू ख्रिस्त यांची स्तोत्रे सारख्याच उत्कटतेने गायिली आहेत. त्यांचे काही उल्लेखनीय ग्रंथ : मनिद वाळ्‌क्कैयुम् गांधियडिगळुम् (१९२१, म.शी. गांधीजींचे आदर्श), तमिळ नाडुम् नम्माळवारम् (१९२२, म. शी. नम्माळवारांचे वैष्णव तत्त्वज्ञान), तमिळ नूल्गळिल् बौद्धम् (१९२९, म. शी. तमिळ वाङ्‌मयातील बौद्ध तत्त्वज्ञान), समरस–दीपम् (१९३४, म. शी. सामाजिक पुनर्रचना), पोदुमै वीट्टल (१९४२, म. शी. सर्व धर्मांतील व्यापक तत्त्वे), किरिस्तुमो ळिक्कुरळ (१९४८, म. शी. येशू ख्रिस्त) इत्यादी.

त्यांच्या काव्यसंग्रहांपैकी उरिमै वेट्‌कै अल्लदु नाट्‌टुपाटल् (१९३१, म. शी. स्वातंत्र्यगीते), पोरुळुम् अरुळुम् अल्लदु मार्क्सीययुम् गांधीयमुम् (१९५१, म. शी. गांधी व मार्क्स यांच्या विचारांची तुलना), वळर्‌  च्चियुम् ‌वाळ्‌वुम् अल्लदु पडुक्कैप्पिदट्रल (१९५३) हे काही प्रमुख काव्यसंग्रह होत. याखेरीज शेक्किळार, तिरुवळ्ळुवर व कारैक्काल अम्मैयार यांच्या कृतींचे त्यांनी अभ्यासपूर्ण संपादन केले असून त्यांच्या कृतींच्या सटीक आवृत्याही प्रसिद्ध केल्या आहेत. त्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे : पेरियपुराणम् (१९३०), तिरुक्कुरळ (तिरुक्कुरळमधील पहिली २४ प्रकरणे, २ खंड, आवृ. २ री, १९३९, १९५१) आणि कारैक्काल अम्मैयार तिरुमुरै (१९४७).

त्यांचे तिरु वि. क. वाळ्‌क्कैक्कुरिप्पुक्कळ (१९४४) हे आत्मचरित्र तमिळ साहित्यातील एक श्रेष्ठ कृती मानले जाते. त्यांच्या सहजसुंदर, परिपक्व व प्रगल्भ शैलीचे दर्शन त्यांच्या या आत्मचरित्रात होते. १९४३ मध्ये त्यांची षष्ट्यब्दी तमिळनाडूमध्ये राज्यपातळीवर अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली. मद्रासमधील नागरिकांनी त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव देण्यात आलेले एक माध्यमिक विद्यालय स्थापन केले आहे.

वरदराजन्, मु. (इं.) पोरे, प्रतिभा (म.)