बेस्की, रेव्हरंड : (१६८०-१७४६). तमिळ भाषेत लेखन करून तमिळ साहित्य समृद्ध करणारे एक इटालियन जेझुइट मिशनरी व विद्वान त्यांचे संपूर्ण नांव कॉन्स्तान्त्सो जूझेप्पे एऊझेब्यो बेस्की. जन्म इटलीत कास्तिग्लीओन येथे. यूरोपातून जे ख्रिस्ती मिशनरी तमिळनाडूत आलेत व तेथील भाषा आत्मसात करून ज्यांनी मौलिक लेखन केले त्यांत रोबेर्तो डी नोबीली व रे. बेस्की यांचा निर्देश अवश्य करावा लागेल. येस्कींनी `वीरमामुनिवर’ हे तमिळ टोपननाव धारण करून आपली काव्यादी तमिळ साहित्य निर्मिती केली. तमिळनाडूतील तिन्नवेल्ली जिल्ह्यात कुलम्‌ येथे त्यांचे केंद्र व वास्तव्य होते. तमिळनाडूत आल्यावर वेस्कींनी संस्कृत व तमिळ भाषा आत्मसात केल्या. तमिळवर तर त्यांनी महाकाव्य रचण्याइतपत प्रभुत्व मिळवले.

तेंबावणि (१७२६, म.शी. मधुर पद्यांची माला वा ओंजळ) हे तमिळ महाकाव्य त्यांनी लिहिले असून त्यात बायबलच्या जुन्या व नव्या करारांशी संबद्ध अशा प्रसंगांचे सरळ, सुबोध व सरस चित्रण आहे. ३० सर्गांत विभागलेल्या ह्या महाकाव्यात विविध तमिळ छंदांत रचलेली एकूण ३,६१७ कडवी आहेत. शबदकळा, कल्पकता, छंदवैविध्य, चित्रसदृश वर्णने व काव्यगुण ह्या दृष्टीने हे महाकाव्य विशेष महत्वाचे मानले जाते.

चार भागांत रचलेला चतुरगरादि हा तयांचा शब्दकोश तमिळमधील आद्य शबदकोश मानला जातो. तमिळ व्याकरणावरही त्यांनी दोन महत्वपूर्ण ग्रंथ लिहिले असून त्यांतील एक लॅटिनमध्ये व दुसरा तमिळमध्ये आहे. तमिळ व्याकरणग्रंथाचे नाव सोन्नुल विळक्कम्‌ (सु. १७३०) असे असून तो पारंपारिक सूत्रपद्धतीने तो लिहिला आहे. वेदियर ओळुक्कम आणि अविवेक परिपूरण गुरूकथे हे त्यांचे दोन गद्य ग्रंथ आधुनिक तमिळ गद्याचे आरंभबिंदू मानले जातात. बेदियर ओळुक्कममध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्मप्रचारकासाठी आचारसंहिता सांगितली असून अविवेक परिपूण गुरूकथे ह्या लोकप्रिय ग्रंथात गुरूच्या अज्ञानाचे व दुष्कृत्यांचे उपरोधिक व विनोदी शैलीतील चित्रण आहे. उपरोधिक कथेच्या स्वरूपात लिहिलेल्या ह्या विनोदी ग्रंथाचा खरा रोख प्रोटेस्टंट पंथातील चार उपपंथांच्या विचारसरणीचर टर उडविण्याचा होता तथापि तमिळ वाचकांस ह्यामूळ प्रेरणेचे आकलन झाले नाही व त्यांनी एक सर्वसामान्य उपरोधिक. विनोद ग्रंथ म्हणूनच त्याचे उत्स्फूर्तपणे त्याचे स्वागत केले. साध्या-सुबोध व विनोदपूर्व शैलीत तो असल्याने आबालवृद्धवाचकांसही तो आस्वाद्य आहे.

बेस्कींनी तिरूक्कुरळ ह्या प्रख्यात अभिजात तमिळ काव्याचा लॅटिनमध्ये अनुवाद करून पाश्चात्य जगास त्याची ओळख करून दिली. त्यांचे इतर उल्लेखनीय गद्य ग्रंथ पुढीलप्रमाणे – ज्ञान उणर्त्तलुवेद विळक्कम्‌ हे ख्रिस्ती धर्मप्रचारार्थ लिहिलेले तमिळ ग्रंथ तिरूक्कोवळूर कळंबगम्‌अडेक्कल माले हे तमिळ गद्य ग्रंथGrammatica latino-timulica (१७२८?) व Grammatica latino-timulica (१७३८?) हे तमिळ व्याकरणावरील दोन लॅटिन ग्रंथ. पहिल्यात अभिजात मतिळचे वयाकरण आणि दुसऱ्यात अभिजातोत्तर कालखंडातील तमिळ भाषेचे व्याकरण आहे. शिवाय तमिळ-लॅटिन कोश, तमिळ-फ्रेंच कोश व पोर्तुगीज-लॅटिन-तमिळ कोशही त्यांनी रचले.

धार्मिक व साहित्यिक क्षेत्रांत त्यांना मानाचे स्थान होते व त्यांना अनेक अनुयायीही लाभले होते. तिन्नवेल्ली जिल्ह्यातील अंबलक्कड येथे ते निधन पावले. रॅम्पोल्ला मस्कारेहन्स यांनी त्यांचे वीरमामुनियर (१९५३) या शीर्षकाच तमिळमध्ये चरित्रही लिहिले आहे.

वरदराजत्त, मु. (इं.)सुर्वे, भा.ग. (म.)