नक्कीरर : तमिळ साहित्याच्या संघम् काळातील एक प्रसिद्ध कवी. इ. स. पू. ३००—इ. स. १०० ह्या दरम्यानच्या काळातील एट्‌टुत्तोगै (८ संकलने)  आणि पत्तुप्पाट्‌टु (१ संकलन) नावाने प्रसिद्ध असलेल्या नऊ काव्यसंकलनांत नक्कीररच्या दोन काव्यांचा अंतर्भाव आहे. नक्कीरर हा तिसऱ्या संघम्‌चा अध्यक्ष होता आणि तत्कालीन कवींत त्याला मानाचे स्थान होते, असे म्हणतात [→ संघम् साहित्य]. त्याच्या धीरोदात्ततेबाबत अनेक आख्यायिका रूढ आहेत. त्याच्या जीवनाबाबत व कालाबाबत निश्चित स्वरूपाची माहिती मिळत नाही.

वरील नऊ संकलनांतील त्याचे तिरुमुरुगर्रुप्पदै हे एक ३,१८० ओळींचे गोपगीत असून सुब्रह्मण्यदेवतेची (कार्तिकेयाची) कृपा संपादन करण्यासाठी प्रयत्‍नशील असलेल्या भक्तास अनुलक्षून केलेला उपदेश, असे त्याचे स्वरूप आहे. सुब्रह्मण्याच्या सहा प्रसिद्ध मंदिरांचेही त्यात वर्णन आले आहे. त्याचे नेटुनलवदै  हे दुसरे काव्यही गोपगीत प्रकारातीलच असून ते १८८ ओळींचे आहे. प्रस्तुत काव्यात नक्कीररच्या उत्तुंग कल्पनाशक्तीचा मनोज्ञ विलास पहावयास मिळतो. ह्या गोपगीताच्या शीर्षकाचा अर्थ ‘उत्तरेकडील कंटाळवाणा पण उपकारक वारा’ असा आहे. एक राजा मोहिमेवर दीर्घकाळ गुंतून पडतो. त्याच्या मीलनासाठी झुरणाऱ्या राणीच्या विरहव्याकुळ अवस्थेचे सुंदर वर्णन त्याने त्यात केले आहे.

नक्कीररने या दोन गोपगीतांव्यतिरिक्त अनेक भावगीते व नाट्यात्मक एकभाषितेही लिहिली आहेत. त्याची नाट्यात्मक एकभाषिते काल्पनिक नायक-नायिकांच्या प्रेमसंबंधांवर आधारलेली आहेत.

नक्कीरर नावाचाच एक भाष्यकारही आठव्या शतकात होऊन गेला. त्याने कळवियल नावाच्या एका व्याकरणग्रंथावर विस्तृत भाष्य लिहिले आहे. दहाव्या शतकात नक्कीर देवर नावाचा एक शैव संतही होऊन गेला.

वरदराजन्, मु. (इं.) सूर्वे, भा. ग. (म.)