ग्रोपिअस, वॉल्टर : (१८ मे १८८३–५ जुलै १९६९). विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ जर्मन वास्तुविशारद व ⇨बौहाउस  या कलाशिक्षणसंस्थेचा संस्थापक. बर्लिन येथे जन्म. बर्लिन व म्यूनिक येथे वास्तुकलेचे शिक्षण (१९०३–०७). पुढे काही काळ पीटर बेरेन्स या वास्तुशिल्पज्ञाकडे साहाय्यक म्हणून काम केले. १९१० पासून त्याने स्वतंत्ररीत्या वास्तुव्यवसायास सुरुवात केली. आडोल्फ मायरसमवेत आलफेल्ट-ॲन-डर-लाइन येथे १९११ मध्ये त्याने ‘फॅगस फॅक्टरी’ ही पहिली महत्त्वपूर्ण वास्तू उभारली. ही वास्तू म्हणजे काच व पोलादाच्यावॉल्टर ग्रोपिअस वास्तुरचनेतील एक क्रांतिकारक टप्पा होय. कोलोन्य येथील ‘Deutscher Werkbund’ प्रदर्शनासाठी ग्रोपिअस व मायर ह्यांनी प्रशासकीय कार्यालयाची अभिनव वास्तुरचना उभारली (१९१४). पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस ग्रोपिअसची ‘ग्रँड ड्यूकल सॅक्सन स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्‌स’ आणि ‘सॅक्सन अकॅडमी ऑफ फाइन आर्ट्‌स’ ह्या संस्थांच्या संचालकपदी नेमणूक झाली. ह्या दोन संस्था एकत्र करून ग्रोपिअसने ‘बौहाउस’ या कलाशिक्षणसंस्थेची वायमार येथे स्थापना केली (१९१९). कला व तंत्रविद्या यांचा समन्वय साधणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट होते. १९२६ मध्ये बौहाउसचे वायमारहून देसौ येथे स्थलांतर झाल्यावर तेथील नवीन वास्तुकल्प ग्रोपिअसने केला ती त्याची एक उत्कृष्ट निर्मिती गणली जाते. १९२८ मध्ये त्याने बौहाउसच्या संचालकपदाचा राजीनामा दिला व स्वतंत्र व्यवसायावरच लक्ष केंद्रित केले.  १९२८ ते १९३४ दरम्यान तो बर्लिनमध्ये होता. नंतर लंडन येथे इ. मॅक्स्‌वेल फ्रायसमवेत त्याने काही गृहवास्तूंची निर्मिती केली. तसेच ‘इम्पिंग्टन व्हिलेज कॉलेज’ची वास्तू उभारली. तिचा प्रभाव ब्रिटनमधील युद्धोत्तर विद्यालयीन वास्तूंवर दिसून येतो. १९३७ मध्ये ग्रोपिअस अमेरिकेला गेला. ‘ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाइन’, हार्व्हर्ड येथे त्याने वास्तुकलेचा प्राध्यापक म्हणून काम केले (१९३८–५२). तसेच मार्सेल ब्रॉयरसमवेत काही गृहवास्तू उभारल्या. त्यांमध्ये लिंकन, मॅसॅचूसेट्‌स येथील त्याच्या स्वतःच्या घराचाही अंतर्भाव होतो. ग्रोपिअसने १९४६ मध्ये ‘द आर्किटेक्ट्‌स कोलॅबरेटिव्ह’ (टीएसी) ही वास्तुशिल्पज्ञांची संघटना स्थापन केली आणि तिच्यामार्फत अनेक इमारती उभारल्या. त्यांत ‘हार्व्हर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट सेंटर’ ह्या प्रख्यात इमारतीचा समावेश होतो. त्याने वास्तुकलेवर रीबिल्डिंग अवर कम्युनिटीज (१९४५), स्कोप ऑफ टोटल आर्किटेक्चर (१९५५) इ. ग्रंथ लिहिले. आधुनिक वास्तुशिल्पज्ञ, उत्कृष्ट शिक्षक, कुशल संघटक, शिक्षणतज्ञ आणि लेखक अशा अनेक अंगांनी त्याची कारकिर्द लक्षणीय ठरली. कामाचा अनुभव घेत शिकणे व विषयाचा मूलभूत अभ्यास करणे, हीच यशाची पायरी अशी त्याची शिकवण होती.

त्याला अनेक मानसन्मान लाभले : हॅनोव्हर येथील तंत्रविद्यालय आणि हार्व्हर्ड युनिव्हर्सिटी यांच्याकडून पदव्या (१९२९ व १९५३), साऊँ पाउलू येथील ‘Grand Prix d’ Architecture’ (१९५४), ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स’ या संस्थेचे सुवर्णपदक (१९५६), ‘युनिव्हर्सिटी ऑफ हँबर्ग’चे गटे पारितोषिक (१९५७) व ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्‌स’ ह्या संस्थेचे सुवर्णपदक (१९५९). बॉस्टन येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Giedion, Sigfried, Walter Gropius Work and Teamwork, New York, 1954.

  2. Fitch, J. M. Walter Gropius, New York, 1960.

पेठे, प्रकाश