शरच्‍चंद्र मुक्तिबोधमुक्तिबोध, शरच्‍चंद्र : (२१ जानेवारी १९२१–२ नोव्हेंबर १९८४). मराठी कवी, कादंबरीकार आणि निबंधकार. जन्म इंदूरचा. शिक्षण उज्जैन व इंदूर येथे एम्. ए, एल्एल्. बी. पर्यंत. त्यानंतर माध्यमिक शाळांतून अध्यापन, वकीली, नागपूरच्या प्रकाश मासिकाचे सहसंपादन असे विविध व्यवसाय केले. १९५७ पासून नागपूरच्या ‘नागपूर महाविद्यालया’त मराठीचे प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले.

नवी मळवाट (१९४९) व यात्रिक (१९५७) हे मुक्तिबोधांचे काव्यसंग्रह. क्षिप्रा (१९५४), सरहद (१९६२) आणि जन हे वोळतु जेथे (१९६९) ह्या त्यांच्या कादंबऱ्या. त्यांच्या निबंधसाहित्यात काही निबंध (१९६३), जीवन आणि साहित्य (१९७२) आणि सृष्टी, सौंदर्य आणि, साहित्यमूल्य ह्या ग्रंथांचा समावेश होतो.

नवी मळवाट ह्या काव्यसंग्रहास विदर्भ साहित्यसंमेलनाचे पारितोषिक मिळाले. तसेच यात्रिक ह्या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. मानवी जीवन हे यांत्रिक, निर्जीव व निष्फळ आहे असा नैराश्यपूर्ण आशय मर्ढेकरी कविता अवतरल्यानंतर मराठी कवितेतून उमटू लागला असताना मुक्तिबोधांनी युयुत्सू आणि आशावादी कविता लिहिली. नवी मळवाट ह्या आपल्या काव्यसंग्रहाच्या दोन प्रस्तावनांतून (पहिल्या आवृत्तीची व १९६४ मधील दुसऱ्या आवृत्तीची) निराशावादाचे त्यांनी सैद्धांतिक पातळीवरून खंडन केले. ‘वास्तवतेच्या आघातांनी तीव्र झालेल्या अनुभूतीस तिच्या संपूर्ण पार्थिव स्वरूपात प्रकट करणे’ ‘विषम जीवनामुळे निर्माण झालेल्या जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारी अनेक अनुभूतींची सत्ये’ आपल्या काव्यांतून प्रकट करणे हे मुक्तिबोधांच्या दृष्टीने क्रांतीकारी नवकवीचे कार्य होय. आपल्या कवितेचा आशय अधिक सामाजिक असल्यामुळे तो प्रकट करण्यासाठी व्यावहारिक जीवनातील प्रतिमांचा उपयोग केला पाहिजे, अशीही त्यांची भूमिका होती. मार्क्सवादावरची श्रद्धा त्यांच्या दोन्ही कवितासंग्रहांमागील एक महत्त्वाची प्रेरणा होय.

आपल्या कादंबऱ्यांतूनही मुक्तिबोधांनी आपल्या सामाजिक दृष्टीचा प्रत्यय दिला आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणजे सुप्त शक्तींचा एक असून एक पिंड असून समाजात राहिल्यामुळे तिला बरेवाईट व्यक्तित्व प्राप्त होत असते, अशी भूमिका घेऊन त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतील व्यक्तींच्या सुखदुःखांचे चित्रण करीत असताना त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीलाही रूप देण्याचा प्रयत्न केला आहे.

मार्क्सवाद ही मुक्तिबोधांच्या समीक्षेमागचीही महत्त्वाची प्रेरणा असली, तरी ते मार्क्सवादाच्या चौकटीत अडकून पडले नाहीत. तथापि निर्मितिप्रक्रियेचा विचार करीत असताना त्यांनी सामाजिकतेला विशेष महत्त्व दिले. तसेच ‘रस’ आणि ‘रूप’ ही दोन तत्त्वे बाजूला ठेवून त्यांनी ‘मानुषता’ ह्या तत्त्वाचा ललितकृतीचे घटनतत्त्व म्हणून पुरस्कार केला. त्यांच्या दृष्टीने समता, स्वातंत्र आणि बंधुता ही मानुषतेचीच कालिक तत्त्वरूपे होत, नागपूर येथे ते निधन पावले.

कुलकर्णी, अ. र.