कांजिण्या : ज्वर व त्वचेवर विशिष्ट तऱ्हेचे उत्स्फोट (फोड) दिसणाऱ्या एका सौम्य सांसर्गिक रोगाला कांजिण्या किंवा शीतला असे म्हणतात. हा रोग मुख्यतः लहान मुलांना होतो.

रोगाचे मूळ कारण एक अतिसूक्ष्म विषाणू (व्हायरस) असून त्याचे प्रजनन (वाढ) मनुष्याच्या शरीराबाहेर करणे साध्य झाले आहे. मात्र हे प्रजनन वरच्या प्रतीच्या विशिष्ट प्राण्यांच्या शरीर कोशिकांतच (पेशींतच) होऊ शकते. हा विषाणू व साधारण परिसर्प किंवा नागीण (हरपिझ झॉस्टर) या रोगाचा विषाणू एकच असावा असे वाटते. कारण या दोन्ही विषाणूंचे गुणधर्म एकच असून कित्येकवेळा एकाच व्यक्तीला दोन्ही रोग एकाच वेळेला झालेले दिसतात.

या विषाणूंचा संसर्ग मुख्यतः श्वासामार्गे होतो. रोग्याच्या खोकण्या-शिंकण्यामुळे विषाणुदूषित तुषार हवेत पसरतात व जवळच्या व्यक्तीच्या श्वासाबरोबर शरीरात प्रवेश करुन तेथे रोगोत्पत्ती करतात. रोग्याची दूषित भांडी, कपडे वगैरेंमुळेही रोगप्रसार होतो. रोग एकदा होऊन गेला म्हणजे बहुधा पुन्हा होत नाही त्यावरुन रोगामुळे उत्पन्न झालेली प्रतिकारशक्ती जन्मभर टिकते, असे वाटते.

कांजिण्यांचा परिपाककाल (विषाणू शरीरात गेल्यापासून लक्षणे उत्पन्न होण्यापूर्वी लागणारा काल) १४ ते १६ दिवस, क्वचित तीन आठवडयांपर्यंत असतो. रोग अगदी सौम्य असतो पण क्वचितप्रसंगी सुरुवातीस त्याची लक्षणे तीव्र असतात. प्रथम सर्दी, थंडी भरुन ताप येणे, शिंका, ठसका, तोंडास अरुची व डोके दुखणे ही लक्षणे दिसतात. पहिल्या एकदोन दिवसांतच रंजिका (लाल फोड) दिसू लागतात. ताबडतोब त्यांचे स्वरूप् बदलून त्यांत पाणी जमल्यासारखे फोड दिसतात, त्या स्वरूपाला पीटिका असे म्हणतात. आणखी एखाद्या दिवसाने हे पाणी पुवाळल्यासारखे होऊन फोडाला पिवळट रंग येतो, त्याला पूयिका असे म्हणतात. एकदोन दिवसांतच या पूयिका सुकू लागून काळ्या पडतात व पुढील पाचसात दिवसांत त्यांच्या खपल्या पडून रोग बरा होतो. रंजिका, पीटिका व पूयिका या तीनही अवस्था एकाच वेळी त्वचेवर दिततात कारण फोड दोनचार दिवस येतच रहातात. प्रथम ज्या रंजिका उत्पन्न होतात त्यांच्या भोवतीची त्वचा लाल असून पीटिका थोड्या उंच फोडासारख्या तांबड्या रंगाच्या दिसतात. या पीटिका सर्वांगावर येतात पण त्यातल्या त्यात चेहरा, पोट, पाठ व छाती या भागांवर जास्त प्रमाणात दिसतात, क्वचित तोंडावर व घशातही काही फोड येतात.

रोग इतका सौम्य आहे की, पुष्कळ वेळा सुरुवातीची लक्षणे दिसण्यापूर्वीच शरीरावर फोड दिसू लागतात, त्याचवेळी हा रोग प्रथम लक्षात येतो. मोठ्या माणसाला कांजिण्या आल्या तर मात्र लक्षणे जास्त तीव्र असतात. पीटिकाही जास्त सुजल्यासारख्या दिसून केव्हा केव्हा त्यामध्ये रक्तस्त्राव व कोथही (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांचा म्हणजे ऊतकांचा मृत्यू होऊन सडणे) होतो.

कांजिण्यांपासून उपद्रव म्हणजे फोड खाजविल्यामुळे त्या जागी व्रण, गळवे वगैरे होऊ शकतात. म्हणून ते खाजविले जाणार नाहीत याबद्दल दक्षता घेणे चांगले. क्वचित कांजिण्यांच्या विषाणूंचा मेंदूवर परिणाम होऊन मस्तिष्कशोथ (मेंदूची दाहयुक्त सूज) होतो. हा शोथ कित्येक वेळा दहापंधरा दिवसांनंतरही उपस्थित होतो.

कांजिण्यांचे निदान फारसे कठीण नाही. सुरुवातीच्या एकदोन दिवसांत फोडांच्या साम्यामुळे देवी व कांजिण्या यांत घोटाळा होतो पण देवीचे फोड चौथ्या दिवशी तर कांजिण्या पहिल्याच दिवशी येतात. शिवाय वर वर्णन केल्याप्रमाणे कांजिण्यांत फोडाच्या तीनही अवस्था एकाच वेळी दिसतात तशा देवीत दिसत नाहीत.

कांजिण्या रोग मारक नाही. या रोगात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असते आणि तेही मूळच्या अशक्त मनुष्यांतच दिसून येते.

कांजिण्यांवर परिणामकारी औषध उपलब्ध नाही व त्याची तादृश जरूरीही नाही. फोड खाजविल्यास होणारा उपद्रव टाळण्याकरिता काही मलम वापरतात. तसेच योग्य ती शुश्रूषा व पथ्यपाणी केल्यास रोग ७–८ दिवसांत पूर्णपणे बरा होतो.

कांजिण्यांवर प्रतिबंधक उपाय म्हणजे रोग्याचा संसर्ग होऊ न देणे, पण व्यवहारात ते शक्य होत नाही. कारण अंगावर फोड आल्यानंतरच रोग लक्षात येतो व संसर्ग त्याच्या आधीच होऊन गेलेला असतो. रोगाचा सौम्यपणा लक्षात घेतल्यास विशेष प्रतिबंधक उपायांचीही फारशी गरज नाही.

कामत, सु. अ.

आयुर्वेदीय उपचार : कडू निंब, बेहडा व हळद थंड पाण्यात वाटून पाजावे म्हणजे त्रास होत नाही. कांजिण्याच्या पूर्वरूपात ज्येष्ठमध, केळीच्या काल्याच्या रसात किंवा पांढरे चंदन, अडुळसा, चमेलीच्या पानांचा रस किंवा मध ह्याबरोबर घेतल्याने कांजिण्या येत नाहीत. कांजिण्या आल्या असता किंवा येणार असे दिसता निंबाच्या पानांची डहाळी घरात व दारात जिकडे तिकडे बांधावी. ज्वर जोराचा असला तर चंदन, अडुळसा, नागरमोथा, गुळवेल, मनुका ही रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी चुरून गाळून द्यावी. फोड असून दाह होत असेल, तर रानशेणींची राख त्यावर भुरभुरावी म्हणजे त्या सुकतात व पिकत नाहीत. शिवाय जप, होम, बली, दान, स्वस्तिवाचन, गोब्राह्मण, गौरी, शंकर ह्यांची पूजा करावी, सितलादेवीचे स्तोत्र म्हणावे.

पहा : आतुर चिकित्सा

जोशी, वेणीमाधवशास्त्री