श्रीमहाभारतम् : व्यासांच्या महाभारता चे थोर मलयाळम् कवी कुंचिक्कुट्टन् तंपुरान (१८६५-१९१३) ह्यांनी मलयाळम्मध्ये केलेले भाषांतर. महाभारता चे द्राविडी वृत्तांत भाषांतर करण्याची योजना सी. पी. अच्युत मेनन ह्यांच्या नेतृत्वाखाली १८९३ मध्ये आखण्यात आली होती पण ती आकारास आली नाही. ह्या योजनेच्या अंतर्गत कुंचिकुट्टन् तंपुरान ह्यांच्याकडे महाभारता ची जी पर्वे भाषांतरासाठी सोपविण्यात आली होती, ती मात्र त्यांनी पूर्ण करून दिली होती. महाभारता चे संपूर्ण भाषांतर स्वत:च करण्याची प्रेरणा तंपुरान ह्यांना त्यातूनच मिळाली. हे काम प्रचंड होते, पण ते त्यांनी सुरू करून केवळ ८७४ दिवसांत पूर्णत्वास नेले. शब्दाला शब्द आणि वृत्ताला वृत्त अशा पद्धतीने हे भाषांतर त्यांनी केले आहे. हे काम तसे अवघडच होते. ह्या भाषांतराची शैली साधी, सरळ, सुबोध पण प्रभावी आहे. मूळ महाकाव्याचा उच्च दर्जा ह्या भाषांतरातही कायम राखण्यात आला आहे. ह्या भाषांतरामुळे ‘ केरळव्यासन् ’ म्हणून ते ख्याती पावले. श्रीमहाभारतम् ची पहिली आवृत्ती १९०६ मध्ये प्रकाशित झाली. दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचे काम १९५२ मध्ये मासिकाच्या रूपात हाती घेण्यात आले आणि १९५८ मध्ये ते पूर्णत्वास गेले. ह्या दोन आवृत्त्यांमध्ये राहिलेले मुद्रणदोष व इतर त्रूटी व्यासंगी तज्ज्ञांच्या साहाय्याने शक्य तितक्या दूर करून अधिक निर्दोष व परिपूर्ण आवृत्ती कोट्टायम येथील ‘ साहित्य प्रवर्तक को-ऑपरेटिव्ह सोसायटी ’ने १९६५ मध्ये प्रकाशित केली. ह्याच संस्थेने ह्या गंथाची नवी आवृत्ती १९८१ मध्ये प्रसिद्ध केली. अभिजात मलयाळम् साहित्यातील हा अमोल ठेवा आहे.

ह्या भाषांतराचे कर्ते कुंचिक्कुट्टन् ह्यांचे मूळ नाव राम वर्मा असे होते. मलयाळम् साहित्यातील वेण्मणी संप्रदायातील (मलयाळम्मधील संस्कृत शब्दांच्या अतिरेकी मिश्रणाविरूद्घ बंड करून शुद्घ मलयाळम्चा पुरस्कार करणारा हा संप्रदाय) एक प्रमुख कवी वेण्मणी अच्छन् नंपूतिरी (१८१७९१) ह्यांचे कुंचिक्कुट्टन् तंपुरान हे द्वितीय पुत्र होत. ते शीघ कवी होते. त्यांनी विपुल साहित्यनिर्मिती केली : कविभारतम् , दक्षयागयज्ञम् इ. दीर्घकाव्ये कुटल्माणिक्यम् , ओरू चरित्रकथ अशी काही लघुकाव्ये लक्षणा संगम् , नलचरितम् ह्यांसारखी नाटके अयोध्याकांडम् , आत्मबोधम् अशा काही गाथा काही साहित्यशास्त्रविषयक गंथ शुकसंदेशम् , श्रीमद्‌भागवतम् अशी भाषांतरे ह्यांचा तीत समावेश होतो. त्यांच्या काही साहित्यकृती संस्कृतातही आहेत.

भास्करन् , टी. (इं.) इनामदार, श्री. दे. (म.)