कुरुप, जी. शंकर : (३ जून १९०१–    ). प्रसिद्ध आधुनिक मलयाळम्‌ कवी. जन्म केरळमध्ये, आद्य शंकराचार्यांचे जन्मस्थान असलेल्या कलडीजवळील एका खेडेगावी. मलयाळम्‌ व संस्कृतचे शिक्षण झाल्यावर एका शाळेत ते मलयाळम्‌चे अध्यापन करू लागले. पुढे स्वप्रयत्नाने आणि बुद्धिमत्तेने ते प्राध्यापकाच्या हुद्यापर्यंत पोहाेचले. 

जी. शंकर कुरुप

आधुनिक काळातील एक प्रतिभासंपन्न कवी म्हणून त्यांना मलयाळम्‌ साहित्यात महत्त्वपूर्ण स्थान आहे. जुन्या साचेबंद मलयाळम्‌ काव्याला त्यांनी नवीन शब्दकळा, प्रतिमासृष्टी आणि प्रतीकात्मकता यांद्वारा मानवतावादाच्या नव्या वातावरणात आणून नवचैतन्य प्राप्त करून दिले. त्यांनी आपल्या काव्यात आधुनिक विज्ञान आणि प्राचीन आध्यात्मिक विचारधारा यांचा सुंदर समन्वय साधला. कुरुप याच्या सुरुवातीच्या कविता साहित्य कौतुकम्‌ (४ भाग) मध्ये संगृहित असून त्या पारंपरिक शैलीत आहेत. ह्या काळात त्यांच्यावर मलयाळम्‌  साहित्यात ‘थोर त्रयी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तीन प्रतिभासंपन्न कवींचा (कुमारन आशान, वळ्ळत्तोळ नारायण मेनन आणि उळ्ळूर एस्‌. परमेश्वर अय्यर) विशेष प्रभाव होता. ह्या त्रयीतील वळ्ळत्तोळ यांच्या प्रभावातून त्यांनी आपली राष्ट्रीय कविता लिहिली. त्यांनी भारतगौरवाची उज्ज्वल गीते गाऊन राष्ट्रवादी भावनेत चैतन्य ओतले. कुरुप यांच्यावर टागोरांच्या गूढवादी व प्रतीकवादी कवितेचाही विशेष प्रभाव आहे. नंतरच्या काळात ते समाजवादाचे कडवे प्रतिपादक बनले. त्यांची ‘नले’ (उद्या) ही क्रांतिकारी कविता विशेष प्रसिद्ध आहे. नंतरच्या काळातील त्यांची कविता अधिक बौद्धिक व चिंतनपर बनलेली दिसते.  आतापर्यंतच्या मलयाळम्‌ काव्यात प्रतीकवादाचा त्यांच्याइतका सुंदर व प्रभावी वापर दुसऱ्या कोणत्याही कवीने केलेला नाही.

आजवर त्यांचे विसांवर काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ओतक्कुळल्‌ (१९५०) ह्या त्यांच्या केवळ साठ कवितांच्या संग्रहास भारतीय ज्ञानपीठाचे (१९६५) व विश्वदर्शनम्‌  ह्या संग्रहास साहित्य अकादमीचे (१९६३) पारितोषिक देण्यात आले. पाथेयम्‌ (१९६१) हाही त्यांच्या १३५ कवितांचा संग्रह दर्जेदार असून, त्यात त्यांच्या  प्रतिभेच्या विविध पैलूंचा सुंदर आविष्कार दिसून येतो. यांशिवाय सूर्यकांति, मुत्तुस्सिप्पि इ. त्यांचे उल्लेखनीय काव्यसंग्रह होत. कालिदास, भास, रवींद्रनाथ टागोर, उमर खय्याम ह्यांच्या काव्यांचे त्यांनी मलयाळम्‌मध्ये उत्तम अनुवाद केले असून ते अत्यंत लोकप्रिय आहेत.  

नायर, एस्‌. के. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)