आ. १३. शुक्राणुजनन : (१) शुक्रकोशिकाजनक, (२) आद्य शुक्रकोशिका, (३) दुय्यम शुक्रकोशिका, (४) प्राक् शुक्राणू किंवा शुक्राणुपूर्व कोशिका, (५) शुक्राणू.

युग्मक जनन : पुरूषातील किंवा स्त्रीमधील जनन कोशिकेला युग्मक म्हणतात. पुरुषातील युग्मक जननाला ‘शुक्राणुजनन’ आणि स्त्रीमधील युग्मक जननाला ‘अंडजनन’ म्हणतात.

शुक्राणुजनन : पुरुषातील शुक्राणु-उत्पादक क्रिया म्हणजे शुक्राणु-जनन-वृषणातील रेतोत्पादक नलिकांतील आद्य जननकोशिकांपासून शुक्राणू तयार होतात. या आद्य कोशिकांत टप्प्याटप्पायने बदल होत जाऊन शेवटी पूर्ण वाढलेला शुक्राणू तयार होतो. या टप्प्यांतील

कोशिकांना पुढीलप्रमाणे विशिष्ट नावे आहेत. (१) शुक्रकोशिकाजनक : या कशिकेत गुणसूत्र द्विगुणित असते. मानवामध्ये  शुक्रकोशिकाजनकांचे तीन प्रकार ओळखता येतात. गडद प्रकार (अ), फिकट प्रकार (आ) आणि प्रकार (इ). या तिन्ही कोशिकांच्या आकारात किंवा कोशिकाद्रव्यात फारसा फरक नसतो मात्र त्यांच्या केंद्रकात निश्चित फरक आढळतो. प्रत्येक शुक्रकोशिकाजनक कोशिकेत चव्वेचाळीस दैहिक आणि दोन लिंग गुणसूत्रे असतात. तिच्यापासून समविभाजनाने दोन, दोनापासून चार अशा वाढत्या संख्येने नव्या कोशिका तयार होतात. (२) प्रत्येक नव्या कोशिकेला ‘आद्य शुक्रकोशिका’ म्हणतात व त्या रेतोत्पादक नलिकेच्या अंतस्तरात अगदी पृष्ठस्थ असतात. प्रत्येक कोशिका वाढते व समविभाजनाने आणखी नव्या कोशिका तयार होतात. या नव्या कोशिका आकारमानाने लहान असून त्यांना (३) दुय्यम शुक्रकोशिका म्हणतात. प्रत्येकीतील गुणसूत्रांची संख्या निम्मी म्हणजे बावीस आणि एक लिंगसूत्र (X किंवा Y) एवढी असते. प्रत्येकीचे समविभाजन होऊन तयार होणाऱ्या नव्या कोशिकांना (४) प्राक् शुक्राणू अथवा शुक्राणुपूर्व-कोशिका म्हणतात. प्रत्येकीत एकगुणित गुणसूत्रे असतात व प्रत्येकीचे रूपांतर पूर्ण शुक्राणूत होते. ही वाढ होण्यापूर्वी प्रत्येक शुक्राणुपूर्व-कोशिका रेतोत्पादक नलिकाभित्तीत असलेल्या सर्टोली कोशिकांच्या (एन्रीको सर्टोली या इटालियन कोशिकावैज्ञानिकांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या कोशिकांच्या) कोशिकाद्रव्यात पूर्णपणे किंवा अंशतः मिसळते. (५) शुक्राणू हे अंतिम स्वरूप असून डोके, मध्यभाग व शेपूट असे त्याचे तीन भाग स्पष्टपणे ओळखता येतात. पुरुष आणि स्त्री जननकोशिकांच्या संयुग्मनास योग्य अशी ही रचना असून शुक्राणू अतिशय  चलनशील  असतात.

अंतिम स्वरूप धारण केलेले शुक्राणू सर्टोली कोशिकांच्या टोकांवर गोळा होतात आणि त्या कोशिका त्यांचे पोषण करतात. सर्टोली कोशिकांतून मुक्त झालेले शुक्राणू रेतोत्पादक नलिकेच्या पोकळीत तरंगतात. वृषण-जालीकेतून ते शुक्राणुवाहिनीत येतात आणि या ठिकाणी त्यांची शरीरक्रियात्मक वाढ पूर्ण होते. शुक्राणुवाहिनीतून वाहत येऊन तिच्या कुंभिकेत (शेवटच्या काहीशा रूंद  भागात) गोळा होतात. व जलद  गतीने गर्भाशय आणि अंडवाहिनीकडे जातात. त्यांची जननक्षमता ४८ तासांनतर नाहीशी होते व ९६ तसांत ते मरतात. [⟶ शुक्राणु].

अंडजनन : अंडाशयाच्या बाह्यकात पूर्ण वाढलेले अंड तयार होण्याच्या क्रियेला अंडजनन म्हणतात. स्त्रीमध्ये ही क्रिया वयाच्या ११ ते १४ वर्षापासून (यौवनावस्थेपासून) ते ४० ते ५० वर्षांपर्यंत (ऋतुनिवृत्तीपर्यंत) चालू असते. पूर्ण अंड तयार  होईपर्यंत अंडाशयात अंड व त्याच्या सभोवतालच्या कोशिका (ज्यापासून पुटक बनते त्या) यांच्यासंबंधी दोन प्रमुख क्रिया घडतात : (१) पुटक तयार होणे, (२) अंडजनन.

(१)पुटकनिर्मिती : बाह्याकामध्ये लहान लहान कोशिका-गुच्छ तयार होतात व ते जननदअधिस्तर कोशिकांपासून बनतात. या गुच्छातील मध्यवर्ती पोशिका इतरांपेक्षा अधिक वाढते व ती ‘अंडजनक-कशिका’ बनते आणि इतर कोशिका पुटक-कोशिका बनतात. अंडजनक-कोशिका थोडी वाढल्यानंतर तिला ‘आद्य अपक्वांड’ म्हणतात. आद्य अपकांड आणि इतर पुटक-कशिका मिळून तयार होणाऱ्या गुच्छाला ‘आद्य पुटक’ म्हणतात. या पुटकातील पोकळी ⇨स्त्रीमदजन (इस्ट्रोजन) हॉर्मोनयुक्त द्रव्याने भरल्यानंतर त्याला ‘द्रवार्बुदीय पुटक अथवा अंडपुटक’ म्हणतात. अशी अनेक पुटके निरनिराळ्या अवस्थांतून एकाच वेळी जात असतात. द्रवार्बुदीय पुटक अंडाशय बाह्यकाच्या पृष्ठभागाजवळ येऊन फुटताच त्यातील अंड बाहेर पडते व याला अंडमोजन म्हणतात. अंडमोचन होताच ⇨पोष ग्रंथीचे पुटकोद्दीपक हॉर्मोन स्रवण बंद होते. परिणामी इतर पुटकांची वाढ थांबते व त्यांचा संकोच होऊन ती नाश पावतात.


या पुटकांना ‘संकोचित पुटके’ म्हणतात.

आ. १४. अंडजनन : (१) अंडजनक-कोशिका, (२) आद्य अपक्वांड, (३) दुय्यम अपक्वांड, (४) पहिली लोपिका, (५) पक्वांड, (६) दुसऱ्या लोपिका.

(२)अंडजनन : वर वर्णन केल्याप्रमाणे प्रथम अंडजनक-कोशिका तयार होते व तीमध्ये द्विगुणित गुणसूत्रे असतात म्हणजे ४४ अधिक दोन × गुणसूत्रे असतात. आद्य पुटक तयार होताच अंडजनक-कशिकेचे आद्य अपक्वांडात रूपांतर होते. त्यापासून द्रवार्बुदीय पुटक तयार

झाल्यानंतर आद्य अपक्वांडाचे अर्धसूत्रण विभाजन होते व त्यामुळे दुय्यम अपक्वांड आणि ‘पहिली लोपिका’ (त्यक्त कोशिका) तयार होतात. दुय्यम अपक्वांडात अर्धी म्हणजे २२ अधिक एक × गुणसूत्रे असतात आणि त्यात लोपिकेपेक्षा बरेच जादा कोशिकाद्रव्य असते. दुय्यम अपक्वांडाचे समविभाजन सुरू असतानाच अंडमोजन होते. पुढील २४ ते ३६ तसांत निषेचन न झाल्यास अपक्वांड मरते परंतु निषेचन झाल्यास अर्धसूत्रण विभाजन पूर्ण होते व दुसरी लोपिका तयार होते. निषेचित अंडाला ‘युग्मज’ म्हणतात. लोपिका अर्धसूत्रण विभाजनात अक्रियाशील असतात.

गर्भवाढीच्या पाचव्या महिन्याच्या सुमारास प्रत्येक अंडाशयात ६० लक्ष जननकोशिका असतात. त्यानंतर जन्मकाळाच्या सुमारास त्यांचा मोठ्या प्रमाणावर अपकर्ष होतो व फक्त २० लक्ष आद्य अपकांडे शिल्लक उरतात. यौवनावस्थेपर्यंत ४०,००० अपक्वांडे उरतात. यांपैकी फक्त ४०० स्त्रीच्या प्रजननक्षम वयात अंडमोचनाकरिता उपलब्ध असतात.

शुक्राणूंसंबंधी अद्यापि अनिश्चित स्वरूपाच्या काही माहितीचा उल्लेख येथे करणे आवश्यक आहे. संभोगानंतर स्त्रीच्या योनिमार्गात असताना शुक्राणूंवर काही प्रक्रिया घडून  ते अंडात शिरून निषेचनास समर्थ बनविले जातात. या प्रक्रियेला ‘आक्रमकतावर्धन’ म्हणतात. निरनिराळ्या पृष्ठवंशी व अपृष्ठवंशी प्राण्यांतील संयुग्मनापूर्वी दोन्ही युग्मकांमध्ये विविध प्रकारच्या अन्योन्यक्रिया अंडजन्य किंवा योनिमार्गातील फर्टिलायझिन (शुक्राणूचे अस्तित्व जाणण्यात व त्यांच्या चलनशीलतेला चालना देण्यात भाग घेणारे द्रव्य) आणि शुक्राणुजन्य अँटिफर्टिलायझिन (निषेचन होण्यापूर्वी अंड्याने शुक्राणू आकर्षित करून घेण्याच्या कार्याची पूर्तता करण्यासाठी शुक्राणूने निर्माण केलेले द्रव्य) यांमध्ये होते व ती आक्रमकतावर्धनाशी संबंधित असते, असा समज आहे. सध्या तरी या प्रश्नाबाबत अनिश्चितता आहे.


अंडमोचन : पूर्ण वाढलेले अंड (पक्वांड) द्रवार्बुदीय पुटकातून मुक्त होण्याला अंडमोचन म्हणतात. स्त्रीमध्ये ही क्रिया यौवनापासून ऋतुनिवृत्तीपर्यंत प्रत्येक ऋतुचक्राच्या मध्यास म्हणजे एक पाळी संपल्यानंतर दुसरी पाळी येण्यापूर्वी १४±२ दिवस अगोदर होते. कधी कधी आठच दिवसांनी तर कधी कधी वीस दिवसांनतरही अंडमोजन होते असे एस्. एल्. सीग्लर या शास्त्रज्ञांना आढळले आहे. गर्भारपण वा अंडाशय विकृती वगळल्यास ही क्रिया सातत्याने चालू असते. अंडमोचनाचा निश्चित काळ ठरवणे अशक्य आहे परंतु पुढील गोष्टींवरून काही अंदाज करता येतात : (१) अंडमोचनाच्या वेळी किंवा किंचित अगोदर मूल तापमानात वाढ होते. (२) अंडमोचनाच्या वेळी श्रोणि गुहेतील जैवविद्युत् वर्चसातील (पातळीतील) बदल मोजता येतात. (३) अंतःस्रावी ग्रंथींच्या स्रावातील बदल अंडमोचन झाल्याचे दर्शवू शकतात. संभाव्य अंडमोचन काळी स्त्रीचे मूत्र अंदरामध्ये अंतःक्षेपणाने टोचल्यास उंदरातील अंडाशयात रक्ताधिक्य झाल्याचे अंडमोचनापूर्वी ३-४ दिवस अगोदर आणि चोवीस तास पूर्वीपर्यंत आढळते. (४) योनिमार्गातील स्राव व गर्भाशय ग्रीवेचा स्राव यांच्या प्रयोगशालेय तपासणीवरून अंडमोचनाविषयी अंदाज करता येतो.

मुक्त झालेले अंड पर्युदरगुहेत पडल्यानंतर अंडवाहिनीच्या उदरगुहीय मुखावरील झालरीवजा प्रवर्धामुळे अंडवाहिनीच्या पोकळ नलिकेकडे खेचले जाते. अंडाशयापासून हे मुख जवळ असावे म्हणून प्रवर्धापैकी एक प्रवर्ध अंडाशयाला चिकटून असतो. अंडवाहिनीत शिरल्यावर अंडाचा अंडवाहिनीतून तिच्या गर्भाशयाकडील मुखाकडे म्हणजेच गर्भाशयाकडे प्रवास सुरू होतो. संभोगाच्या वेळी योनिमार्गात पडलेले शुक्राणू गर्भाशयात शिरून, अंडवाहिनीच्या गर्भाशयातील मुखातून शिरून अंडाच्या उलट दिशेने प्रवास करू लागतात. एखाद्या शुक्राणूची व अंडाची अंडवाहिनीच्या बाह्य एक तृतीयांश भागात बहुधा गाठ पडते व त्या ठिकाणी निषेचनांस सुरुवात होते. अशी गाठ न पडल्यास निषेचन न होता अंड नाश पावते व ते गर्भाशयाच्या स्रावामध्ये समावून जाते.

आ. १५. अंडमोचन व निषेचित अंत्राची प्रगती आणि कोरकपुटी-रोषण : (१) अंडाशय, (२) अंडमोचन होऊन मुक्त झालेले पक्वांड, (३) अंडवाहिनी, (४) निषेचन व युग्मजनिर्मिती, (५) युग्मज विभाजनातून मूलपुंच तयार, (६) मूलपुंचापासून कोरकपुटीची निर्मिती, (७) कोरकपुटीचे रोपण, (८) गर्भाशय गुहा.

आ. १६. मानवी कोरकपुटी : (१) अंतःस्थ कोशिका पुंज अथवा भ्रूणजनक, (२) कोरकगुहा, (३) बाह्य कशिका पुंज.

निषेचन : अंड व शुक्राणू यांच्या संयुग्मनास निषेचन म्हणतात. या मीलनानंतर तयार होणाऱ्या निषेचित अंडाला त्याच्या विभाजनपूर्व अवस्थेत ‘युग्मज’ अथवा ‘निषेचित अंड’ म्हणतात [⟶ गर्भधारणा व गर्भबाहुल्य]. निषेचनानंतर पुढील गोष्टी साध्य होतात. (१) गुणसूत्रांची संख्या द्विगुणित होते. प्राक् केंद्रकातील अर्धी गुणसूत्रे एकतर् येऊन ४४ अधिक होन × अशी एकूण ४६ गुणसूत्रे होतात. (२) भ्रूणाची (भावि अपत्याची) लिंगनिश्चिती होते. शुक्राणू जर × (लिंग) गुणसूत्रासहित निषेचनात भाग घेणारा असेल, तर स्त्री-युग्मज आणि जर Y (लिंग) गुणसूत्रासहित असेल, तर पुरुष-युग्मज तयार होते. (३) निषेचनानंतर समविभाजनास जलद गतीने सुरुवात होते. या विभाजनामुळे अनेक लहान लहान कोशिका असलेला युग्मज तयार होतो.

ही विभाजनक्रिया चालू असतानाच निषेचित अंडाचा गर्भाशयाकडे प्रवास चालू असतो व गर्भाशयात पोहोचण्यास सर्वसाधारणपणे पाच दिवस लागतात. युग्मजापासून द्विकोशिकीय, चौ-कोशिकीय अशी वाढ होते आणि प्रत्येक कोशिकेला ‘कोरकखंड’  म्हणतात. निषेचनापासून चौथ्या दिवसानंतर तयार होणाऱ्या साधारण घन कोशिका समुच्चयाला ‘मूलपुंज’ (मोरुला) म्हणतात. या पुंजाची आणखी वाढ होऊन त्यांत पोकळी निर्माण होताच त्याला ‘कोरकपुटी’ म्हणतात (ही वारयुक्त सस्तन प्राण्यांच्या बाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण एकभित्तिकाच असते) व या अवस्थेतच गर्भाशयाच्या पोकळीत युग्मज पोहोचतो.

अल्पकाळ मुक्तपणे तरंगणारी कोरकपुटी गर्भाशयाच्या अंतःस्तरावर चिकटते व तेथील पृष्ठस्थ कोशिकांत शिरून स्थिर होते. या क्रियेला ‘कोरकपुटी-रोपण’ म्हणतात. सर्वसाधारणपणे रोपणाची सुरुवात सातव्या दिवशी होऊन अकराव्या दिवशी ते पूर्ण होते. कोरकपुटी ज्या ठिकाणी शिरते, तेथील गर्भाशय अंतःस्तर कोशिकांची रचना विस्कळीत होते व कोरकपुटीच्या सभोवती टाकाऊ पदार्थांचा व परिस्रावित रक्ताचा संचय होतो. या संचयाला ‘भ्रूण-पोष’ म्हणतात. कारण त्यापासून भ्रूणाचे पोषण होते. कोरकपुटीचे रोपण बहुधा गर्भाशयाच्या पश्च भित्तीवर बुध्न भागात (वरच्या रुंद गोल घुमटाकार जाड भागात) होते. तसेच ते मध्यरेषेत किंवा एका बाजूसही होते. सर्वसाधारणपणे कोरकपुटी गर्भाशय भित्तीत शिरून साडेनऊ दिवस पूर्ण होणाच्या सुमारास पूर्णपणे झाकली जाते. कित्येक वेळा रोपण वर वर्णिल्याप्रमाणे न होता अंडवाहिनीत, तिच्या गर्भाशयजवळील भागात आणि क्वचितच अंडाशयातही होते. अशा प्रकारच्या गर्भधारणेला ‘अपस्थानीय गर्भधारणा’ म्हणतात व ती बहुधा विदारण (रोपण झालेला भाग फाटणे) आणि रक्तस्त्रावाने संपुष्टात येते. कधी-कधी वाढ होण्यास योग्य जागा नसल्यामुळे भ्रूण मरण पावतो व अभिशोषिला जातो.


आ. १७. आद्यजननस्तर : (१) बाह्यस्तर, (२) मध्यस्तर, (३) अंतःस्तर.

प्रारंभिक भ्रूणविज्ञान : कायखंडपूर्व अवस्था : (आद्यस्तर तयार होणे). या अवस्थेत कोरकपुटीच्या पोकळीत द्रवसंचय होत जाऊन ती वाढते   व तिला ‘कोरकगुहा’ म्हणतात. या गुहेत विकेंद्री स्थितीत जो कोशिका पुंज असतो, त्याला ‘अंतःस्थ कोशिका पुंज’ वा ‘भ्रूणजनक’ म्हणतात.

सुरुवातीस हा पुंज थोड्या कोशिकांचा बनलेला असतो. लवकरच त्याच्या आतील बाजूवर दुसरा एक कोशिकांचा थर तयार होतो. त्याला ‘अंतःस्तर’ म्हणतात. बाकी उरलेल्या जाड कोशिका पुंजापासून ‘बाह्यस्तर’ आणि ‘मध्यस्तर’ तयार होतात. सुरूवातीस हे कोशिकांचे थर जरी एकमेकावंर एखांद्या चापट आकाराच्या वडीसारखे रचलेले असले, तरी त्यांची गोलाकार पिशवीसारखी रचना होते व या अवस्थेला ‘स्यूतिभ्रूणन’ (किंवा आद्य भ्रूणन) म्हणतात. या आद्यजननस्तरांपासून शरीराचे सर्व भाग बनतात. कोणत्या जननस्तरापासून

बाह्यस्तर   मध्यस्तर   अंतःस्तर 
(१)बाह्यत्वचा, त्वचा उपांगेकेस, नखे. (२) जवळजवळ संपूर्ण तंत्रिका तंत्र, मस्तिष्क व मेरूरज्जू गुच्छिका, अनुकंपी गुच्छिका, पोष अधिवृक्क ग्रंथीचा बाह्यक.(४)पोषग्रंथीचा अग्रखंड (५)स्वच्छमंडल, नेत्रश्लेष्म   व अश्रुग्रंथीतील उपकाल कोशिका.(६) नेत्रभिंग. (७) कनी निकेतील अरेखिता स्नायू, (८) संवेदी अवयवातील तत्रिका- उपकला.(९) नाक, नाकाभोवतालची कोटरे, मुखाचा टाळू भाग,हिरड्या व गाल या

भागांतील उपकलास्तर,(१०) लाला ग्रंथी व दंतवल्क, (११) गुदद्वाराचाआतील भाग व मूत्रमार्गाचा

(१) संपूर्ण आंत्रमार्गाचे ऊतके. (२) दंतवल्काशिवा दांतांचे सर्वभाग. (३) संपूर्ण सोडून). स्नायू तंत्र-रेखांकित व अरेखित (कनीनिकेतील स्नायूसोडून). (४) रक्त, रक्तवाहिन्या व लसीका तंत्र. (५) मूत्राशयाचा पुष्कलसा भाग. (६)अष्ठीला ग्रंथी व मूत्रमार्ग वगळत मूत्र-जनन तंत्राचा इतर भाग.(७) अधिवृक्क ग्रंथीचा बाह्यक,       परिहृदय गुहा, परिफुप्फुस गुहा व पर्युदर गुहेची मध्यस्तर जनित उपकला. (१) संपूर्ण आंत्रमार्गाचे  उपकलास्तर (काही भाग

सोडून).                 (२) आंत्रमार्गात उघडणाऱ्या ( यकृत, अग्नि पिंडासहित सर्व ग्रंथींच्या (लाल ग्रंथी वगळून) ग्रंथीचा पश्चखंड. अंतःस्तर कोशिका.(३) कर्णनलिका व मध्यकर्णा तील उपकलास्तर. (४) अवटू ग्रंथी, परावटू ग्रंथी यांचे उपकलास्तर. (५) स्वरयंत्र, श्वासनाल व श्वसनलिका, वायुकोश यांचे उपकलास्तर. (६) मूत्राशयाचे व मूत्रमार्गाचे पुष्कळसे उपकलास्तर.(७) अष्ठीला ग्रंथीतील उपकला.

कोणते भाग बनतात हे कोष्टक क्र. १ मध्ये दिलेले आहे. (कोष्टकातील संज्ञांच्या स्पष्टीकरणासाठी स्नायू तंत्र, तंत्रिका तंत्र, लसीका तंत्र, कान, डोळा, नाक, दात, अंतःस्रावी ग्रंथी इ. नोंदी पहाव्यात. या नोंदींत त्या त्या तंत्राच्या अथवा इंद्रियाच्या भ्रूणात होणाऱ्या विकासासंबंधीही अधिक माहिती दिली आहे.

कोष्ठक क्र. १ मधील वर्णनावरून लक्षात येते की, प्रत्येक स्तर शरीराचा विशिष्ट भाग उत्पन्न करतो. शरीरभाग या तीन आद्य स्तरांतील कोशिकांपासून निर्माण होत असले, तरी सुरुवातीस या सर्वच कोशिका (तिन्ही स्तरांतील) बहुशक्तिशाली असतात. काही कालावधीनंतर त्यांची ही शक्ती कमी होते परंतु अजिबात नाहीशी होत नाही. विसाव्या शतकात जननस्तरांची विशिष्ट ऊतक निर्माण करण्याची क्षमता असण्याचा सिद्धांत पूर्णपणे त्याज्य ठरविला गेला आहे.    अवयवांच्या पुढील वाढीत हे तिन्ही स्तर एकमेकांत गुंफलेले असतात व एकमेकांवर अवलंबून असतात. पूर्ण वाढलेल्या शरीरातील कोशिका मात्र विभेदित असतात म्हणजे स्नायू कोशिका, तंत्रिका कोशिका किंवा ग्रंथी कोशिका एकमेकींची जागा घेऊ शकत नाहीत. निरनिराळ्या विशिष्ट कोशिका मिळून कार्यक्षम अशी निरनिराळी ऊतके कशी तयार होतात,


हे आजपर्यंत न सुटलेले कोडे आहे.

आ. १८. (अ) जरायू व रस्नांकुरांची सुरवात : (१) जरायू, (२) भ्रूणबाह्य देहगुहा, (३) प्रारंभिक रसांकुर वृंत (देठ), (४) अपरा-आंत्र अंधवर्ध, (५) जरायु-मध्यस्तर, (६) संयोजी वृंत, (७) उल्ववाहिनी, (८) उल्बगुहा, (९) दुय्यम पीतककोश (आ) निरंकुरी जरायू व परिअंकुरी जरायू : (१) निरंकुरी जरायू, (२) भ्रूणबाह्य देहगुहा, (३) संयोजी वृंत (आता अधर बाजूने जोडलेला), (४) परिअंकुरी जरायू (अपरा क्षेत्र), (५) अवस्कर पटल, (६) अपरा नाल, (७) उल्बगुहा, (८) आद्यांत्र, (९) मुख-ग्रसनी कला, (१०) परिहृदय.

भ्रूण पोषण : निषेचनानंतर अगदी पहिल्या समविभाजनापासून तयार होणाऱ्या कोशिका आद्य अपक्वांड अवस्थेपासूनच मुळात कोशिकांतर्गत असलेल्या पोषणद्रव्यांचा उपयोग करतात. सुरुवातीस ही पोषणद्रव्ये सांद्रित केलेली असावीत. कोरकपुटीतील कोरकगुहा तयार होताच ही पोषणद्रव्ये काहीशी विरल स्वरूपात कोशिका अभिशोषित करतात. प्रत्यक्ष कोरकपुटी अंडवाहिनी वं गर्भाशय यांच्या स्रावापासून पोषणद्रव्ये मिळवीत असावी. याशिवाय प्रत्यक्ष रोपणाच्या वेळी तिच्या सभोवती गोळा होणाऱ्या भ्रूण-पोषापासून कोरकपुटीचे पोषण होते. भ्रूणाच्या वाढीबरोबरच त्याची पोषणद्रव्यांची गरज वाढते व ती पुरवण्याकरिता मातेचे रक्त उपयोगात आणले जाते. कोरकपुटीचे जरायुपुटिकेत रूपांतर होते व पुढील वाढीबरोबर तिला काही प्रवर्ध फुटतात. त्यांना जरायु-रसांकुर  म्हणतात. या रसांकुरांचा उद्देश पोषणद्रव्ये अधिक प्रमाणात शोषण करू शकणारा पृष्ठभाग वाढविणे हा असतो. सुरुवातीस रसांकुर संपूर्ण भ्रूणवेष्टावर असतात. कालांतराने फक्त तळाकडील भागीच ते उरतात आणि वाढतात व या भागाला ‘परिअंकुरी जरायू’ म्हणतात व उरलेल्या भागाल ‘निरंकुरी जरायु’ म्हणतात. त्यापासून अपरा (वार) तयार होते. अपरेपासून परजीवी असलेल्या भ्रूणाला व गर्भाला पोषक पदार्थ आणि ऑक्सिजन मातेच्या रक्तातून तर्षणाने [⟶ तर्षण] पुरविले जातात. याच क्रियेने गर्भातील त्याच्य पदार्थ मातेच्या रक्तात मिसळतात. मातेच्या रक्तकोशिका किंवा गर्भाच्या रक्तकोशिका केव्हाही एका रुधिराभिसरणातून दुसऱ्यात शिरत नाहीत. परिअंकुरी जरायू मातेच्या रक्तातच तरंगत असते.

गर्भकला : (भ्रूणकला किंवा भ्रूणबाह्यस्तर). आद्य कोरकखंडांपासून  तयार होणाऱ्या काही गर्भ-बाह्य भागांचा यात समावेश होतो : (अ)  ⇨जरायू, (आ) ⇨ उल्ब, (इ) पीतककोश, (ई) ⇨ अपरापोषिका विपुटी अथवा अंधवर्ध (एका टोकास बंद असलेला पिशवीसारखा भाग).

(अ)जरायू व त्याची स्थित्यंतरे यांचे वर वर्णन केलेले आहे.

(आ) उल्ब : भ्रूणबाह्यस्तराशी सलग असलेली ही कला उल्बगुहेचे वेष्टन असते. कोरकपुटी रोपणापासूनच उल्बगुहा तयार होऊ लागते. या गुहेतील द्रवाला उल्बद्रव म्हणतात व तो हळूहळू वाढत जाऊन गुहेची पोकळीही वाढवतो. ही वाढ गर्भारपणाच्या सहाव्या ते सातव्या महिन्यापर्यंत चालू असते. नंतर हा द्रवसंचय कमी होतो व गर्भारपणाच्या शेवटास एक लिटर उल्बद्रव असतो. विकसित होत असलेला भ्रूण या द्रव माध्यमात तरंगत असल्यामुळे त्याच्या नाजूक भागांना संरक्षण मिळते व गर्भारपणाच्या शेवटच्या काळात गर्भाला सहज हालचाली करता येतात. याशिवाय गर्भाला बाह्य आघातापासून संरक्षण मिळते. उल्बद्रव दोन लिटरपेक्षा वाढल्यास ‘अति-उल्बोदकता’ आणि त्याच्या कमतरतेला ‘अल्प-उल्बोदकता’ म्हणतात. ही दोन्ही कधी कधी गर्भाच्या अपसामन्यतेशी निगडित असतात. उल्बद्रवाच्या उत्पादनात मातेचा, गर्भाचा किंवा दोघांचाही कितपत भाग असतो, हे अद्याप अनिश्चित आहे. त्यात दोन प्रतिशतपेक्षाही कमी घन पदार्थ असून त्यामध्ये यूरिया, अकार्बनी लवणे, अल्पसे ग्लुकोज व प्रथिने असतात. मातेचे रक्त, गर्भाचे रक्त व उल्बद्रव्य यांच्या दरम्यान अपरेच्या माध्यमातून व गर्भाच्या मूत्रपिंडाद्वारे जलद देवाणघेवाण होते. गर्भारपणाच्या शेवटी शेवटी हा द्रव गर्भाचे मूत्र त्यात मिसळण्यामुळे विरल बनतो. प्रसूतीच्या वेळी डोक्याच्या पुढे तयार झालेली अग्र उल्बद्रव पिशवी एखाद्या पाचरीसारखी गर्भाशयाचे तोंड रुंद करण्यास मदत करते [⟶ प्रसुतिविज्ञान].


(इ)पीतककोश : अंतःस्थ कोशिका पुंजापासून निघणाऱ्या काही कोशिकांपासून आद्य पीतककोश तयार होतो. या पिशवीवजा वाढीच्या छताच्या कोशिकांच्या घडीपासून नळीसारखा भाग बनतो व त्याचे आतडे बनते. पीतककोशाचा पुष्कळसा भाग कालांतराने नाहीसा होतो. काही पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये (काही जलचर व पक्षी) पीतककोश बराच मोठा असतो व त्यात पोषक पीतकाचा साठा असतो. मानवात व तर काही सस्तन प्राण्यांत पीतककोश जवळजवळ नसतोच.

(ई)अपराकोशिका विपुटी किंवा अंधवर्ध : आद्य पीतककोशापासून तयार होणाऱ्या अंतःस्तरीय कोशिकांच्या नलिकेला अपरापोषिका अंधवर्ध म्हणतात. त्याची सुरुवात प्रश्चांत्रापासून (आतड्याच्या मागच्या भागापासून) होते. त्याचे महत्त्व त्याच्या रक्तवाहिन्यांसंबंधीच असते. या रक्तवाहिन्या गर्भ व अपरा यांच्या दरम्यान रक्ताची ने-आण करतात.

आ. १९. सगर्भ गर्भाशय (दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीस) : (१) पार्श्व गर्भशय्या, (२) गर्भशय स्नायुभित्ती, (३) आधार गर्भशय्या, (४) उल्बगुहा, (५) नाळ, (६) पीतककोश, (७) गर्भशय्या संपुट, (८) गर्भाशय पोकळी, (९) गर्भाशय ग्रीवा.

गर्भशय्या : निषेचन व कोरकपुटी रोपण यशस्वी झाल्याबरोबर भ्रूणपोषकापासून जनन ग्रंथिपोषक हॉर्मोन उत्पन्न होऊ लागते व ते पीतपिंडाची (अंडमोचनानंतर कोरकपुटीपासून तयार होणाऱ्या १ ते १.५ सेंमी.  व्यास असलेल्या पिंडाची) क्रियाशीलता  (गर्भरक्षक नावाचा अंतस्राव स्रवण्याची क्रिया) चालू ठेवते. ऋतुस्राव बंद होतो व रक्तवाहिन्यांची वाढ झालेल्या गर्भाशय अंतःस्तराला ‘गर्भशय्या’ म्हणतात. या भागात पुष्कळ कोशिका तयार होतात, त्यांना गर्भशय्या कोशिका म्हणतात. कोरकपुटीचे रोपण पूर्ण होताच तयार होणाऱ्या गर्भशय्येच्या भागांना निरनिराळी नावे दिली जातात. गर्भ व गर्भकला यांना वेढणाऱ्या भागाला  ‘गर्भशय्या संपुट’, गर्भ व गर्भाशय भित्ती यांच्या दरम्यान असणाऱ्या भागाला  ‘आधार गर्भशय्या’ म्हणतात. आधार भागात अपरा तयार होते. ज भाग गर्भाशयाच्या अस्तरासारखा उरतो त्याला  ‘पार्श्व गर्भशय्या’ म्हणतात. गर्भाच्या वाढीबरोबर तिसर्यात महिन्यात संपुट व पार्श्व भाग एकमेकांशी संलग्न होतात आणि पाचव्या महिन्यात संपुट भाग अतिशय पातळ बनतो. पुढील काही महिन्यांत संपुट भाग जवळजवळ नाहीसा होतो व पार्श्व भागाचा अपकर्ष होतो. जरायू व गर्भाशय अंतःस्तर यांचा एवढा दाट संपर्क असतो की, प्रसूतीच्या वेळी गर्भशय्येचा सर्व भाग (जो अंतःस्तरापासूनच बनलेला असतो) गर्भाच्या ऊतकाबरोबरच बाहेर पडतो. म्हणून या भागाला गर्भशय्या म्हणण्याऐवजी  ‘पतनिका’ वा ‘अस्थायी गर्भकोश’ असेही म्हणता येईल.

भ्रूणवाढ : आकारमानात होणारी वाढ येथे विचारार्थ घेतली आहे. वाढ हा शब्द जीववैज्ञानिक दृष्ट्या गट, व्यक्ती, शरीर, शरीरभाग, अवयव किंवा ऊतकाकरिताही वापरतात. भ्रूणवाढ ही प्रामुख्याने ऊतक वाढच असते. कोशिका-गुणन (विभाजनाने कोशिकांच्या संख्येत होणारी वाढ) हा आकारवृद्धीचा प्रमुख घटक असला, तरी केवळ त्यामुळेच वृद्धी होत नाही. त्यामुळे वाढीत भाग घेणारी फक्त काही एकके तयार होतात. वाढीस कारणीभूत असणाऱ्या प्रमुख गोष्टींमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो : (१) सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपलब्ध पोषक पदार्थांपासून नवा सजीव पदार्थ (कोशिका द्रव्य) निर्माण करणे. (२) जलवृद्धी ही दुसरी गोष्ट. जिच्यामुळे आकारमान वाढते. सुरुवातीस मानवी भ्रूण ९८% पाणीच असतो. प्रौढ वयात पाण्याचे प्रमाण ७०% असते. (३) कोशिकांच्या दरम्यान असणाऱ्या पदार्थांची वाढ अथवा अभिवृद्धी वाढीस कारणीभूत असते. या कोशिकाबाह्य पदार्थांमध्ये जेली, तंतू, उपास्थी (कूर्चा) व अस्थीतील आधारद्रव्य यांचा समावेश होतो. या क्रियांमुळे नवजात अर्भकाचे वजन मूळच्या युग्मजापेक्षा हजारो पटींनी वाढते.

ऊतक वाढ तीन प्रकारांनी होते : (१) गुणनक्षमताजन्य, (२) कोशिका आकारमानवृद्धी आणि (३) अभिवृद्धी.

(१) गुणनक्षमता : सर्व सस्तन प्राण्यांतील कोशिकांची संख्यावाढ क्रमशः होणाऱ्या जलद समविभाजनाने होते. एककोशिकीय युग्मजापासून नऊ महिन्यांत नवजात अर्भकाच्या शरीरातील सु. २ अब्ज कोशिका तयार होतात. निरनिराळ्या ऊतक कोशिकांतील ही क्षमता निरनिराळी असते. विभेदन व पक्वता यांमुळे या क्षमतेते बदल होतात. काही ऊतक कोशिकांची ही क्षमता जन्मभर टिकून असते [उदा., बाह्यत्वचा, आंत्रमार्गातील उपकला व रक्तातील लाल कोशिका निर्माण करणाऱ्या मज्जाभ (अस्थींच्या पोकळ भागातील अस्थिमज्जा नावाच्या पदार्थातील) कोशिका]. काही कोशिकांच्या बाबतीत याउलट भ्रूणीय अवस्थेतच कार्यभाग संपताच ही क्षमता लोप पावते (उदा., तंत्रिका कोशिका). गुणनक्षमतेवर आनुवंशिक, पोषणज, अंतःस्रावी ग्रंथिजन्य, औष्णिक, यांत्रिक, प्रकाशकीय इ. अनेक कारकांचा परिणाम होतो. कोशिकांच्या गुणनक्षमतेतील या फरकाचे कारण अजून निश्चितपणे समजलेले नाही. अलीकडील संशोधनानुसार ऊतकातच काही विशिष्ट पदार्थ असतात आणि ते समविभाजनावर नियंत्रण करीत असावेत. या पदार्थांना ‘कॅलोन्स’ म्हणतात.


(२) आकारमानवृद्धी : ऊतकातील प्रत्येक कोशिकेच्या आकार मानातील वाढ येथे सूचित आहे. काही अपृष्ठंवंशी प्राण्यांमध्ये (उदा., डिप्टेरा गणामधील कीटकांमध्ये) लाला ग्रंथीच्या ऊतक कोशिकांची वाढ इतर कोशिकांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण असते. सस्तन प्राण्यात तंत्रिका कोशिका आणि तंत्रिकाश्लेष्म कोशिका [⟶ तंत्रिका तंत्र] यांच्या पृष्ठीय क्षेत्रात व कोशिकाद्रव्यात जन्मानंतर वरीज वाढ होते. सगर्भ गर्भाशयाच्या अरेखित स्नायूतील कोशिका वाढ याच प्रकारची असते. कोशिकाद्रव्य वाढ केंद्रकातील डीएनएशी निगडित असावी, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. कोशिकाद्रव्य व केंद्रक यांचे एकमेकांशी निश्चित प्रमाण असते. जेव्हा कोशिकाद्रव्याची बरीचशी वाढ होते तेव्हा हे प्रमाण कायम ठेवण्याकरिता पर्यायी योजना अमलात आणल्या जातात.

आ. २०. विकासाल्या चौथ्या व पाचव्या आठवड्यांतील भ्रूण (आढवा छेद) : (अ) कायखंडनिर्मितीची सुरुवात : (१) तंत्रिका शिखा, (२) तंत्रिका पट्टिका, (३) तंत्रिका दुमड, (४) पृष्ठरज्जू, (५) पृष्ठीय महारोहिणी, (६) पीतककोश, (७) कायखंड प्रारंभ (आ) काद्यखंडनिर्मितीची प्रारंभिक अवस्था : (१) तंत्रिका शिखा, (२) तंत्रिका नलिका, (३) कायखंड, (४) पीतककोश (इ) कायखंडनिर्मिती काही दिवसांनंतर (१) कायखंड, (२) आद्याशयस्तर, (३) पीतक वृंत, (४) पीतककोश, (५) नाळ, (६) आद्यकायास्तर, (७) पृष्ठरज्जू, (८) आंत्र.

मोठ्या कोशिकाभेवती लहान उपकोशिका तयार होतात व सर्व कोशिका मिळून शरीरक्रियात्मक एकक बनते.

(३) कोशिकाबाह्य ऊतक वाढ किंवा अभिवृद्धी : अस्थी व उपास्थी यांची वाढ कोशिकाबाह्य ऊतक वाढीने होते. तंतुमय संयोजी ऊतक, कंडरा (अस्थींना वा उपास्थींना स्नायू घट्ट बांधणारे तंतुसमूह), संधिसंपुटे (सांध्यांना वेष्टणाऱ्या तंतुमय पिशव्या), स्वच्छमंडल (बुबुळाचा पुढचा पारदर्शक भाग), कंडरा कला (स्नायू एकत्र बांधणाऱ्यां पातळ, रूंद व चपट्या कंडरा) व प्रावरणी (त्वचेखालील आणि स्नायू, तंत्रिका व रक्तवाहिन्या यांच्यामध्ये असणाऱ्या, अवकाशी म्हणजे पोकळसर संयोजी ऊतकांचे थर) हे भागही अशाच प्रकाराने वाढतात.

ऊतक वाढीचे जरी वरील प्रकार वर्णिले असले, तरी प्रत्यक्षात ते एकमेकांत गुंफले जाऊनच भ्रूणवाढ होते. याशिवाय ते कोशिका विभेदन, ऊतक क्रियाशीलता, कोशिका वार्धक्य व जीर्णता या सर्वांशी निगडित असतात. काही ठिकाणी ऊतक घट, अपकर्षा, कोशिकामृत्यू व ऊतक काढून घेणे या गोष्टीही भ्रूणवाढीत महत्त्वाच्या असतात. या सर्व गोष्टींमुळे भ्रूणवाढीकरिता आवश्यक व विशिष्ट कोशिका पुंज तयार होतात आणि विशिष्ट घडण (उदा., घट्ट गोळा, पोकळ चेंडू, नळ्या, पदर, स्तर वगैरे) तयार होते. भ्रूणवाढीत कोशिकावृद्धीची निरनिराळी गती महत्त्वाचा भाग घेते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकाच भ्रूणीय ऊतकापासून तयार होणारी तीन तंत्रे–रोहिणी तंत्र, नीला तंत्र व लसिकावाहिनी तंत्र-विशिष्ट कार्याकरिता निरनिराळ्या गतींनी वाढतात.

कायखंडनिर्मिती : (कायखंडयुक्त भ्रूण आणि तंत्रिका ऊतक निर्मितीस प्रारंभ होणारी अवस्था). कायखंडपूर्व अवस्थेतील भ्रूण एक साधी गोलाकार चकती असून तिसऱ्या आठवड्यात काही अक्षीय वाढीमुळे तिची लांबट आकाराची पट्टिका बनते. त्यानंतर कायखंड पडण्यापूर्वी भ्रूण कुंभाकृती असतो. या चापट कुंभाकृती असतो. या चापट कुंभाकृती भ्रूणाचा आकार बदलून नलिकाकार भ्रूण तयार होतो.

आ. २१. ३. ४ मिमी. लांबीच्या भ्रूणाचा बाह्याकार (कायखंडनिर्मितीनंतर काही दिवसांनी) : (१) कायखंड (हे स्पष्ट दिसतात), (२) नाळ, (३) शेपूट, (४) कर्ण स्तरपट, (५) नेत्र काच (भिंग) स्तरपट, (६) परिहृद्‌ उंचवटा.

या नलिकेची डोक्याकडील बाजू शेपटाकडील बाजूपेक्षा अधिक रूंद होते व भ्रूणास्थ मध्यस्तरापासून कायखंड तयार होण्यास सुरुवात होते. कायखंड तयार होत असताना ते नाजूक अशा बाह्यस्तराच्या आच्छादनाखाली स्पष्ट दिसतात. कायखंडयुक्त भ्रूणाच्या पृष्ठीय भागावर प्रथम ‘तंत्रिका पन्हळ’ दिसू लागते व तिच्या दोन्ही बाजूंस ‘तंत्रिका दुमडी’ असतात. या दुमडी एकमेकींजवळ येऊन ‘तंत्रिका-नलिका’ बनते. नलिकेची डोक्याकडील बाजू पुष्कळ रुंद असते. तिची अग्र व पश्च छिद्रे दुमडी पूर्णपणे संलग्न होताच बंद होतात. दुमडी व बाह्यस्तर ज्या ठिकाणी एकत्र येतात तेथे  तंत्रिकाबाह्यास्तर कोशिकांच्या लाबट पट्ट्या तयार होतात. त्यांपासून मेरुरज्जू गुच्छिका व परिसरीय तंत्रिका तंत्रांचा काही भाग तयार होतो. नलिकेपासून मेंदू व मेरुरज्जू तयार होतात.

तंत्रिका पन्हळीच्या खाली व नलिकेच्या पृष्ठीय भागावर मध्यस्तरापासून जाड उभा थर बनतो व त्याला ‘पृष्ठरज्जू’ म्हणतात. हा भाग भ्रूणाला आधार देण्याचे कार्य करतो व त्यापासून भावी मणके तयार होतात. भ्रूणीय मध्यस्तरापासून निरनिराळे शरीरभाग तयार होतात व त्यांना पुढीलप्रमाणे नावे दिल जातात :

(१)हृदोत्पादक मध्यस्तर : हृदय तयार होणारा भाग.  (२)  पराअक्षीय मध्यस्तर : यापासून दोन्ही बांजुंचे कायखंड तयार होतात. (३) मध्यस्थ मध्यस्तर : या पासून अधिवृक्क ग्रंथींचा बाह्यक, जनन ग्रंथी व वृक्क बनतात. (४) पार्श्व पट्टिका मध्यस्तर : याचे देहगुहेमुळे दोन थर बनतात. एका थरापासून शरीरभित्ती तयार होते व दुसरीपासून आंत्रभित्ती बनते. या थरांना अनुक्रमे ‘आद्य कायास्तर’ व ‘आद्याशयस्तर’ म्हणतात.


आ. २२. पाचव्या आठवड्याच्या सुरूवातीच्या मानवी भ्रूणाचा बाह्याकार : वरचा डोक्याचा भाग हृदयाच्या उंचवट्यावर टेकलेला असून कायखंडनिर्मिती स्पष्ट दिसत आहे. १२.५ मिमी. पेक्षाही जास्त लांबीच्या भ्रूणात मेंदू व हृदय या महत्त्वाच्या अवयवांनी दोन तृतीयांश भाग व्यापला आहे. पुढील भागी दांडीसारखी नाळ दिसत आहे.

पार्श्वपट्टिका मध्यस्तरात लहान लहान पोकळ जागा तयार होतात  व त्या सर्व संमीलित होऊन देहगुहा बनते. या देहगुहेचा जो भाग  हृदोत्पादक मध्यस्तराशी निगडित असतो त्याची ‘परिहृदय गुहा’ बनते आणि उरलेल्या भागापासून ‘परिफुप्फुस गुहा’ व ‘पर्युदर गुहा’ बनतात.


आ. २३. मानवी भ्रूणाच्या वाढीच्या काही अवस्था

पराअक्षीय मध्यस्तराची लहान लहान भागांत विभागणी अंडमोचनानंतर २० दिवसांनी सुरू होते व ती पस्तिसाव्या ते चाळीसाव्या दिवसापर्यंत चालू असते. ही विभागणी तिसाव्या दिवशी जवळजवळ पूर्ण झालेली असते व २८ ते ३० समखंड तयार होतात. या खंडांना कायखंड म्हणतात. एकूण ४३ ते ४४ खंडजोड तयार होतात. भ्रूणवयाचा अंदाज येण्याकरिता कायखंडनिर्मितीच्या प्रक्रियेचा उपयोग करतात. पहिला कायखंड विसाव्या दिवशी आणि पुढच्या प्रत्येक दिवशी तीन खंड मिळून तिसाव्या दिवशी तीस कायखंड तयार होतात. त्यानंतर ही निर्मिती मंदावते. ही निर्मिती चालू असताना भ्रूणातील इतर भागांतही बदल होत असतात.

भ्रूण बाह्याकार :  भ्रूणशरीर वाढत असताना वाढ-विस्तार प्रथम डोक्याच्या भागामध्ये व नंतर शेपटाच्या भागाकडे होतो. सातव्या व आठव्या  आठवड्यांत डोके अधिक सरळ बनते आणि धडाच्या खालच्या भागाची वक्रता कमी होते. प्रमुख्याने हृदय व यकृत यांच्या उंचवट्यांमुळे शरीराच्या अभ्युदरीय (उदराकडील) भागाचा जो आकार बनतो, तो बदलून छाती व पोट मिळून अधिक गोलाकार बनतो. एके वेळी भ्रूणाच्या लांबीच्या एकपंचमांश लांबी असलेली शेपूट अपकर्षामुळे व नितंबांच्या वाढीमुळे जवळजवळ दिसेनाशी होते. चेहरा पुष्कळसा  मानवी आकार धारण करतो डोळे, कान व दोन्ही जबडे ओळखता येतात. डोक्याच्या बाजूस असणारे डोळे त्याच्या पुढच्या भागात येतात. नाकाचा दांडा नसल्यामुळे नाक बसके असून नासारंध्रे खाली उघडण्याऐवडी अग्रदिशेकडे उघडलेली दिसतात. वरच्या आद्य ग्रसनी चापांपासून (घशाच्या कमानींसारख्या भागांपासून वरचा व खालचा जबडा तयार होतो आणि बाह्यकर्णही तयार होतात. उरलेले चाप एकमेकांत समाविष्ट होऊन दिसेनासे होतात व त्यांपासून मान तयार होते. बाह्य जननेंद्रियांची आद्यांगे दिसू लागतात पण ती व्यवच्छेदक (निराळेपणा दर्शविणारी) व लिंगदर्शक नसतात.


आठव्या आठवड्याच्या शेवटास २५ मिमी. लांबीच्या भ्रूणात बहुतेक सर्व अंतःस्थ अवयवांची आद्यांगे तयार झालेली असतात  आणि बाह्यांगांची वैशिष्ट्ये उमटलेली असतात. पुढील वाढ फक्त योग्य तेवढे रूपांतर घडवून आणते. अंतःस्थ  अवयवांची वाढ आणि विशिष्टीकरण होत जाते. आठ आठवडे पूर्ण होण्याच्या सुमारास तंत्रिका-स्नायू यंत्रणा काहीशी पूर्णत्वास पोहोचल्यामुळे नाजूक उद्दीपनांना प्रतिसाद मिळू शकतो.

आ. २४. भ्रूण बाह्याकारातील बदल : (अ) ३७ दिवसांचा भ्रूण : (१) नाळ, (२) पायाचे आद्यांग, (३) यकृताचा उंचवटा, (४) हृदयाचा उंचवटा, (५) हाताचे आद्यांग, (६) कायखंड (आ) ४७ दिवसांचा भ्रूण : (१) प्रबाहू, (२) पाऊल, (३) बाह्यकर्ण, (४) बाहू किंवा भुज, (५) यकृताचा उंचवटा (इ).६० दिवसांचा भ्रूण : (१) ग्रैव (मानेचा) भाग, (२) मांडी, (३) पाय (टांग), (४) जनन गुलिका, (५) बाहू, (६) बाह्यकर्ण.

दुसरा महिना संपताच भ्रूणाची लांबी ३० मिमी. होते. या अवस्थेनंतर जन्म होईपर्यंत ‘भ्रूण’ या संज्ञेऐवजी ‘गर्भ’ ही संज्ञा वापरतात.

आता गर्भ अधिक मानव सदृश दिसू लागतो. डोके मात्र बरेच असमानतः वाढलेले असते. नाळेत उतरलेले आतड्याचे वेटोळे तीमधून उदरगुहेत काढून घेतले जाते. बाह्यकर्ण डोळ्यांच्या पातळीवर येतात आणि पापण्या चिकटून बंद होतात. नखे तयार होण्यास सुरुवात होते. बहुतेक सर्व अस्थीमधील अस्थिभवन केंद्रे तयार होतात. बाह्य जननेंद्रियावरून लिंग ओळखता येते.

चौथ्या महिन्यात चेहऱ्‍यात प्रमुख बदल होतात. चेहरा रुंद असला, तरी डोळे एकमेकांजवळ येतात. नाळ उदरभित्तीवर काहीशी वर जोडल्यासारखी होते. पाचव्या महिन्यात अंग गर्भरोमांनी [⟶ केस] आच्छादिले जाते. तसेच डोक्यावर काही केस दिसतात. त्वचा कमी पारदर्शक बनते. मातेला गर्भचलन (गर्भाच्या हालचालीचा) बोध होतो अथवा प्रथम गर्भस्पंद जाणवतो. सहाव्या महिन्यात भुवयांचे व पापण्यांचे केस स्पष्ट दिसतात. त्वचेवर सुरकुत्या पडतात. सातव्या महिन्यात गर्भ एखाद्या निर्जलीभवन झालेल्या म्हाताऱ्‍यासारखा दिसतो. सुरकतलेली त्वचा भ्रूण स्नेह द्रव्याने (पांढुरक्या मेणासारख्या पदार्थाने) आच्छादिली जाते. पापण्या उघडतात. आठव्या महिन्यात त्वचेखाली वसासंचय (स्निग्ध ऊतकाचा संचय) होतो. नवव्या महिन्यात त्वचेची लाली कमी होऊन ती फिकट बनते. सुरकुत्या नाहीशा होतात आणि धड व अवयव भरीव दिसतात. पूर्ण वाढलेल्या गर्भाचे डोके काहीसे मोठेच असते. हातांची लांबी पायापेक्षा किंचित  अधिक असते. गर्भरोम नाहीसे झालेले असून भ्रूण स्नेह द्रव्य अंगभर पसरलेले असते. नखे वाढून वोटांच्या टोकांपर्यंत आलेली असतात. नाळ उदरभित्तीच्या मध्यबिंदूवर असते. वृषण पूर्णपणे वृषणकोशात उतरलेले असतात. स्त्री लिंगी गर्भात बाह्यजननेंद्रियातील फट नाहीशी होते.

कोष्टक क्र. २. भ्रूणाचे वय, उंची व वजन
निषेचनापासूनचे वय (महिने) उंची (बसल्या स्थितीत)(मिमी.) वजन  (ग्रॅम)
२.२५ २.२५
३.७५ २५
१३५ १७०
१८५ ४४०
२२५ ८२०
२७० १,३८०
३१० २,२२०
९,३६० ३,१५०

अवद्यवांची वाढ : सर्वसाधारण भ्रूणवाढीबद्दलची माहिती वर दिली आहे. निरनिराळ्या  अवयवांच्या वाढीविषयी थोडक्यात माहिती खाली दिली आहे. या अवयवांवरील स्वतंत्र नोंदीत त्यांच्या भ्रूणविज्ञानासंबंधी अधिक माहिती दिली आहे. अवयव वाढीची विभागणी त्यांच्या मूळ जननस्तरावरून केलेली आहे.


बाह्यस्तरापासून निर्मित भाग : (१) त्वचा : बाह्यत्वचा बाह्यस्तरापासून तयार होते. सुरुवातीच्या एककोशिकीय थराचे बहुकोशिकीय थरात रूपांतर होते. थराच्या आधार कोशिकांत रंजककण तयार होतात. हात व तळपाय यांतील बाह्यत्वचा अधिक जाड व वैशिष्ट्यपूर्ण बनते. अंतस्त्वचा तंतुमय असून ती मध्यस्तरापासून बनते आणि बाह्यत्वचेला आधार देण्याचे कार्य करते. नखे बोटांच्या टोकावरील

आ. २५. त्वचा वाढ व केसनिर्मिती : (अ) तिसऱ्‍या महिन्यातील त्वचा : (१) अधिरोमस्तर, (२) बाह्यत्वचा, (३) मध्यस्तर (आ) गर्भावस्था संपण्याच्या सुमारास त्वचेत निर्माण होणारा रोमपुटक : (१) विकासावस्थेतील केस, (२) आद्य रूपातील त्वक्-स्नेह ग्रंथी, (३) केशमूल, (४) रोमपुटक, (५) मध्यत्वचा, (६) जननस्तर, (७) बाह्यत्वचा.

बाह्यत्वचेपासून बनतात व त्याची सुरुवात पाचव्या महिन्यात होते. जन्मापूर्वी  एक महिना अगोदर नखे बोटांच्या अग्रापर्यंत वाढलेली असतात. फक्त सस्तन प्राण्यांतच केस आढळतात व ते बाह्यत्वचेपासून तयार होतात. पहिल्या वाढीला गर्भरोम म्हणतात व ती जन्मापूर्वीच झडून जाते. केस गळून पडण्याची व वेळोवेळी पुन्हा तयार होण्याची क्रिया जन्मभर चालू असते. भ्रूण वा गर्भ वयाच्या सहाव्या महिन्यापर्यंत बाह्यात्वचेला ‘अधिरोमस्तर’ म्हणतात. त्वक्स्नेह ग्रंथी केसाभोवतालच्या उपकला कोशिकांपासून बनतात. घर्म ग्रंथींची सुरुवात चौथ्या महिन्यात बाह्यस्तरातील कोशिकांतून होते. सस्तन प्राण्यांचे वैशिष्ट्य असलेल्या स्तन ग्रंथी विशेषीकृत घर्म ग्रंथीच असतात. पाचव्या महिन्यात प्रत्येक स्तन ग्रंथीची सुरूवात १५–२० भरीव कोशिकांच्या दांड्यापासून होते व त्या आद्य संयोजी ऊतकात वाढतात. या दांड्या नंतर पोकळ बनतात व स्तन ग्रंथीतील दुग्धवाहिन्यांचे कार्य करतात. बाल्यावस्थेच्या शेवटापर्यंत स्त्री व पुरुष बालकातील स्तन ग्रंथी सारख्याच असतात. [⟶ त्वचा घर्म ग्रंथि स्तन].

(२) मुख व गुदद्वार : मुखाची सुरुवात आद्यमुखापासून होते. आद्य वरचा जबडा व आद्य खालचा जबडा या दोन उंचवट्यांच्या दरम्यान एक खोलगट भाग असतो. या खोलगट भागाच्या तळाशी जो पातळ कोशिकांचा पडदा असतो त्या ठिकाणी बाह्यस्तर आणि अंतःस्तर एकमेकांत मिसळलेले असतात. चौथ्या आठवड्यात हा पापुद्रेवजा पडदा फाटतो आणि बाह्यस्तरजन्य मुख व अंतःस्तरजन्य ग्रसनी (घसा) एक होतात. बाह्यस्तर कोशिकांच्या पट्टिका मध्यस्तरात वाढून त्यांच्या द्विदल विभाजनापासून ओठ व गाल तयार होतात. दातांची निर्मिती जटिल असते. दंतवल्क बाह्यस्तरापासून तर इतर पुष्कळसा भाग, दंतिन आणि संधानक मध्यस्तरापासून बनतात [⟶ दात]. लाला ग्रंथी बाह्यस्तरापासून आणि आद्यमुखाच्या छतातील कशिकांपासून ⇨ पोष ग्रंथीचा अग्रखंड बनतो.

अंतःस्तरीय पश्चांत्र आणि बाह्यस्तरीय खळगा यांच्यामध्ये द्विस्तरीय अंडाकृती कोशिकांचा पडदा असतो व त्याला ‘आद्य गुद’ म्हणतात व त्यापासून गुदनाल व गुदद्वार बनतात. हा पापुद्रा आठव्या आठवड्यात फाटतो आणि गुदद्वार व गुदांत्र एकमेकांशी जोडली जातात. [⟶ गुदद्वार व गुदांत्र].

आ. २६. तीस कायखंड असलेल्या (तिसाव्या दिवशीच्या) भ्रूणतील तंत्रिका नलिकेचे पश्च दर्शन : (१) अग्र मेंदू, (२) मध्य मेंदू, (३) पश्च मेंदू, (४) मेरुरज्जू.

(३) तंत्रिका तंत्र : केंद्रीय तंत्रिका तंत्र, मेंदू व मेरुरज्जू यांनी बनणाऱ्‍या तंत्रिका तंत्राच्या या भागाची भ्रूणविज्ञानविषयक माहिती ‘तंत्रिका तंत्र’ या नोंदीत दिली आहे.

परिसरीय तंत्रिका तंत्र : यामध्ये (अ) मेरुरज्जू तंत्रिका आणि (आ) मस्तिष्क तंत्रिका यांचा समावेश होतो.

(अ)या तंत्रिका संवेदनावाहक व प्रेरक अशा दोन्ही प्रकारच्या तंतूंच्या बनतात. प्रत्येक तंत्रिका दोन मूळांपासून (पृष्ठीय व अभ्युदरीय) बनते. बाहु अथवा हाताकडे जणाऱ्या तंत्रिका भुज जालिकेपासून आणि पायाकडे जाणाऱ्या कटि-त्रिक् जालिकेपासून निघतात. भ्रूणाच्या वयाच्या पाचव्या आठवड्यातच संवेदनावाहक व प्रेरक तंत्रिका एकत्र वाढू लागून संपूर्ण परिसरीय तंत्रिका तंत्र वाढू लागते. कशेरुक दंडाची (पाठीच्या कण्याची) वाढ जलद होत असल्यामुळे तंत्रिका-मुळे ठराविक दोन कशेरुकांच्या (मणक्यांच्या) दरम्यानच बाहेर  पडावयाची असल्यामुळे तिरकस ओढली जातात. यामुळे पहिल्या  कटि-कशेरुकाच्या खाली या तंत्रिका-मुळांचा पुंज बनतो. त्याला ‘मेरुपुच्छ’ म्हणतात.


(आ) पाचवी, सातवी, नववी व दहावी मस्तिष्क तंत्रिका भ्रूणातील आद्य ग्रसनी चापाशी संबंधित असतात. त्यांची सुरुवात मेरुरज्जू तंत्रिकांप्रमाणेच होते. पहिली अथवा गंध तंत्रिका वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिच्या कोशिका नाकाच्या वरच्या भागातील गंधकलास्तरात असतात व तेथून निघणारे अक्षदंड मेंदूकडे नेले जातात. दुसरी अथवा नेत्र तंत्रिका खऱ्‍या  अर्थाने तंत्रिका नसून, डोळ्याचा जालपटल हा काहीसा दूर झालेला मेंदूची भाग मेंदूला जोडण्याचे कार्य करतात. तीन, चार, सहा व बारा या क्रमांकांच्या मस्तिष्क तंत्रिका संपूर्णपणे प्रेरक आहेत. आठवी अथवा श्रवण तंत्रिका पूर्णपणे संवेदनावाहक असते. दहावी अथवा प्राणेशा तंत्रिका मिश्र (संवेदी व प्रेरक) तंतुंची बनते आणि बारावी अथवा अधोजिव्हा तंत्रिका पूर्णपणे संपूर्ण प्रेरक असते.

स्वायत्त तंत्रिका तंत्र : सर्व अंतस्त्ये (देहगुहेतील हृदय, वृक्क इ. इंद्रिये), अरेखित स्नायू, हृद् स्नायू यांना आणि शरीरातील ग्रंथींना या तंत्रिका तंत्राचा पुरवठा होतो. हे शरीरभाग भ्रूणाच्या आद्य अंतःस्तरापासून बनतात.  याशिवाय आद्य कायास्तरापासून बनणाऱ्‍या रक्तवाहिन्यांना व काही ग्रंथींना या तंत्राचा पुरवठा असतो. हे तंत्र प्रामुख्याने द्वि-तंत्रिका कोशिकांचे बनलेले असते : (१) तंत्रिका गुच्छ पूर्व-कोशिका आणि (२) तंत्रिका गुच्छ पश्च-कोशिका. यांशिवाय या तंत्राचे (१) अनुकंपी व (२) परानुकंपी असे दोन प्रमुख विभागाही आहेत.

तंत्रिका शिखा या भागापासून काही कोशिका स्थलांतरित होतात व त्यांपासून महारोहिणीच्या दोन्ही बाजूंस खंडयुक्त तंत्रिका ऊतकाचे पुंज तयार होतात. यांपैकी काही कोशिकांपासून स्वायत्त कोशिका गुच्छिका बनतात. या गुच्छिका एकमेकींस जोडल्या जाऊन ‘अनुकंपी तंत्रिका गुच्छिका साखळी’ तयार होते. काही आद्य तंत्रिका कोशिका या साखळीत भाग न घेता आणखी दूर जातात व त्यांपासून पार्श्व तंत्रिका गुच्छिका तयार होतात. काही आद्य तंत्रिका कोशिका जवळच्या अंतस्त्याशी संलग्न होतात किंवा प्रत्यक्ष त्यात शिरून पुरवठा करतात. यांना ‘अंतिम तंत्रिका गुच्छिका’ म्हणतात. पार्श्व तंत्रिका गुच्छिकांतील काही कोशिका दोन्ही बाजूंच्या अधिवृक्क ग्रंथींच्या मध्यस्तरीय भागात शिरतात. तेथे त्या एकत्रित वाढून अधिवृक्क ग्रंथींतील अंतःस्रावी कोशिका बनतात. ४३ दिवसांच्या भ्रूणातील स्वायत्त तंत्रिका तंत्राची वाढ ‘तंत्रिका तंत्र’ या नोंदीतील आ. ९ मध्ये दर्शविली आहे.

या ठिकाणी तंत्रिका तंत्रांच्या प्रसूतिपूर्व जीवनातील कार्यांचा आढावा घेणे योग्य ठरते. सुरुवातीसच हे नमूद करणे  आवश्यक आहे की, मानवी भ्रूण  व गर्भ यांच्यासंबंधी अत्यल्प माहिती प्राप्त झालेली आहे. भ्रूणातील तंत्रिका तंत्राची क्रियाशीलता मेरुरज्जूद्वारा होणाऱ्‍या काही प्रतिक्षेपी क्रियांतून (कोणत्याही प्रकारच्या बाह्य उद्दीपनामुळे निर्माण झालेल्या स्नायू यंत्रणेच्या अनैच्छिक प्रतिसादांतून) प्रथम दिसून येते. आठव्या आठवड्याच्या सुमारास म्हणजे भ्रूणाची लांबी  २५ मिमी. असताना स्पर्श प्रितसाद मिळतो. नवव्या किंवा दहाव्या आठवड्यात म्हणजे भ्रूणाची लांबी २५-४० मिमी. असताना उत्स्फूर्त हालचाल होऊ लागते. तळहाताची पकड प्रतिक्षेपी क्रिया आणि पादतल प्रतिक्षेप (पायाची बोटे तळपायाकडे वळणे) तिसऱ्या महिन्यात मिळतात. श्वसनक्रिया, चोखणे व गिळणे या क्रियांशी संबंधित असलेल्या प्रतिक्षेपी क्रिया जन्मापूर्वी निर्माण झालेल्या असतात. यांशिवाय डोळ्यांच्या हालचाली व बाहुली प्रतिक्षेपही तयार असतात. [⟶ प्रतिक्षेपी क्रिया].

(४) ज्ञानेंद्रिये : गंध, रुची, दृष्टी व श्रवण यांसंबंधींची थोडक्यात माहिती येथे दिली आहे.

(अ) गंध : डोक्याच्या भागाच्या टोकावर बाह्यस्तराच्या दोन जाड थरांपासून दोन खळगे तयार होतात आणि त्यांना गंध खळगे म्हणतात. या खळग्यांचे दोन कोश बनतात व त्यांचा अल्पसा भाग गंधज्ञान कार्यास योग्य असा बनतो. काही कोशिका आधार कोशिकांचे व काही तर्कूसारख्या (चातीच्या आकाराच्या) कोशिका गंध कोशिका बनतात. गंध कोशिकेच्या एका टोकावर गंधकेस असतात व ते उपकला कोशिकांच्या थराबाहेर डोकावतात. दुसऱ्‍या टोकापासून एक तंत्रिका तंतू मागे जाऊन अंत्यमस्तिष्क भागाशी जोडला जातो. चौथ्या आठवड्याच्या शेवटास सुरू होऊन आठ आठवड्यांच्या सुमारास हा संबंध प्रस्थापित होतो. [⟶ गंध].

(आ) रुची : बहुतेक सर्व रुचिकलिका (रुचीचे आकलन होणाऱ्‍या  खास तंत्रिका ज्यांत आहेत अशा कळीच्या आकाराच्या संरचना) जिभेवर तयार होतात. जीभ, टाळू व ग्रसनी यांवरील उपकला कोशिकांच्या जाड थरापासून रुचिकलिका बनतात. सातव्या, नवव्या व दहाव्या मस्तिष्क तंत्रिकांच्या संवेदी टोकाशी रुचिकलिका संबंधित असतात. [⟶ रुचि].


आ. २८. १३.२ मिमी. लांबीच्या भ्रूणातील डोळद्याचा छेद : (१) काचेवरील पृष्ठस्थ उपकला थर, (२) काच पुटिका, (३) वाढणारे काच तंतू, (४) बाह्यस्तर, (५) जालपटलाचा रंजक थर, (६) अक्षिवृंतकांची पोकळी, (७) जालपटलाचा तंत्रिका थर, (८) जालपटलाचा रंजक थर, (९) श्वेतपटल व मध्यपटल तयार होणारा मध्यस्तराचा भाग.

(इ) दृष्टी : अग्रमस्तिष्काच्या दोन्ही बाजूंस तयार होणाऱ्‍या  दोन कोशांपासून डोळ्यांची सुरुवात होते. या कोशांचे अक्षिचषकांत रूपांतर होते आणि प्रत्येक चषक मागे बारीक अक्षिवृंतकाने (देठासारख्या भागाने) मेंदूला जोडला जातो. अक्षिचषकाचा बराचसा भाग जालपटलात (डोळ्यातील प्रकाशग्राही भागात) रूपांतरित होतो. सहाव्या महिन्याच्या समुमारास तीन प्रकारच्या तंत्रिका कोशिकांचे तीन थर ओळखता  येतात : (क) दृष्टिकोशिका : प्रकाशग्राही शलाका किंवा शंकू असलेला थर, (ख) द्विध्रुवी कोशिका थर [ (क) आणि (ग) यांच्यामध्ये असलेला थर] आणि (ग) गुच्छिका कोशिका (ज्यंपासून अक्षदंड निघतात व ते अक्षिवृंतकाद्वारे मेंदूशी जोडले जातात). अक्षिवृंतकाचे दृक्‌तंत्रिकेत रूपांतर होते. चषकाच्या उरलेल्या पातळ कोशिका

आ. २७. १० मिमी. लांबीच्या (३७ दिवस वयाच्या) भ्रूणाशील डोळा : (१) काच पुटिका, (२) स्वच्छ मंडलीय बाह्यस्तर, (३) अक्षिवृंतक, (४) काचाम रोहिणी, (५) अक्षिचषकाचा आतील थर (जालपटल), (६) अक्षिचषकाचा बाहेरील थर (मध्यपटल).

थरापासून जालपटलाच्या रंजक कोशिका तयार होतात. डोळ्यातील काच (भिंग) बाह्यस्तर कोशिकांपासून बनते व त्याची सुरुवात पाचव्या आठवड्याच्या मध्यास होते.

अक्षिचषकाभोवतालच्या मध्यकोशिकास्तराच्या बाह्यस्तरापासून कठीण श्वेतपटल व पारदर्शक स्वच्छमंडल बनते. आतील थरापासून रक्तवाहिन्यायुक्त मध्यपटल बनते. स्वच्छमंडलाच्या अग्रभागी बाह्यस्तराच्या दोन घड्या तयार होतात व त्यांचे पापण्यांत रूपांतर होते. पापण्या व स्वच्छमंडल यांच्या दरम्यानची पोकळी नेत्रश्लेष्म-कोटर बनते. तिसऱ्‍या महिन्याच्या सुरुवातीस पापण्यांच्या मोकळ्या कडा एकमेकींस जोडल्या जातात व पाचव्या महिन्यात जोडलेल्या ठिकाणच्या कोशिका नाश पावतात व पापण्या एकमेकींपासून अलग होतात. नेत्रश्लेष्म-कोटरातील विशिष्ट जागेवरील कोशिकांपासून अश्रू ग्रंधी बनतात. [⟶ डोळा].

आ. २९. बाह्यकर्णांची वाढ : (अ) १० मिमी. लांबीच्या (३७ दिवसांच्या) भ्रूणातील बाह्यकर्ण : (१) कंठास्थी चापावरील उंचवटे, (२) पहिली बाह्य खाच, (३) अधोहनू चापावरील उंचवटे (आ) २० मिमी. लांबीच्या (४७ दिवसांच्या) भ्रूणातील बाह्यकर्ण : (१) अधोहनू चाप, (२) बाह्यकर्णमार्ग (इ) पूर्ण दिवसांच्या गर्भातील बाह्यकर्ण : (१) कर्णपाली, (२) बाह्यकर्णमार्ग.

(ई) श्रवण : अंतर्कर्ण भागात श्रवण ग्राहक व शरीर संतुलन संबंधीचे तंत्रिका ग्राहक असतात. अंतर्कर्णाची सुरूवात सात कायखंड असलेल्या अवस्थेपासून बाह्यस्तराच्या जाडसर कर्णस्तरपटातून होते. तीस कायखंड असलेल्या अवस्थेत ‘कर्णपुटक’ तयार होते आणि त्याचे (१) कर्णशंबूक (कर्णशंकू) भाग व (२) श्रोतृकुहर भाग (अंतर्कर्णातील हाडांनी बनलेल्या नलिकाकार पोकळीच्या म्हणजे सर्पिल कुहराच्या मध्यभागातील लंबवर्तुळाकार पोकळ भाग) यांत विभाजन होते. पहिल्या ग्रसनी कोष्ठाच्या प्रवर्धाचे मध्यकर्ण गुहेत रूपांतर होते. या गुहेपासून ग्रसनीकडे जाणाऱ्‍या प्रवर्धापासून ‘ग्रसनीकर्ण नलिका’ (तोंड, नाक, घसा व कानाचा पडदा यांमध्ये संबंध प्रस्थापित करणारी नलिका) तयार होते. मध्यकर्णातील मुद्‌गारास्थिका, ऐरणास्थिका व स्थापन्यस्थिका या अस्थिका (लहान हाडे) पहिल्या व दुसऱ्‍या  ग्रसनी चापांपासून बनतात आणि स्नायू मध्यस्तरापासून तयार होतात. कर्णपाली व बाह्यकर्णमार्ग मिळून बाह्यकर्ण बनतो. बाह्यकर्णमार्ग पहिल्या ग्रसनी पन्हळीपासून आणि कर्णपाली पहिल्या व दुसऱ्‍या  ग्रसनी चापांवरील उंचवट्यांच्या एकत्रीकरणापासून वनतो. [⟶ कान].

मध्यस्तरापासून निर्मित काही भाग : यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो : (अ) कंकाल तंत्र, (आ) स्नायू तंत्र, (इ) वाहिनी तंत्र, (ई) मूत्रोत्सर्जक तंत्र, (उ) जनन तंत्र.

(अ) कंकाल तंत्र : अस्थी, उपास्थी व तंतुमय ऊतक मिळून हे तंत्र बनते. सोप्या भाषेत हाडांचा सांगाडा, उपास्थी व सांध्यांचे बंधनासारखे भाग मिळून हे तंत्र बनले आहे. त्याचे दोन प्रमुख भाग आहेत : (१) अक्षीय कंकाल आणि (२) उपांगीय कंकाल.


(१) अक्षीय कंकाल : कायखंडपूर्व व कायखंडयुक्त अवस्थांत कंकालाचा हा भाग ‘पृष्ठरज्जू’  या भागात समाविष्ट असतो. त्या ठिकाणी कायखंडयुक्त अवस्थेच्या शेवटी शेवटी ‘आद्य कशेरुक’ अथवा  ‘दृढ खंड’ तयार होतो. या आद्य कशेरुक कोशिका पुंजापासून फासळ्यांची हाडे फक्त वक्षीय भागातच वाढतात. फासळ्यांची अभ्युदरीय टोके उरोस्थीस (छातीच्या मध्यावरच्या चपट्या हाडास) मिळतात. उरोस्थी दोन स्वतंत्र कोशिका पुंजापासून तयार होते.

कवटीची हाडे तीन निरनिराळ्या घटकांची बनलेली असतात. तळभाग तीन अवस्थांतून (कलामय, उपास्थिमय आणि अस्थिमय या अवस्थांतून) जाऊन पूर्ण वाढतो. याउलट दोन्ही बाजू व माथ्याचा भाग आद्य कलामय अवस्थेतूनच बनतात. दुसऱ्‍या ते पाचव्या ग्रसनी चापांच्या अभ्युदरीय टोकापासून स्वरयंत्र व कंठास्थी वनतात.

आ. ३०. भ्रूणातील कंकाल तंत्र : (अ) ११ मिमी. लांबीच्या (३८ दिवसांच्या) भ्रूणातील कंकाल तंत्र : (१) अंसमेखला व हाताचे मूलरूप, (२) स्कंधास्थी, (३) कशेरुक मूलरूप, (४) फासळ्यांचे मूलरूप, (५) श्रोणिमेखलेचे व पायाचे मूलरूप (आ) २० मिमी. लांबीच्या (४७ दिवसांच्या) भ्रूणाचे कंकाल तंत्र : (१) पश्चकपालास्थी, (२) कशेरुक, (३) स्कंधास्थी, (४) फासळ्या, (५) त्रिकास्थी, (६) माकड हाड, (७) घोटा व पावलातील हाडे, (८) गुडघा व घोटा यांच्या मधल्या भागातील हाडे, (९) ऊर्वस्थी, (१० भुजास्थी, (११) प्रबाहूतील हाडे, (१२) मनगट व हातातील हाडे, (१३) उरोस्थी.

(२) उपांगीय कंकाल : पाचव्या आठवड्यात भ्रूणमध्यस्तरापासून तयार झालेल्या अवयव-कलिकांमध्ये हाताच्या व पायाच्या हाडांना सुरूवात होते. सातव्या आठवड्यात सर्व हाडांचे आद्य भाग तयार असतात. अस्थिभवन मात्र जन्मानंतरही चालू असते. अंसमेखला (खांदा) व हाताची हाडे इतर हाडांप्रामाणे तिन्ही अवस्थांतूनच निर्माण होतात.


सांधे दोन संभाव्य हाडांतील संधानक पृष्ठभागांमधील भ्रूणमध्यस्तरापासून बनतात. जटिल सांधे संधिकलाच्छादित बनतात. त्या ठिकाणी भ्रूण मध्यस्तरापासून प्रथम एक चकती बनते व नंतर तिचा अपकर्ष होऊन सांध्याची पोकळी तयार होते. [⟶ कंकाल तंत्र].

आ. ३१ २० मिमी. लांबीच्या (४७ दिवसांच्या) भ्रूणातील स्नायू तंत्र : (१) समलंब स्नायू, (२) उदरीय बाह्य तिर्यक् स्नायू, (३) महानितंब स्नायू, (४) उरुचतुःशिर स्नायू, (५) उदरदंडी स्नायू, (६) त्रिशिर स्नायू.

(आ) स्नायू तंत्र : प्रत्येक कायखंडाचा पुष्कळसा भाग आद्य स्नायू कोशिकांत रूपांतरित होतो. या आद्य स्नायू कोशिकांपासून ऐच्छिक स्नायूतील स्नायू तंतू बनतात. डोके व मान यांतील काही स्नायू ग्रसनी चापातील भ्रूणमध्यस्तरापासून तयार होतात. सर्वसाधारणपणे आद्य स्नायू कोशिका एकमेकींत मिसळून संमिश्र स्नायू बनतात व विभाजनाने स्नायू भाग बनतात. विभाजनात किंवा मूळ स्थानापासून दूर जाताना या स्नायू भागांचे तंत्रिका तंतू त्यांच्या बरोबरच असतात. भ्रूणमध्यस्तराच्या कोणत्याही भागापासून बनलेले सर्वच स्नायू ऐच्छिक व रेखांकितच असतात. दहाव्या आठवड्यात भ्रूणात स्वयंजनित हालचाल सुरू होते. पोकळी असलेल्या अंतस्त्याजवळील भ्रूणमध्यस्तरापासून अनैच्छिक स्नायू तयार होतात. फक्त हृदयाचे स्नायू अनैच्छिक असूनही रेखांकित असतात. [⟶ स्नायु तंत्र].

(इ) वाहिनी तंत्र : रोहिण्या, नीला व लसीकावाहिन्या मिळून हे बनते. इतर पोकळी असलेल्या अंतस्त्याप्रमाणे या पोकळ नळ्यांच्या आतील बाजूस उपकलास्तर असते आणि भित्ती स्नायू व तंतुमय ऊतक यांच्या बनतात.

रक्तवाहिन्यांची सुरूवात भ्रूणमध्यस्तरात छोट्या छोट्या फटींच्या स्वरूपात होते. वाढीबरोबर या फटींचे जाळे बनते. या भागातील आद्य कोशिकांना ‘वाहिका कोरक’ कोशिका म्हणतात. द्विपार्श्व सममित (शरीराच्या मध्य अक्षातून जाणाऱ्या एकाच प्रतलाने होणाऱ्या उजव्या आणि डाव्या भागांत समान असणाऱ्या) वाहिन्या चार आठवड्यांच्या भ्रूणात तयार असतात. शरीराच्या वाढीस योग्य असे बदल नव्या वाहिन्यांची निर्मिती, काहींचा अपकर्ष व काहींचे एकीकरण मिळून केले जातात. भ्रूणातील नीला-रोहिण्यांप्रमाणे सुरुवातीस, दिपार्श्व सममित असतात परंतु वाढीबरोबर त्या सर्वांमध्ये मोठे बदल होतात. लसीकावाहिन्या नीलांबरोबर परंतु स्वतंत्रपणे वाढतात. अनुबंधनातून लसीका महावाहीनी तयार होते. तिसऱ्‍या महिन्यात लसीकावाहिन्यांच्या जाळ्यात विशिष्ट जागी लसीकाभ ऊतक कोशिका गोळा होतात व त्यांचे लसीका ग्रंथीत रूपांतर होते. [⟶ रक्ताभिसरण तंत्र लसीका तंत्र]

(ई) मूत्रोत्सर्जक तंत्र : पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये क्रमविकास (उत्क्रांती) होत असताना वृक्क (मूत्रपिंड) निर्मितीचे तीन प्रकार झाले आहेत. पहिल्या प्रकारात ‘अग्रवृक्क’, दुसऱ्‍यात ‘मध्यवृक्क’ आणि तिसऱ्‍यात ‘पश्चवृक्क’ तयार झाली. हे सर्व भाग वृक्कजनक ऊतकापासून बनतात. मानवी भ्रूणातही वृक्कनिर्मिती तीन प्रकारांत होते परंतु अग्रवृक्क व मध्यवृक्क नाहीसे होऊन त्यांच्या फक्त नलिका जनन तंत्रात वापरल्या जातात. पश्चवृक्क हा भाग जटिल असून त्यापासून वृक्क बनतात. मूत्रोत्सर्जक तंत्रातील उत्सर्जक भाग म्हणजे वृक्क मध्यस्तरापासून आणि मूत्र गोळा करणारा भाग म्हणजे मूत्रवाहिनी व मूत्राशय अंतःस्तरापासून बनतात. मूत्रशयाजवळील मूत्रवाहिनीपासून निघणाऱ्या पुष्कळ ऊतक करिकांचे एकत्रीकरण होऊन ⇨ अष्ठीला ग्रंथी तयार होते. [⟶ मूत्रोत्सर्जक तंत्र].

(उ) जनन तंत्र : जनन तंत्र व मूत्रोत्सर्जक तंत्र ही दोन्ही मध्यस्तरापासून निर्माण होतात आणि सुरुवातीस एकमेकांशी संबंधित असतात. भ्रूणाचे लिंग अंडनिषेचनाच्या वेळीच ठरत असले, तरी भ्रूणवयाच्या दुसऱ्या महिन्याच्या शेवटासच जननेंद्रियाचे लिंग ओळखता येऊ लागते. या आधीच्या काळात फक्त आद्यांग तयार होते व ते दोन्ही लिंगांच्या भ्रूणांत सारखेच असते. यामुळे जनन तंत्राची वाढ दोन अवस्थांतून होते. पहिल्या अवस्थेला ‘अविभेदित अवस्था’ व दुसरीला ‘विभेदीकृत अवस्था’ म्हणतात. जनन आद्यांगाचे विभेदन प्रामुख्याने जीनांद्वारे नियंत्रित होत असते परंतु विभेदन होत असताना जनन ग्रंथीमार्फत काही हॉर्मोनांचे स्रावही त्यात भाग घेत असण्याची शक्यता आहे. जनन तंत्र तयार होताना सुरुवातीस पुरुष व स्त्री संबंधित प्रत्येकी दोन नलिका संच तयार होतात. कालांतराने जेव्हा जरूर नसते तेव्हा दोहोंपैकी एका संचाचा नाश होतो.

दोन्ही लिंगांमध्ये बाह्य जननेंद्रियांची सुरुवात मध्यभागी असलेल्या ‘जनन गुलिका’, ‘दोन जनन-मूत्र घड्या’ आणि प्रत्येक बाजूस असलेल्या एका ‘जनन उंचवट्या’ पासून होते. तीन महिन्याच्या सुमारास या आद्यांगांचे पुरुष किंवा स्त्री लिंगदर्शक रूपांतर होऊ लागते. पुरुषात गुलिका व घड्या एकत्र येऊन शिश्न तयार होते. जनन उंचवटे गुदद्वाराकडे जातात व त्यांच्या एकत्रीकरणातून वृषणकोश बनतो. स्त्रीमध्ये गुलिका छोटीच राहते व तिचे ‘भगशिश्न’ बनते. जननमूत्र घड्यांपासून बृहत्‌भगोष्ठ व लघुभगोष्ठ बनतात. [⟶ जनन तंत्र].


अंतःस्तरापासून निर्माण होणारे काही भाग : (अ) घसा अथवा ग्रसनी : चार ग्रसनी चापांची टोके मिळून जीभ तयार होते. मध्यभागी एकत्र येऊन तयार झालेल्या पृष्ठभागावर अंकुर व काही ठिकाणी रुचिकलिका तयार होतात. ग्रसनी चाप व ग्रसनी कोष्ठ एकांतरित (एकाआड एक) असतात. पहिल्या ग्रसनी कोष्ठापासून ग्रसनी-कर्ण नलिका आणि मध्यकर्ण हे भाग बनतात. दुसऱ्या कोष्ठात गिलायू (टॉन्सिल) तयार होतात. तिसऱ्या कोष्ठांच्या जोडीपासून ⇨ यौवनलोपी ग्रंथीचा अर्धा अर्धा भाग तयार होतो. तिसरी व चौथी ग्रसनी कोष्ठ जोडी मिळून ⇨ परावटू ग्रंथी तयार होतात. ग्रसनीच्या तळभागापासून मध्यरेषेत ⇨ अवटू ग्रंथीची निर्मिती होते. [⟶ ग्रसनी].

(आ) आंत्रनलिका : कायखंड अवस्था पूर्ण होण्याच्या सुमारास भ्रूणवयाच्या विसाव्या ते चाळिसाव्या दिवसांत आद्य आंत्रमार्ग तयार होतो. कायखंडनिर्मितीस सुरुवात होण्याच्या सुमारास ‘अग्रांत्र’, ‘मध्यांत्र’ व ‘पश्चांत्र’ हे भाग ओळखता येतात आणि ही विभागणी व या प्रत्येक भागाचे विशिष्टीकरण व अंतस्त्यांची सुरुवात या काळात पूर्ण होतात.

ग्रसिका (ग्रसनीपासून जठरापर्यंत अन्न वाहून नेणारी मांसल नलिका) एक सरळ नळी बनते. जठराची वाढ पृष्ठीय बाजूस अधिक झाल्यामुळे बहत्‌वक्रता आणि लघुवक्रता निर्माण होतात. जठर भाग ९०° चक्राकृती फिरतो आणि परिणामी पृष्ठीय व अभ्युदरीय कडा डाव्या व उजव्या बाजूंस येतात. धडापेक्षा आंत्रवाढ झपाट्याने झाल्यामुळे आंत्राची वाढती वेटोळी नाळेत शिरतात व कालांतराने परत उदरगुहेत घेतली जातात. शेवटी लहान व मोठ्या आतड्यांच्या जागा चक्रगतीने नक्की ठरतात.

आंत्रांची सुरूवात ज्या वेळी घडी पडून नलिका तयार होत त्याच वेळी ही नलिका ‘पृष्ठीय आंत्रबंध’ नावाच्या पडद्याने लटकती ठेवलेली असते व या बंधातून आतड्यास रक्तपुरवठा व तंत्रिका पुरवठा

आ. ३२. जठर व संबंधित भाग : (अ) ७ मिमी. लांबींच्या (३४ दिवसांच्या) भ्रूणातील रचना : (१) जठर, (२) पृष्ठीय अग्निपिंड, (३) यकृत व पित्ताशय अंधवर्ध, (४) अभ्युदरीय अग्निपिंड, (५) ग्रहणी लघ्वांत्राचा सुरुवातीचा भाग, (६) प्लीहेचे आद्यांग (आ) १० मिमी. लांबीच्या (३३ दिवसांच्या) भ्रूणातील रचना : (१) अभ्युदरीय अग्निपिंड, (२) ग्रहणी, (३) पृष्ठीय अग्निपिंड, (४) प्लीहा.

होतो. पृष्ठीय आंत्रबंधाशिवाय आंत्रनलिका भ्रूणाच्या अभ्युदरीय भित्तीस आणखी एका बंधाने जोडलेली असते. आंत्रमार्गाच्या चक्रगतीमुळे या आंत्रबंधात फरक होतात. अभ्युदरीय बंध उजवीकडे जातो व त्यात यकृताचा काही भाग निर्माण होतो. पृष्ठीय बंधाच्या डावीकडील भागात प्लीहा (पानथरी) तयार होते.

अग्रांत्रापासून निघणाऱ्या दोन अंधवर्धांपासून (एका टोकाला बंद असलेल्या पिशव्यांसारख्या वाढींपासून) अग्निपिंडाची निर्मिती होते. दोन्ही अंधवर्ध मिसळून अग्निपिंडवाहिनी व स्रावक भाग तयार होतात. लांगरहान्स द्वीपके हा इन्शुलीन निर्माण करणारा भाग विशिष्ट कोशिकांपासून बनतो. [⟶ अग्निपंड आंत्र पचन तंत्र].


(इ) श्वसन तंत्र : श्वसन तंत्राचा सुरुवातीचा भाग नासागुहा बाह्यस्तरापासून बनतो. या तंत्राची सुरुवात आंत्रापासून निघणाऱ्‍या एका कोष्ठापासून होते. त्याच्या आतील अस्तर अंतःस्तर कोशिकांचे असते. अस्तराबाहेर असणाऱ्‍यात मध्यस्तरापासून स्नायू व संयोजी ऊतक बनते. ग्रसनीच्या तळभागापासून पोकळ फुप्फुस कलिका तयार होतात. प्रथम एकच कलिका असते व ती ग्रसनी कोष्ठाच्या शेपटाकडे मध्यरेषेत वाढते. ती नलिकेच्या आकाराची व फुगीर टोकाची असते. नलिकेच्या तोंडाजवळ स्वरद्वार असते व तेथेच स्वरयंत्र तयार होते. प्रत्यक्ष

आ. ३३. फुप्फुस वाढ : (अ) ११.८ मिमी. लांबीच्या भ्रूणातील फुप्फुस कलिका : खंड निर्मितीची सुरुवात (आ) १४.२ मिमी. लांबीच्या भ्रूणातील फुप्फुसे (सहाव्या आढवड्याच्या सुरुवातीस).

नलिकेपासून श्वसनाल बनतो. त्याच्या टोकाकडील फुगवटीच्या विभाजनाने दोन प्रमुख शाखा-उजवी व डावी प्रमुख श्वासनलिका-बनतात. या दोन्ही शाखांच्या टोकांवर भावी फुप्फुसांची आखणी तयार असते. उजव्या बाजूस तीन फुप्फुस खंड आणि डाव्या बाजूस दोन फुप्फुस खंड तयार होतात. वाढ व वारंवार होणाऱ्‍या विभाजनाने श्वासनलिका व वायुकोश रचना पूर्ण होते. विभाजन क्रिया सहाव्या महिन्यापर्यंत चालूच असते. शेवटच्या महिन्यात वायुकोशनिर्मिती पूर्ण होते व रक्तवाहिन्यांत भरपूर वाढ होते. पहिल्या अंतःश्वसनापर्यंत हे सर्व भाग लघु-अवस्थेतच राहतात. [⟶ फुप्फुस श्वसन तंत्र].

भ्रूणीय अपमार्गण : मानवी भ्रूणाला विकृतीचा (रोग होण्याचा), अपसामान्य वाढीचा व अपरूपजननाचा नेहमी धोका असतो. भ्रूण व गर्भ वाढीच्या कोणत्याही क्षणी ऱ्‍हास व मृत्यू होण्याची शक्यता असते. पुष्कळसे मृत्यू निषेचनानंतर पहिल्या दोन किंवा तीन आठवड्यांतच होत असल्यामुळे समजून येत नाहीत. एकूण युग्मजांपैकी बहुधा ५०% च पूर्ण वाढत असावेत. गर्भारपणाच्या पहिल्या सात आठवड्यांत वाढीसंबंधीची व्यंगे निर्माण होऊ लागतात. मातेच्या मानसिक अनुभवांचा (उदा., भयानक घटना किंवा किळसवाणी दृश्ये यांचा) भ्रूणावर परिणाम होतो, असा एक समज आहे परंतु त्यात काहीही तथ्य नाही कारण माता व गर्भ परस्परांशी तंत्रिका तंत्र दृष्ट्या केव्हाही संबंधित नसतात. मातेची प्रकृती उत्तम नसल्यास कधीकधी भ्रूणाची वाढ सदोष होते किंवा भ्रूणाला मृत्यू येतो. मातेचे काही रोग (उदा., जर्मन गोवर, उपदंश, टॉक्सोप्लाझ्मा गोंडाय नावाच्या परजीवींमुळे-दुसऱ्‍या जीवांवर उपजीविका करणाऱ्‍या सूक्ष्मजीवांमुळे –उद्‌भवणारा रोग) गर्भास अपाय करू शकतात. याशिवाय अपरेतील विकृती, मातेच्या जननेंद्रियांची विकृती व तिच्या अंतःस्रावी ग्रंथींच्या कार्यतील बिघाड गर्भास हानिकारक असू शकतात. प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेळीही गर्भास इजा होण्याचा नेहमी संभव असतो.

अपरूपजननविज्ञान अथवा जन्मजात विकृत जननविज्ञान : ज्या शास्त्रात जन्मजात म्हणजे भ्रूणावस्थेत व गर्भावस्थेत अपसामान्य निर्मिती व वाढ यांचा तसेच त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करतात, त्याला अपरूपजननविज्ञान म्हणतात. अपरूपजननात अगदी ढोबळ व स्पष्ट दिसणाऱ्‍या जलशीर्ष [ मस्तिष्क विवरांत प्रमाणापेक्षा जास्त मस्तिष्क-मेरुद्रवाचा संचय झाल्याने डोक्याचे आकारमान प्रमाणापेक्षा मोठे होणे ⟶ तंत्रिका तंत्र] आणि ⇨ खंडतालू यांसारख्या विकृतीसहित केवळ सूक्ष्मदर्शकीय तपासणीनंतरच समजणाऱ्‍या काही रक्तासंबंधीच्या विकृतींचाही समावेश होतो. चयापचयातील (शरीरात सतत होणाऱ्‍या भौतिक व रासायनिक घडामोडींतील) जन्मजात बिघाडामुळे उत्पन्न होणाऱ्‍या फिनिल कीटोन्यूरिया [फिनिल अलॅनीन नावाच्या ॲमिनो अम्लाच्या चयापचयात्मक बिघाडामुळे उत्पन्न होणारी विकृती ⟶ फिनिल ॲलॅनीन कीटोनांचे आधिक्य] आणि निवर्णता अथवा वर्णहीनता (त्वचेतील रंजक पदार्थाच्या अभावामुळे उत्पन्न होणारी विकृती) यांचाही समावेश अपरूपजननात होतो. सर्वच जन्मजात विकृती जन्मल्याबरोबर ओळखू येतात असे नाही. उदा., संकुचित महारोहिणी ही विकृती असूनही मूल अर्भकावस्थेत व बाल्यावस्थेतही पूर्णपणे लक्षणविरहित असू शकते.

नवजात काळात जिवंत राहणाऱ्या चौदा अर्भकांमागे एका अर्भकात जन्मजात विकृती आढळते आणि एकूण विकृत अर्भकांपैकी निम्म्यामध्ये एकापेक्षा अधिक दोष आढळतात. चाळीस अर्भकांमध्ये एकात रचनात्मक दोष (खंडतालू वगैरे) आढळतात आणि त्यांवर उपचारांची गरज असते.

भ्रूणाची योग्य वाढ होण्याकरिता अनेक कारकांची गुंफण व्हावी लागते. या सर्व कारकांमध्ये साहचर्य, योग्य अनुक्रम, योग्य वेळ व जागा, तसेच योग्य दिशा यांची गरज असते. प्रवर्तक उद्दीपकांचा अभाव किंवा न्यूनता किंवा कोशिकांच्या प्रतिसाद देण्याच्या क्षमतेचा अभाव यामुळे ‘अनुत्पत्ती’ (अवयव किंवा त्याचा भाग तयार न होणे), ‘अल्पविकसन’ (अपूर्ण वाढ) यांसारख्या विकृती उत्पन्न होतात. या विकृतींना परिसरीय किंवा जननिक कारणेही असू शकतात परंतु अत्यल्प अपरूपजननासंबंधी निश्चित कारण सांगणे अशक्य असते.


आ. ३४. सील प्राण्यासारखे हातपाय असलेली विकृती (फोकोमेलस).

आनुवंशिक किंवा जीनांद्वारे अपत्यात येणाऱ्या विकृतींमध्ये दात्रकोशिका पांडुरोग [रक्तविलयनजन्य विशिष्ट आकार असलेल्या लाल कोशिका असलेली आणि बहुधा समयुग्मज व प्रामुख्याने कृष्णवर्णीय नीग्रोंमध्ये आढळणारी जन्मजात विकृती ⟶ पांडुरोग], रंगांधत्व [निरनिराळे रंग एकमेकांपासून भिन्न आहेत हे ओळखता न येणे ⟶ डोळा], हंटिंग्टन कंपवात  [⟶ बालकंपवात], रक्तस्रावी रोग (रक्तस्रावरोधक घटकाच्या न्यूनतेमुळे रक्तक्लथनाच्या म्हणजे रक्त गोठण्याच्या वा साखळण्याच्या काळात प्रमाणापेक्षा बरीच वाढ झाल्यामुळे रक्तस्राव न थांबणारा व लिंग गुणसूत्राद्वारे अपत्यात उतरणारा रोग) इत्यादींचा समावेश होतो. या विकृती जीनांच्या अथवा गुणसूत्रांच्या विपथगमनामुळे उद्भवतात. अलीकडील गुणसूत्रांच्या संशोधनात्मक सखोल अभ्यासामुळे गुणसूत्र विपथगमन जन्मजात विकृतीत भाग घेत असल्याचे निश्चित सिद्ध झाले आहे. टर्नर लक्षणसमूह [⟶ आनुवंशिकी] या जन्मजात विकृतीत वामनता, अल्पविकसित अंडाशये, अनार्तव (मासिक पाळीचा संपूर्ण अभाव) व दुय्यम लैंगिक लक्षणांचा अभाव ही लक्षणे आढळतात. या विकृतीत फक्त एकच लिंग गुणसूत्र (XO) आढळते. जोडीतील दुसरे गुणसूत्र अजिबात नसते किंवा आकारदृष्ट्या अपूर्ण असते.

परिसरीय कारकांपैकी अपरूपजननास कारणीभूत असणारी काही कारणे निश्चित ज्ञात झाली आहेत. गर्भारपणातील प्रारण उद्भासन (भेदक प्रारण-तरंगरूपी ऊर्जा – अंगावर पडणे), व गटातील ⇨ फॉलिक अम्ल या जीवनसत्वाची तीव्र न्यूनता, काही औषधांचे सेवन (उदा., थॅलिडोमाइड) इत्यादींमुळे जन्मजात विकृती उत्पन्न होतात. गर्भारपणात शामक म्हणून वापरलेल्या थॅलिडोमाइड या औषधाच्या सेवनामुळे अर्भकात सील प्राण्यासारखे हातपाय असलेली विकृती (आ. ३४) उत्पन्न झालेली आढळून आलेली आहे. पश्चिम जर्मनीत १९६० मध्ये १२६ णि १९६१ मध्ये ४७७ नवजात अर्भके या विकृतीने ग्रासलेली होती. या विकृतीत हात व पाय जणू काही दंड व तंगडी यांच्या मध्यस्थीशिवाय खांदे व नितंब यांना जोडल्यासारखे दिसतात.

आ. ३५. अनुत्पत्ती व अल्पविकसन : (अ) शिश्न अनुत्पत्ती (आ) शिश्न अल्पविकसन.

भौतिकीय, पोषणज, विषाभ, अंतःस्रावी ग्रंथीसंबंधित व विशिष्ट वाढीस अवरोधक असलेले पदार्थ यांसारखी अनेक कारणे प्रयोगशालेय संशोधनावरून अपरूपजननास कारणीभूत असल्याचे आढळले आहे. बहुतेक सर्व कारके भ्रूणाच्या विभेदन काळात परिणाम करतात व प्रत्येक अपरूपजनक विशिष्ट प्रकारचाच परिणाम करतो. कधीकधी अपरूपजनक पदार्थ प्रमाणापेक्षा वाढल्यास भ्रूणनाशही संभवतो. हे  पदार्थ मातेला हानिकारक असतातच असे नाही. उदा., गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत जर्मन गोवर झालेल्या स्त्रीला फारसा त्रास होत नाही परंतु तिच्या अपत्यात जन्मजात विकृती हटकून आढळतेच.

तशीच राहणे, उदा., द्विदल गर्भाशय (गर्भाशय बुघ्न भाग जुळून न येणे), (ई) प्राकृतिक न होणे (उदा., अछिद्री गुदद्वार),

आ. ३६. आद्यावस्था कायम राहणे : द्विदल गर्भाशय : (अ) दोन स्वतंत्र गर्भाशये-योनिमार्गात उभा पडदा (आ) एक गर्भाशय-दोन शृंगे.

अपरूपजननाचे काही प्रकार : या प्रकारांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते : (अ) अनुत्पत्ती, (आ) अल्पविकसन, (इ) आद्यवस्था तशीच राहणे उदा., द्विदल गर्भाशय (गर्भाशय बुघ्न भाग जुळून न येणे), (ई) प्राकृतिक अपकर्ष न होणे (उदा., अछिद्री गुदद्वार),

आ. ३७. प्राकृतिक अपकर्य न होणे : अछिद्र गुदद्वार : (१) गुदाशय, (२) मूत्राशय

(उ)ऊतक एकत्रीकरण न होणे (उदा., अतिरिक्त प्लीहा तयार होणे), (ऊ) अपूर्ण स्थानांतरण [ उदा., ॲनवर्तीर्ण वृषण (वृषणकोशता वृषण न उतरता उदरगुहेत किंवा इतर जागी राहणे)], (ए) अप्रारूपी विभेदन (उदा., उपास्थि-अविकसनजन्य वामनता).

 आ. ३८. अप्रारूपी विभेदन : ⟶ उपास्थि – अविकसनजन्य वामनता.

आ. ३९. (अ) संयुक्तांगुल (आ) द्विगुणित आंगठा (इ) अविकसित आंगठा व अरास्थी.

इतिहास : प्राणी व मानव यांच्या प्रजननाबद्दलचे कुतूहल फार प्राचीन काळापासून ईजिप्त, चीन व ग्रीस य़ा देशांतून जागृत झाले होते. तथापि सूक्ष्मदर्शकाचा शोध लागण्यापूर्वी भ्रूमविज्ञानाबद्दल अगदी उथळ विधाने केली जात होती. अंडातून पूर्ण वाढलेला प्राणी कसा उत्पन्न होतो हा विषय बहुतांशी तत्त्ववेत्त्यांकडेच सोपविल्यासारखा झालेला होता.

ग्रीक तत्त्ववेत्ते व शास्त्रज्ञ अरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४-३२२) यांना भ्रूणविज्ञानाचे जनक मानतात. दृश्य विवर्धनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना कनिष्ठ प्राण्यातील (विशेषेकरून कोंबडीतील) भ्रूणविज्ञानासंबंधी निरीक्षणातून तयार झालेली महत्त्वाची मते त्यांनी प्रकट केली होती. त्यांच्या काळातील प्रचलित ‘पूर्वरचना’ सिद्धांतावर त्यांनी विचार केला होता परंतु तो त्यांना मान्य नव्हता. त्यांच्या मताप्रमाणे भ्रूणाची उत्पत्ती निराकार (आकारहीन) द्रव्यापासून होते उदा., मानवी भ्रूणाची उत्पत्ती प्रभावित अथवा सक्रियित ऋतुस्रावातील रक्तापासून होते.


माता-पित्याचा भ्रूणाशी असलेला जैव संबंध सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत अज्ञात होता. काही प्राण्यांत उत्स्फूर्त प्रजनन होते, अशी कल्पना विल्यम हार्वी (१५७८-१६५७) यांच्यासारख्या शरीरक्रिया-वैज्ञानिकांचीही होती. सतराव्या व अठराव्या शतकांत जी. डब्ल्यू. फोन लायप्निट्स, आलब्रेख्ट फोन हालर व शार्ल बॉने या शास्त्रज्ञांनी प्रथम ‘क्रमविकास’  (उत्क्रांती) व पुढे ‘पूर्वरचना’ या नावाने त्या वेळी प्रचलित असलेल्या सिद्धांताचे जोरदार समर्थन केले होते. उत्क्रांती या शब्दाचा अर्थ ‘कळी उमलून जसे पूल तयार होते’ असा केला जात होता. पूर्वनिर्धारित या सिद्धांताप्रमाणे प्रौढातील सर्व शरीरभाग अंडामध्ये सूक्ष्मवस्थेत पूर्वरचित असतात आणि भ्रूणविकास म्हणजे या भागांची उकल व वाढ होणे म्हणजेच नवीन असा कोणताही भाग तयार होत नाही. १६७७ मध्ये आंतॉन व्हान लेव्हेनहूक या डच शास्त्रज्ञांच्या एका विद्यार्थ्याने त्यांचे लक्ष शुक्राणूकडे वेधल्यानंतर त्यांनी त्याचे पहिले वर्णन केले. या शोधानंतर एक नवा सिद्धांत मांडला गेला. त्याप्रमाणे या सूक्ष्म, चलनक्षम व जिवंत वस्तूत (शुक्राणूत) सर्व बीजे समाविली असून अंड फक्त पोषक पदार्थ पुरविण्याचे कार्य करते. फक्त शुक्राणूपासून पूर्ण मानवाकृती नवा जीव तयार होतो असे प्रतिपादन करणाऱ्या या नव्या विचाराच्या शास्त्रज्ञांना ‘शुक्राणूवादी’ किंवा ‘सूक्ष्मजीववादी’ असे संबोधीत. यांपैकी काही शास्त्राज्ञांनी तर शुक्राणूचे काल्पनिक चित्र काढून त्याच्या आत छोटासा पूर्णाकृती मानवही काढला होता व ते या सूक्ष्म मानवाला ‘होमंक्युलस’ म्हणत.

मार्चेल्लो मालपीगी (१६२८-९४) या इटालियन शास्त्रज्ञांनी सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने भ्रूणविज्ञानात महत्त्वाची भर घातली. त्यांनी कोंबडीच्या भ्रूणाचा सूक्ष्म अभ्यास केला आणि काही सूक्ष्म भागांचे अचूक वर्णन केले. त्यांच्या लेखनामुळे त्यांना वर्णनात्मक भ्रूणविज्ञानाचे आद्य प्रवर्तक मानतात.

बर्लिन येथील शास्त्रज्ञ सी. एफ्. व्होल्फ (१७३३-९४) यांनी आपला Theoria Generationis हा ग्रंथ १७५९ मध्ये प्रसिद्ध केल्यापासून आधुनिक भ्रूणविज्ञानाची सुरुवात झाली. हार्वी यांचा अनिर्धारित विकासाचा जुना सिद्धांत त्यांनी उचलून धरला होता. ‘भ्रूण पूर्वनिर्मित असून तो अंडाशयात बंदिस्त अवस्थेत असतो’ या त्या काळच्या सिद्धांताला त्यांनी कसून विरोध केला होता. १७६८ मध्ये त्यांनी एका लेखात कोंबडीच्या भ्रूणातील आतड्याच्या विकासाचे वर्णन केले होते. या शास्त्रीय टिपणाबद्दल दुसरे एक भ्रूणवैज्ञानिक ⇨ कार्ल एर्न्सट फोन बेअर (१७९२-१८७६) यांनी ‘शास्त्रीय निरीक्षणाचा एक अप्रतीम नमुना’ म्हणून प्रशंसोद्गार काढले होते. भ्रूणातील काही भागांना व्होल्फ यांचे नाव देण्यात आले आहे. उदा., भ्रूणातील प्रजनन कटकाला (ज्या भागापासून मूत्रोत्सर्जन  तंत्र व प्रजनन तंत्राचा काही भाग तयार होतो त्या कंगोऱ्‍यासारख्या भागाला) ‘व्होल्फ कटक’ म्हणतात. अवयवनिर्मिती पर्णसदृश स्तरापासून (बीजजननस्तरापासून) होते, हा व्होल्फ यांचा विचार बेअर यांच्या जननस्तर (भ्रूणीय स्तर) सिद्धांताशी अगदी मिळताजुळता होता.

वर उल्लेखिलेले फोन बेअर यांना आधुनिक भ्रूणविज्ञानाचे जनक मानतात. ख्रिश्चन पांडर (१७९३-१८६५) या शास्त्रज्ञांसमवेत त्यांनी १८१२ मध्ये भ्रूणाची वाढ तीन जननस्तरांपासून होते हे दाखवून दिले. या स्तरांपासून शरीरातील सर्व ऊतके तयार होतात. या आद्यस्तरांना १८४५ मध्ये रोबेर्ट रेमाक यांनी बाह्यस्तर, मध्यस्तर व अंतःस्तर या अर्थाची नावे प्रथम दिली. फोन बेअर यांनी कोंबडीतील भ्रूणाच्या अभ्यासाशिवाय इतर प्राण्यांतील भ्रूणांचाही अभ्यास केला व भ्रूणविज्ञानाला तुलनात्मक अभ्यासाची जोड दिली. १८२७ मध्ये त्यांनी सस्तन प्राण्यातील अंड प्रथम शोधिले. ऊतकजनन, अवयवजनन आणि आकारजनन या भ्रूणविज्ञानांसंबंधीच्या शास्त्रीय विचारांना त्यांनीच प्रथम चालना दिली.

एफ्. एम्. बॅल्फू (१८५१-८२) या इंग्रज शास्त्रज्ञांनी १८८०-८१ च्या सुमारास आपला भ्रूणविज्ञानावरील ट्रिटाइझ ऑन कंपॅरेटिव्ह एंत्रियॉलॉजी हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्या वर्षांपर्यंतच्या या विषयाच्या संशोधनकाऱ्‍याचा आढावा घेण्यात आला होता. तत्पूर्वी त्यांनी नेपल्स झूलॉजिकल स्टेशनमध्ये काम करीत असताना इलॅस्मोब्रँक माशांवर संशोधन करून अंड व भ्रूण यांची प्रारंभिक अवस्था, वृक्काची (मूत्रपिंडाची) वाढ आणि मेरुरज्जू तंत्रिकांचा उगम यांविषयी महत्त्वाची माहिती मिळविली होती.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटास भ्रूणविज्ञान हे एक जटिल शास्त्र बनले होते. निरनिराळ्या मार्गांनी त्यात सतत भर पडत गेली होती. या काळात स्विस शास्त्रज्ञ व्हिल्हेल्म हिस (१८३१-१९०४) यांचे कार्य महत्त्वाचे होते. त्यांनी आपले लक्ष भ्रूणविज्ञानातील ‘ऊतकजनन’ आणि भ्रूणीय तसेच पूर्ण वाढलेल्या प्राण्याच्या आकारविज्ञानविषयक अभ्यासावर केंद्रित केले होते. १८६६ मध्ये त्यांनी ‘सूक्ष्मछेदक’ या उपकरणाचा शोध लावला. या उपकरणाच्या मदतीने ऊतकाचे अतिशय पातळ तुकडे कापून ते सूक्ष्मदर्शकाखाली तपासता येतात. या उपकरणाद्वारे मिळालेल्या क्रमिक छेदांवरून त्यांना द्विमितीय भ्रूण पुनर्रचनेची कल्पना सुचली व त्यांनी भ्रूणलेख तंत्राचा [सूक्ष्मदर्शक व कॅमेरा ल्यूसिडा ⟶ कॅमेरा ऑव्सक्यूरा व कॅमेरा ल्यूसिडा यांचे एकत्रिकरण करून भ्रूणाच्या आकृत्या काढण्याच्या तंत्राचा] शोध लावला. त्यांच्या सहकाऱ्‍यांनी या उपकरणात आणखी सुधारणा केल्या. या उपकरणामुळे भ्रूणातील ऊतकांचे संबंध अचूक समजतात. त्यांचे दोन शिष्य फ्रॅन्झ कीवेल व फ्रॅन्कलीन माल यांनी त्यांचे मानवी भ्रूणवरील संशोधनकार्य पुढे चालू ठेवून १९१०-१२ च्या सुमारास मॅन्युअल ऑफ ह्यूमन एंब्रियॉलॉजी नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला.


व्हिल्हेल्म रू (१८५०-१९२४) या जर्मन शास्त्रज्ञांना प्रायोगिक भ्रूणविज्ञानाचे जनक मानतात. त्यांनी सहज उपलब्ध असलेल्या बेडकांच्या अंड्यांचा उपयोग केला होता. त्यांच्याशिवाय हान्स स्पेमान, आर्. जी. हॅरिसन आणि टी. एच्. मॉर्गन यांनी या शास्त्राच्या प्रगतीत काही तंत्रे वापरून भर घातली. त्यामुळे सैद्धांतिक व वर्णनात्मक भ्रूणविज्ञानाला प्रत्यक्ष पुराव्याचा आधार मिळणे शक्य झाले.

हार्व्हर्ड विद्यापीठातील भ्रूणविज्ञान व तुलनात्मक शरीर या विषयांचे प्राध्यापक सी. एस्. मायनट (१८५२-१९१४) यांनी ह्यूमन एंब्रियॉलॉजी (१८९२), बिब्लिओग्राफी ऑफ व्हर्टिब्रेट एंब्रियॉलॉजी (१८९३) आणि लॅबोरेटरी टेक्स्टबुक ऑफ एंब्रियॉलॉजी (१९०३) हे ग्रंथ प्रसिद्ध करून भ्रूणविज्ञानात महत्त्वाची भर घातली. त्यांनी दोन निरनिराळ्या प्रकारच्या स्वयंचलित सूक्ष्मछेदक उपकरणांचा सोध लावला होता. वारेची उत्पत्ती आणि रचना या विषयावरील संशोधनाबद्दल ते प्रसिद्ध होते.

वॉशिंग्टन येथील कार्नेगी इन्स्टिट्यूशनमधील जी. एल्. स्ट्रीटर (१८७३-१९४८). जी. डब्ल्यू. कॉर्नर व इतर काही शास्त्रज्ञांनी या विषयाच्या सर्वांगावर प्रकाश पाडण्याकरिता पुष्कळ महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. वानरवर्गी प्राणी आणि मानव यांच्या भ्रूणावरील संशोधनाविषयीचे या संस्थेचे कार्य प्रसिद्ध आहे. वरीलप्रमाणेच ओस्कार हेर्टव्हिख (१८४९-१९२२) व जे. रॉक  या शास्त्रज्ञांचे  मानवी भ्रूणासंबंधीचे कार्य उल्लेखनीय आहे.

विविध प्रकारच्या प्राण्यांतील अंड्यांची रचना, संघटन, विशिष्ट आकृतिबंध आणि विकास पद्धत यांमध्ये एवढे वैचित्र्य आहे की, भ्रूणविज्ञानाविषयी कोणताही एकच विशिष्ट सिद्धांत मांडता येत नाही. सर्वांच्या अभ्यासावरून एक सर्वसाधारण संकल्पना मात्र लक्षात येते व तो म्हणजे प्रगामी विभेदन अथवा टप्प्याटप्प्याने होणारा विकास आणि ज्यामध्ये प्रत्येक टप्पा अगोदरच्या व नंतरच्या (पाठोपाठच्या) टप्प्याशी अगदी जवळून निगडित असतो.

वरिल संकल्पना हजारो वर्षांपूर्वी अरिस्टॉटल यांनी मांडली असली, तरी तिची सत्यता पटवण्याकरिता विसावे शतक यावे लागले. तत्पूर्वी भ्रूणविज्ञानाच्या इतिहासाकडे पाहिल्यास असे दिसून येते की, या संकल्पनेच्या निश्चितपणाचा किंवा अनिश्चितपणाचा पाठपुरावा करण्यात बराच काळ खर्ची पडला आहे.

भारतातही फार प्राचीन काळापासून (इ. स. पू. ४०००) भ्रूण व गर्भ यांच्या  विकासाकडे लक्ष गेले होते. काही धार्मिक ग्रंथांतून केवळ निरीक्षणावर आधारित अशी या विषयाची वर्णने आहेत. उपनिषदांच्या ‘गर्भोपनिषद’ भागात गर्भविकासाचे वर्णन केले आहे. श्री मार्कण्डेयपुराण या ग्रंथातही अकराव्या अध्यायात गर्भस्थितिवर्णन हा भाग आहे. या लिखाणातील महत्त्वाच्या भागाचा सारांश खाली दिला आहे :

‘स्वर्गापासून अथवा नरकापासून मुक्त झालेला प्राणी मानव, स्त्रियांच्या रजाचे ठिकाणी सिंचन केलेले जे बीज त्याला येऊन मिळतो . . . रज व शुक्र या दोहोंशी तो प्राणी मिळून गेला असता ते स्थिर होते आणि कलल (पहिल्या रात्रीनंतरची मिश्रण अवस्था), बुद्‌बुद् (सात रात्रीनंतरची फेसाळ अवस्था) आणि पेशी (अर्ध्या महिन्यानंतरची अवस्था) हे आकार त्याला प्राप्त होतात. बीजापासून ज्याप्रमाणे अंकुराची उत्पत्ती होते त्याप्रमाणे पाच अंगाची उत्पत्ती यथाविभाग पेशीपासून होते. बोटे, डोळे, नाक, तोंड व कान ही उपांगे अंगापासून फुटतात व उपांगांना नखे वगैरे येतात. . . . दोन महिन्यांनी डोके तयार होते. तीन महिन्यांनंतर पाय तयार होतात. चार महिन्यांनी गुल्फ (घोटा), जठर, कमरेचा भाग बनतो. पाचव्या महिन्यात पृष्ठवंश तयार होतो. सहाव्यात तोंड, नाक, डोळे, कान तयार होतात. सातव्या महिन्यात सजीव होतो आणि आठव्या महिन्यात सर्वांगपूर्ण बनतो.’

आधुनिक काळात नव्या उपकरणांच्या शोधामुळे भ्रूणविज्ञानात अधिक भर पडत आहे. उदा., इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक व कलाभेद सूक्ष्मदर्शक [⟶ सूक्ष्मदर्शक] यांच्या मदतीने अतिसूक्ष्म पातळीपर्यंत विभेदन करता येत असल्यामुळे भ्रूणविज्ञानाच्या काही शाखांचा अभ्यास सोपा झाला आहे. कोशिकीय रसायनशास्त्र आणि ऊतक रसायनशास्त्र यांच्या प्रगतीमुळे भ्रूणविकासातील रासायनिक घटकांचे स्थान निश्चित करता येऊ लागले आहे. सूक्ष्म रासायनिक तंत्राचा उपयोग करून भ्रूणाच्या किंवा त्याच्या भागाच्या चयापचयाचे जीवरासायनिक विश्लेषण करणे शक्य झाले आहे.

हे सर्व उपलब्ध असूनही भ्रूणविकासाचे  वर्णन करणे ही एक कठीण गोष्ट आहे. परिरक्षित भ्रूणांचा अभ्यास फक्त क्रमिक टप्प्यांच्या वाढीचे स्थायी वर्णन करण्यास मदत करतो परंतु त्यापासून एका टप्प्यापासून पुढील  टप्प्यापर्यंतच्या गतिक प्रक्रियांचा बोध होत नाही. जिवंत भ्रूणाच्या अभ्यासात निरीक्षणक्षम बदल समजतात परंतु पुष्कळशी अंडी व भ्रूण एवढे नाजूक व पारदर्शक असतात की, ते हाताळणे अतिशय कठीण तर असतेच शिवाय त्यांचे निरनिराळे भाग ओळखणेही कठीण असते.

सलगर, त. चि. भालेगाव, य. त्र्यं.

संदर्भ :1. Allan, F. D. Essentials of Human Embryology, New York, 1960. 2. Arey. L. B. Developmental Anatomy  : A Textbook and Laboratory Manual of Embryology, Philadelphia, 1965. 3. Balinsky, B. I. An Introduction  to Embryology, Philadelphia, 1975. 4. Best, C. H. Taylor, N. B. The Living Body, Bombay, 1961. 5. Bodemer, C. W. Modern Embryology, New York, 1968. 6. Bonner, J. The Molecular Biology of Development, Oxford, 1965. 7. Harrison, R. G. Wilens, S., Ed., Organization and Development of the Embryo, New Haven, 1969. 8. Nee tham. J. A. History of Embryology, New York, 1975. 9. Patten, B. M. Foundations of Embryology, New York, 1964. 10. Rugh. R. Expermental Embryology : Techniques and Procedures, Minneapolis,  1962. 11. Smith. A. The Body, London 1968. 12 Waddington, C. H.  Principles of Development  and Differentiation, New York, 1966. 13. Warwick, R. Williams, P.L., Ed., Gray’s Anatomy, Edinburgh, 1973. 14. Weber, R. Ed., The Biochemistry of Animal Development, 3 Vols., New York, 1969, 1967, 1975. 15. Weiss, P. Principles of Development : A Text in Experimental Embryology, New York, 1969.