हेंच, फिलिप शोवॉल्टर : (२८ फेब्रुवारी १८९६–३० मार्च १९६५). अमेरिकन वैद्य. अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यकातीलहॉर्मोनांची रासायनिक संरचना आणि त्यांचे जैव परिणाम यांसंबंधी शोधलावल्याबद्दल हेंच आणि त्यांचे सहकारीएडवर्ड कॅल्व्हिन केंड्ल आणि स्वित्झर्लंडचे ⇨ टाडेयस राइशस्टाइन यांना १९५० सालचे वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. हेंच यांनी संधिवाताभ या आजाराच्या उपचारासाठी अधिवृक्क हॉर्मोनाचा( कॉर्टिसोनचा) यशस्वी रीत्या वापर केला. 

 

फिलिप शोवॉल्टर हेंचहेंच यांचा जन्म पिट्सबर्ग ( पेनसिल्व्हेनिया) येथे झाला. १९२० मध्ये त्यांनी पिट्सबर्ग विद्यापीठाची एम्.डी. पदवी संपादन केली. १९२६ मध्ये ते मायो क्लिनिकमध्ये संधि-वाताभ आजार विभागाचे सल्लागार आणि प्रमुख झाले. १९२८ मध्ये त्यांनी मायो फाउंडेशन येथे अध्या-पनास सुरुवात केली. हेंच १९५८ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते मिनेसोटा विद्यापीठाच्या द स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये गुणश्री प्राध्यापक होते. 

 

 मायो क्लिनिकमध्ये हॉर्मोनांच्या अलगीकरणावर संशोधन करणाऱ्या केंड्ल या शरीरक्रियावैज्ञानिक रसायनशास्त्रज्ञांबरोबर हेंच यांनी १९२५ मध्ये संशोधन करण्यास सुरुवात केली. संशोधन करीत असताना हेंच यांच्या लक्षात आले की, गरोदरपणात आणि कावीळ झालेली असताना संधिवाताभ संधिशोथाच्या तीव्र वेदना कमी होतात किंवा नाहीशा देखील होतात. कारण गरोदरपणात स्त्री-लिंग हॉर्मोनांचे प्रमाण वाढते. तसेच कावीळ झालेल्या व्यक्तीमध्ये पित्ताम्ले वाढतात. या निरीक्षणाद्वारे त्यांना समजले की, हा आजार होण्यामागे सूक्ष्मजंतूच्या प्रादुर्भावाचा संबंध नसतो, तोजीवरासायनिक प्रक्षोभामुळे होतो. यांमध्ये प्रपिंडीय हॉर्मोनांचा देखीलसमावेश असू शकतो. हेंच यांनी केंड्ल यांच्यासमवेत संधिशोथामधील अंतस्रावी घटकांचा अभ्यास केला. त्यांना खात्री होती की, अधिवृक्क बाह्यकातील स्टेरॉइड हॉर्मोने सुद्धा संधिशोथाला आराम देऊ शकतील.हेंच यांनी अधिवृक्क बाह्यकातील विविध अर्कांच्या चाचण्या घेतल्या. १९३६ मध्ये केंड्ल आणि राइशस्टाइन यांनी संयुग-ई वेगळे केले. नंतर या संयुगाला कॉर्टिसोन हे नाव देण्यात आले. १९४० मध्ये केंड्ल यांनी कॉर्टिसोन या स्टेरॉइडाची निर्मिती केली. १९४८ मध्ये हेंच यांनी संधिशोथाच्या रुग्णांवर कॉर्टिसोन प्रायोगिक तत्त्वावर वापरायला सुरुवात केली. त्यांनी या स्टेरॉइडाच्या उपचारामुळे होणारी सुधारणा स्पष्टपणे दाखवून दिली. कॉर्टिसोन हे संधिवाताभ संधिशोथासाठी प्रमुख औषध ठरले. कॉर्टिसोन आणि त्यासारखी स्टेरॉइडे विविध आजारांच्या उपचारां-साठी आजही वापरली जातात. [→ कॉर्टिसोन]. 

 

हेंच यांचे ओचो रीओस (जमेका) येथे निधन झाले. 

वाघ, नितिन भरत