फ्रीड्रिख फोन शिलर

शिलर, योहान क्रिस्टोफ फ्रीड्रिख फोन : (१० नोव्हेंबर १७५९–९ मे १८०५). थोर जर्मन नाटककार, कवी आणि इतिहासकार. जन्म वर्टेंबर्ग राज्यातील मारबाख येथे. वडील ड्यूक ऑफ वर्टेंबर्गच्या सैन्यात कॅप्टन. लूडव्हिग्जबर्ग येथील लॅटिन शाळेत आरंभीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर धर्मोपदेशक होण्याची इच्छा असूनही ड्यूक ऑफ वर्टेंबर्गच्या दडपणामुळे शिलरला सैनिकी अकादमीत वैद्यकाचे शिक्षण घ्यावे लागले. पुढे स्टटगार्ट येथे सैन्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याची नोकरी मिळाली. तेथे असतानाच ‘द रॉबर्स’ (१७८१, इं. शी.) ह्या त्याच्या पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग मॅनहाइम येथे झाला. आपल्यावर झालेल्या अन्यायामुळे समाजाविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या नायकाची ही शोकात्मिका आहे. ह्या नाटकामुळे त्याला कीर्ती लाभली, तरी डयूक ऑफ वर्टेंबर्गचा त्याच्यावर रोष होऊन त्याने त्याच्या नाट्यलेखनावर बंदी घातली. त्यामुळे स्टटगार्टहून पळ काढून तो मॅनहाइमला आला तथापि तेथेही काही अडचणी आल्यामुळे लाइपसिक येथे क्रिस्त्यान कोय्र्नर (१७५६–१८३१) ह्या त्याच्या एका चाहत्याने दिलेला आधार त्याने स्वीकारला. १७८७ मध्ये डॉन कार्लोस हे त्याचे निर्यमक छंदातले पद्य नाटक प्रसिद्ध झाले. ‘द रॉबर्स’वर जर्मन साहित्याच्या इतिहासातील ‘स्टुर्म उंड ड्रांग’ ह्या चळवळीचा प्रभाव होता. [→ जर्मन साहित्य]. डॉन कार्लोसपासून त्याच्या नाट्यलेखनाला नव-अभिजाततावादी वळण मिळाले. ह्यानंतर सु. दहा वर्षे शिलरने नाटके लिहिली नाहीत. तो वायमारला आला इतिहास, कांटचे तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र आशा विषयांकडे वळला. ‘द रिव्होल्ट ऑफ द नेदर्लंड्स’ (१७८८, इं. शी.) आणि ‘द हिस्टरी ऑफ द थर्टी यीअर्स वॉर’ (१८०२, इं. शी) हे इतिहासग्रंथ त्याने लिहिले. १७८९ मध्ये येना विद्यापीठात  इतिहासाचा प्राध्यापक म्हणून त्याची नियुक्ती झाली. आपल्या तात्त्विक निबंधांतून आणि कवितांतून कलेविषयीचे आपले चिंतन त्याने प्रकट केले. कला ही एक उन्नयनकारी शक्ती असून उच्च संस्कृतीची निर्मिती आणि जगातील सुसंवादित्वाचे दर्शन घडविण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे शरीराच्या आणि भौतिकतेच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आत्म्याच्या उदात्त साम्राज्यातील पहिला पदक्षेप म्हणजे कला तसेच निसर्गातून कलावंताला सौंदर्याचे नियम प्रतीत होतात, अशी त्याची धारणा होती.

शारलॉट फोन लेंगेफेल्ड ह्या सुसंस्कृत स्त्रीशी शिलरचा विवाह झाला (१७९०). १७९१ पासून अतिश्रमामुळे त्याची प्रकृती ढासळली. त्यातून तो कधीच पूर्णपणे सावरला नाही.

दहा वर्षांनंतर शिलर पुन्हा नाट्यलेखनाकडे वळला आणि वालेनश्टाइन (त्रिनाट्य, १७९८–९९), मारिआ श्टुअर्ट (लेखन १८००), ‘द मेड ऑफ ऑर्लेआन्स (लेखन १८०१, इं शी.) आणि ‘द ब्राइड ऑफ मेसिना’ (लेखन १८०२-०३, इं. शी.) ह्या श्रेष्ठ नाट्यकृती त्याने लिहिल्या. ⇨ तीस वर्षांच्या युद्धात प्रॉटेस्टंटांना विरोध करणाऱ्या कॅथलिक सैन्याचा सेनापती वालेनश्टाइन ह्याच्यावर शत्रूशी संगनमत केल्याचा आरोप आणि त्याचा झालेला खून, हा उपर्युक्त त्रिनाट्याचा विषय. मृत्युदंडाला धैर्याने सामोरी जाणारी मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स हिचे तशा मरणामुळे झालेले नैतिक पुनरुत्थान मारिआ श्टुअर्टमध्ये दाखविलेले आहे. ‘द मेड ऑफ ऑर्लेआन्स’ मध्ये जोन ऑफ आर्कच्या बलिदानाचा एक वेगळाच अर्थ त्याने लावला आहे. ग्रीक शोकात्मिकेचा आदर्श समोर ठेवून लिहिलेल्या ‘द ब्राइड ऑफ मेसिना’ ह्या नाट्यकृतीत नात्याच्या अजाणतेपणामुळे आपल्या बहिणीच्याच प्रेमात पडून आपल्या कुटुंबाचा सर्वनाश घडवून आणणाऱ्या दोन भावांची कथा आहे. ह्या सर्व नाटकांवर नव-अभिजाततावादाचा प्रभाव आहे.

शिलर आणि त्याचा समकालीन मित्र ⇨ योहान वोल्फगांग फोन गटे ह्यांनी आपल्या नाट्यलेखनाने युरोपीय नाट्यपरंपरेत मोलाची भर घातली. स्वतंत्र अशी फक्त अकरा नाटके शिलरने लिहिली तीव्र भावनात्मकतेला पेलून धरील अशी नाट्यभाषा त्याने वापरली. रंगभूमीचे स्वरूप व शक्यता ह्यांची उत्तम जाण त्याला होती. वैचारिक बांधीलकी हे त्याच्या नाटकांचे एक सामर्थ्य आहे. त्याच्या नाटकांची संरचना नाट्यविषयाला नेमकी चौकट प्राप्त करून देते. नाटकांतील व्यक्तिरेखा त्याच्या विचारांच्या वाहक म्हणून रंगभूमीवर वावरतात.

वारमार येथे तो मरण पावला.

संदर्भ : 1. Calvin, T. The life and Works of Friedrich Schiller, New York, 1970.

           2. Carlyle, Thomas, The life of Friedrich Schiller, London, 1825.

           3. Frey, J. R. Ed. Schiller, 1759-1959 : Commemorative American Studies,  Urbana (III), 1959.

           4. Kaufman, F. W. Schiller : Poet of Philosophical Idealism, Oberlin (Ohio), 1942.

           5. Kerry, S. S. Schiller’s Writtings on Aesthetics, New York, 1961.

           6. Stahl, E. L. Friedrich Schiller’s Drama : Theory and Practice, Oxford, 1956.

 

कुलकर्णी, अ. र.