त्स्वाइख, श्टेफान : (२८ नोव्हेंबर १८८१–२२ फेब्रुवारी १९४२). ऑस्ट्रियन साहित्यिक. जर्मन भाषेत लेखन. व्हिएन्ना येथे एका ज्यू कुटुंबात त्याचा जन्म झाला. व्हिएन्ना आणि बर्लिन विद्यापीठांतून साहित्य आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांचा त्याने अभ्यास केला व्हिएन्ना विद्यापीठाची डॉक्टरेट मिळविली. कलानिर्मिती आणि कलास्वाद ह्यांची ओढ त्याला शालेय जीवनापासून होती आणि वयाच्या अठराव्या वर्षापासून व्हिएन्नामधील दर्जेदार नियतकालिकांतून त्याचे लेख प्रसिद्ध होत होते. त्याच सुमारास सिल्बेर्ने साइटेन (१९०१, इं. शी. सिल्व्हर स्ट्रिंग्ज) हा त्याचा काव्यसंग्रहही प्रकाशित झालेला होता. पुढे इंग्‍लंड, फ्रान्स, इटली, भारत, चीन आदी देशांचा त्याने प्रवास केला. ह्या प्रवासातून उदार, सर्वदेशीय (कॉस्मपॉलिटन) अशी दृष्टी त्याला प्राप्त झाली. सर्वदेशीयत्वाची ही व्यापक जाणीव त्याने आयुष्यभर जपली. पहिल्या महायुद्धाच्या काळात वार्ताहर म्हणून त्याने स्वित्झर्लंडमध्ये प्रवेश मिळविला. तेथे विख्यात फ्रेंच साहित्यिक रॉमँ रॉलां ह्यांचा सहवास त्याला लाभला. युद्धकाळात शांततावादी भूमिका घेणाऱ्या त्यांच्यासारख्या साहित्यिकांच्या गटास तो मिळाला. युद्धाची अनर्थकारकता दाखवून देणारी येरेमीआस (१९१७) ही नाट्यकृतीही त्याने लिहिली. युद्ध संपल्यानंतर तो ऑस्ट्रियात परतला आणि सॉल्झबर्ग येथे राहू लागला. प्रतिकूल राजकीय वातावरणामुळे १९३४ मध्ये ऑस्ट्रिया सोडून तो इंग्‍लंडमध्ये आला. तेथे काही काळ राहिल्यावर तो ब्राझीलला आला. रिओ दे जानीरोजवळील पेट्रोपलिस येथे त्याने आपल्या पत्‍नीसह आत्महत्या केली.

कविता, निबंध, कथा, नाटक, चरित्र असे विविध साहित्यप्रकार श्टेफानने हाताळले. तथापि कथा, निबंध आणि चरित्रग्रंथ ह्यांवर त्याची कीर्ती आज मुख्यतः अधिष्ठित आहे. फ्रॉइडच्या मानसशास्त्रीय लेखनाचा श्टेफानच्या मनावर फार मोठा परिणाम झालेला होता आणि फ्रॉइडच्या सिद्धांतांच्या आधारे माणसांच्या कृती, त्यांमागील उद्दिष्टे आणि प्रेरणा ह्यांचा शोध घेण्याचा प्रयत्‍न त्याने आपल्या कथांतून व चरित्रांतून केला. विविध व्यक्तिरेखा त्यांच्या सूक्ष्म बारकाव्यांसकट उभ्या करण्याचे त्याचे सामर्थ्य ह्या शोधातून प्रकटले. श्टेफानच्या निबंधांतूनही त्याची मनोविश्लेषणाची दृष्टी प्रत्ययास येते. एर्स्टेस एर्लेबनिस (१९११, इं. शी. फर्स्ट एक्स्पीरिअन्स), आमोक (१९२२, इं. भा. १९३१) आणि फरविरुंग डेअर गेफ्यूहल (१९२५, इं. भा. कॉन्‌फ्‍लिक्ट्स, १९२७) हे त्याचे तीन कथासंग्रह उल्लेखनीय आहेत. जिवंत कल्पनाशक्ती आणि कथेच्या घाटाची कलात्मक जाणीव त्यांतून दिसून येते. ड्रायमाइस्टर (१९२०, इं. भा. थ्री मास्टर्स, १९३०), डेअर कांफ मिट डेम ड्येमोन (१९२५, इं. भा. मास्टर्स बिल्डर्स, १९३९) हे त्याने लिहिलेल्या अनेक चरित्रग्रंथांत विशेष प्रसिद्ध होत. थ्री मास्टर्स मध्ये बाल्झॅक, डिकिंन्झ आणि डॉस्टॉव्हस्की ह्यांची चरित्रे असून मास्टर बिल्डर्स मध्ये फ्रीड्रिख हल्डरलीन, हाइन्‍रिख फोन क्लाइस्ट व फ्रीड्रिख नीतशे ह्यांची जीवने रंगविली आहेत. ह्या साऱ्याच लेखनाला एक प्रकारच्या उत्कट अंतःप्रज्ञेचा स्पर्श झालेला असल्यामुळे वस्तुनिष्ठ चरित्रांपेक्षा त्यांचे स्वरूप वेगळे वाटते. स्टेर्नस्ट्यूंडेन डेअर मेन्शहाइट (१९२८, इं. भा. द टाइड ऑफ फॉर्च्युन, १९४०) मध्ये काही ऐतिहासिक व्यक्तींची शब्दचित्रे आलेली आहेत, तीही ह्या संदर्भात लक्षणीय ठरतात. पॉल व्हेर्लेअन, एमिल व्हेरहारेन ह्यांच्या कवितांचे उत्कृष्ट अनुवादही त्याने केले. डी वेल्ट फोन गेस्टर्न (१९४४, इं. शी. द वर्ल्ड ऑफ यस्टरडे) हे त्याचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

संदर्भ : Romains, Jules, Stefan Zweig : Great European, New York, 1941.

कुलकर्णी, अ. र.