काफ्का, फ्रांट्‌स : (३ जुलै १८८३ – ३ जून १९२४). जर्मन कथाकादंबरीकार. प्राग शहरी जन्म. हा जन्माने चेकोस्लोव्हाक आणि ज्यू वंशाचा होता. त्याने कायद्याची पदवी प्राग विद्यापीठातून संपादन केली (१९०६). १९०८ मध्ये एका विमा कंपनीत त्याला नोकरी मिळाली पण नोकरीच्या जाचक चाकोरीत त्यांच्या संवेदनाक्षम मनाची सतत पिळवणूक झाली. १९१२ साली त्याची आपल्या प्रेयसीशी ओळख झाली व लग्नही ठरले परंतु १९१७ मध्ये त्याने जुळलेली सोयरीक तोडून टाकली. १९१३ मध्ये त्याचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला आणि अमेरिका या कादंबरीच्या सुरुवातीचा भागही त्याने त्याच वर्षी प्रसिद्ध केला. १९१५ साली त्याला ‘फाँटेन पारितोषिक’ देण्यात आले.

काफ्काचे आयुष्य शारीरिक व मानसिक यातनांशी झगडण्यातच खर्ची पडले. प्रेमात तो अयशस्वी ठरला. त्याचे कौटुंबिक जीवनसुद्धा  दुःखीच होते. त्याचे वडील स्वभावाने अत्यंत उग्र आणि हुकूमशाही वृत्तीचे होते आणि मुलाच्या वाङ्‍मयीन महत्वाकांक्षांना त्यांचा विरोध होता. काफ्काचा मित्र व चरित्रकार मॅक्स ब्रॉड, त्याचा डॉक्टर रोबेर्ट क्लोपश्टोक व त्याची अखेरच्या काळातली मैत्रीण डोरा डायमांट या लोकांनीच त्याला सहानुभूतीपूर्वक साथ दिली.

फ्रांट्स काफ्का

काफ्काचा स्वतःच्या लेखणगुणांवरील विश्वाससुद्धा डळमळता होता. मृत्यूपूर्वी आपला मित्र मॅक्स ब्रॉड याला त्याने अशी सूचना लिहून ठेवली होती, की आपली सर्व हस्तलिखिते नष्ट करून टाकावी. Der Prozess (१९२५, इं. भा. द. ट्रायल, १९३७), Das Schloss (१९२६, इं. भा. द. कॅसल, १९३०), Amerika (१९२७, इं. भा. १९३८), ह्या कादंबऱ्या काफ्काचा मित्र मॅक्स ब्रॉड याने काफ्काच्या मृत्यूनंतर प्रकाशित केल्या. In der Strafkolonie (१९१९, इं. भा. इन द. पीनल कॉलनी, १९४१), Ein Landarzt (१९१९, इं. भा. द. कंट्री डॉक्टर, १९४०), Die Verwandlung (१९१६, इं. भा. मेटमॉर्फसिस, १९३७), हे त्याचे काही उल्लेखनीय कथासंग्रह. यांखेरीज त्याच्या रोजनिश्याही (Tagebucher 1910-1923, इं. भा. द. डायरी ऑफ फ्रांट्‌स काफ्का, २ खंड, १९४८-४९) प्रसिद्ध झाल्या आहेत.

१९१७ साली त्याला फुप्फुसाचे दुखणे जडले व तेव्हापासून त्याला नोकरीतून दीर्घकाळ रजा घ्यावी लागली. त्याच्या मृत्यूनंतरच त्याचे बरेचसे लेखन प्रसिद्ध झाले.

दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात पश्चिमी देशांत ⇨ अस्तित्ववाद या नावाने ओळखली जाणारी जी जीवनविषयक विचारसरणी जोराने प्रसारात आली, तिच्या अनेक जनकांत काफ्काचा उल्लेख केला जातो. सरेन किर्केगॉर या अस्तित्ववादी विचारवंताचे विचार काफ्काला परिचित होते परंतु काफ्का विचारवंत नसून सर्जनशील लेखकच होता. निराशा, कोंडमारा, वैताग, भय, भीषण उत्कंठा आणि न्यूनत्वाचा अनुभव यांचा स्वप्नवास्तवसदृश कथानकांद्वारा त्याने तपशीलवार रीतीने ठाव घेण्याचा प्रयत्न केला असल्याने, अस्तित्ववादी त्याला आपल्या परंपरेतील लेखक मानतात.

काफ्का व्हिएन्ना शहराजवळच्या एका शुश्रूषागृहात मरण पावला.

संदर्भ : 1.Brod, Max, Eine Biographie, Trans. Humphreys Roberts, G.Franz Kafka : A     

             Biography, New York, 1947.

2.Osborne, Charles, Kafka, Edinburgh and London, 1967.

3.Tauber’ Herbert, Kafka Trans. Humphreys Roberts, G. Senhouse, Roger, Franz  

              Kafka : An Interpretation of His Works, New Haven.1948.

चित्रे, दिलीप