ऱ्यूकर्ट, फ्रीड्रिख : (१६ मे १७८८-३१ जानेवारी १८६६). जर्मन कवी व पौर्वात्य भाषाभ्यासक. जन्म शूव्हाइन्फुर्ट येथे. हायडल्‌बर्ग, वुर्टस्‌बर्ग आणि येना येथे त्याने ग्रीक-लॅटिन या प्राचीन भाषांचे अध्ययन केले. अरबी, फार्सी इ. पौर्वात्य भाषा तो स्वप्रयत्नाने शिकला. स्टटगार्ट येथे एका नियतकालिकाचा संपादक म्हणून काही काळ काम पाहिल्यानंतर एर्लांगन व बर्लिन विद्यापीठांत अनुक्रमे १८२६-४१ आणि १८४१-४८ ह्या कालखंडांत त्याने पौर्वात्य भाषाशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम केले. १८४८ नंतर नॉइझस येथे त्याचे वास्तव्य होते. तेथेच तो निवर्तला.

फ्रीड्रिखच्या काव्यकृतींत डॉयचगेडिश्ट (१८१४, इं. शी. जर्मन पोएम्स), लिबेस्‌फ्रयुलिंग (१८२१, इं. शी. लव्ह्‌ज स्प्रिंगटाइम), दि वाडजहाईट देस ब्रह्मानन (६ खंड, १८३७ ३९, इं. भा. द विज्‌डम ऑफ द ब्रॅह्मिन, १८८२), नल उंड दमयंती (१८३८) ह्यांचा अंतर्भाव होतो. डॉयचगेडिश्टह्या काव्यसंग्रहात समाविष्ट असलेली ‘गेहारनिष्टऽ सोनेटन्’ (इं. शी. सॉनेट्‌स इन आर्मर) ही सुनीतमालिका विशेष गाजली. जर्मनीत स्वातंत्र्यासाठी लढली गेलेली युद्धे हा ह्या सुनीतांचा विषय. त्याच्या कविता अनेकदा शब्दांच्या आहारी गेलेल्या सखोलता हरवून बसलेल्या अशा वाटतात परंतु त्याच्या काव्यातील पौर्वात्य प्रतिमा लक्षणीय आहेत. ‘लव्हज स्प्रिंगटाइम’ मधील त्याच्या कविता खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. फ्रायमुंट राइमार ह्या नावाने त्याने काही कविता लिहिल्या. द विज्‌डम ऑफ द ब्रॅह्मिन मध्ये त्याने भारतीय जीवनविषयक दृष्टिकोण सांगितला. नल उंड दमयंती मध्ये नलदमयंतीची प्रसिद्ध भारतीय कथा काव्यरूप झालेली आहे.

अनेक पौर्वात्य भाषा त्याला येत असल्यामुळे संस्कृत, फार्सी, अरबी, हिब्रू इ. भाषांतील साहित्य तो अनुवादरूपाने जर्मन भाषेत आणू शकला. विख्यात फार्सी कवी रूमी ह्याची गझल त्यानेच अनुवादित स्वरूपात जर्मनीत पोहोचवली. त्याने नाट्यलेखनही केले आहे.

महाजन, सुनंदा