श्टिफ्टर, आडालबेर्ट : (२३ ऑक्टोबर १८०५- २८ जानेवारी १८६८). जर्मन (ऑस्ट्रियन) कथा-कादंबरीकार. जन्म ऑस्ट्रियातील ओबरप्लॅन येथे. व्हिएन्ना येथे कायद्याचे शिक्षण त्याने पदवी न घेताच अर्धवट सोडले. त्यानंतर शिक्षक, चित्रकार म्हणून त्याने काम केले. पुढे लिंझ येथील शाळा-तपासनीसाची नोकरी त्याला अनेक प्रकारच्या आजारांमुळे सोडावी लागली (१८६५). आजारपणाला कंटाळून त्याने लिंझ येथे आत्महत्या केली.

त्याचे कथालेखन १८४० पासून प्रसिद्घ होऊ लागले. ह्या कथांत ‘ वाइल्ड फ्लॉवर्स ’(१८४१, इं. शी.) आणि ‘माय गेट गँडफादर्स पोर्टफोलिओ’(१८४१-४२, इं. शी.) ह्यांसारख्या कथांचा समावेश होतो. ‘ बिजिटा ’(१८४४) ह्या कथेपासून त्याला स्वतःचा नेमका घाट गवसला. आपण ज्या प्रदेशात राहतो, तो प्रदेश आणि तेथील लोक हेच आपल्या साहित्यकृतीचा आशय आणि घाट ठरवितात कारण त्यांच्यांत एक आंतरिक एकात्मता असते, ह्याची त्याला जाणीव झाली. ही जाणीव त्याच्या साहित्यातून उत्कटपणे प्रत्ययाला येते. स्टुडिएन (६ खंड, १८४४- ५०, इं. शी. स्टडीज), बुंटश्टाइन (१८५३, इं. शी. स्टोन्स ऑफ मेनी कलर्स) ह्या त्याच्या कथासंगहांना मोठी लोकप्रियता प्राप्त झाली.

डेअर नारव्‌झोमर (१८५७, इं. शी. द इंडियन समर) ही त्याची कादंबरी जर्मन साहित्यातील एक अभिजात साहित्यकृती मानली जाते. दोन प्रेमी जीवांच्या जीवनात विलंबाने आलेल्या सुखाची ही कहाणी आहे. विटिको (१८६५-६७) ह्या त्याच्या कादंबरीत एका न्याय्य आणि शांततामय व्यवस्थेच्या स्थापनेसाठी माणूस करीत असलेल्या संघर्षाचे चित्रण आहे.

कुलकर्णी, अ. र.