वुल्फिला : (३११ – सु. ३८३). गॉथिक भाषेत बायबलचा अनुवाद करणारा बिशप. उल्फिलास हे त्याचेच एक पर्यायी नाव. त्याच्या जीवनाची निश्चित माहिती मिळत नाही. तथापि तो मूळचा कॅपाडोशियन होता. त्याचा जन्म कॅपोडोशियात (आशिया मायनरमधील एक महत्त्वाचे राज्य) झाला, असे म्हणतात. तो कॉन्स्टँटिनोपल (आताचे इस्तंबूल) येथे जन्मला, असेही म्हटले जाते. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात कॅपाडोशियन लोक डॅन्यूब नदीच्या उत्तरेस स्थायिक झाले होते.

वुल्फिला तीस वर्षांचा असताना त्याला गॉथिक ख्रिश्चनांचा बिशप म्हणून नेमण्यात आले (३४१). गॉथ लोकांमध्ये सात वर्षे राहिल्यानंतर गॉथिक राजाकडून त्याचा छळ सुरू झाल्यामुले बल्गेरियाचा एक भाग असलेल्या मिशिया येथे त्याने स्थलांतर केले. कॉन्स्टँटिनोपल येथे तो निधन पावला, असे म्हणतात.

वुल्फिलाने ग्रीक, लॅटिन व रूनिक मूळाक्षरांच्या आधारे गॉथिक मूळाक्षरे तयार केली. ⇨बायबलचा  गॉथिक भाषेत अनुवाद करण्यासाठी ही मूळाक्षरे त्याने वापरली. या अनुवादाचा आज उपलब्ध असलेला भाग थोडाच असला, तरी जर्मानिक भाषांच्या अभ्यासकांच्या दृष्टीने त्याचे महत्त्व मोठे आहे. गॉथिक भाषेचा वाङ्‌मयीन उपयोग करून तिच्या विकासाचा मार्ग त्याने खुला करून दिला.

ख्रिस्ती  धर्माची जर्मानिक परिभाषाही त्याने तयार केली. [→ जर्मानिक भाषासमूह ].

कुलकर्णी, अ. र.