ल्यूशन : (इ. स. सु. १२०–सु. २००). प्राचीन ग्रीक वक्तृत्वशास्त्रवेत्ता आणि उपरोधकार. समॉसत-आजचे तुर्कस्तानातील समासात-येथे जन्मला. त्याच्या लहानपणी त्याला मूर्तिकलेत स्वारस्य निर्माण झाल्यामुळे शिल्पकार असलेल्या आपल्या काकाकडे तो उमेदवारी करू लागला परंतु त्या दोघांचे न पटल्यामुळे ल्यूशन ह्याने ही उमेदवारी सोडून दिली. तो वक्तृत्वशास्त्राकडे वळला, ग्रीस, इटली, दक्षिण गॉलचा त्याने प्रवास केला. त्याची मातृभाषा ॲरेमाइक होती. परंतु ग्रीक भाषा आणि संस्कृती ह्यांचा त्याने उत्तम अभ्यास केला होता. शहराशहरांतून त्याने आपली वक्तृत्वकला सादर केली. न्यायालयांत वकील म्हणूनही त्याने काम केले असावे. चाळिशीच्या आसपास असताना तो अथेन्यमध्ये स्थायिक झाला आणि स्टोइक पंथाच्या डिमोनॅक्स ह्या तत्त्वज्ञाच्या मार्गदर्शनाखाली तत्त्वज्ञानाचा अभ्यास करू लागला. तात्त्विक स्वरूपाचे संवाद तो लिहू लागला परंतु पुढे ते सोडून देऊन उपरोधप्रचुर संवादलेखन तो करू लागला. हा एक नवा प्रकार होता आणि ह्या उपरोधप्रचुर संवादलेखनावरच त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. त्याच्या उत्तरायुष्यात रोमन सम्राट कोमोडस (कार. इ. स. १८०-१९२) ह्याने ईजिप्तमध्ये न्याय आणि कायदा ह्यांच्याशी संबंधित अशा एका पदावर त्याची नेमणूक केली. पुढे तो अथेन्सला आला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला, असे दिसते.

ल्यूशनच्या नावावर, परंपरेने ८० गद्यकृती मोडतात परंतु त्यांतील सु. दहा त्याच्या दिसत नाहीत. ल्यूशनने आपल्या लेखनात आपल्या पूर्वजीवनाची आणि भ्रमंतीची माहिती दिलेली आहे (Somnium-इं. शी. द व्हिजन). रोममधील विलासी आणि विस्कळित जीवनाशी त्याने अथेन्समधील शांत आणि साध्या जीवनाची तुलना केली आहे (Nigrinus). ‘द लिटररी प्रोमीथीअस ’ (इं.शी.) मध्ये तो त्याच्या उपरोधप्रचुर संवादलेखनाबद्दल लिहितो. De Historia Conscribenda (इं. शी. द वे टू राइट हिस्टरी) मध्ये आदर्श इतिहासकारामध्ये कोणते गुण असावेत, हे त्याने सांगितले आहे. सत्याची कदर, निःपक्षपातीपणा ह्यांचा त्याने पुरस्कार केला आहे. त्याच्या समकालीन इतिहासकारांवर त्याने टीकाटिप्पणीही केली आहे.  Vera Historia (इं. शी. द ट्रू हिस्टरी) मध्ये असंभवनीय साहसकथा खऱ्या म्हणून सांगणाऱ्या प्राचीन ग्रंथकर्त्यांचे विडंबन त्याने केले आहे. डिमोनॅक्स ह्या त्याच्या गुरूबद्दलही त्याने लिहिले आहे (डिमोनॅक्स).

ल्यूशनच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य दिसते, ते त्याच्या उपरोधप्रचुर संवादांत. दांमिकतेचा त्याला तिटकारा होता आणि त्या अवगुणावर प्रहार करण्यासाठी आपल्या विनोदाचे हत्यार त्याने अत्यंत प्रभावीपणे वापरले. समकालीन साहित्य, तत्त्वज्ञान, बौद्धिक जीवन ह्यांतील दांभिकता आणि अपप्रवृत्ती त्याच्या टीकेचे लक्ष्य बनली. काही ग्रीक देवतांशी संबंधित असलेल्या मिथ्यकथांची त्याने थट्टा केली आहे. उदा., Deorum Dialogi (इं. शी. डायलॉग्ज ऑफ द गॉड्स) आणि  Marinorum Dialogi (इं. शी. डायलॉग्ज ऑफ द सी-गॉड्स). पैसा आणि प्रतिष्ठा ह्यांचा क्षणभंगुरपणा माणसे जाणत नाहीत, ह्याचे दुःख त्याला होते आणि ‘डायलॉग्ज आफ द डेड’ (इं. शी.) सारख्या संवादांतून त्याने ते उपरोधाने मांडले आहे. तत्त्वज्ञान शिकवायचे पण ते आचरणात आणवयाचे नाही, ह्या प्रवृत्तीबद्दलही त्याने आपल्या खास शैलीत निषेध नौंदविला आहे (बँक्विट). तत्त्वज्ञांचा लिलावही त्याने दाखविला आहे (Vitarum auctio, इ. शी. द. ऑक्शन ऑफ लाइव्ह्ज). कोणत्याही तत्त्वज्ञानाच्या संस्थापकांविरुद्ध आपला रोख नसून त्या त्या तत्त्वज्ञानाचा वारसा सांगण्याऱ्या अपात्र दांभिकांना आपण्यास धारेवर धरावयाचे आहे, असे ल्यूशन स्पष्ट करतो.

 

ल्यूशनच्या समोर मिनिपस (इ. स. पू. तिसरे शतक) ह्या सिनिक पंथीय तत्त्वज्ञाचा आणि उपरोधकाराचा आदर्श असल्याचे दिसते. परंतु त्याने प्लेटॉनिक संवादांचे तंत्र आपल्या उपरोधप्रचुर आविष्कारासाठी प्रत्ययकारीपणे वापरले. आपल्या लेखनातून त्याने ज्या गमतीदार कथा सांगितल्या, त्यांचा प्रभावस्त्रोत फ्रांस्वा राब्ले, जॉनाथन स्विफ्ट, हेन्री फील्डिंग, व्हॉल्तेअर ह्यांच्या लेखनातूनही जाणवतो आणि ह्या दृष्टीने पाहता उपरोधिकेच्या यूरोपीय साहित्यातील विकासाच्या संदर्भात त्याने महत्त्वाची कामगिरी बजावल्याचे दिसते. अँटिक ग्रीक ही भाषा त्याने अतिशय सफाईने वापरली. रोमन साम्राज्याच्या उत्तर कालातील, तसेच बायझंटिन कालखंडातील लेखकांवरही त्याच्या शैलीचे संस्कार झालेले दिसतात. वॉल्टर सॅव्हिज लँडॉर ह्या इंग्रज लेखकाने लिहिलेल्या ‘इमॅजिनरी कॉनव्हर्सेशन्स’मधील ‘ल्यूशन अँड टिमोथिअस’ मध्ये ल्यूशनच्या धर्म व तत्त्वज्ञानविषयक विचारांची चर्चा आलेली आहे.

कुलकर्णी, अ. र.