युरिपिडीझचा अर्धपुतळा, इ. स. पू. ४ थे शतकयुरिपिडीझ : (सु. ४८०–४०६ इ. स. पू.). श्रेष्ठ ग्रीक नाटककार. सालामिस येथे त्याच्या कुटुंबाची मालमत्ता होती आणि तेथेच त्याचे पूर्वायुष्य गेले, असे दिसते. तेथे एका गुहेत बसून तो लेखन-वाचनात स्वतःला व्यग्र ठेवी, असे म्हणतात. समकालीनांमध्ये तो फारसा लोकप्रिय नव्हता प्राचीन ग्रीक नाटककारांना नाट्यलेखनाबद्दल दिली जाणारी पारितोषिके त्याला मोठ्या प्रमाणावर कधी मिळाली नाहीत. सार्वजनिक जीवनात फारसा न मिसळणारा, अलिप्त वृत्तीचा असा हा नाटककार होता. तथापि ग्रीक तत्त्वज्ञ अनॅक्सॅगोरस आणि संगीतकार टिमोथीअस ह्यांच्यासारखे काही मित्र त्याला होते. तो व्यायामपटू व चित्रकार होता, असेही म्हटले जाते. इ. स. पू. ४०८ नंतर मॅसिडोनियाचा राजा आर्किलेअस ह्याच्या दरबारी युरिपिडीझ होता आणि मॅसिडोनिया येथेच त्याचा मृत्यू झाला, असे म्हणतात.

युरिपिडीझने मुख्यतः शोकात्मिका लिहिल्या. ‘द डॉटर ऑफ पेलिअस’ (इ. स. पू. ४५५, इं. शी.) हे युरिपिडीझचे पहिले नाटक. ते आज उपलब्ध नाही. त्याने ९२ नाटके लिहिली, असे म्हटले जात असले, तरी आज त्याची फक्त १८ नाटके उपलब्ध आहेत ती अशी : (१) अल्सेस्टिस (इ. स. पू. ४३८), (२) मीडीअ (इ. स. पू. ४३१), (३) हिपॉलिटस (इ. स. पू. ४२८), (४) ट्रोजन विमेन (इ. स. पू. ४१५, इं. शी.), (५) हेलन (इ. स. पू. ४१२), (६) ओरेटीझ (इ. स. पू. ४०८), (७) इफिजिनिआ ॲट औलिस (इ. स. पू. ४०५, इं. शी.), (८) बॅकी (इ. स. पू. ४०५), (९) अँड्रॉमकी, (१०) चिल्ड्रन ऑफ हीरॅक्लीझ (इं. शी.), (११) हेक्युबा, (१२) सप्लायंट्स (इं. शी.), (१३) इलेक्ट्रा, (१४) मॅडनेस ऑफ हीरॅल्कीझ (इं. शी.), (१५) इफिजिनिआ इन टोरिस (इं. शी.), (१६) आयन, (१७) द फिनिशियन मेडन्स (इं. शी.), आणि (१८) सायक्लोप्स (इं. शी.). ‘सायक्लोप्स’ ही एक विरूपीका आहे. ‘ऱ्हीसस’ नावाची एक शोकात्मिका युरिपिडीझच्या नावावर मोडत असली, तरी ती त्याचीच आहे किंवा काय ह्याविषयी शंका आहे.

स्त्रिया, धर्म आणि युद्ध हे तीन विषय त्याच्या आज उपलब्ध असलेल्या नाटकांतून प्रामुख्याने आढळतात. युरिपिडीझच्या नाटकांची संविधानके त्याने प्रचलित कथांतून घेतलेली असली, तरी त्या मूळ कथांतील व्यक्तिरेखांचे मानसिक संघर्ष तो आपल्या नाटकांतून खोलवर जाऊन उलगडतो. त्याची दृष्टी वास्तववादी आहे. त्याचे संवाद दैनंदिन व्यवहारांतील संवादांप्रमाणे साधे, सोपे परंतु परिणामकारक असे आहेत. असामान्य व्यक्तींतील असामान्यत्वापेक्षा त्यांचे माणूस म्हणून दिसणारे दोष त्याला विशेष आकर्षित करतात आणि केवळ थोरामोठ्यांची दुःखे चित्रित करणाऱ्या शोकात्मिकेची चौकटही त्याला मान्य नव्हती. समकालीन सामाजिक, राजकीय व तत्त्वज्ञानीय प्रश्नांत युरिपिडीझला रस होता. त्याच्या काळातील प्रचलित मूल्यांच्या प्रामाण्याविषयी त्याला सतत शंका होती आणि त्याची ही संदेहवादी वृत्ती त्याच्या नाट्यकृतींतून प्रत्ययाला येते. तसेच बुद्धिवाद आणि उदारमतवाद ह्यांची छाया त्याच्या नाटकांवर स्पष्टपणे पडलेली दिसते. प्रचलित धर्मावर तो उघड उघड टीकाही करताना दिसतो. कर्तव्य आणि प्रेम, बुद्धी आणि भावना, निरपवाद मूल्ये आणि सापेक्ष मूल्ये, मूल्ये आणि प्रत्यक्ष आचरण ह्यांचा झंझावाती संघर्ष हा युरिपीडीझच्या नाट्यविश्वाचा गाभा होय. मानवी आशा-आकांक्षांचे आकलन आणि मानवाला भोगाव्या लागणाऱ्या यातनांबद्दलची अपार सहानुभूती, हे युरिपीडीझचे एक ठळक वैशिष्ट्य होय. पुरुषपात्रे रंगविण्यापेक्षा स्त्रीपात्रे रंगविण्यात त्याची प्रतिभा विशेष रमते, असेही दिसून येते. स्त्रियांच्या समान हक्कांची जाणीवही युरिपीडीझला होती, असे लक्षात येते. समकालीनांत तो लोकप्रिय नव्हता, ह्याचे एक कारण, त्याचे विचार स्वतःच्या काळाच्या बरेच पुढे होते, असे दिसते. श्रेष्ठ ग्रीक सुखात्मिकाकार ॲरिस्टोफेनीस ह्याच्याही उपरोधाचे युरिपीडीझ हा एक लक्ष्य बनला होता.

युरिपीडीझने आपल्या नाटकांत आरंभकांचा (प्रलॉग्ज) बराच उपयोग करून घेतलेला दिसतो. त्याने ग्रीक नाटकांतील पारंपरिक वृंदाचे कार्यही आपल्या नाटकांत मर्यादित ठेवले परंतु त्या वृंदासाठी त्याने उत्कृष्ट भावकविता लिहिल्या. त्याची नाट्यरचना विस्कळित असल्याची टीका त्याच्यावर केली जाते तथापि त्याच्या नाट्यविश्वाचे दर्शन घेताना मानवी मनाचे गूढ व अतर्क्य पैलू हुडकू पाहणारी त्याची भेदक प्रतिभा सतत प्रत्ययास येत राहते.

संदर्भ : 1. Bates, W. N. Euripedes: A Student of Human Nature, reprint, New York, 1969.

2. Conacher, D. J. Euripedean Drama, Myth, Theme and Structure, Toronto, 1967.

3. Decharme, P. Trans. Loeb, J. Euripedes and the spirit of His Drama, New York, 1906.

4. Lucas, F. L. Euripedes and His Influence, New York 1963.

5. Murray, G, Euripedes and His Age, 2nd ed. New York, 1965.

6. Norwood, G. Essays on Euripedean Drama, Berkeley, Cliffs,1954.

7. Segal, E. Ed. Euripedes: A Collection of Critical Essays, Englewood Cliffs, N. J. 1968.

8. Whitman, C. H. Euripedes and the Full Circle of Myth, Cambridge, Mass, 1974.

कुलकर्णी, अनिरुद्ध