कॅलिमाकस : (सु. ३१५ – २४० इ. स. पू.). ग्रीक कवी आणि विद्वान. जन्म उत्तर आफ्रिकेतील सायरीनी ह्या ग्रीक वसाहतीत. पित्याचे नाव बॅट्स. कॅलिमाकस हा प्रारंभी शिक्षक होता तथापि पुढे ईजिप्तच्या टॉलेमी फिलडेल्फसने (सु. ३०९ – २४६ इ. स. पू.) ॲलेक्झांड्रियाच्या विख्यात ग्रंथालयात त्याची ग्रंथसूचिकार म्हणून नेमणूक केली. तेथे Pinakes (टॅब्लेट्स) ह्या नावाने १२० खंडांची एक महत्त्वाची ग्रंथसूची त्याने तयार केली. बृहद्ग्रंथ आणि दीर्घकाव्ये – उदा., महाकाव्य ह्यांचा काळ संपुष्टात आला असून, काटेकोर तंत्रशुद्धता सांभाळून लिहिलेल्या लहान पण प्रगल्भ कवितांची आणि ग्रंथांची निर्मिती ही आपल्या काळाची वाङ्मयीन गरज आहे, अशी त्याची धारणा होती. म्हणूनच ⇨ॲपोलोनियस रोडियस ह्या त्याच्या शिष्याने लिहिलेल्या आर्गोनाउटिका ह्या महाकाव्यावरून त्या दोघांत वाद घडून आला.

त्याने ८०० हून अधिक ग्रंथ लिहिल्याचा उल्लेख ग्रीक कोशकार स्यूइडॅस ह्याने केला असला, तरी आज त्याने रचिलेली झ्यूस, अपोलो, आर्टमिस इ. देवदेवतांवरील सहा स्तवने आणि सु. चौसष्ट सुभाषितवजा लहान कविताच उपलब्ध आहेत. त्याशिवाय Aitia(इं. शी. कॉझेस), Berenikes Plokamos (इं. शी. लॉक ऑफ बेरनायसी), Hecale आणि Iambi ह्या काव्यग्रंथांचे काही भाग पपायरीच्या स्वरूपात उपलब्ध आहेत.

त्याच्या वाङ्मयविषयक भूमिकेशी सुसंगत असेच त्याने वाङ्मय आहे. Aitia हा त्याचा सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ चार खंडांचा असला, तरी त्यात धार्मिक परंपरा आणि विधी यांच्याशी संबद्ध असलेल्या आख्यायिकांवरील लघुकाव्येच संगृहीत केलेली आहेत. Hecale हे त्याचे काव्य म्हणजे लघुमहाकाव्याचा आदर्शच होय. ‘लॉक ऑफ बेरनायसी’ हे बहुधा Aitia च्याच चौथ्या खंडात अंतर्भूत केलेले असावे, असे काही अभ्यासकांचे मत आहे. ⇨ काटलस या रोमन कवीने आपले Coma Berenices हे काव्य याच काव्याधारे रचिले आहे. Iambi मध्ये आयँबिक वृत्तात लिहिलेल्या लघुकविता आहेत. प्लेटो आणि सिसेरो यांच्या दरम्यान होऊन गेलेल्या प्रभावशाली वाङ्मयसेवकांत त्याचे स्थान वरचे आहे.

कुलकर्णी, अ. र.