लिसिअस : (इ. स. पू. सु. ४४५- इ. स. पू. सु. ३८०) ग्रीक वक्ता. त्याचे कुटुंब संपन्न होते. त्याचे वडिल मूळचे सिराक्यूसचे. पेरिक्लीझच्या निमंत्रणावरून ते अथेन्सला आले. प्लेटोला त्याच्या वडिलांबद्दल कौतुक वाटे आणि त्यांचे उत्कृष्ट वर्णन त्याने आपल्या रिपब्लिकमध्ये केलेले आहे. लिसिअसने वक्तृत्वशास्त्राचे शिक्षण इटलीत घेतले. इ. स. पू. ४१२ मध्ये राजकिय कारणास्तव हकालपट्टी झाल्यामुळे तो अथेन्सला परत आला. इ. स. पू. ४०४ मध्ये अथेन्सच्या नगर राज्यात लोकशाही संपुष्टात येऊन तीस हुकुमशहांच्या रूपाने एक स्वल्पतंत्र राजवट उभी राहिली होती. संपत्ती गोळा करण्यासाठी श्रीमंतांना अटक करण्याचे आणि त्यांची मालमत्ता ताब्यात  घेण्याचे सत्र ह्या राजवटीने आरंभले होते. लिसिअस आणि त्याच्या भाऊ पोलिमार्कस ह्यांनाही पकडण्यात आले. लिसिअस पळून जाऊन शकला परंतु पोलिमार्कसचा वध करण्यात आला. ‘ तिसांची हुकूमशाही’ ह्या नावाने ओळखली जाणारी ही राजवट इ. स. पू. ४०३ मध्ये नष्ट करण्यात आल्यावर लिसिअस अथेन्सला परतला तथापि तेव्हा त्याची आर्थिक स्थिती प्रतिकूल झालेली असल्यामुळे, न्यायालयात आपली बाजू मांडू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी प्रभावी भाषणे लिहून देण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला. पहिल्यांदा त्याने तीस हुकूमशहांपैकी एक आणि पोलिमार्कसच्या वधाला जबाबदार असलेला एराटॉस्थिनीझ ह्याच्यावरच खटला भरला. त्या संदर्भात त्याने केलेले प्रभावी भाषण ‘अगेन्स्ट एराटॉस्थिनीझ’ (इं. अर्थ) प्रसिद्ध आहे. लिसिअसने लिहून दिलेली भाषणे सु. दोनशे असल्याचे म्हटले जाते तथापि त्याची आज उपलब्ध भाषणे फक्त ३४ आहेत.

लिसिअसच्या भाषणांचे वैशिष्ट्य म्हणजे ती लिहिताना तो स्वतःला आपल्या अशीलाच्या जागी कल्पून, त्याच्याशी समरस होऊन जात असे. सहज, साधी भाषा तो वापरायचा परंतु त्या भाषेच्या अवगुंठनाआड अशीलाची बाजू न्यायालयाला पटवू पाहणारा अत्यंत प्रभावी युक्तिवाद दडलेला असे. त्याच्या भाषणांना अधूनमधून विनोदाचाही स्पर्श असे. पण त्याच्या भाषणांमध्ये भावविवशता फारशी आढळत नाही. सॉक्रेटीसचा बचाव करण्यासाठी त्याने एक भाषण तयार केले होते तथापि सॉक्रेटीसने त्याचा उपयोग करून घेण्याचे नाकारले, असे म्हटले जाते.

कळमकर, य. शं.