पालामास, कोस्टिस : (१३ जानेवारी १८५९ – २७ फेब्रुवारी १९४३). श्रेष्ठ ग्रीक कवी. जन्म पेलोपनीसमधील पट्रॅस येथे. वयाच्या सहाव्या वर्षी वडील निवर्तल्यानंतर त्याचे पालनपोषण मिसलाँगी येथे त्याच्या काकाने केले. आरंभीचे शिक्षण मिसलाँगी येथे झाल्यानंतर कायद्याच्या अभ्यासासाठी त्याने अथेन्स विद्यापीठात प्रवेश घेतला परंतु पदवी मिळण्यापूर्वीच तो तेथून बाहेर पडला. त्यानंतर पत्रकारी आणि समीक्षालेखन ह्यांवर त्याने काही काळ उदरनिर्वाह केला. १८९७ मध्ये अथेन्स विद्यापीठाचा सचिव म्हणून त्याची नेमणूक झाली आणि ह्या पदावर सेवानिवृत्तीपर्यंत (१९२६) त्याने काम केले.

अथेन्सचा नव-संप्रदाय ओळखल्या जाणाऱ्या वाङ्मयीन संप्रदायाचा संस्थापक आणि नेता म्हणून पालामासला अर्वाचीन ग्रीक साहित्यात विशेष मान्यता मिळालेली आहे. ह्या संप्रदायाने ग्रीक साहित्यातील अभिजात शैलीला कालजीर्ण म्हणून विरोध करून लोकसाहित्यातून आलेल्या आणि सर्वसामान्यांना जवळच्या अशा ‘डिमॉटिक’ किंवा लोकजात शैलीचा प्रखर पुरस्कार केला.

Tragoudia tes Patridos mou (१८८६, इं.शी. साँग्ज ऑफ माय कंट्री) हा त्याचा पहिला कवितासंग्रह. त्यानंतरच्या काव्यकृतींत Asalefte Zoe (१९०४, इं.भा. लाइफ इम्मूव्हबल), Dodecalogos tou Gyftou (१९०७, इं.शी. द ट्वेल्व्ह लेज ऑफ द जिप्सी) आणि I flogera tou Vasilia (१९१०, इं.शी. द किंग्ज फ्ल्यूट) ह्यांचा समावेश होतो. Trisevgene (१९०३, इ.शी. द. थ्राइस नोबल) ही त्याची नाट्यकृती. ह्या नाट्यकृतीखेरीज अन्य गद्यलेखनही त्याने केलेले असले, तरी तो मूलतः कवीच आहे. त्याच्यातील कवी ह्या नाट्यकृतीतूनही प्रकर्षाने प्रकटला आहे.

द ट्वेल्व्ह लेज ऑफ द जिप्सी आणि द किंग्ज फ्ल्यूट ही पालामासची महाकाव्ये. पहिल्या महाकाव्याला उत्कट भावकाव्याची डूब आहे. एका जिप्सी नायकाचा जीवनप्रवास त्यात चित्रित केला आहे. कला आणि स्वातंत्र्य ह्यांचे प्रतीक म्हणून हा जिप्सी आलेला आहे.

द किंग्ज फ्ल्यूट हे एक ऐतिहासिक महाकाव्य. बायझंटिन सम्राट दुसरा बेसिल ह्याने अथेन्सची आणि कुमारी मेरीच्या पवित्र स्थानाची केलेली यात्रा त्यात दाखविलेली आहे. राष्ट्रीय प्रेमाचा प्रगाढ ओलावा हे पालामासच्या एकूण कवितेचे एक लक्षणीय वैशिष्ट्य आहे. ग्रीकांच्या राष्ट्रीय आशाआकांक्षांची ती परिणामकारक अभिव्यक्ती आहे. भावगेय, जोमदार भाषा व विविध छंदांचा वापर ही त्याच्या कवितेची अन्य वैशिष्ट्ये. पश्चिमी आणि प्राच्य विचारसंचिताने संस्कारलेल्या दृष्टिकोणातून ग्रीकांचा इतिहास, त्यांच्या पुराणकथा आणि तत्त्वज्ञान ह्यांच्याकडे पाहणारा हा कवी होता. त्याच्या संप्रदायातून पुढे आलेल्या कवींनी लोकजात भाषेची अभिव्यक्तिक्षमता वाढविली. अथेन्समध्ये त्याचे निधन झाले.

कुलकर्णी, अनिरुद्ध.