होमर : थोर ग्रीक महाकवी.इलिअड आणिओडिसीह्या अभिजात ग्रीक महाकाव्यांचा कर्ता म्हणून प्राचीन ग्रीकांनी त्याचेनाव ह्या महाकाव्यांशी जोडले. यापलीकडे त्याची फारशी माहिती मिळत नाही. त्याची जन्मतारीख आणि जन्मस्थळ कोणते ह्याबद्दलही निश्चित माहिती ज्ञात नाही तथापि जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यिकांपैकी एक म्हणून ह्या कवीची गणना निश्चितपणे करता येईल. अत्यंत व्यापक अर्थाने विचार केला, तर त्याचे प्रभावक्षेत्र किती मोठे आहे, ह्याची कल्पना येऊ शकते. इलिअड आणि ओडिसी ही दोन महाकाव्ये अभिजाततेच्या युगात ग्रीक शिक्षण आणि संस्कृती ह्यांच्यासाठी पायाभूत ठरलेली होती. ग्रीकांनी ह्या साहित्यकृतींकडे केवळ साहित्य म्हणून पाहिले नाही, ही बाबही ह्या संदर्भात लक्षणीय ठरते. त्यांच्या दृष्टीने होमरची ही महाकाव्ये केवळ हेलेनिक ग्रीकांश ऐक्याचे प्रतीक नव्हती, तर नैतिक आणि व्यावहारिक शिक्षणाचा एक प्राचीन स्रोत म्हणूनही ती त्यांना महत्त्वाची वाटत होती. 

 

होमरसंबंधीचे गर्भित निर्देश आणि त्याच्या काव्यांतील उद्धृते इ. स. पू. सातव्या शतकाच्या मध्यापासून आढळतात. आर्किलोकस आल्कमन, कलायनस ह्या इ. स. पू. सातव्या शतकातल्या कवींच्या आणि सॅफो ह्या इ. स. पू. सहाव्या शतकातल्या कवयित्रीच्या आणि तिच्या समकालीन असलेल्या अन्य कवींच्या कवितांत होमरची शब्दकळा अनेकदा वापरलेली दिसते. होमरच्या महाकाव्यांतले प्रसंगही कलाकृतींचा विषय झालेले आहेत. होमर हा आयोनियाचा रहिवासी होता असे सर्व-साधारणपणे मानले जाते आणि त्यात तथ्य असावे कारण त्याच्या महाकाव्यांत आयोनियन बोलीभाषा लक्षणीयपणे वापरलेली आहे. बहुधा इ. स. पू. सातव्या शतकाच्या उत्तरार्धात रचिल्या गेलेल्या ‘हिम टू अपोलो ऑफ डिलॉस’ (इं. अर्थ) ह्या स्तोत्रात असा दावा केला गेला आहे, की ते स्तोत्र ‘खडबडीत’ केऑस येथे राहणाऱ्या एका अंध माणसाने लिहिले आहे. ह्या संदर्भात ओडिसी मधला एक प्रसंग निर्देशनीय ठरतो. डिमोडोकोस नावाचा एक चारण फिनिशियन राजाच्या दरबारात येतो. डिमोडोकोसचे वर्णन ‘ईश्वरी गायक’ असा केलेला असून कला-साहित्याची देवता म्यूस हिने त्याला गोड गीताची देणगी दिली परंतु दृष्टी हिरावून घेतली अशा आशयाचा निर्देश आहे. शक्यता आहे, की डिमोडोकोसच्या रूपाने होमरने स्वत:बद्दल सांगितले असावे आणि तसे असल्यास उपर्युक्त स्तोत्रात आलेल्या ‘अंध माणसा ‘च्या निर्देशाला पुष्टी मिळते. होमरचे वंशज केऑस या आयोनिक बेटावर राहात होते, असेही म्हटले जाते आणि आधुनिक अभ्यासक ह्या म्हणण्याशी सहमती दर्शवतात. 

 

इलिअड आणि ओडिसी ही महाकाव्ये एकाच कवीची, की दोन वेग- वेगळ्या कवींची, ह्याबद्दल वाद आहे. ह्याचे कारण ह्या दोन महाकाव्यांच्या स्वरूपात वेगळेपणा आहे. इलिअड हे मुख्यत: नाट्यात्म स्वरूपाचे असून त्यात एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेले योद्धे ग्रीक शोकात्मिकेतल्या अभिनेत्यांप्रमाणे बोलतात, तर ओडिसीतले निवेदन दैनंदिन भाषेला अधिक जवळचे आहे. ह्या दोन महाकाव्यांच्या संरचनेतही लक्षवेधी फरक आहे. इलिअडचे संविधानक एका ओघात पुढे जाते, तर ओडिसीत सहा सर्ग असून त्यांत प्रत्येकी चार भाग समाविष्ट आहेत. मानसशास्त्राच्या अंगाने जे अभ्यासक ह्या दोन महाकाव्यांकडे पाहतात, त्यांना ह्या दोन महाकाव्यांतून दिसणारे मानवी प्रतिसाद आणि वर्तणुकीमागची वृत्ती ह्यांच्यात स्पष्ट भेद जाणवतो. उदा., इलिअडमध्ये घोड्यांचे सौंदर्य आणि त्यांचा वेग ह्यांची प्रशंसा केलेली दिसते, तर ओडिसी मध्ये अश्वप्रशंसेत स्वारस्य दाखवलेले दिसत नाही. इलिअड मध्ये कुत्र्यांना उकिरडे फुंकणारे, असे म्हटले आहे तर ओडिसीमध्ये ओडिस्यूसचा इमानी म्हातारा कुत्रा आर्गॉस ह्याच्याबद्दल सहृदयतेची भावना व्यक्त केलेली आढळते. ही दोन महाकाव्ये वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या काळी लिहिली असावीत हे दर्शविणारा आणखी एक निकष सांगण्यात येतो. इलिअडमध्ये फिनिशियनांचा निर्देश कुशल कारागीर असा केलेला असून उत्तम धातुकाम आणि सुंदर वस्त्रे विणणारे म्हणून त्यांची प्रशंसा करण्यात आली आहे. तथापि ओडिसी मध्ये फिनिशियनां-बद्दलच्या ग्रीकांच्या भावनेत बरेच परिवर्तन झालेले दिसते. कुशल कारागीर म्हणून ग्रीक अजूनही त्यांना मानताना दिसतात तथापि त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी हिकमती लुच्चे, अशी आहे. इ. स. पू. सातव्या शतकात ग्रीकांच्या व्यापारात कार्थेजमधील फिनिशियनांनी प्रवेश करून त्यांच्याशी जी स्पर्धा सुरू केली, तिचे प्रतिबिंब ह्या बदलात दिसते. इतर अंतर्गत पुरावेही ओडिसी हे महाकाव्य इलिअडनंतर लिहिले गेले असे दर्शवितात. 

 

एक गोष्ट निश्चित ह्या दोन्ही महाकाव्यांची रचना मौखिक आहे तीलिहिली गेलेली नाहीत कारण मायसीनी संस्कृतीचा र्‍हास आणि अभिजात ग्रीक संस्कृतीचा उदय ह्यांच्या दरम्यानच्या काळात – म्हणजेइ. स. पू. बाराव्या शतकाचा उत्तरार्ध ते इ. स. पू. आठव्या शतकाचामध्य – ग्रीक त्यांच्या मायसीनियन पूर्वजांची लिपी विसरले होते आणि फिनिशियनांच्या लिपीशी त्यांची पुरेशी ओळख झालेली नव्हती. यावरून अभ्यासकांकडून असा एक तर्क केला जातो, की ही दोन्ही महाकाव्येइ. स. पू. आठव्या शतकाच्या अखेरीपूर्वी वा त्यानंतर अल्पावधीतच –म्हणजे दीर्घ काव्यरचना करण्याइतपत एखाद्या लिपीची ओळख झालेलीनसताना – रचिली गेली असावीत. अशा निरक्षर वातावरणात कोणताही समकालीन दस्तऐवज का उपलब्ध नसावा, ह्याचे कारण ह्यातूनच मिळते. 

 

होमरची स्तोत्रे (होमरिक हिम्स) ह्या नावाने निर्देशिली जात असलेली३४ प्राचीन ग्रीक स्तोत्रे आहेत. ‘हिरोइक हेक्झॅमीटर’ ह्या वृत्तात रचिलेली ही स्तोत्रे निरनिराळ्या देवदेवतांना उद्देशून आहेत. प्राचीन काळी ती होमरने रचिली, असे मानले जात होते तथापि ती वेगवेगळ्या काळी रचिली गेली आहेत आणि त्यांचे रचयिते अज्ञात आहेत. 

 

संदर्भ :1. Camps, W. A. An Introduction to Homer, 1980.

          2. Carpenter, Rhys, Folk Tale, Fiction and Saga in Homeric Epics, 1946.

          3. Clarke, Howard, Homers Readers : A Historical Introduction to the Iliad and the Odyssey, 1981.

         4. Fitzgerald, Robert, Trans., The Iliad, 1974, reissued 1984.

          5. Griffin, Jasper, Homer, 1980.

         6. Scott, Adam, Homer and His Influence, 1930.

         7. Webster, T. B. L. From Mycenae to Homer, 1958 reprinted 1977.

        8. Whitman, Cedric H. Homer and the Heroic Tradition, 1958. 

कुलकर्णी, अ. र.